शुक्रवार, ९ नोव्हेंबर, २०१८

नुपूर

नुपूर
आनंदकंद
गागालगा लगागा गागालगा लगागा

गाण्यात ताल आहे तालात सूर आहे
येशील तू कधी रे आवाज दूर आहे...

काळीज फाटलेले प्रीतीत बाटलेले
या पापणीत आसू डोळ्यात पूर आहे...

मातीत गुंतलेले रानात वाजलेले
काट्यात चालताना पायी नुपूर आहे...

हातात हात आहे कानात बात आहे
स्पर्शात रातराणी वासात चूर आहे...

नात्यात बांधलेला रात्रीस चांद बोले
देहात चांदणीच्या भलताच नूर आहे...

कामात गुंतलेला घामात झिंगलेला
शेतात चालताना वाटेत तूर आहे...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

गुरुवार, ८ नोव्हेंबर, २०१८

कधीतरी

11 शुभगंगा
22 मात्रा-8,8,6

अभिमानाला सोडावे तू कधीतरी
स्वाभिमानास तू मोडावे कधीतरी

गूढ रंगात अवघडलेल्या नात्यांचे
धागे धागे जोडावे तू कधीतरी

चाला बोला हसता खेळा एक व्हाया
झाल्या चूका खोडावे तू कधीतरी

माय पित्याला विसरू नकोस संसारी
चरणी स्पर्श मनोभावे कर कधीतरी

बसून एकाच पंगतीलाच एकदाचा
जाती पाती तोडावे तू कधीतरी

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
8.11.18

फटाके

फटाके फोडून केले त्यांनी
पहा आनंदाने कन्यादान
घर सोडावे लागले नाही
अहा तुम्ही किती भाग्यवान

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

बुधवार, ७ नोव्हेंबर, २०१८

दिवाळी

कवी विचार मंच

स्पर्धेत सहभागी रचना(कविता)

दिवाळी

महाराणी ती सणांची
दिवाळीचा दिन आला
आमंत्रण देते तुम्हा
चला चला फराळाला ..

शेव,लाडू,चकलीचा
घातलाय मोठा घाट
लेक जावयाची पाही
सारे कुटुंबीय वाट ...

दारी सुगंधी तोरण
बांधू झेंडू गलाबाचे
पान फुलांच्या नक्षीत
नवरंग रांगोळीचे ...

पहाटेच्या आंघोळीला
लावू चंदनी उटणे
पोळी गुळ पुरणाची
सागवानाचे लाटणे ...

सुरसुरी,भुईनळे
आतषबाजीला
हात धरून आणूया
पहाया आजीबाईला..

पणतीच्या ज्योती मध्ये
पुजा लक्ष्मीची करुया
हात जोडून मागूया
वसा प्रेमाचा धरूया

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

दिवाळी

श्रीमंताचा दिन दिवाळी
गरिबाची दीन दिवाळी
बंगल्याची प्रकाश जाळी
झोपडीची हीन दिवाळी

सौ.संगिता भालसिंग

हे ईश्वरा

हे ईश्वरा ,

काया वाचा मन
गुंतविले सत्कर्मात
नाही वर्तन कधी
केले अधर्मात ...

मी सुख मागितले
तू तर दुःख दिले ....
सदा आनंदाने
मी स्वीकारले ....

पण तुझा हिशेब
बरोबर आहे का ....?

Sangita Bhalsing

बघ जरा
पाप पुण्याचा
माझा घड़ा ...
बदलला तर नाही ना .....?

***************
प्रा.सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
6/11/15

पिंजरा


व्योमगंगा
गालगागा गालगागा गालगागा गालगागा
गजल

सोनियाच्या पिंजऱ्याने कोंडले या पाखराला
त्या नभाशी ती भरारी बंद केली पामराला...

त्या धरेला भेटण्याला घालतो तू येरझारा
मीच आहे ओळखीची लाट बोले सागराला...

हो जरासा रानभैरी सोड मौना बरस आता
दोन हात जोडतो मी आळवूनी पावसाला...

देव नाही दूत नाही राक्षसाचा हा पहारा
टाक आता तू जपूनी कोवळ्याशा पावलाला...

या जगाच्या त्या शुभेच्छा फार झाल्या जिंकण्याला
फोड छाती मार ठोसा पार करण्या कातळाला...

छत्र नाही पत्र नाही साजनाला खंत नाही
पापणीला घे मिटूनी थांबवाया काजळाला...

घाम गेला दाम नाही या पिकाला भाव नाही
माय मातीचा सहारा का विकावे वावराला...

सूर आहे ताल आहे अतरंगी शब्द वाहे
संगिताच्या भैरवीचा साज आहे या मनाला...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
06.11.18

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...