रविवार, ३० सप्टेंबर, २०१८

आईस पत्र

नमस्कार,
माझी मुलगी पूजा.......
... मुलीने मला(आई)पत्र लिहिले आहे ,अशी कल्पना
***************************

आईस पत्र
प्रिय आई,
शि. सा.न.वि. वि.
ए आई, अग तुला पाहिलेच पत्र मी
लिहित आहे ग ...!!यापूर्वी कधी प्रसंगच आला नाही,
अणि गरज पण नाही पडली ....!!
लग्न होवून सासरी आले,पण तुला माझ्या मनात
घेऊन आले आहे मी .क्षणोंक्षणी तुझी खूप खूप
आठवण येते ....!!
सकाळी उशिरा उठायची माझी सवय आता मोडली
बघ ...खूप लवकर उठते ....म्हणजे तूच उठवते
तुझी हाक मला ऐकू येते ,राणी... उठ ग ...किती
वेळ झोपतेस ,कॉलेजला उशीर होईल ...!!
मग मी चटकन उठून कामाला लागते ,अगदी
तुझ्या सारखी .....!!
भाजी पोळी, नाश्ता करताना तुला आठवित तुझ्याच
सारख सर्व काम करते ....तुला किती किती विविध
पदार्थ येतात ग ...!! मीही शिकत आहे ...काही काही
पदार्थ आता जमू लागले आहेत ....सासुबाई सुद्धा
कौतुक करतात बरं ...!! सासरे पण खुश असतात
अणि हे पण ...!! तू मला बळेच स्वयंपाक शिकवत
होतीस ,तेंव्हा खूप कंटाळा येत असे .पण त्याचे महत्व
आता मला कळत आहे ...!!
खरेच आई,तू खूप खूप छान शिक्षण अणि संस्कार
दिले मला, त्यामुळेच मी इथे सर्वांची मने जिंकली
आहेत .तू म्हणायची की,माणूस प्रिय नसते ,तर
माणसाचे काम प्रिय असते ...!! याचा प्रत्यय मला
येत आहे .
कोणतेही काम कसे व्यवस्थित अणि नीटनेटके
करावे हे शिकवले तू ...!!  धुतलेले कपडे कसे
वाळत घालावे,झटकुंन,भांडी कशी घासुन पुसून
लक्ख् करावी,किचन कसे स्वच्छ ठेवावे ...?
तू म्हणायची की,खायला, प्यायला, ल्यायला,नेसायला
खूप खूप चांगले लागते तर, काम देखील खूप खूप
चांगले करावे ...!!
अणि माझा धाकटा दिर म्हणजे अगदी आपल्या
खोडिल राजू सारखाच आहे अगदी.माझ्या खोड्या
करतो ,खूप सतावतो ...पण मी मनावर घेत नाही हं
उलट त्याची खूप काळजी घेते,जीव लावते, तो
अभ्यास करीत नाही ...पण मी त्याला रागवाते
त्याचा अभ्यास सुद्धा करवुन घेते ...!!
आजे सासूबाई ची तर गंमतच आहे बघ ....
डोळ्यांनी अधू आहेत ...मग हरघडी मला बोलावत
असतात ,सतत राणी, राणी करीत असतात ग...!!
त्यांची सुद्धा मनोभावे मी सेवा करते ....!!
तुझीच शिकवण ही सुद्धा ...!! मी पाहिले तुला
आपल्या कोपिष्ट आजीची सेवा करताना ...!!
तू म्हणायची की,मूलीने कितीही शिक्षण घेतलेले
असो,तिने आपले बाईपण सोडु नये ....!!
मी एवढे शिक्षण घेतले,त्याचा उपयोग मी माझ्या
उत्तम संसारासाठी करीत आहे ,कारण इथे मला
नोकरी करण्याची गरज नाही ग ...!! स्वातंत्र्य अणि
स्वैराचार यातील फरक तू चांगला शिकविला आहेस.
मला इथे सर्व प्रकारचे स्वातंत्र्य आहे ,त्यामुळे
माझ्या शिक्षणाचा तोरा मी कधी नाही दाखवला.
सर्व जण मला खूप जीव लावतात ,काळजी
घेतात.म्हणून तू माझी अजिबात काळजी करू
नको,आईबापाचे नाव मी उंच करीन ...तुमची
शिकवण माझ्या आयुष्याची उत्तम शिदोरी आहे.
आता तुला एक आनंदाची बातमी मी सांगणार
आहे,तू आजी होणार आहेस ...!!
पण आताच सांगते ,मी बाळंतपना साठी तुझ्याकडे
येणार नाही ग ....जूना रिवाज असला तरी ....!!
कारण सासु बाई म्हणतात की,मी सर्व करिन् तुझे
मला मुलगी नाही, मग तूच आमची मुलगी आहेस
म्हणून मी नाही येणार तिकडे ...!! तुम्हीच सर्व जण
इकडे मला भेटायला या ...!!
आता मी माझी सर्व खुशाली सांगितली
पण  तुमची खुशाली मला कळव ...!!
आजी,बाबा कसे आहेत ग,औषध घेतात का
वेळेवर ...!! आणि राजू अभ्यास करतो की नाही?
का फ़क्त क्रिकेट च ...!! त्याला सांग की,तुझी ताई
काळजी करते तुझी,खूप अभ्यास कर,यंदा दहावी चे
वर्ष आहे ...!! क्रिकेट खेळणे जरा कमी कर ...!!
आणि दादा ना सांग ,की लवकर घरी येत जा ,खूप वेळ
बाहेर जातो त्यांचा,अणि कंपनीत ओव्हर टाइम नका
करू म्हणावे,तबबेती ची काळजी घ्या ,उगीच
जादा काम नका करू म्हणावे ...!!
आई तू पण काळजी घे ग स्वत:ची...!! तुझे गुडघे
दुखत होते ,आता बरे वाटते का ? तेल लावून रोज
मालिश कर ...राजू ला सांग जरा ...पाय तेल लावून
मसाज करायला ..बरे वाटेल मग ...!!
अग आपली गाय राधा कशी आहे ग ...व्याली की
नाही अजुन ...? तिच्या दुधाची चव किती छान ग
मला तिची पण खूप आठवण येते...!!
शेजार च्या काकू कशा आहेत ,काका अणि काकू
ची भांडण .....आठवतात मला ...कधी मिटतिल
देव जाने ...!!
आणखी काय लिहु आता .....खूप खूप बोलायचे
अणि लिहायचे आहे ग ....पण आता बस करते.
ता.क. दिवाळी आमच्या घरी झाली की,भाऊबीजे ला मी नक्की येईल ...
कळावे,
           तुझीच पूजा
Sangita Balding
Ahmednagar
स्पर्धेत समाविष्ट
जागतिक कन्या दिन
सप्ताह

बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८

डोरले

का मनाला चोरले तू
काळजाला कोरले तू...
चालताना सप्तपदी
बांध आता डोरले तू ...

Sangita Bhalsing

मंगळवार, २५ सप्टेंबर, २०१८

स्पर्श

नकळत होता स्पर्श लाजरा
गोऱ्या गाली चढली लाली ...
पापण्यांना झुकवून खाली
हळूच उबदार कुशीत आली ...

Sangita Bhalsing

माझी कन्या- पूजा

माझी कन्या पूजा

ये ग पूजा ये ग पूजा ये राणी वानी
लेक माझी लई लाडाची
सोनपरी वानी
बघ आवरलं आवरलं साफसूफ घर केले
हॉल मधे लाल फुलांचे गुच्छ लावले

सडा टाकला रांगोळी केली तुळशीवृंदावनी
ये पूजा ये ग पूजा ये राणी वानी
काळजावरी हात ठेवूनी वाट किती पाहू
जावयाला सांग लवकरी माहेरा जाऊ

काव काव कोकलतो, कावळा दारी
ये ग पूजा ये ग पूजा ये राणी वानी
सण आलाय बीजे आधी राखी पुनवेचा
धाकटा ग भाऊ आहे गोड बहिणीचा

आली दिवाळी लाडू चकली फटाके उडवीत
अंगणात झाडाखाली भुईचक्कर सोडीत
ये ग पूजा ये ग पूजा घाल गळा मिठी
मीठ मोहऱ्या उतरुनी काढीन ग दिठी

Sangita Bhalsing
Ahmednagar

मंगळवार, १८ सप्टेंबर, २०१८

इंद्रधनू

उगवतीचे रंग कोवळे
मावळतीचे रंग सावळे ...
इंद्रधनूचा गोफ दुहेरी     
कोणी  विणला न कळे ...

Sangita Bhalsing

सोमवार, १७ सप्टेंबर, २०१८

दर्प

वागण्यातून दिसे
अहंकाराचा दर्प ...
सावध हो मानवा
गिळून टाकील सर्प ...

Sangita Bhalsing

गुरुवार, १३ सप्टेंबर, २०१८

गणरायचे आगमन

🌹गणपती बाप्पा मोरया 🌹

कोवळ्या किरणांची सोनेरी सकाळ ...घेऊन आली गणरायाच्या आगमनाची गोड चाहूल...
अंगणी सडा ,सारवण आणि सुंदर नक्षीची रंगीबेरंगी मोठी रांगोळी ..
सारे घर आणि देवघर स्वच्छ ,निटनेटके ...देव घरातली सर्व भांडी स्वच्छ चमकदार ....लखलख रंगीत लाइटच्या माळा ...
मंद सुंगम संगीत रेडिओवर चालू ....त्याच तालात देवाची आंघोळ आणि कपाळी चंदन उटी...धूप आणि अगरबत्तीचा दरवळणारा मस्त सुवास...मंद तेवत असणारी समई...थरथरणारी दिव्याची इवली ज्योत ...
घरात धावणाऱ्या ईवल्या पावलांची मधेच लुडबुड ...आरती साठी सज्ज झालेले तबक... तांदळावर विराजमान झालेला शुभ्र कापूर ...गुलाब,निशीगंध,झेंडू ही सजून तयार ...सर्व फळेही गणपती सोबत बसण्यात आतुर झालेले...
गणपतीबाप्पा च्या आगमनाची जय्यत तयारी... सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद,समाधान .....
गणपती बाप्पा मोरया च्या गजरात बाप्पाची रंगीत वस्त्रभूषण करुन चौरंगावर स्थापना....समूहस्वरात
गणपती आणि देवीची आरती... पेढ़े आणि मोदकाचा गोड प्रसाद....
***************************
(सर्वाना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ....!!
आमच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे....तुमच्या घरी झाले का?
झाले असेल तर कमेंट मधे फ़ोटो टाका ....)

प्रा.सौ.संगिता भालसिंग
Sangita B Bhalsing

अहमदनगर

गणराज

मन अथांग सागर या समुहात
सुधाकरी स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त रचना
एकूण 50 रचना ....!!
-----------------------------------------------------
गणराज
दि.०६/०९/१६

०१
पहिले नमन
गणराया तुला
आशीष दे मला
सुबुद्धिचा...

०२
बाप्पा मोरया रे
वक्रतुंड देवा
करिते मी सेवा
मनोभावे ...

०३
गणराया तुझी
महाकाय मूर्ती
त्रिखंडात किर्ती
दुमदुमे ...

०४
गणराया तुझे
सुपासम कान
गळा अणि मान
दिसेचना ...

०५
गणराया तुला
महादेव पिता
पार्वती ती माता
भाग्यवान ...

०६
मळाचा गणेश
पार्वतीने केला
शंकर लढला
दारामधी ...

०७
गणराया तुझे
चमकती डोळे
भाविक ते भोळे
अचंबित ...

०८
ओवीत गायले
गणेशाचे रूप
मनाला हुरुप
सदोदित ...

०९
गणराया तुझ्या
पायामधे वाळा
नर्तनाचा चाळा
मोहवितो ..

१०
मोदक नि लाडू
नैवेद्याला केले
गोड तोंड झाले
गणेशाचे ...

११
खोबऱ्याचा किस
साखरेची पिठी
मोदकाची वाटी
गणेशाला ...

१२
स्नेह खोबऱ्याचा
गोडी साखरेची
आवड गणूची
मोदकाची ...

१३
हाती पंचारती
कापुराची ज्योती
भक्त ओवाळीती
गणेशाला ..

१४
ओवाळू गणेशा
नयनांच्या ज्योती
गाऊया आरती
हर्षभरे ...

१५
दोन्ही नेत्री हिरे
चमकती फार
शोभतो सुंदर
गणराज ...

१६
तुंदिल तनुचा
श्री गणनायक
वाहन मूषक
ईवलासा ...

१७
गणराया तुझे
सजले मखर
सुमनांचे हार
सुगंधित ...

१८
गौरी नि गणेश
बहिण भावंड
ममतेची जोड़
अविरत ...

१९
एकविस दूर्वा
गणुला वाहिन
उपास करीन
निर्जलीचा ...

२०
मृदंग वाजतो
गणेश नाचतो
भक्तही डोलतो
तालावर ...

२१
अंकुश परशु
हातातली शस्त्र
गणेशाचे अस्त्र
दुष्टांवर ...

२२
ऋद्धि अणि सिद्धि
लाडक्या या भार्या
गाऊ चला आर्या
गणेशाला ...

२३
दोनदा जन्मला
पार्वतीचा बाळ
कर्दनांचा काळ
द्वैमातुर...

२४
दोन वेळा जन्म
माघाची चतुर्थी
भादाची चतुर्थी
द्वैमातुर....

२५
गजराज मुख
मानवी शरीर
वाहन उंदीर
गणेशाचे ...

२६
परशु रामाने
दात उपटला
एकच राहिला
गणेशाला ...

२७
विसरु नका रे
गणेशाचा बंधू
चला सारे वंदु
कार्तिकेय ...

२८
शिव पार्वतीला
केली प्रदक्षिणा
जागले वचना
गणराज ...

२९
ऐरावत मुख
इंद्राचे वाहन
लावले कापून
गणेशाला ...

३०
महाभारतात
व्यास कूट श्लोक
गणेश लेखक
बुद्धिवान ...

३१
हे गणनायका
सकलांचा त्राता
विनविते आता
दर्शन दे ....

३२
तारणहार तू
सकलांचा दाता
पावसी वंचिता
गजानना ...

३३
लाल रक्त वर्ण
जास्वंदी सुमन
पार्वती नंदन
भुललासे ...

३४
शितल दुर्वांची
गणेशा आवड
काढिते सवड
तोडायला ...

३५
कपाळी घातला
केशराचा गंध
गणा झाला धुंद
सुगंधाने ...

३६
भाळावर शोभे
चंदनाचा टिळा
पायामधे वाळा
गणेशाच्या ...

३७
मंगलमूर्ती तू
संकटाला धाव
नवसाला पाव
भक्तांचिया ...

३८
चंदनाचा पाट
बसायला तुला
पितांबर तुला
नेसायला ...

३९
मऊमऊ वस्त्र
रेशमाचे धागे
हसायला लागे
गणराज ...

४०
रेशमी वस्त्राला
लाल लाल काठ
मोद काठोकाठ
गणेशाला ...

४१
सदा असू दे रे
तुझी छत्र छाया
आम्हावर माया
गणराया ...

४२
ओंकार स्वरूप
रूप मनोहर
नाचतो सुंदर
गणराया ...

४३
सकाम निष्काम
भक्ती मी करिते
उपास धरिते
गणराया ...

४४
संकटी पावशी
सुखकर्ता तूच
दुखहर्ता तूच
गणराया ....

४५
साष्टांग प्रणाम
प्रथम वंदन
गौरीचा नंदन
गणराया ...

४६
गणराया तुझे
थुलथुले पोट
गबदुले बोट
छान किती ....

४७
विशाल कपाळ
तल्लख बुद्धिचे
वेद वाणी वचे
गणराया ....

४८

श्रवण मनन
करितो चिंतन
भले मोठे कान
गणेशाचे ...

४९
अवखळ फार
पार्वतीचा पुत्र
ज्ञानीयाचे नेत्र
गणेशाचे ...

५०
चार भुजा धारी
अस्त्र शस्त्र करी
दुर्जन संहारी
गणराया ...

प्रा. सौ.संगिता भालसिंग
दि.०८/०९/१६

बुधवार, १२ सप्टेंबर, २०१८

ओढ

सांजवेळी साजनाचीओढ वाटे
रोज स्वप्नी भेट होता गोड वाटे
हात हाती गुंफलेला भास वाटे
पापणीला आसवांची जोड वाटे

Sangita Bhalsing

डोळे

हाताने डोळे पूसता येतात ,
पण
डोळ्यातील अश्रूनी
हाताच्या रेषा पूसता
येत नाहीत...

Sangita Bhalsing

रविवार, ९ सप्टेंबर, २०१८

छळ

कितीदा मनाने असे हे जळावे
कधी का कुणाला कसे ना कळावे

दुखाची सुखाशी कधी गाठ नाही
असे संकटाने सदा का छळावे ...

Sangita Bhalsing

शुक्रवार, ७ सप्टेंबर, २०१८

नजर

जायचे तर खुशाल जा
एकदा नजर फिरवून ...
मात्र परतणार की नाही ?
एकदा मनाशी ठरवून ..

Sangita Bhalsing

गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१८

शिक्षक दिन

05 सप्टेंबर 2018
' शिक्षक दिन ' निमित्त माझ्या कॉलेज मधे माझे अध्यक्षीय मनोगत.....

Sangita B Bhalsing

https://youtu.be/DeXgfzWdWWI

बुधवार, ५ सप्टेंबर, २०१८

गुरू

गुरु

वट वृक्षाची सावली
गुरु माझी ग माऊली

ज्ञान आहे हे शाश्वत
महागुरुच्या पाऊली

गोड दोड शिष्याला
गुरु कधी न सोडीती

जीवनाच्या परीक्षेला
सदा गुरुच तारिती

फुले मुलांचा बगीचा
शिस्त नियमांचे खत

छडी हातावर परि
करी अनिवार प्रित

कष्ट घामाचा फुलोरा
जपे बालकांचे हित

घडे यशस्वी माणूस
होई गुरुचीच जीत

Sangita Bhalsing

आनंद

🌹 आनंद 🌹

आनंद हा कृतीवर/कार्यावर अवलंबून असतो...
कोणी काम सांगून आनंदी होतो,तर दुसरा काम टाळून आणि तिसरा ते कार्य/काम पूर्ण करून ...!!
आपण कसे आनंदी व्हायचे ते ठरवा ...👌

Sangita Bhalsing

सोमवार, ३ सप्टेंबर, २०१८

विश्वास

आटला जिव्हाळा
भडकल्या ज्वाला ...
विश्वासाने भरलेला
सांडला एक प्याला ...

Sangita Bhalsing

कार्यभाग

कोणी नाही कुणाचे
जो तो ज्याचा त्याचा ...
विसंबला दुसऱ्यावरी
कार्यभाग बुडाला त्याचा ...

प्रा.सौ.संगिता भालसिंग

रविवार, २ सप्टेंबर, २०१८

कान्हा

कान्हा तुझी मुरली
राधेला झुलविते ...
मधुर मधुर सूराने
जीवन फुलविते ...

Sangita Bhalsing

मंगळसूत्र

राजा तुझं नाव
हातावर गोंदले ..
मंगळसूत्र तुझेच
गळ्यात बांधले ...

Sangita Bhalsing

शनिवार, १ सप्टेंबर, २०१८

रंग

रोज लावी चेहऱ्यावर रंग थोडा
रोज खोटे वागताना ढंग थोडा

व्यवहारी या जगाशी नांदताना
या मनाशी बांधलेला चंग थोडा ...

Sangita Bhalsing

फुंकर

लेखणीने चाल शब्दा कागदावर
घाल फुंकर भाजलेल्या काळजावर
भावनांच्या गारव्याला सांजवेळी
काव्य बरसू दे शितलशा पावसावर

Sangita Bhalsing

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...