रविवार, ४ सप्टेंबर, २०१६

तो एक दगड

प्रथम क्रमांक प्राप्त रचना ....!!

साहित्य दर्पण -काव्य स्पर्धा
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

*तो एक दगड*

शेंदूर फासलेला तो दगड
निर्जीव निराकार ...
गार्हाणी ऐकून किटलेले
अदृश्य कान ...
होकार नकारातही
न डोलणारी मान ....!!
तो एक दगड .....

अन्यायाचा प्रतिकार
न करणारे बंदिस्त हात ....
पेटलेल्या नंदादिपाचा
प्रकाश नि ऊब
याचीही जाणीव नसणारा
तो एक दगड ...

भाजी भाकरीच काय,
पंचपक्वन्नाच्या नैवेद्याची
चवही न घेतलेली रसना ...
अत्याचार पाहूनही
ब्र शब्दही न बोलणारा ....
तो एक दगड...

बुडणाराला वाचविण्यास
न धावणारे अचल पाय ...
भवसागर पार करताना
काळाकभिन्न मृत्यु
पाहणारे निश्चल डोळे ...
तो एक दगड ....

हे दगडा ,लक्षात ठेव
तुझे सोहळे ,केवळ
मानवाने फासलेल्या
शेंदरा मुळे आहेत ...
त्याच्या श्रद्धा ,तुझ्या पायाशी
नत मस्तक आहेत ...
घट्ट विश्वासाला तडा
लागू देऊ नको ....

ज्या मानवाने तुला
जन्म दिला ....
त्यांचे कल्याण कर ....
नाहीतर तो
सैरभैर होऊन
तुझेच अस्तित्व
विसरून जाईल ....!!
तुला नमस्कार हवा असेल तर
चमत्कार कर ...!!

सौ.संगिता भालसिंग@25
अहमदनगर
०३/०९/१६

शुक्रवार, २ सप्टेंबर, २०१६

कश्मिरात शांतता पाहिजे

साहित्य दर्पण - उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त

नाद चारोळी स्पर्धा
💐💐💐💐💐💐💐💐

धगधगत्या कश्मीरात शांतता पाहिजे,
मानव्याचा प्रेमफुलोरा फुलण्यासाठी..

शुभ्र हिमावरचे रक्त थांबले पाहिजे,
भारतमातेचे अश्रू थांबण्यासाठी...

**************************
प्रा. सौ.संगिता भालसिंग @२५
अहमदनगर
दि.०१/०९/१६
spsfun.com

मोती

सुख

भोग

गुरुवार, १ सप्टेंबर, २०१६

बैल पोळा

बैल पोळा

अरे,शेतकरी दादा
नको होऊ हवालदिल ...
सण आलाय पोळ्याचा
सजव बेगडानी बैल ...

जोडी सर्जा राजाची
घाल अंगावर झुल ...
तुझी लक्ष्मी कष्टाची
वाहिल पायावर फ़ुल ...

वाटा सुखाचा दुखाचा
दिस येतील जातील ...
तुझ्या कष्टाच्या घामाचा
मोती सोन्याचा होईल ...

प्रा.सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
दि.०१/०९/१६
spsfun.com

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...