साहित्य मराठी लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
साहित्य मराठी लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १ फेब्रुवारी, २०२६

अध्याय २ - लेख क्रमांक २ - श्री गजानन महाराज शेगाव

अध्याय २ - लेख क्रमांक २ - श्री गजानन महाराज शेगाव 

                    *श्री गणगणरामाय नमः*

                          लेख क्रमांक २

                        *अध्याय दुसरा*

                   *स्वामींचा प्रगटोत्सव*

अध्याय २ - लेख क्रमांक २ - श्री गजानन महाराज शेगाव



प्रगटले स्वामी गणगणराज 

           समर्थ योगी योगीराज 

उधळे भक्तीरस रसराज 

           लीला लिलये करे गणराज।।धृ।।

जगत् व्याप्त,जग,जग आधार 

          जनजीवन जनजीवनसार

घेऊन रुप सगुण साकार 

          साकारले दीगंबराकार 

अजर, अमर, ऋषी ,अविनाशी 

           नाशी अन्न मुखी ग्रासी 

"अन्नं परब्रह्म" वेदोक्ती

           "ब्रम्हं अन्नं" दर्पोक्ती 

दर्प दर्पीचे दडपाया 

            दुख दुखितांचे दर्शाया 

दर्शन दर्शवी गणगणराम   

             सिता ,सितापती सिताराम।।ॐ।।


       सद्गुरू सांगतात की, जे ज्ञेय परब्रह्म आहे ते 

(१)संपूर्ण जगाला व्यापून आहे (२)ते जगाचे अभिन्न निमित्तोपादान कारण आहे.

(३) संपूर्ण जग त्या ज्ञेय परब्रम्हावरच आधारित आहे.(४)संपूर्ण जगातील लोकांच्या  जीवनाचे संप्रेरक तेच ज्ञेय परब्रम्ह आहे 

(५)आणि प्रत्येकाच्या जीवनाचे सार सुद्धा तेच परब्रह्म आहे.

    ज्ञेय म्हणजे ,जाणून घेण्याची गोष्ट. समजा समोर एक वस्तू ठेवलेली आहे.ती वस्तू काय आहे ते मला जाणावयाचे आहे. तेव्हा  मी झालो ज्ञाता.समोरची वस्तु झाली ज्ञेय.आणि ती वस्तु जाणणे ,हे झाले ज्ञान. आणि ज्ञाता,ज्ञेय,ज्ञान ह्यास त्रिपुटी म्हणतात. पंच ज्ञानेंद्रियाद्वारे जाणलेल्या ज्ञानामुळे ,ज्ञाता केंव्हाही ज्ञेय होत नाही.समजा समोर ज्ञेय, गुलाबाचे फुल आहे.परंतू ज्ञाता केव्हाही गुलाबाचे फुल होणार नाही.

            परंतू  परब्रह्माचे विशेष हे आहे की ,ते ज्ञेय परब्रह्म जाणता क्षणीच जाणणारा स्वतः परब्रम्ह होतो.व तो जीवन्मुक्त महापुरुष नित्यानंदात लीन होतो.माउली ज्ञानेश्वरीत लिहितात की,"आणि जाणितलेया वरौते |काहीच करणे नाही जेथे |जाणणेचि तन्मयाते | आणि जयाचे ॥१३\८६५॥

अर्थ:-ते ज्ञेयस्वरुप जाणल्यामुळे, ज्ञाता संसाराचा निरास करून नित्यानंद स्वरूप होतो.म्हणजे ज्ञेय स्वरूप होतो.ह्यासच अमृतत्वाची प्राप्ती म्हणतात. 

        हे ज्ञेय परब्रम्ह  जगास आतून  व बाहेरून पुर्णपणे व्यापून आहे. भगवान भगवद्गीतेत सांगतात की, "सर्वत: पाणिपादं तत्सर्वतोऽक्षिशिरोमुखम् |सर्वत: श्रुतिमल्लोके सर्वमावॄत्य तिष्ठति ॥

१३-१३॥

 अर्थ :-ते  सर्वत्र हात, पाय, डोळे, नाक, कान, मुख,असलेले आहे. कारण ते विश्वाला व्यापून राहीले आहे. 

      ह्यावरून कोणास असे वाटेल की परब्रह्म उपाधी युक्त आहे.परंतू माउली लिहितात की,ते परब्रह्म निरुपाधिक आहे. ते ज्ञेय परब्रम्ह सर्व व्यापक आहे हे दाखविण्यासाठी श्रृती मधे सुद्धा असाच उल्लेख आहे."वाचूनि हस्त, नेत्र पाये | हे भाष तेथ के आहे | सर्व शुन्यत्वाचा न साहे | निष्कर्षु जे ॥१३-८८४॥

अर्थ:- एरव्ही ब्रम्ह हे सर्व शुन्यपणाचा शेवट आहे.हा सिद्धांत सुद्धा ज्या ठिकाणी सहन होत नाही, त्या परब्रम्हाच्या ठिकाणी हात, पाय, डोळे हे बोलणे कोठे आहे.

         हे परब्रह्म "आहे" असेही म्हणता येत नाही.व "नाही " असेही म्हणत येत नाही. माऊली ज्ञानेश्वरीत लिहीतात की,"जे नाही म्हणो जाइजे | तव विश्वाकारे देखिजे |विश्वचि ऐसे म्हणिजे | तरि हे माया ॥१३-८६८॥ 

       म्हणजे परब्रम्हास नाकाराबे ,तर जे जगाच्या आकाराने आपणांस दिसते, मग त्यासाठी उपादान व निमित्त कारण कोणते ?ह्या प्रश्नास उत्तर मिळत नाही.व जगच परब्रम्ह म्हणावे तर ही माया आहे किंवा परमात्म्याचे तेज किवा प्रकाश आहे.म्हणूनच भक्तिमार्गात "जे जे भेटे भूत | तया मानिजे भगवंत "| असा भाव ठेवतात. ह्यावरून हाच निष्कर्ष निघतो की जग व जगाचा आधार एक परमात्माच आहे.

*जनजीवन जनजीवनसार*:- केनोपनिषदात ऋषी लिहितात की, यन्मनसा न मनुते येनाहुर्मनो मतम् |

तदेव ब्रम्ह त्वं विद्धि नेदं यदिदमुपासते.॥५॥

अर्थ:- ज्याचे मनाने मनन करता येत नाही ,पण ज्याच्यामुळे मनाला मनन करण्याची शक्ती प्राप्त होते,तेच ब्रम्ह स्वरुप आहे असे तू निश्चितपणे जाण.ज्याची तू उपासना करतोस, ते ब्रम्ह स्वरुप नाही.तसेच ज्याच्यामुळे डोळ्यांना बघण्याची शक्ती ,वाचेला बोलण्याची शक्ती,पायाला चालण्याची  शक्ती, म्हणजे जी जी क्रिया कर्मेद्रियानी ,किंवा ज्ञानेंद्रियानी करतो त्या सर्व कार्यास ज्याच्यामुळे शक्ती प्राप्त होते ते परब्रम्ह आहे.म्हणून सर्व प्राण्यांच्या जीवनाचे कारण एक परब्रम्हच आहे व सर्वाच्या जीवनाचे सार सुद्धा परब्रम्हच आहे.

             अशा विलक्षण सर्वज्ञ,सर्व व्यापी, सर्व शक्तीमान परब्रम्हाची शक्ती घेऊन ब्रम्हलोकातून स्वामी माघ वद्य सप्तमीस  शेगावात पातुरकरांच्या वाड्यासमोर प्रगट झाले.व लीलये पत्रावळीतील उष्ट्यी भाताची  शीते वेचून खाऊ लागले. ह्या स्वामीच्या लीलेचा असा अर्थ होतो की ,आपणास जे काही मिळते तो भगवंताचा प्रसाद म्हणून आनंदाने ग्रहण करावा कारण तो प्रसाद म्हणजेच परब्रम्ह आहे.व हीच वेदाची सुद्धा शिकवण आहे.ह्या उलट जो ब्रम्ह स्वरुप प्राण्याना अन्न समजतो म्हणजे  दीन दुबळ्या ,गरीब लोकांना लुटतो ,छळतो किंवा त्याच्यावर अन्याय करतो हा त्या दुर्जनांचा दर्प आहे.व हा दर्प दडपण्या साठीच स्वामी  ब्रम्हलोकातून पृथ्वीवर अवतीर्ण झाले. स्वामी ब्रम्हलोकातून अवतीर्ण झाले ह्या वाक्याची मीमांसा अशी आहे की, प्रत्येक कार्याला काहीतरी कारण असतेच व  ते  कारण त्या कार्यामधे सुक्ष्म रुपात अनुस्यूत असते. स्वामीनी आपल्या सर्व भक्ताना नामस्मरण करुन उपास्याचे रूप डोळ्यांत साठविण्यास शिकविले.व भक्ताना  क्रम मुक्तीच्या मार्गाद्वारे मुक्त होण्यासाठी ब्रम्हलोकात पाठविले.म्हणून ह्या कार्याच्या कारणावरुन आपण तर्क बांधू शकतो की  स्वामी सुद्धा ब्रम्ह लोकातून आले आहेत.त्याचप्रमाणे तेलंगी ब्राह्मण जे स्वामीच्या समोर चुकलेली ऋचा म्हणत होते ,त्यांना स्वामी म्हणाले होते, 

   म्हणा असे मी जसे म्हणू 

          ब्रम्हा म्हणती तसे म्हणू

त्याचप्रमाणे,

    म्हणवून म्हणविली ऋचा अशी 

          ब्रम्ह ब्रम्हदेव वदे जशी 

वरील सर्व कारणावरून हाच निष्कर्ष निघतो की स्वामी ब्रम्हलोकातून अवतीर्ण झालेले  महापुरुष आहेत.    

      महाभारताचे युद्ध संपल्यावर अर्जुनाने भगवंताना पुन्हा एकदा भगवद्गीता कथन करण्यास सांगितली तेव्हा भगवान म्हणाले त्या वेळेस मी तुला योगयुक्त अवस्थेत उपदेश केला.आता तो उपदेश पुन्हा सांगणे मला शक्य नाही.पण मी तुला  ब्रम्हलोकातून आलेल्या ऋषीनी दिलेली उत्तरे सांगतो असे सांगून अर्जुनाची ईच्छा तृप्त केली.त्या उत्तरानाच *अनुगीता* म्हणतात. ह्यावरून ब्रम्हलोकातून आलेल्या ऋषींचे महत्त्व कळते.आपले सद्गुरू देहधारी दिसत होते तरी ते परब्रम्ह स्वरुप अजर,अमर,अविनाशी असे ऋषी होते.माऊली लिहीतात की,

नाम,रुप, संबंधु |जाति,क्रिया,भेदू | हा आकारासीच प्रवादू | वस्तुसि नाही॥१३-९०४॥

अर्थ:- नाम,रुपादी संबंध व जाति क्रियादी भेद  हे आकारावरच नांदतात. त्याची भाषा ब्रम्हवस्तुला लागु पडत नाही. भगवान सुद्धा  भगवद्गीतेच्या दुसर्‍या अध्यायात लिहीतात की, अविनाशि तुद्विध्दि येन सर्वमिदं ततम् | विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ॥१७॥

अर्थ:-नाशरहित असे तेच ज्ञेय आहे की,ज्याने  हे हे सर्व जग व्याप्त केले आहे.त्या अविनाशी तत्वाचा नाश कोणीही करु शकत नाही.

        अशा तत्वाच्या प्राप्तीचा एकमेव उपाय म्हणजे सद्गुरूंना शरण जाऊन त्यांची अहंकार रहित भक्ती करणे हा होय.ह्या भक्तीत सद्गुरुंचा शब्द प्रमाण असतो.अशी भक्ती जेव्हा पुर्णता गाठते,तेव्हा भक्ताचा जीवभाव टाकून दिल्या जातो.व स्वामी त्यास मंत्र दीक्षा देतात. भक्त रात्रंदिवस मंत्राचा जप करतो. जसे चिचोलीचे माधवराव कुळकर्णी.ह्या जपातूनच त्या उपासकाला  जीवनाचे रहस्य कळते व भक्त कृतकृत्य होतो.ही कृतकृत्यता आम्हांसही मिळावी हीच सद्गुरु चरणी प्रार्थना.


ओवाळितो गुरूराया 

             जीवभाव ओवाळूनिया

ध्यान स्वरुपा ध्यानी यावे 

             ध्यानी रघुपती पद गावे 

मुखी नित्य गणगण गावे 

             गणगण गीत मुखी यावे.

गणगण गीत वदाया या 

             गणगण गीत गावाया या 

भक्ती स्वरुप वदाया या 

             पद भक्ती शिकवाया या 

शिक्षण शिकवे गणगणराम 

             सिता सितापती सिताराम ॥ॐ॥


रघुपती राघव राजाराम 

                  पतित पावन सिताराम 

                  श्रीगणगणरामार्पणमस्तू



जगन्नाथ गांधी 

मुंबई मालाड (प)

९७३९५१८८५८

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...