बुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१८

जरतर

वृत्त- आनंदकंद

गागालगा लगागा गागालगा लगागा

जोडू नकोस नाते आता उगीच वरवर
सोडून काल गेली पडले विशाल अंतर...

ती सांजवेळ होती हातात हात होता
दाबून टाकलेली ओठात काल थरथर...

तू चढवलास झोका,डोळे मिटून होते
आंब्यास बांधलेल्या झोक्यात काल गरगर...

दावू नको जगाला काळीज फाटलेले
धागे कसे बसे ही जोडून आज भरभर...

श्वासात श्वास होता विश्वास काल होता
नात्यास लागलेली बाधीत आज घरघर...

होत्या चुका कुणाच्या हे आज सांगताना
वागू नकोस खोटे बोलू नकोस चरचर...

थांबू नकोस आता सांधू नकोस आता
कापून टाकलेले काळीज आज करकर...

शब्दात मांडलेली वचने नकोस काढू
या जीवनी तसेही घडते असेच जरतर...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

घरधनी

💐🌹घरधनी🌹💐

घरधनी प्रिय माझा
मोठ्या दिलाचा असे राजा
गोरया भाळी शोभतसे
सौभाग्याचा टिळा माझा ||१||

घरधनी प्रिय माझा
त्याची काय सांगू बात ?
गुणगान सारं करता
शब्द कमी पडतात ||२||

घरधनी प्रिय माझा
चार लोकात मान सन्मान
ऐकाया भारी कवतिक
सदा आतुरले कान ||३||

घरधनी प्रिय माझा
शूरवीर चाले झोकात
माझे सुख सारे
खरे त्याच्याच सुखात ||४||

घरधनी प्रिय माझा
शिरी शोभतो पटका
माझ्या प्रेमातुन नाही
सात जन्मही सुटका ||५||

..........................
प्रा.सौ.संगिता भालसिंग
20/1/15

मंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१८

वेदना

सूर्य डोळयात ठेऊ नकोस

वेदनाही पेटेल ना

चंद्र डोळयात येऊ दे

वेदना थंडावेल ना ....

सौ.संगिता भालसिंग
30/10/14

अंतरंग

जलौघवेगा
लगालगागा लगालगागा

अंतरंग

दुखावलेल्या अशा मनाला
कधीच दावू नये जनाला...

लढा कुणाशी धडा कुणाला
उगीच शक्ती नको पणाला...

असा नको रे बळी पडू तू
क्षणिक मोहातल्या क्षणाला...

कमावलेल्या परावयाच्या
नकोस स्पर्शू दुज्या धनाला...

दुखावले पोट दोष कारे
उगीच अन्नातल्या कणाला...

मलिन रे अंतरंग झाले
उगाच का सजवतो तनाला...

Sangita Bhalsing

मलिका

तुझ्या अधीर मनात असते
अनुत्तरित प्रश्नांची मालिका ..

पण सदा लक्षात ठेव सखी
तूच माझ्या दिलाची मलिका ...

Sangita Bhalsing

आक्षेप

।। आक्षेप।।

लेखन माझे
विचार माझे ,
कागद माझा
पेनही माझा ..

भावना माझी
शब्दही माझे ,
चारोळी माझी
काव्यही माझे ..

मी ही तुझी
तू ही माझा ,
व्यक्त होताना
आक्षेप तुझा ..?

Sangita Bhalsing

रविवार, १४ ऑक्टोबर, २०१८

रण रागिणी

बनू नकोस सीता
त्या रामाची
लोक तुला
अबला म्हणतील ...

बनू नकोस द्रोपदी
त्या पांडवांची
लोक तुला
वाईट म्हणतील ...

बन जिजाऊ
त्या शिवबाची
लोक तुला
आदर्श माता म्हणतील ....

बन सावित्री
त्या ज्योतिबाची
लोक तुला
क्रांतिज्योती म्हणतील ....

बन राणी
त्या झाशीची
लोक तुला
रण रागिनी म्हणतील .....

Sangita Bhalsing

Ahmednagar...
.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...