( जुगलबंदी - नितीन मोकल सोबत जुगलबंदी )
माझ्या रचना-
सावळा विठ्ठल
विठुच्या नामाचा
सूर ग लागला...
थकल्या देहाला
विसावा मिळाला ...
सोन्याचा कळस
दुरुन दिसला ....
सखा पांडुरंग
गालात हसला ...
विठुच्या मंदिरा
सोन्याचा कळस ...
वारीला जायला
नाही मला आळस ...
कळस पाहयाला
लाख लोक जाती ...
कपाळी लावती
पंढरीची माती...
पंढरीची माती
कपाळी गिलावा...
वारकऱ्याच्या मनी
प्रेमाचा ओलावा ...
डोईला तुळस
चालते पायी पायी
उन्हाचा चटका
मला जाणवत नाई....
पंढरीची माती
मऊ मऊ किती...
वैष्णवांचा मेळा
पायाने तुडविती ...
पंढरपुरात आला
वारकरयांचा ग लोंढा....
सावळया विठुला शोभे
मोतियाचा गोंडा ....
माऊलीच्या घोड्याला
रंगीबेरंगी झुल ...
विठुच्या नामात हाले
माझ्या कानातलं डुल ...
माऊलीच्या घोड्याला
रंगीबेरंगी मऊ झुल ...
विठुच्या नामाची
मला पडली ग भुल ...
जनाईच्या संग
विठु फुगडी खेळतो ...
पहाटेच्या पारी संग
दळण बी दळीतो ...
ओवी विठ्ठलाची
दळताना गाते...
जाते ओढ़ताना
काम हलके करते ...
विठुच्या हाताचा होई
जात्याला ग स्पर्श ...
सुपातल्या डाळीला
होई वेगळाच हर्ष ...
डाळ पाखडली
फ़ोलं उडाली उडाली....
विठ्ठलाची ओवी
काळजात ग भिडली ...
विठुच्या मंदिरी
सोन्याची पालखी
वारीला जायाला
जीवाची तलखी ...
विठुला भेटाया
पंढरीला जाऊ ..
सावळी मुरत
काळजात ठेऊ ...!!
शितल गारवा ..
टिळा चंदनाचा
उपाय विठुला
भक्ताच्या त्रासाचा...
वारीला चालले
आयाबाया संग..
हातामधी टाळ
भजनात दंग...
तुळशीची माळ
गळ्यात घातली ..
काडीवानी काया
विठु नामाने चेतली ...
सावळया विठुची
रुक्मिणी सावळी ..
अंगामधी ल्याली
जरीकाठी चोळी ...
सावळी रुक्मिन
हाती पंचारती ताट ...
आली विठ्ठलाची स्वारी
सोडा सोडा जरा वाट ...
सौ.संगिता भालसिंगप्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर
www.tufaan.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.