बुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१८

नाते

21 आनंदकंद
गागालगा लगागा गागालगा लगागा

जोडू नकोस नाते , आता उगीच वरवर
सोडून काल गेला , पडले विशाल अंतर

ती सांजवेळ होती , हातात हात होता
दाबून टाकलेली , ओठात काल थरथर

तू चढवलास झोका,डोळे मिटून होते
आंब्यास बांधलेल्या , झोक्यात काल गरगर

दावू नको जगाला , काळीज फाटलेले
धागे कसे बसे ही , जोडून आज भरभर

श्वासात श्वास होता , विश्वास काल होता
नात्यास लागलेली , बाधीत आज घरघर

होत्या चुका कुणाच्या , हे आज सांगताना
वागू नकोस खोटे , बोलून आज चरचर

थांबू नकोस आता , सांधू नकोस आता
कापून टाकलेले , काळीज आज करकर

स्वप्नात मांडलेली , वचने नकोस काढू
या जीवनी तसेही , घडते असेच जरतर

ही संगिता मनाने , बांधून वेदनेला
ते शेर काळजाचे , गजलेत आज भरभर

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

जरतर

वृत्त- आनंदकंद

गागालगा लगागा गागालगा लगागा

जोडू नकोस नाते आता उगीच वरवर
सोडून काल गेली पडले विशाल अंतर...

ती सांजवेळ होती हातात हात होता
दाबून टाकलेली ओठात काल थरथर...

तू चढवलास झोका,डोळे मिटून होते
आंब्यास बांधलेल्या झोक्यात काल गरगर...

दावू नको जगाला काळीज फाटलेले
धागे कसे बसे ही जोडून आज भरभर...

श्वासात श्वास होता विश्वास काल होता
नात्यास लागलेली बाधीत आज घरघर...

होत्या चुका कुणाच्या हे आज सांगताना
वागू नकोस खोटे बोलू नकोस चरचर...

थांबू नकोस आता सांधू नकोस आता
कापून टाकलेले काळीज आज करकर...

शब्दात मांडलेली वचने नकोस काढू
या जीवनी तसेही घडते असेच जरतर...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

घरधनी

💐🌹घरधनी🌹💐

घरधनी प्रिय माझा
मोठ्या दिलाचा असे राजा
गोरया भाळी शोभतसे
सौभाग्याचा टिळा माझा ||१||

घरधनी प्रिय माझा
त्याची काय सांगू बात ?
गुणगान सारं करता
शब्द कमी पडतात ||२||

घरधनी प्रिय माझा
चार लोकात मान सन्मान
ऐकाया भारी कवतिक
सदा आतुरले कान ||३||

घरधनी प्रिय माझा
शूरवीर चाले झोकात
माझे सुख सारे
खरे त्याच्याच सुखात ||४||

घरधनी प्रिय माझा
शिरी शोभतो पटका
माझ्या प्रेमातुन नाही
सात जन्मही सुटका ||५||

..........................
प्रा.सौ.संगिता भालसिंग
20/1/15

मंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१८

वेदना

सूर्य डोळयात ठेऊ नकोस

वेदनाही पेटेल ना

चंद्र डोळयात येऊ दे

वेदना थंडावेल ना ....

सौ.संगिता भालसिंग
30/10/14

अंतरंग

जलौघवेगा
लगालगागा लगालगागा

अंतरंग

दुखावलेल्या अशा मनाला
कधीच दावू नये जनाला...

लढा कुणाशी धडा कुणाला
उगीच शक्ती नको पणाला...

असा नको रे बळी पडू तू
क्षणिक मोहातल्या क्षणाला...

कमावलेल्या परावयाच्या
नकोस स्पर्शू दुज्या धनाला...

दुखावले पोट दोष कारे
उगीच अन्नातल्या कणाला...

मलिन रे अंतरंग झाले
उगाच का सजवतो तनाला...

Sangita Bhalsing

मलिका

तुझ्या अधीर मनात असते
अनुत्तरित प्रश्नांची मालिका ..

पण सदा लक्षात ठेव सखी
तूच माझ्या दिलाची मलिका ...

Sangita Bhalsing

आक्षेप

।। आक्षेप।।

लेखन माझे
विचार माझे ,
कागद माझा
पेनही माझा ..

भावना माझी
शब्दही माझे ,
चारोळी माझी
काव्यही माझे ..

मी ही तुझी
तू ही माझा ,
व्यक्त होताना
आक्षेप तुझा ..?

Sangita Bhalsing

रविवार, १४ ऑक्टोबर, २०१८

रण रागिणी

बनू नकोस सीता
त्या रामाची
लोक तुला
अबला म्हणतील ...

बनू नकोस द्रोपदी
त्या पांडवांची
लोक तुला
वाईट म्हणतील ...

बन जिजाऊ
त्या शिवबाची
लोक तुला
आदर्श माता म्हणतील ....

बन सावित्री
त्या ज्योतिबाची
लोक तुला
क्रांतिज्योती म्हणतील ....

बन राणी
त्या झाशीची
लोक तुला
रण रागिनी म्हणतील .....

Sangita Bhalsing

Ahmednagar...
.

मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१८

दसरा आला

दिंडी
9+10 = 19 मात्रा

दसरा आला

साफसूफ करा,अंगण घर नि दार
दसरा आला रे , दिन राहिले चार...

तना बरोबरच , मनही स्वच्छ करा
सद्गुणांनी करा,दुर्गुणांवर वार...

सोन्यासारखे , प्रेम देता घेता
जाती धर्मास ,कराच हद्दपार...

मानवी मूल्य , स्वातंत्र्य समता
पळवून लावा,विषमता आजार...

माणुसकीचा दिप ,पेटवा सर्वत्र
सुखाचा प्रकाश  ,येईल रे बहार...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

सूर

ओळखीचे सूर होते
ते जरीही दूर होते
भेटण्याची आस होती
पण मनी काहूर होते

Sangita Bhalsing

स्त्री शेतकरी

सबला स्त्री शेतकरी
मातीचे सोने करी

संकट मालिका जरी
धैर्य वसते तिच्या करी

Sangita Bhalsing

शुक्रवार, ५ ऑक्टोबर, २०१८

स्वाभिमान

अभिमानाने वागणे पसंत नाही
स्वाभिमान त्यागण्यास उसंत नाही
जशास तसे वागणे आवडते
सोडून दयायला मी संत नाही..

Sangita Bhalsing

गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१८

सुशिक्षित

ऊतेजानार्थ गौरव प्राप्त रचना ....!!

💐सुशिक्षित अणि सुसंस्कृत💐
🙏�🙏�🙏�🙏�🙏�🙏�🙏�🙏�🙏�

सुशिक्षित व्यक्तीला
सुसंस्कृत म्हणावे काय ?
सुशिक्षितपणा अणि सुसंस्कृतपणा
यातील फरक कळेल काय ?

कागदी भेंडोळी अभिमानाने
आपण मिरवतो आहोत ...
सुसंस्कृतपणा दुराभिमानाने
आपण विसरलो आहोत ....

शिवबा राजांचे नाव उच्चारताना
त्यांचे आचार विचार अंगीकारा ...
स्वातंत्र्य समता बंधुता स्वीकारुन
भारत देशाची मान ऊंच करा ...

भारतीय संस्कृतीची महान परंपरा
भारतीयांनो,विसरु नका कधी ....
शिका यशस्वी जीवनाचा मूलमंत्र
एकटा मानव जगु शकत नाही कधी ...

श्रद्धा अणि अंधश्रद्धा यातील
फरकही ओळखा जरा ...
विज्ञानाच्या प्रगतीवरच
होतो देशाचा विकास सारा ...

दुसऱ्याची खोल वेदना कधी
काळजात खोलवर जाते का ?
परोपकार करण्याची वृत्ती
मनोमन रुजते का ?

*प्रा.सौ.संगिता भालसिंग*
अहमदनगर
दि.०१/१०/१६

सोमवार, १ ऑक्टोबर, २०१८

रंग जीवनाचे

विषय-रंग जीवनाचे

'जातानाही पाणी पी' रंग जीवनाचे...
सुख दुःखाच्या चरकात घे भरून...
कातरवेळी वळून पहा बेधुंद मनाचे ...
जातील अलवार क्षण अमर करून ...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...