बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८

डोरले

का मनाला चोरले तू
काळजाला कोरले तू...
चालताना सप्तपदी
बांध आता डोरले तू ...

Sangita Bhalsing

मंगळवार, २५ सप्टेंबर, २०१८

स्पर्श

नकळत होता स्पर्श लाजरा
गोऱ्या गाली चढली लाली ...
पापण्यांना झुकवून खाली
हळूच उबदार कुशीत आली ...

Sangita Bhalsing

माझी कन्या- पूजा

माझी कन्या पूजा

ये ग पूजा ये ग पूजा ये राणी वानी
लेक माझी लई लाडाची
सोनपरी वानी
बघ आवरलं आवरलं साफसूफ घर केले
हॉल मधे लाल फुलांचे गुच्छ लावले

सडा टाकला रांगोळी केली तुळशीवृंदावनी
ये पूजा ये ग पूजा ये राणी वानी
काळजावरी हात ठेवूनी वाट किती पाहू
जावयाला सांग लवकरी माहेरा जाऊ

काव काव कोकलतो, कावळा दारी
ये ग पूजा ये ग पूजा ये राणी वानी
सण आलाय बीजे आधी राखी पुनवेचा
धाकटा ग भाऊ आहे गोड बहिणीचा

आली दिवाळी लाडू चकली फटाके उडवीत
अंगणात झाडाखाली भुईचक्कर सोडीत
ये ग पूजा ये ग पूजा घाल गळा मिठी
मीठ मोहऱ्या उतरुनी काढीन ग दिठी

Sangita Bhalsing
Ahmednagar

मंगळवार, १८ सप्टेंबर, २०१८

इंद्रधनू

उगवतीचे रंग कोवळे
मावळतीचे रंग सावळे ...
इंद्रधनूचा गोफ दुहेरी     
कोणी  विणला न कळे ...

Sangita Bhalsing

सोमवार, १७ सप्टेंबर, २०१८

दर्प

वागण्यातून दिसे
अहंकाराचा दर्प ...
सावध हो मानवा
गिळून टाकील सर्प ...

Sangita Bhalsing

गुरुवार, १३ सप्टेंबर, २०१८

गणरायचे आगमन

🌹गणपती बाप्पा मोरया 🌹

कोवळ्या किरणांची सोनेरी सकाळ ...घेऊन आली गणरायाच्या आगमनाची गोड चाहूल...
अंगणी सडा ,सारवण आणि सुंदर नक्षीची रंगीबेरंगी मोठी रांगोळी ..
सारे घर आणि देवघर स्वच्छ ,निटनेटके ...देव घरातली सर्व भांडी स्वच्छ चमकदार ....लखलख रंगीत लाइटच्या माळा ...
मंद सुंगम संगीत रेडिओवर चालू ....त्याच तालात देवाची आंघोळ आणि कपाळी चंदन उटी...धूप आणि अगरबत्तीचा दरवळणारा मस्त सुवास...मंद तेवत असणारी समई...थरथरणारी दिव्याची इवली ज्योत ...
घरात धावणाऱ्या ईवल्या पावलांची मधेच लुडबुड ...आरती साठी सज्ज झालेले तबक... तांदळावर विराजमान झालेला शुभ्र कापूर ...गुलाब,निशीगंध,झेंडू ही सजून तयार ...सर्व फळेही गणपती सोबत बसण्यात आतुर झालेले...
गणपतीबाप्पा च्या आगमनाची जय्यत तयारी... सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद,समाधान .....
गणपती बाप्पा मोरया च्या गजरात बाप्पाची रंगीत वस्त्रभूषण करुन चौरंगावर स्थापना....समूहस्वरात
गणपती आणि देवीची आरती... पेढ़े आणि मोदकाचा गोड प्रसाद....
***************************
(सर्वाना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ....!!
आमच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे....तुमच्या घरी झाले का?
झाले असेल तर कमेंट मधे फ़ोटो टाका ....)

प्रा.सौ.संगिता भालसिंग
Sangita B Bhalsing

अहमदनगर

गणराज

मन अथांग सागर या समुहात
सुधाकरी स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त रचना
एकूण 50 रचना ....!!
-----------------------------------------------------
गणराज
दि.०६/०९/१६

०१
पहिले नमन
गणराया तुला
आशीष दे मला
सुबुद्धिचा...

०२
बाप्पा मोरया रे
वक्रतुंड देवा
करिते मी सेवा
मनोभावे ...

०३
गणराया तुझी
महाकाय मूर्ती
त्रिखंडात किर्ती
दुमदुमे ...

०४
गणराया तुझे
सुपासम कान
गळा अणि मान
दिसेचना ...

०५
गणराया तुला
महादेव पिता
पार्वती ती माता
भाग्यवान ...

०६
मळाचा गणेश
पार्वतीने केला
शंकर लढला
दारामधी ...

०७
गणराया तुझे
चमकती डोळे
भाविक ते भोळे
अचंबित ...

०८
ओवीत गायले
गणेशाचे रूप
मनाला हुरुप
सदोदित ...

०९
गणराया तुझ्या
पायामधे वाळा
नर्तनाचा चाळा
मोहवितो ..

१०
मोदक नि लाडू
नैवेद्याला केले
गोड तोंड झाले
गणेशाचे ...

११
खोबऱ्याचा किस
साखरेची पिठी
मोदकाची वाटी
गणेशाला ...

१२
स्नेह खोबऱ्याचा
गोडी साखरेची
आवड गणूची
मोदकाची ...

१३
हाती पंचारती
कापुराची ज्योती
भक्त ओवाळीती
गणेशाला ..

१४
ओवाळू गणेशा
नयनांच्या ज्योती
गाऊया आरती
हर्षभरे ...

१५
दोन्ही नेत्री हिरे
चमकती फार
शोभतो सुंदर
गणराज ...

१६
तुंदिल तनुचा
श्री गणनायक
वाहन मूषक
ईवलासा ...

१७
गणराया तुझे
सजले मखर
सुमनांचे हार
सुगंधित ...

१८
गौरी नि गणेश
बहिण भावंड
ममतेची जोड़
अविरत ...

१९
एकविस दूर्वा
गणुला वाहिन
उपास करीन
निर्जलीचा ...

२०
मृदंग वाजतो
गणेश नाचतो
भक्तही डोलतो
तालावर ...

२१
अंकुश परशु
हातातली शस्त्र
गणेशाचे अस्त्र
दुष्टांवर ...

२२
ऋद्धि अणि सिद्धि
लाडक्या या भार्या
गाऊ चला आर्या
गणेशाला ...

२३
दोनदा जन्मला
पार्वतीचा बाळ
कर्दनांचा काळ
द्वैमातुर...

२४
दोन वेळा जन्म
माघाची चतुर्थी
भादाची चतुर्थी
द्वैमातुर....

२५
गजराज मुख
मानवी शरीर
वाहन उंदीर
गणेशाचे ...

२६
परशु रामाने
दात उपटला
एकच राहिला
गणेशाला ...

२७
विसरु नका रे
गणेशाचा बंधू
चला सारे वंदु
कार्तिकेय ...

२८
शिव पार्वतीला
केली प्रदक्षिणा
जागले वचना
गणराज ...

२९
ऐरावत मुख
इंद्राचे वाहन
लावले कापून
गणेशाला ...

३०
महाभारतात
व्यास कूट श्लोक
गणेश लेखक
बुद्धिवान ...

३१
हे गणनायका
सकलांचा त्राता
विनविते आता
दर्शन दे ....

३२
तारणहार तू
सकलांचा दाता
पावसी वंचिता
गजानना ...

३३
लाल रक्त वर्ण
जास्वंदी सुमन
पार्वती नंदन
भुललासे ...

३४
शितल दुर्वांची
गणेशा आवड
काढिते सवड
तोडायला ...

३५
कपाळी घातला
केशराचा गंध
गणा झाला धुंद
सुगंधाने ...

३६
भाळावर शोभे
चंदनाचा टिळा
पायामधे वाळा
गणेशाच्या ...

३७
मंगलमूर्ती तू
संकटाला धाव
नवसाला पाव
भक्तांचिया ...

३८
चंदनाचा पाट
बसायला तुला
पितांबर तुला
नेसायला ...

३९
मऊमऊ वस्त्र
रेशमाचे धागे
हसायला लागे
गणराज ...

४०
रेशमी वस्त्राला
लाल लाल काठ
मोद काठोकाठ
गणेशाला ...

४१
सदा असू दे रे
तुझी छत्र छाया
आम्हावर माया
गणराया ...

४२
ओंकार स्वरूप
रूप मनोहर
नाचतो सुंदर
गणराया ...

४३
सकाम निष्काम
भक्ती मी करिते
उपास धरिते
गणराया ...

४४
संकटी पावशी
सुखकर्ता तूच
दुखहर्ता तूच
गणराया ....

४५
साष्टांग प्रणाम
प्रथम वंदन
गौरीचा नंदन
गणराया ...

४६
गणराया तुझे
थुलथुले पोट
गबदुले बोट
छान किती ....

४७
विशाल कपाळ
तल्लख बुद्धिचे
वेद वाणी वचे
गणराया ....

४८

श्रवण मनन
करितो चिंतन
भले मोठे कान
गणेशाचे ...

४९
अवखळ फार
पार्वतीचा पुत्र
ज्ञानीयाचे नेत्र
गणेशाचे ...

५०
चार भुजा धारी
अस्त्र शस्त्र करी
दुर्जन संहारी
गणराया ...

प्रा. सौ.संगिता भालसिंग
दि.०८/०९/१६

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...