क्रश
सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची.
"पेपर... पेपर..."
तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं.
सई... सोळा वर्षांची, साधी, निरागस. मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी. आई शिलाईचं काम करायची, बाबा बँकेत लिपिक होते. घरात श्रीमंती नव्हती, पण माणुसकी आणि संस्कार भरपूर होते.
पेपर टाकायला दररोज एक मुलगा यायचा. नाव होतं आदित्य.
गोरा वर्ण, घाऱ्या डोळ्यांत आत्मविश्वास, किंचित सोनेरी झलक असलेले सुंदर आणि दाट केस , स्वच्छ कपडे, चेहऱ्यावर नेहमीच हसू. जुन्या सायकलीवर तो संपूर्ण परिसरात पेपर वाटायचा आणि नंतर कॉलेजला जायचा.
सईला त्याचं रूप आवडत होतं; पण त्याहून जास्त त्याचा स्वाभिमान.
एक दिवस पाऊस कोसळत होता. रस्ते चिखलाने भरले होते. तरीही आदित्य वेळेवर पेपर टाकून गेला. सई खिडकीतून त्याच्याकडे पाहत होती.
"एवढ्या पावसातही हा काम चुकवत नाही," ती मनात म्हणाली.
हळूहळू तिच्या दिवसाची सुरुवात त्याला पाहिल्याशिवाय व्हायचीच नाही.
तो दिसला की तिच्या चेहऱ्यावर हसू यायचं.
तो गेला की पुन्हा पुस्तकांत डोकं.
त्यांच्यात कधी बोलणं झालं नव्हतं. फक्त नजरा भेटायच्या... आणि दोघेही हलकंसं हसायचे.
एके दिवशी पेपर उचलताना सईची वही खाली पडली.
आदित्यने सायकल थांबवली. वही उचलून तिच्या हातात दिली.
"छान अभ्यास कर... मोठी हो," एवढंच म्हणाला.
ते चार शब्द सईने मनात जपून ठेवले.
त्या दिवसापासून तिच्या अभ्यासाला जणू नवी दिशा मिळाली.
तिने ठरवलं—
"फक्त कोणावर प्रेम करून आयुष्य घडत नाही; स्वतःला घडवलं तरच प्रेमाची किंमत समजते."
काही वर्षं गेली.
बारावी, पदवी, स्पर्धा परीक्षा...
सई अधिकारी झाली.
एका कार्यक्रमात तिचं प्रमुख पाहुणी म्हणून स्वागत होत होतं.
कार्यक्रम संपल्यावर गर्दीतून एक परिचित चेहरा पुढे आला.
"ओळखलंस?"
ती क्षणभर थबकली.
"आदित्य...!"
तो हसला.
"आजही सकाळी पेपरच वाटतो. पण आता माझी स्वतःची एजन्सी आहे."
दोघेही काही क्षण शांत राहिले.
सई म्हणाली,
"तुझ्या त्या एका वाक्याने माझं आयुष्य बदललं होतं."
आदित्य हसत म्हणाला,
"आणि तुझ्या मेहनतीने त्या वाक्याला अर्थ दिलास."
दोघेही एकमेकांकडे पाहून हसले.
कोणताही प्रेमाचा प्रस्ताव नव्हता.
नाट्यमय शेवट नव्हता.
फक्त एक गोड, निरागस "क्रश" सुंदर आठवण बनून मनात कायमचा जिवंत राहिला.
काही भावना प्रेमात बदलल्या तर नशीब, आणि आठवणीत जपल्या तर आयुष्यभराचं हसू बनतात.
Sangita Bhalsing
Ahilyanagar
Maharashtra






