रविवार, १३ नोव्हेंबर, २०१६

माझी गझल ३१

माझी गझल ३१

पैंजणे

पैज़णे वाजली आज थोडी
गर्विता नाचली आज थोडी

रेशमी सूर हे छेडल्यावर
सुंदरी लाजली आज थोडी

काजळी रात गेल्यावरी ती
बोलली सावली आज थोडी

चांदणे पेरता भोवताली
काळजा भावली आज थोडी

चोरुनी भेटण्या साजनाला
पावले चालली आज थोडी

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Copyright
spsfun.com

शनिवार, १२ नोव्हेंबर, २०१६

माझी गझल ३०

माझी गझल ३०

शब्द

शब्द माझे कूळ आहे
काव्य माझे खूळ आहे ...

अक्षरांना लागलेली
अर्थवाही धूळ आहे ...

जीवनाच्या प्रेरणांना
बांधण्या व्याकूळ आहे ...

टोकदार लेखणीचे
भोवती वारुळ आहे ...

साहित्याचा बांधलेला
देविकाचा रूळ आहे ...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Copyright
spsfun.com

गुरुवार, १० नोव्हेंबर, २०१६

श्रीरंग

आज मंगळवार दि.०८/११/१६
एकमत वर्तमान पत्रातील साक्षी
पुरवणी मधे माझी कविता प्रकाशित......!!
सौ.सुरेखा जाधव यांचा लेख प्रकाशित.....!!

सौंदर्य

सौँदर्य

" सौँदर्य "हा शब्द उच्चारल्या बरोबर
आपल्या नजरे समोर कोणते चित्र
चटकन येते ?
बहुतेक आपल्या समोर सुंदर अणि
कमनीय बांध्याची तरुणीचेच चित्र
येईल , यात शंका नाही ...!!
कदाचित दुसऱ्या अनेक गोष्टी
आपल्या मनात येऊ शकतील....
एखादे सुंदर खळखळून हसणारे बालक,
वाऱ्यावर डोलणारे सुगंधी फूल
अशा नैसर्गिक बाबी....!!
यात सौंदर्य आहेच ,पण मानवी
सुंदरता विचारात घेतली तर ती
दोन प्रकारची आहे .एक शारीरिक
सौंदर्य अणि दूसरे मानसिक सौंदर्य.
शारीरिक सौंदर्य म्हणजेच खरे सौंदर्य
समजले जाते ,हे मात्र चूक आहे,
कारण ते नश्वर आहे. परमेश्वराने
बनवलेला सुंदर देह म्हणजे सौंदर्य नव्हे,
देह नश्वर आहे ,एक दिवस तो
मातीत मिसळून जाईल ...!!
पण मानसिक सौंदर्य मात्र अविनाशी
आहे.मानवाचे उत्तम गुण, संस्कार,
शील ,चारित्र्य ,उत्तम कार्य हे गुण
कधीच नष्ट होऊ शकत नाहीत.
म्हणूनच म्हणतात की,
"मरावे परि किर्ती रुपे उरावे "
दुर्मिळ असा मानवी जन्म एकदाच
मिळतो,त्याचा उपयोग उत्तम अशा
नैतिक कार्या साठीच झाला पाहिजे.
अशा कार्याचा सुगंध सतत दरवळत
राहिल....!! हेच खरे सौंदर्य आहे...!!
सद्गुणांचे ,मानसिक सौंदर्य म्हणजे
अविनाशी,सत्य असे सौंदर्य आहे.

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Copyright
spsfun.com


प्रकाशित लेख

ओवी गीतातील बहिण भाऊ

🌷 ओवी गीतातील भाऊ-बहिणी 🌷
💐💐💐💐💐💐💐💐

लोकगीतातील ओवी हा अतिशय
सुंदर अणि मधुर असा साहित्यप्रकार
आहे."जसे सूचले,तसे रचले" असे
वाटणाऱ्या या ओवीचा उगम
वैदिक अणि अनुष्टुभ छंदात आढळतो.
जात्या वरच्या ओव्या मात्र
अशिक्षित ग्रामीण स्त्रीयांचे अस्सल
अलंकार आहेत .पिढ्यानपिढ्या
चालत आलेले हे मौखिक वांड.मय
आहे .ओवी हा स्त्रीयांचा अगदी
जिव्हाळयाचा विषय .

जात्यावरची घरघर
देई ओवीला बहर ...!!

मात्र आजच्या काळात एकत्र कुटुंब
पद्धती लोप पावत चालली आहे.
परिणामी ओवी हा लोकगीताचा
प्रकार काहीसा मागे पड़त चालला
आहे.जर हे भांडार आजच्या पिढी
समोर मांडले तर, नक्कीच या प्रकाराला
उर्जितावस्था येईल.आजही या
ओव्या मधील सौंदर्य सर्वाना भुरळ
घालील यात शंका नाही.
म्हणूनच भाऊबीजेच्या निमित्ताने
बहिण भावाच्या प्रेमावर आधारित
काही ओव्या तुमच्या समोर मांडण्याचा
माझा हा लेखनप्रपंच .
  *
नवरात्र गेले
दसरा दूर गेला
नेयाला का न आला
बंधुराया ...

दसऱ्या नंतर वेध लागतात ते
दिवाळी अणि भाऊ बीजेचे...!!
त्यातही विशेष आवडीचा दिवस
म्हणजे भाऊबीज ...!!माहेरच्या सुख
स्वप्नात ती दंग असते.गोड़ मधुर
आठवणी तीच्या मनात रुंजी घालत
असतात.

भावाला यायला उशीर झाला की
काळजीचे ढग मनात दाटून येतात,
पण त्याच्या वरील अढळ विश्वास
ती व्यक्त करते ...

पाठच्या बहिणीवर
भाऊ का रुसेल ?
रंग का बदलेल ?
आकाशाचा ....

लडीवाळ बालपण आठवित तिच्या
मनाचे खेळ चाललेले असतात.मात्र
बंधू प्रेमाची ग्वाही ती देते.अणि
आपला प्रिय भाऊ सुखात राहावा
म्हणून परमेश्वराला प्रार्थना ही करते.

दुरच्या देशीचा
सुगंधी येतो वात
असेल सुखात
भाऊ राया ....

तिच्या बरोबर तिची लहान लेकरे ही
मामाची आतुरतेने वाट पहात असतात.
"मामा"म्हणजे दोन माँ...!!
जणू काही आईचे प्रतिरूपच ...!!

ताईच्या बाळाचे
येऊनि घेई मुके
खेळव कौतुके
भाचेयाना ...

भाऊ अणि मुलांचे अल्लड खेळ ती
अनिमिष नयनांनी डोळ्यांत साठवीत
कामधंदा उरकते ...!!
भावा साठी गोडधोड पदार्थ करताना
तिच्या मनात विचार येतो की,

नको धन मुद्रा
नको मोतियाचे हार
देई प्रेमाश्रुंची धार
भाऊ राया ...!!

ओवाळणी हवी आहे फ़क्त प्रेमाची
अणि मायेची ....
माहेर च्या संपत्तीचा मोह तिला नाही.
दिल्या घरी ती सुखात आहे.
तिला फ़क्त प्रेमळ माहेर पाहिजे .

बहिणीला भाऊ
एक तरी असावा
चोळीचा एक खण
एका रातीचा विसावा ...

स्त्री च्या दृष्टीने सर्वात प्रिय स्थान,
विश्रांती स्थान म्हणजे माहेर.
अणि प्रिय अशी माहेरची माणसे.
त्यात ही भाऊ सर्वात प्राण प्रिय...

पोटच्या परिस
मला पाठच्याची गोडी
ताईत बंधू माझा
बालपणीची ग जोड़ी ...!!

अशा अतूट प्रेमात जेंव्हा भावजय
डोकावते, तेंव्हा मात्र ती जराशी
भांबावूनही जाते.भाऊ दुरावेल
अशी भीती ही तिला वाटते...

बंधुजी घेतो चोळी
भावज गुजरी देईना दोरा
चांदाच्या उजेडात काय
चांदणी तुझा तोरा ...

शेवटी नणंद म्हणून हक्क अणि
अधिकार देखील गाजविते. तिच्या
कडून प्रेमाची अपेक्षा देखील करते
प्रसंगी वहिनीचे कौतुकही करते.

बीजेच्या दिशी
माझ्या ताटामधी मोती
गोरे भावजयी
ओवाळीन तुझा पती...!!

भावजयी बरोबर नेहमीच दिल जमाई
करुन घेते,आनंदाने तिला मिठी मारते
अणि असा हा प्रीती संगम,त्रिवेणी संगम
पाहून मातेच्या ह्रदयाला ही
आनंदाची भरती येते...!!

म्हणूनच स्त्रिया आवर्जून ओवी
गातात,

संसारामधी अनेक असती नाती गोती
बहिण भाऊ ही मोलाची माणिक मोती....!!

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
प्रकाशित लेख
Copyright
spsfun.com

चित्रशलाका स्पर्धा भाग ०८

सर्व विजयी स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन💐

परीक्षक श्री.ज्ञानेश्वर कटारे

DK मनोगत...  दिवाळीनिमित्त चित्रशलाका परिवारातर्फे घेण्यात आलेल्या या चारोळी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मित्रमैत्रिणींचं सर्वप्रथम मी कौतूक करु ईच्छितो . कौतूक यासाठी की कुठल्याही स्पर्धेत भाग घेण्यासाठी जिगर लागते . फक्त रक्तपुरवठा व्यवस्थित चालवणं एवढंच काम नसतं काळजाचं . नवनवीन आव्हाने स्विकारुन ती पार करणं हे काळजाचं जास्त महत्वाचं काम . ते तुम्ही सर्वांनी अगदी बेधडक केलै . ग्रेट गाईज्... ( परिक्षक बनून मीही तेच काम केलै बरं का..) आता आपण मुख्य विषयाकडं वळू . निकाल . निकाल म्हटलं की हार जीत येते . जेते कष्टाने आणि कौशल्याने बनतात . सर्व विजेत्यांचं अभिनंदन... पण खरं अभिनंदन मी त्यांचं करेन जे जिंकू शकले नाहीत . क्यूँ की हारकर जितनेवाले को बाजीगर कहते है मेरे दोस्त.. जोक्स अपार्ट , प्रामाणिकपणे लढणं हे जिंकण्याईतकंच महत्वाचं असतं असं मी मानतो . त्या अंगानं पाहिलं तर तुम्ही सगळेच विजेते आहात . फायटिंग स्पिरिट कायम ठेवतो तोच खरा जेता असतो . बी पॉजिटिव . हा निकाल पॉजिटिवली घ्या . तुमच्या प्रतिभेला कुठल्याच निकालाच्या चौकटीत अडकवू नका . प्रतिभा फुलवत रहा . तुम्ही बहरत रहा . चुकांमधून शिका . स्पर्धा आणि निकाल म्हणजे आपल्या चुका दाखवणारे आरसे . एका स्पर्धेत ससा झोपला म्हणून हरला . पण जर तो यातून शिकला तर तो आयुष्यात कधीच कुठल्याच शर्यतीत हरणार नाही ! बी ब्रेव.. बी पॉजिटिव.. भिडत रहा.. स्पर्धा खरंच रंजक होती . निकाल काढताना माझा कस लागला . काही चुका मी सांगू ईच्छितो . ( ज्या की पुढे चालून तुम्हाला दुरुस्त करायच्या आहेत . तरच या स्पर्धेचा खरा हेतू सफळ होईल . ) यमक गरजेचं असतं . त्यामुळंच लय निर्माण होते . पण नुसतं यमकच चालत नाही . यमकाबरोबरच अर्थपुर्ण असं काहीतरी खास मांडणं गरजेचं असतं . काहीतरी थोर , महान मांडण्याच्या नादात गफलत झालीये . सरळ साधं पण अर्थपुर्ण लिहिलं तर ते आपोआप महान होऊन जातं ! खुप मजा आली . आय होप तुम्हा सर्वांनापण आली असेल . मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मेंदूच्या सिस्टिममध्ये इंस्टॉल करा आणि हा घ्या या स्पर्धेचा निकाल... 

निकाल :  ऊत्तेजनार्थ -  1 . प्राची देशपांडे 2 . शशिकला बनकर 
आकर्षक / लक्षवेधी - 1 . स्मिता साळवी 2 . बाबू फिलिप डिसोजा 
तृतिय - 1 . प्रल्हाद दुधाळ 2 . प्रसाद घागरे / गुरुदत्त वागदेकर 
द्वितीय - 1 . श्रीकृष्ण चंद्रकांत कीर 2 . संगीता भांडवले 
प्रथम - 1 . सुनील नाना पानसरे 2 . अश्र्लेषा मोदी
*****************************************

सर्व सहभागी रचना पुढील प्रमाणे ....

******************************************
आकाश कंदिल पणत्यांनी उजळू या
अंगण सुंदर रांगोळी ने सजवू या
नववस्त्रे परिधान करूनी अवघे
आनंद पर्वणी दिप ज्योती रूजवू या
:बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे
चित्रशलाका स्पर्धेसाठी -

...........

दारात सजते रांगोळीची नक्षी
रंगीत कंदील झूलतो आकाशी
नुतन वसने लेवून छानशी.......
मोद उधळतो दिवाळी दिवशी

........................ कवी ‘सुजन’

प्रतिपदेला बळीराजाच्या दातृत्वाची आठवण
भाऊबिजेला बहिण भाऊ बांधे अतुट बंधन
मानाचा पाडवा वाढवी जगण्यातला गोडवा
अभ्यंगाच्या स्नानाने वाईट सवयी सोडवा.
                                     # प्रमोद जोशी.

सर्व स्पर्धकांचे स्वागत ..!!
शुभ दिवाळी ..!!
दिवाळीचे प्रकाश पर्व
उजळला आसंमत सारा
दंगले सजावटीत सर्व
हाच आनंद खरा ...
मी एक स्वप्न

सन दिपोत्सवाचा आला
आनंद मनामनात भरला
कंदील लटकवला दारी
अंगणी रांगोळीची सडा सांडला

घनश्याम बोह्राडे

बि,एल,खान कवि
*****************
आकाश कंदीलाच पडला प्रकाश
दारी काढू रांगोळी नक्शीदार1
तो येणार माझा भाऊराया
घेऊन रंगीन एक मोटारकार11
B,L,khan poet
Deulghat Dist Buldana

झुलतो आकाशकंदील दारावर
रेखिली अंगणी सुंदर ती रांगोळी..!
खाऊन फराळ तृप्त लहानथोर
नात्यांच्या सन्मानाचा सण हा दिवाळी..!
........... प्रल्हाद दुधाळ .

रांगोळीने सजले अंगण
तव उल्हासीत झाले मन....
लखलखे आसमंत सारा
अभ्यंग झाले लावूनी उटणे चंदन....॥
           श्री. हणमंत पडवळ.

दिपोत्सवाच्या आगमनाने
सजली दारे,सजली अंगणे
पणत्यांचा लखलखाट अऩ्
आकाशदिव्याचे दारी चांदणे

संगीता भांडवले
वाशी, उस्मानाबाद

ज्ञानदिप उजळवू, पसरवू साक्षरता ----
एक पणती लावू, शहिद जवानांकरिता -------
जीवनांत भरू रंग, निसर्गा मनी स्मरता -----
हो बळीराजाच्या संग, धरेस करू हरिता ------

                स्मिता साळवी २/११/२०१६.

"आनंद "

मोद पसरला पानोपानी
कंदील सांगे गूज कानी ॥
दारी रेखिली सुरेख नक्षी
रांगोळीतले सुलक्षण पक्षी ॥

प्रा श्री. धनाजी जनार्दन बुटेरे
पोई कल्याण ठाणे

***** स्पर्धा भाग ८ *****

फटाक्याविना करु साजरी
आपण यंदाची ही दिवाळी
लावुनि सुंदर आकाशदीप
काढुनी छानछान रांगोळी
© राज़

दिपोत्सवाची रंगत न्यारी
रांगोळीने अंगण सजले
आकाशकंदिल लाविला दारी
आनंदाने घर हसले
प्राची देशपांडे
स्पर्धेसाठी

बाबांच्या सोबतीनं मिनी पहा
आकाश कंदिल लावत होती
तिचीच रांगोळी आई हरकून
भरल्या नयनांनी पहात होती

शिवा चौधरी
जामनेर,जळगांव
9592487310

आकाशदिव्याने केली
अंधारावर मात ।
रांगोळी, नवे कपडे, फराळ
आनंदाची बरसात ।।
नरेंद्र म्हस्के , शिरपूर ( धुळे )

नव चैतन्याची सुरमई पहाट आज उगवली
सप्तरंगांची उधळण करत आंगण ही सजले
झेंडू फुलांच्या तोरनाणे दार ही सजले
नात्यांचा मान सन्मान करण्या मन आधिरले
सौ. शुभांगी धारमळकर ,पुणे.

दिस दिवाळीचे पाच .....करा करा ग रोषणाई ......बाबा आकाशी दिवा ......अंगणात रांगोळी आई ..........नितीन वानखडे , खामगाव

चित्रशलाका स्पर्धा भाग ८
१ ते ५ नोव्हेंबर २०१६

अंगणात रांगोळी अन् दारात पणत्यांची माळ
दिवाळ सण घेऊन आला सुख समृद्धीचा शुभकाळ
लक्ख प्रकाश चोहीकडे पण त्यांच्या घरी अंधार
एक दिवा शहिदांसाठी जे बनले सीमेवर शत्रुंसाठी कर्दनकाळ

रचनाकार : गुरुदत्त वाकदेकर
दिनांक : ०३/११/२०१६

सलामीरूपी आकाशकंदिल लटकवू दारावर
तोफगोळ्यांच्या रांगोळीवर शहिदांच्या नामाची पणती
परमवीरचक्राचे तोरण लावून दारी
वीरपुत्रांची हरित ठेवूया ही धरती
…………………………वैशाली रा. रसाळ

स्नेहरुपी प्रकाशाने उजळण्या जीवन,
प्रतिवर्षाप्रमाणे आला दिपोत्सवाचा सण,
शुभेच्छांचा वर्षाव करूया शुभचिंतन,
यश,किर्ती,लक्ष्मीचे होई जोरात आगमन.
स्पर्धेसाठी नाही.......प्रमोद जोशी.

चित्र शलाका चारोळी स्पर्धा:-

बाबांनी लावला नवा आकाश कंदील दारी,
आईने काढली (रंगीत) रांगोळी अन पणत्यांची रांग कठड्या वरी,
फराळाची लज्जत न नव्या कपड्यांची ऐट भारी,
दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा घरोघरी.

सौ.रचना देशपांडे
ठाणे

स्पर्धेसाठी ...

दारी लक्ष्मी रांगोळी रेखते

संसारात सदा दक्ष असते...

आनंदाचा पारावार घरात

संस्कारांची दिवाळी असते ....

रोहिदास होले ...
गोपाळवाडी ,दौंड ,पुणे
3/11/2016

स्पर्धेसाठी

रांगोळीचा सडा रंगला अंगणात
नक्षीदार वस्ञ अन् दिवा आकाशात,
सामोरी पणत्यांची लेणी थाटात
उंच उडू दे स्वप्न  निळ्याशार नभात.
                  - अभिषेक राजुरकर.

पेटवावी दाराशी आज तुम्ही अशी पनती
  नसावी कधीही अंधकाराची सावली त्या वरती...
                          जळावी विषमता वाती प्रमाणे त्या खोडाची
फुलवावी नवचैतन्याची पालवी समतेच्या झाडा वरती...

बाबांच्या मदतीने आकाशदिवा
आईच्या मदतीने रेखीव रांगोळी
अबालवृद्धांना एकत्र आणणारी
आम्हांस प्यारी अतीव दिवाळी
----सुनिल नाना पानसरे----

चित्र शलाका चारोळी स्पर्धे साठी :-
दिवाळीच्या सणाला, आले धनी घराला,
आणली मला पैठणी, नवे कपडे लेकरांला,
लेक लाडकी बापाची, कंदील शोभेल खांबाला
मी रेखिते गं रांगोळी घेऊन मदतीला लेकराला.
मिलिंद......

आकाश कंदिल सजवताना
बाप -बेटीही आनंदीत दिसे
दारी छान रांगोळी काढताना
आई अन् मुलगा गोड हसे...

** सौ. वनिता शिंदे-किर्दकुडे***

सुबक रांगोळी , द्वारी तोरण हार
आकाशकंदील वाढवे शोभा सणाची
फराळ , शुभेच्छाची असे रेलचेल
अंगणी आली माझ्या दिवाळी स्नेहाची

  @ अश्लेषा मोदी @

तमस सरु दे दूर; पणतीने शहीदाच्या,
ज्ञान उजळू दे; प्रकाशाने कंदीलाच्या।
सौख्य रुजू दे मनी, रंगाने दिवाळी कण्याच्या,
समाधान नांदू दे गृही, मोदे नूतन वस्त्राच्या।।
                      
                                            -सुधीर बेंद्रे.

स्पर्धेसाठी

दिवाळी येता रांगोळी तोरण शोभे दारी
फराळाचा गोड घास घालू सर्वांच्या मुखी,
प्रेम बंधुत्व समानतेची तेजाळू पणती हृदयी
मागणे कुबेर लक्ष्मीला सर्वांना ठेव सुखी...

.. अर्चना माने    ४/११/२०१६

             पुणे

सप्तरंगात रंगते
दिवाळी आम्हा घरात
दारी तोरण,सडा रांगोळीचा
दाटे आनंद सर्वांच्या मनात...

    - भाऊसाहेब बोराडे
        नाशिक

साज लेवूनी नव वस्त्राचा
रेखिली दारी रांगोळी,
कंदिलाचा प्रकाश शिंपीत
आली घरी दिवाळी ।।

सौ.समिधा बाष्टे
रत्नागिरी.

लक्ष्मीबळीराजाच्या स्वागता आकाश कंदिल सजतो
परंपरेनुसार अंगण रांगोळीने नववरंगात सजते
संस्कृती आमची भेदभाव संपवून दिवाळीत एकत्र आणते
लाडू चिवडा करंजी खाऊन नववस्त्रासह दिवाळी सजते
    शशी खंडाळकर पुणे 04।11।2016
स्पर्धेतसाठी

स्पर्धेसाठी चारोळी

दिवाळीचा सण आनंदाचे क्षण
पणत्यांची शोभा आकाशकंदिल उभा
आयुष्याची रांगोळी त्यांत प्रयत्नांचे रंग
फराळाचा स्वाद, काहीही खाण्याची मुभा

... सौ. शशिकला बनकर, भोसरी

दिवाळी सण हा मौजमजेचा, बागडती हि मुले लहान
परंपरेचा ठेवि मान कुटुंब, पारंपारिक वेष घालून
हिरवा, पिवळा, लाल, निळा भरुनी रंग छान
संसाराचे चित्र रेखिते, गृहलक्ष्मी या रांगोळी मधून

अजित करंबेळकर
डोंबिवली

आली दिवाली ,
घेऊन  कंदिल  रांगोलीचा थाट  ll
सुखी  जाहली ,
आनंदे  पहाते  लक्षमीची  वाट  ll
     Jayee Vilas

फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,
चिवडा, चकली, लाडू आणि करंजीची ही लज्जत न्यारी
नव्यानवलाईची दिवाळी येता,                                                                             आनंदली दुनिया सारी......संदिप....संदिप

चित्रशलाका  स्पर्धा भाग 08 ---- नोव्हेंबर -----2016 .....

सा-यांच्या मनी मानसी आनंद नाचे नयनी
आली आली दारी मंगल दिपावली ...!!
अंगणी सजली सुबक प्रेम रंगीन रांगोळी 
चढली तोरणे चढला आकाश कंदिल आभाळी ...!! ....अंजली अंजली .....

_______________________________

वारं वहातय थंड गार हिवाळी

अलगद उतरली आहे घरात दिवाळी

स्वागत करतेय दारातली रंगीत रांगोळी

रंगलय कुटुंब अन झुलतोय कंदिल आभाळी

@ राज देव

___________________________________चिञशलाका स्पर्धेसाठी चारोळी
भाग ०८ वा

मानवतेचा आकाशदीवा लावुनी
रेखाटूया धर्मनिरपेक्षतेची रांगोळी ।
दृढ विश्वासाच्या पेटवूणी पणत्या..
प्रत्येका हृदयी साजरी करु दिवाळी ।।

✍🏻✍©:-कवी अनिकेत जयंतराव देशमुख. (अनु)
            रा- गोपालखेड , ता. जि. अकोला.
                    mo-9689634332

स्पर्धेसाठी

दारोदारी रेखाटली गृहलक्ष्मीच्या
हस्त स्पर्शाने समतेची रांगोळी..!
अन् आकाश कंदिलाच्या प्रकाशाने
उजळली मानवतेची पहिली आंघोळी..!

विलास साळवे , मुंबई
९८२०५९६४७२.

चित्रशलाका
"पणत्या,तोरणे,रांगोळया
सजल्या माझ्या दारी,
त्यातला एक दीप लागो
वंचितांच्या झोपडीच्या दारी"
*संगीता देशमुख,वसमत*
स्पर्धेसाठी

शनिवार, ५ नोव्हेंबर, २०१६

नेट भारी

नेटभारी इ दिवाळी अंक 2016 मधे
माझ्या कविता अणि अभंग प्रकाशित 💐
आभार शब्दगंध शब्दरंग मराठी साहित्य
कला दर्पण.....

सौ.संगिता भालसिंग

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...