रविवार, २४ जानेवारी, २०१६

कातरवेळ

कातरवेळ

अशी का मधेच
सोडून गेलीस
कोमल काळीज
तोडून गेलीस

स्वप्नांचा बंगला
मोडून गेलीस
वचनाचा भंग
करुन गेलीस

पाहीन मी वाट
मनी आहे आस
होईल पहाट
तुझा स्वप्नभास

शपथ देतो मी
परतून ये तू
आजन्म प्रेमाचे
वचन घे तू

************
संगिता भालसिंग
24/01/16

वेदना

***** चित्र कविता ****

*** जरासे ****
****************
वेदनेचे काटे
जरासे टोचू दे
कवनाचे फाटे
जरासे फुटू दे ...

स्वागताचे ताट
जरासे भरू दे
शब्दांचे थाट
जरासे करू दे ...

शब्दांचे माठ
जरासे झरू दे
लेखणीचे  भाट
जरासे गाऊ दे ...

किर्तीची लाट
जरासी ऊरू दे
प्रेमाची बट
जरासी धरु दे ...
***************

( सौ.संगिता भालसिंग )

काळोखी रात

🌷 चित्रशलाका 🌷
**************
प्रेमगीत
***************
रात्र गर्द काळोखी
कजव्यांचा प्रकाश
हात हातात सखी
ठेंगणे भासे आकाश

खट्याळ रातराणीचा
मंद मंद धुंद सुवास
बिलगली अशी सखी
घट्ट गुंतला श्वास

रातकीडयांची किर्र किर्र
भासे प्रेमगीत लकेर
माझ्या सुरात सुस्वर
मिसळलास अखेर

घुसळले प्रतिबिंब
संथ निळ्या पाण्यात
हरवून गेला निसर्ग
मधुर प्रेमाच्या गाण्यात
*****************
प्रा. सौ.संगिता भालसिंग

पत्र

******* शुभ कातर वेळ *****

कसे बसे पत्र तुला लिहिले
रडता रडता आसवानी भीजले
वाटले मनात झाले ते बरे झाले
कारण माझे मन तू न वाचीले
मनोगत माझे वाहून गेले

सौ.संगिता भालसिंग

शृंखला

भोगवस्तु अबला समजून
   शृंगारलेय तिला ....
      सावित्रीचा वसा सबला होऊन
         नाकारतेय शृंखला ....

प्रा.सौ.संगिता भालसिंग
...............................................................

जीभ

जीभ मऊ
   शब्द कड़क
     फोड़ी खड़क
         काळजाचा ....
************
प्रा.सौ.संगिता भालसिंग

सावित्रीबाई

आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले
यांची जयंती ...
विनम्र अभिवादन
*
सावित्रीबाई पाहताय न तुम्ही
साक्षर झालो शिक्षण घेऊन आम्ही
सही करायला शिकवली तुम्ही
पण सांगितले तरच सही करतो आम्ही

सत्तेची खुर्ची मिळते आम्हाला
पण निर्णय नाही घेत आम्ही
घरकामामुळ सभेला नाही जात आम्ही
सांगितले तर कागदावर सही करतोआम्ही

उत्तम पगाराची नोकरी करतो आम्ही
पण खर्चाचे नियोजन नाही करतआम्ही
संगणक वापरायला शिकतोयआम्ही
संगीतलेल्या कागदावर सहीकरतो आम्ही

गृहमंत्री म्हणून मिरवतो आम्ही
सर्वच मंत्रांचे अधिकार वापरतोआम्ही
निसर्गाने दिलेले दुय्यम स्थान विसरलो नाही आम्ही
संगितलेल्या कागदावर सही करतोआम्ही

प्रा.सौ.संगिता भालसिंग
3/1/15

(उपरोधिक रचना)

खरं नि खोट

पणकाय गंमत आहे पहा ...
खरं लवकर
खरं वाटत नाही....
पण
खोटं मात्र लवकर
खरं वाटतं ...
काय गंमत आहे पहा ...
खरं लवकर
खरं वाटत नाही....
पण
खोटं मात्र लवकर
खरं वाटतं ...
खोट्याला खोटं
भेटतं
खऱ्याला खरे
लवकर नाही भेटत
**************

प्रा. सौ.संगिता भालसिंग

गुरुवार, २१ जानेवारी, २०१६

मैत्री

     प्रथम क्रमांक प्राप्त चारोळी

       🌹मैत्री 🌹

विश्वासाच्या घडीव मनावर ,

स्नेहाचे सुंदर कोरीव लेणे ...!!

क्षणभंगुर जीवन प्रवासात ,

मैत्रीवीना ,व्यर्थ मानव जीणे ...!!

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

प्रा. सौ.संगिता भालसिंग
१६/०१/१६

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

तुझ्या भोवती

🌹 चारोळी स्पर्धा 🌹
🌹🌹🌹🌹🌹🌹
प्रथम क्रमांक प्राप्त रचना
********************

दिल्याघेतल्या अतूट वचनांच्या

सुमधुर आठवणी  सतावती ...

तुजविन उदास दिन अन् राती

मन रेंगाळते तुझ्याच भोवती ...

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
प्रा. सौ.संगिता भालसिंग
*********************

तुळस

*** तुळस *** 

तुळशी ग बाई 
तुझा जन्म रानी - वनी 
ये ग माझ्या अंगणात 
जागा देते वृंदावनी ।। १ ।। 

तुझ्या प्रेमाच्या भजनात 
दंग जाहले मी मनी 
अशी आली बहरत 
दरवळ पसरला जनी ।। २ ।। 

बाळ कृष्णाच्या शोधात 
फिरले मी लोक तिन्ही 
नंद-यशोदेच्या गोकुळात 
स्थळ हे झोकात ।।३ ।। 

छान वाढली अंगणात 
झाली तयारी जोरात 
अशी वाजत - गाजत 
आली दारात वरात ।।४ ।। 

लग्नाला या हो तुम्ही 
नका करू हो आळस 
अशी लाडा कोड़ाची 
माझी साजिरी तुळस ।।५।। 

सौ.संगिता भालसिंग
.४/११/२०१४.

मंगळवार, १९ जानेवारी, २०१६

मन

स्वानुभव

संपत्ती सांभाळणे खूप
सोपे असते ....मात्र
दुसऱ्याचे मन सांभाळणे
खूप कठीण असते ...!!
******************
सौ.संगिता भालसिंग

का आता ?

का आता

माझीच सावली दमली का आता
वेदना कुरवाळण्यात रमली का आता

दुःखभार साहवेना मला का आता
तुझ्यावीना राहवेना मला का आता

प्रश्नांची उत्तरे मिळेना का आता
दुःखाचा घोट गिळेना का आता

सुखावर मन जडेना का आता
मलाच मी आवडेना का आता
************************
प्रा. सौ.संगिता भालसिंग

एकमत वर्तमान पत्रात प्रकाशित रचना

सजना

सजनाच्या प्रेमात
हर्ष दाटला मनात ....
अलवार प्रेम सांगते
सजनाच्या कानात ....

सौ.संगिता भालसिंग

सोमवार, १८ जानेवारी, २०१६

विठुचे चरण

विठुच्या चरणी
झिजविला देह
आनंदाचा डोह
लाभलासे ...

सौ.संगिता भालसिंग

सुई

      सुई

सुई बाई सुई
किती तुला घाई ..?
पुढे शिवत जाताना
मागे जोडत जाई ....

गुण तुझा घ्यायला
कळेल का माणसाला ?
भांडून तोड़तो मन
शिकव जोडायला ....

जन्म मरणाची
असे वाट एकच
स्त्री अन् पुरुष
जगी जाती दोनच ....

जगा अन् जगु दया
मंत्र हा पाळा
फोड़ा अन्  झोडा
तंत्र आता टाळा ....

आदर्श सुईचा
ठेवा रे समोर
प्रेमानंदी मनोमनी
नाचू दया रे मोर ....

प्रा.सौ.संगिता भालसिंग

गौराई

गौराई

आल्या आल्या घरा
लाडक्या गौराई
लिंबलोन बाई
उतरु या ....

पैठणी सुंदर
जरीच्या काठाची
नथनी सोन्याची
नाकामधी ....

मोत्याच्या पाटल्या
हातात दाटल्या
कुड्या कानातल्या
चमचम् ...

शेजारी बसला
बंधू गणपती
अलवार प्रिती
बंधवाची ...

लाडू नि कारंज्या
पोळी पुरणाची
ताटली चांदीची
भोजनाला ...

सजले मखर
चंदनाचा पाट
गौराईचा थाट
वर्णु किती ...?

*******************
प्रा.सौ.संगिता भालसिंग

जय गणेश

जय गणेश जय गणेश देवा

मनापासून करतो तुझी सेवा ....

दे आम्हास सदबुद्धिचा ठेवा

वाजेल जीवनात सुरेल पावा ....

*************************
प्रा.सौ.संगिता भालसिंग

बेभान

संकटे धाऊन
येऊ दे बेभान ...
देवा दे रे दान
फ़क्त सख्त मन ...
****************
प्रा.सौ.संगिता भालसिंग

शिक्षक-गुरु


सोनेरी किनार असते
गुरु शिष्याच्या नात्याला
ज्ञान देऊन गुरु दूर करितो
अज्ञान अणि अंधकाराला ...
रक्ताच्या नात्याची गरज नसते
असे एक हृदयात नाते वसते
गुरु म्हणजे जणू परिस असतो
शिष्याचे तो सुवर्ण बनवितो ...
उमलत्या कळ्याआड़ दड लेले
शास्राज्ञ,कलावंत,संत शोधतो
बालकांच्या अनामिक भविष्यात
भूतकाळाची पावले शोधतो ...
बालकांच्या मनी ज्ञानबीज पेरतो
शील चारित्र्याचे ख़त पाणी घालतो
बहरलेल्या फुला फळांची वाट पाहतो
फुल लेली बाग पाहून धन्य होतो ...
हाती ढाल काळ्या फळयाची असते
शुभ्र् खडूची धारदार तलवारअसते.
छडी अणि शब्दांचे वारही करतो
कौतुकाने पाठीवर थापही देतो ...
वर्तनात कधी भेदभाव नसतो
मनात सदा समभावच वसतो
कधी कुणाचा बांध रेटत नाही
प्रयत्न करतो जोवर ज्योत पेटत नाही
भविष्याकडे डोळे लावून
उद्याचा भव्य उषःकाल पाहतो
कुंभाराच्या मडक्या प्रमाणेच
देशप्रेमी नागरिक घडवितो ...
बदलत्या जगाची जाणीव ठेवतो
मुल अणि पालकानाही समजून घेतो
लखलखत्या उगवतीला सलाम ठोकतो
सर्वांशी जमवून घेत जीवन जगतो
अभिमानाने जगात मिरवतो
अनेक मुलांचा बाप म्हणवतो
नसे कुणाला असे भाग्य
गुरु चरणी मी नतमस्तक योग्य ...
************************
सौ.संगिता भालसिंग

गुरु परंपरा


 5 सप्टेंबर - शिक्षक दिन 
*************************
ब्रह्मानंदं परम सुखदं
केवलं ज्ञानमूर्ति |
द्वंद्वातितं गगन सदृशं
तत्वमस्यादि लक्ष्यम् ||
एकं नित्यं विमलचलं
सर्वधीसाक्षीभूतं |
भावातीतं त्रिगुणरहितं
सदगुरुं तं नमामि ||
अर्थ -
ब्रह्माचा आनंदरूप,परमसुख रूप,
ज्ञानमूर्ती,द्वंद्वा पासून दूर,आकाशा
सारखा निर्लेप व सूक्ष्म,तत्वामसि,
तोच तू आहेस,हे ईश् तत्व तूच आहेस,
त्याची अनुभूती हेच ज्याचे
लक्ष्य आहे;अद्वितीय,नित्य,विमल,
अचल,कोणत्याही भावाच्या पलीकडे
त्रिगुण रहित अशा सदगुरुला
मी नमस्कार करतो .
भारतात पूर्वी गुरु परंपरा होती .
मी कोणाचा तरी आहे हा
मधुर भाव त्यात असतो .
या भावनेत कृतज्ञता होती .
जनकाचे गुरु याज्ञवल्क्य होते .
शुक्रचार्य चे गुरु जनक होते .
सांदीपनी चा शिष्य म्हण वुन
घेण्यात कृष्ण व् सुदामा गौरव
मानत होते .विश्वामित्राची सेवा
करण्यात राम व लक्ष्मण कधी
थकत नव्हते .वेद,उपमन्यु किंवा
आरुणी याना धौम्य ऋषी गुरु
लाभले याबद्दल ते स्वतः ला
धन्य समजत होते .द्रोणाचार्याबद्दल
अर्जुनाच्या मनात असलेला नाजुक
भावच त्याला युद्धकर्तव्यात थोडा
शिथिल बनवतो . परशुरामापासून
ज्ञान प्राप्त करुण घेण्यासाठी
कर्णाने खुप कष्ट घेतले . शुक्राचार्य
पासून संजीवनी विद्या प्राप्त करणाऱ्या
कचाची ज्ञान निष्ठां व् गुरुभक्ती
आजही आपल्याला नतमस्तक
बनवते .
पाश्चात्त्य देशात ही" मी अमक्याचा
शिष्य आहे " असे मानण्या त
गौरव मानतात . मी सॉक्रेटीस चा
शिष्य आहे असे समजन्यात
प्लेटो धन्य समजत होता  अणि
प्लेटो माझा गुरु आहे असे सांगण्यात
अरीस्टोटटल गौरव मानत होता .
   अशी महान गुरु परंपरा आपल्या
देशात अणि परकीय देशात सुद्धा
लाभलेली आहे .अशा परंपरेचे
आपण वारसदार आहोत .आज
शिक्षक दिनाच्या दिवशी या
गुरु परंपरेचा सन्मान करू या .
    ज्याचा ज्याचा घेतला गुण
   तो तो गुरु केला जाण ..!!
या न्यायाने ज्यांच्या ज्यांच्या कडून
आपल्याला ज्ञान कण मिळतात
ते सर्व आपले गुरु म्हणजे शिक्षक
आहेत .श्री दत्त गुरुनी सुद्धा 24
गुरु केले होते .
भारतीय संस्कृतिने गुरु ला
खुप महत्त्व दिलेले आहे .
अशा ज्ञानगुरु ला आज
शिक्षक दिनाच्या निमित्ताने
वंदन ...!!
********************
प्रा.सौ.संगिता भालसिंग

भेट ....


आपली भेट झाली
एका अवघड़
वळण वाटेवर ...
जिथे थांबणं शक्य नव्हतं ..
अन् टाळणंही शक्य नव्हतं ...
शेवटी..
केशर जसे दुधात
तशी मी तुझ्यात
अन् तू माझ्यात
असे काही
गेलो विरघळुन  .....
जे मला नी तुलाही
नाही आले कळून ...
******************
सौ.संगिता भालसिंग

स्पंदन

तुझ्या काव्याचा अर्थ

किती गहन अन् खोल ...

जणू हृदयाचे गुढ़ स्पंदन

गाती कवितेचे धुंद बोल ...

********************
प्रा.सौ.संगिता भालसिंग

माझे भाऊ

🌻 माझे भाऊ 🌻

चंद्र सूर्यावानी
तेजाळते माझे
दोन भाऊ राजे
आवडते ...

मोठा माझा भाऊ
पित्याच्या ठिकाणी
लाड़की वहिनी
आई वानी ...

करारी बाण्याचा
सूर्याच्या तेजाचा
मोकळ्या मनाचा
साधा भोळा ...

शित चंद्रावानी
असे तो धाकटा
राहीना एकटा
आम्हा विना ...

असती ते दूर
मनी हुर हुर
आसवांचा पूर
वाहतसे ...

ओवाळीते माझ्या
नयनांच्या ज्योती
अतूट ही प्रिती
वर्णु किती ...

भावंडाच्या खोडया
आठवती फार
माहेराचे घर
काळजात....

*****************
प्रा.सौ.संगिता भालसिंग

माझी कन्या

🌻 माझी कन्या  🌻

एक घास चिऊचा
एक घास काऊचा
आ कर जरासा
घास घालते गोडसा ..

उपाशी नको राहू
माझी लाड़की राणी
मुखड़ा दिसतो बघ
कसा उदास वानी ...

तू जेवली नाही तर
मला वाईट वाटते
सारे लक्ष माझे
तुझ्या कडेच लागते ...

चिऊ काऊचा घास
घे गोड मानूंन ...
तुझ्या साठी माझा
जीव जातो शिणून ...

जेव जरा पोट भर
छान झोप येईल
मी अंगाई गाईल
तुला झोपी लावील

हात फ़िरविंन तुझ्या
मऊ केसा वरुन
जीवा ओवाळीन
राणी तुझ्या वरुन

****************
प्रा.सौ.संगिता भालसिंग

रविवार, १७ जानेवारी, २०१६

तुझं माझं नातं

नातं

तुझं माझं नातं
जरी नवं होतं
तरी मला किती
ते हवं हवं होतं ....

    तुझ्या डोळ्यात
     माझं गावं होतं
      माझं मन सतत
      तिथे धाव घेतं ...

प्रेमाचं गाव सखे
तुजविना रितं होतं ...
सुखाचा प्याला सखे
तुजसवे पित होतं ...

*****************

सौ.संगिता भालसिंग

कविता

    कातरवेळ 

राघू गेला दूरदेशी
ती मैना उंबऱ्याशी
खेळते आठवणीशी
पाणी दाटे पापण्याशी
रंगीबेरंगी जखमा
जाहलेल्या कधीकाळी
निघाल्या काळ्या खपल्या
या  गुढ कातरवेळी
कातरवेळी आठवे
सख्या अत्तराचे थेंब
नयनातून ओघळे
माझ्या आसवांचे थेंब
सांजवेळी  आठवणी
मन माझे भरलेय
काळजात माझ्या तुझे
गोड लेणे कोरलेय
सुखकर आठवणी
करू सखे साठवणी
दुखकर आठवणी
करू सखे पाठवणी

प्रा. सौ.संगिता भालसिंग

फुंकर

कुणाच्या दुःखाचे भांडवल करु नये

कुणाच्या दुःखावर मीठ चोळू नये

हळुवार घालून फुंकर

सुखाचा ऐकावा हुंकार ...

*******************
सौ.संगिता भालसिंग

अथांग सागर

चित्रशलाका( चित्रकविता )

अथांग सागर अन कातळ काळा
धड़धड़त्या छातीशी कवटाळले बाळा

नजरेत दिसे तिच्या मदतीची याचना
काय करावे,कसे वाचवावे ते कळेना

उरी फूटे बाळास्तव अमृत पान्हा
वस्त्राचे भानही तिला नाही पहा

अशा शिल्पाला काहीही म्हणा
पण न विसरावा तिचा दृढ़ कणा

*****************************

प्रा.सौ.संगिता भालसिंग

रे घना

रे घना ,
चल जरा माझ्या गावी
अणि बघ जरा कोलाहल
दुभंगलेली धरणी अणि
पोपडे आलेली माती ...
आसुसली आहे तुझ्यासाठी
वाट पाहतेय तूझी चातका सारखी
बरस जरा प्रेमाने
तिचे गर्भारपण पहा आनंदाने
तिचे डोहाळे पुरव रे घना ...
कशी फुलेल ती तुझ्या विना
तिच्या कुशीत वाढू दे रे
तुझीच मुले बाळे ....
पाने-फुले,फळे अणि
वृक्ष वेली लता ,प्राणी-पक्षी
तसेच माणूस सुद्धा ...!
ती खुप प्रेमाने तुझा संसार फुलविल
संसाराचा आनंद घे जरा ..
सुख दे अणि घे सुद्धा ...!
नकोस राग धरु कधी तिचा
इतका बरस की, ती तुझ्या
प्रेमाने चिंब चिंब न्हाउन जाईल ...
**************************
सौ.संगिता भालसिंग

रक्ताळलेले शब्द

रक्ताळलेले शब्द तुझे

साहते जराशी हसून

काळजावर दाग माझे

ठेविते उराशी पुसून ...

*********************
सौ.संगिता भालसिंग

संपत्ती

पाहून संपत्ती मंदिराची

विस्फारले डोळे ......

नजरेने टिपले शाळेचे

पावसाचे छत गळे ...

शाळेला दान जनता

का करत नाही ...?

जेथे देशाचा कणा

घडत राही ....

******************
सौ.संगिता भालसिंग

ढग

कुठून कुठून येतात ढग

नयनी पाणी देऊन जातात मग

शमवितात मनाची धग

फुलवितात जीवन मग

******************
सौ.संगिता भालसिंग

सखे

सखे,

नको होऊ इतकी कठोर
सोड भूमिका तुझी ताठर

खुप ताणले की तुटतेय
नि दोन्ही बाजूला लागतेय

वेड्यासारखी का वागतेय ..?
सजा देतेय की भोगतेय ...?

तुझीच काळजी वाटतेय
जीवन सत्य नाकारतेय

सरत्या जीवनी भेटतेय
ते सुख तूच लाथाडतेय

हार नि जीत हवी कशाला ...?
सख्याचा हात घे तू ऊशाला

प्रेमानेच द्वैत मिटतेय
नि नवपालवी फुटतेय ...

**********************
सौ.संगिता भालसिंग

लेख- माझा अनुभव

स्वानुभव ....

फेब्रुवारी महीना म्हणजे शाळा
अणि कॉलेज मधे मौखिक
परीक्षा सुरु असतात .
सर्व विद्यार्थ्यांशी समोरा समोर
संवाद करण्याची संधी मिळते.
जी वर्षभर खुप कमी मिळते.
कारण वर्गात मुलांची संख्या
खुप अधिक असते .प्रत्येक
विद्यार्थ्याशी बोलणे शक्य नसते
तसेच अभ्यासक्रम निर्धारित वेळेत
पूर्ण करण्याचे बंधन असते .
शिवाय सर्वच विद्यार्थी शिक्षकांशी
संवाद करायला किंवा आपली
समस्या सांगायला तयार असतील
असे नाही .....
त्यामुळे मौखिक परीक्षा ( तोंडी
परीक्षा )च्या निमित्ताने मी
मुलांची परीक्षा घेताना बरेच
प्रश्न विचारुन त्याना बोलते करते
----मागील वर्षी ची घटना ...
इयत्ता 12 वि च्या मुलांची
मौखिक परीक्षा चालू होती .
30 मुलांची एक बैच असते
बोर्ड परीक्षेच्या क्रमांका नुसार
ही परीक्षा सुरु झाली. शेवट चा
विद्यार्थी माझ्या समोर परिक्षेला
आला .
तो मुलगा 40 टक्के अपंग होता.
थोडा गतिमंद ही होता .बोलणे
अणि चालणे दोन्ही अडखळत
होते . मात्र स्वभाव खुप छान
होता त्याचा . त्याच्याशी संवाद
वर्षभर संवाद कमीच् होत होता .तो
होस्टेलला राहत होता .पण त्याने
कधी त्याचे प्रॉब्लम सांगितले
नाहीत .पण त्या दिवशी त्याचा
चेहरा खुप उदास दिसत होता .
मला शंका वाटत होती काहीतरी
म्हणून मी त्याला प्रश्र विचारले
तेंव्हा त्याने सांगितले की,
कालपासून त्याने जेवण केलेले
नाही .....!
बापरे ...हे ऐकून मला खुप वाईट
वाटले . आम्हाला तू का सांगितले
नाही ? अणि जेवण का केले
नाही? आजारी आहेस का ?
माझ्या प्रश्नांचा भडीमार सुरु
झाला.पण तो काही न बोलता
केविलवानणे माझ्या कड़े पाहत
होता. काय बोलावे हेच त्याला
सुचत नव्हते ...!
शेवटी त्याच्या मित्राने सांगितले
की तो जेवणाच्या वेळेला नेमका
हजर नव्हता अणि तो गेला तेंव्हा
अन्न संपले होते . अणि त्या
मुलाने हे कोणाला च सांगितले
नव्हते ..
हे सर्व ऐकून माझेच डोळे
पाणावले ..!! मी त्यालाही अणि
त्याच्या मित्रानाही रागवल
आम्हाला का सांगितले नाही
म्हणून किंवा मित्रानी त्याला
मदत का केली नाही .
शेवटी पर्स मधून पैसे काढले
त्याला दिले अणि जा म्हणाले
आधी जेवण कर ...!!
************************
गुरु अणि शिष्य यांचे असेही
एक सुंदर नाते ....
************************
सौ.संगिता भालसिंग

कविता

🌻 दुष्ट काव्यचोरांनो 🌻

***********************

किंचितही प्रतिभा नसे स्वतःची
मात्र कविता चोरता लोकांची

ठेवा थोड़ी लाज शिलकीची
जनांची नाही तर मनाची

चाड ठेवा जराशी नितिमत्तेची
दुष्ट मती तुमची हलक्या प्रतीची

अशी हास्यास्पद कृती तुमची
ताजमहालावर नाव कोरण्याची

हौस किती ती मिरवण्याची
लोकांचे कपडे घालण्याची

भूक किती आधाशीपणाची
लोकांचे ऊष्टे खरकटे खाण्याची

काव्य चोरांनो याद ठेवा शापाची
झोप येणार नाही कधी शांततेची

कल्पना नाही तुम्हा काव्य सागराची
पर्वा नसे आम्हाला दोन थेंबाची

**************************
सौ.संगिता भालसिंग

बाजार

बाजार

श्रद्धेचा बाजार

फलून आलाय

भूलूंन गेलाय

भोळा भक्त ...

*************
सौ.संगिता भालसिंग

सावली

पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही

तेवढा जिव्हाळा मैत्री मधुन मिळतो,

मैत्री मधल्या सावलीचा खरा अर्थ

कडक उन्हातून आल्यावरच कळतो...

***************************
सौ.संगिता भालसिंग

सुख दुःख

सुखाला ही टाळावे लागते

कधी कधी ...अणि

दुःखाला कवटाळावे लागते

कधी कधी ...

**********************
सौ.संगिता भालसिंग

सखे जागी हो

🌻 सखे,जागी हो 🌻

सखे,विसरु नको,तुझी जागा
नको करु विना कारण त्रागा

सखा येतो खुप दमुन भागुन
स्वागत कर जरा गोड हसून

सारा शिण भाग जाईल निघुन
आलाय जगाशी दोन हात करुन

मायेने फिरव हात डोक्यावरुन
विसावेल तुझ्या कुशीत शिरून

दुःखाचे क्षण ही जातील विरुन
पंखात येईल बळ भर भरून

************************
सौ.संगिता भालसिंग

सूर्य नारायणा

अरे सूर्यनारायणा

तापू नको फार

लड़का बंधुराया

बाहेर सुकुमार

*********

संगिता भालसिंग

कलाकृती

नजर नि कल्पना यातून

सुंदर अविष्कार घडतात

मनमोहक कलाकृती

नयनात जडतात ...

***************
सौ.संगिता भालसिंग

मैत्री

विश्वासाच्या घडीव मनावर

स्नेहाचे सुंदर कोरीव लेणे

क्षणभंगुर जीवन प्रवासात

मैत्री वीना व्यर्थ मानव जीणे

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

प्रा. सौ.संगिता भालसिंग

सांग दर्पणा

सांग दर्पणा मी कशी दिसते ?

साज शृंगार करुनी छबी न्याहाळीते ...

प्रतिबिंब सख्याचे कुंकवात पाहते ...

सख्याच्या प्रेमात अविरत नाहते ...

ओझे सुख दुःखाचे आनंदे वाहते

सौ.संगिता भालसिंग

द्वंद्व

द्वंद्व

कधी कधी कातडी
सोलवटून निघतात
कोमल मनाची ....
कारण कळत नाही
पण,असते आठवण
कुणाच्या ऋणाची ....
ऋण कोणते अन् कधी
याचीही जाणीव नसते
कधी कधी ....
परतफेड करावी की
करु नये ..?
द्वंद्व स्वतः शी .....
कशी करावी प्रश्न मनाशी ....
की जीवनभर ओझे वहावे
न कुरकुरता ...?
प्रश्न,प्रश्न अणि प्रश्न ..!!
उत्तर शोधत शोधत ...
येईल शेवटचा श्वास ...
********************
सौ.संगिता भालसिंग

झुंजार छावा

झुंजार छावा शिवबाचा
शतदा नमन करू या
कर्दनकाळ मोगलांचा
स्मृतिदिनी स्मरू या ..
*********************
सौ.संगिता भालसिंग

कविता- जिजाऊ माऊली

 जिजाऊ माऊली 🌻
धन्य धन्य जिजाऊ माऊली 
त्रिवार वंदन ते तुजला 
किर्ती दशदिशा पसरली
राजा शिवाजी तू घडविला ...

राम कृष्ण कथा त्या सांगुनी
सुसंस्कार बीज तू पेरले
अभिमानी स्वाभिमानी तू
स्वसुख दूर दूर सारीले

प्रेरणा स्वातंत्र्याची ती मोठी
स्वराज्य तोरण ते बांधिले
जाती धर्म भिंती त्या पाडुनी
गड कोट किल्ले बनविले ...

मोगलाना पाजिले ते पाणी
शिवाजींची महान करणी
शब्द मान तुझा तो राखुनी
साफल्य ते राज्यभिषेकानी ...

समाधानी तो देह ठेविला
आत्मा अमर तो जाहला
मरुनीया जिवंत राहिली
गातो आम्ही तुझ्या त्या किर्तीला

आशीर्वाद द्यावा तू आम्हाला
घराघरात जन्मों शिवाजी
कुर्बान पुत्र तो करण्याला
अफाट शक्ती दे नारीला
**********************
सौ.संगिता भालसिंग

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...