प्रथम क्रमांक प्राप्त रचना ....!!
साहित्य दर्पण -काव्य स्पर्धा
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
*तो एक दगड*
शेंदूर फासलेला तो दगड
निर्जीव निराकार ...
गार्हाणी ऐकून किटलेले
अदृश्य कान ...
होकार नकारातही
न डोलणारी मान ....!!
तो एक दगड .....
अन्यायाचा प्रतिकार
न करणारे बंदिस्त हात ....
पेटलेल्या नंदादिपाचा
प्रकाश नि ऊब
याचीही जाणीव नसणारा
तो एक दगड ...
भाजी भाकरीच काय,
पंचपक्वन्नाच्या नैवेद्याची
चवही न घेतलेली रसना ...
अत्याचार पाहूनही
ब्र शब्दही न बोलणारा ....
तो एक दगड...
बुडणाराला वाचविण्यास
न धावणारे अचल पाय ...
भवसागर पार करताना
काळाकभिन्न मृत्यु
पाहणारे निश्चल डोळे ...
तो एक दगड ....
हे दगडा ,लक्षात ठेव
तुझे सोहळे ,केवळ
मानवाने फासलेल्या
शेंदरा मुळे आहेत ...
त्याच्या श्रद्धा ,तुझ्या पायाशी
नत मस्तक आहेत ...
घट्ट विश्वासाला तडा
लागू देऊ नको ....
ज्या मानवाने तुला
जन्म दिला ....
त्यांचे कल्याण कर ....
नाहीतर तो
सैरभैर होऊन
तुझेच अस्तित्व
विसरून जाईल ....!!
तुला नमस्कार हवा असेल तर
चमत्कार कर ...!!
सौ.संगिता भालसिंग@25
अहमदनगर
०३/०९/१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.