सोमवार, २८ जानेवारी, २०१९

देश

मी भिकारी रे जरीही देव आहे देश माझा ...
वंदनाला आहे जरी फाटलेला वेष माझा ...

भारतीचा लाडका मी पुत्र आहे वेगळाला ...
या मनाला सांगतो मी दाबताना रोष माझा ...

प्रा.सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

बुधवार, २३ जानेवारी, २०१९

लेणे

डोळ्यात पापण्यांनी
आठवांचे ठसे पेरले ...

काळजात प्रेमाचे
अमर लेणे कोरले....

Sangita Bhalsing

बुधवार, १६ जानेवारी, २०१९

उदास

16 जलौघवेगा वृत्त
लगालगागा लगालगागा

पहाट झाली उदास आता
भकास वाटे मनास आता...

निघून गेला न सांगता तू
फिरून येतो कशास आता...

नको विनंती करुस आता
फितूर झाले प्रयास आता...

नव्याच भेटी नव्याच गाठी
जुनेच गेले लयास आता...

तिळास गोडी नसेच आता
उगाच दोषी गुळास आता...

सौ.संगिता भालसिंग

तुटलेली पतंग

स्पर्धेत सहभागी रचना

महाराष्ट्र साहित्य मंच

कविता

तुटलेली पतंग

कटली रे कटली
पतंग कटली...
मुलांची धावपळ
धूळ माती उठली...

ढील दे दे,ढील दे दे
आरोळी उठली...
पतंगाची काटाकाटी
जीवाची शुध्द कुठली?

छत अंगण घरे दारे
माणसांनी फुलली
गाण्याच्या तालावर
रस्सीखेच चालली ...

संक्रांतीचा सण
भरते अंगात वारे
जाती धर्म विसरून
आनंद लुटतात सारे ...

रंगीबेरंगी पतंग
अवकाशी नाचतात
बिचाऱ्या पक्ष्यांचे
प्राण मात्र घेतात ...

खेळ असो खेळासारखा
नको कुणाला इजा
सण साजरे करा,पण
वाईट गोष्टी करा वजा ..

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
बुधवार दि.16.01.19

शिक पोरी शिक


शिक पोरी शिक

शिक पोरी शिक


बाराखडी शिक...


आई बापाला तू


माग ज्ञान भिक...

लग्न झाले तुझे


सुरू रांधा वाढा 


खरकटी काढा


पाळणाही ओढा...

पायावर उभी


स्वावलंबी बन


ओरबाड जरा


अज्ञानाचे तण...

सोड अंधश्रद्धा


धर्म जाती भेद


वाचूनया काढ


आता चारी वेद...

अन्यायाचा बीज


नको देऊ वाढू


परंपरा खांब


रूढीलाही गाडू...

संस्काराची उटी


भाळावर लाव


जन्म तुझा सार्थ


जगालाही दाव...

सौ.संगिता भालसिंग


अहमदनगर


बुधवार दि.१९.१२.१८


मंगळवार, १५ जानेवारी, २०१९

वार

खुलेआम झाले
वार पाठीवर ...
ब्र शब्द न आला
मूक ओठावर ...

देवा बरे झाले
वार ना पोटावर ...
जरी नाचविले
फेकल्या नोटांवर ...

पैंजणे वाजली
दगडी कोठ्यावर ...
संसार सारा पेलला
पायाच्या बोटावर...

येरझारा घातल्या
आटलेल्या तळ्यावर..
ओरखडे उमटले
कोरड्या गळ्यावर...

सौ.संगिता भालसिंग

शुक्रवार, ११ जानेवारी, २०१९

नाती

उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त रचना...
गझल विचार मंच ,शेगाव

मंदाकिनी वृत्त

गागालगा गागालगा गागालगा गागालगा

वाणी अशी बहरून यावी,
रेशमी ओठातली...
माया अशी उमलून यावी, 
काळजाच्याआतली !!०१!!

डोळे किती व्याकुळ झाले,
भाकरीचा चांदवा..
तृष्णा अशी समजून घ्यावी,
मोकळ्या पोटातली !!०२!!

माझे तुझे वादात कोरा ,
भावनांचा कालवा...
नाती अशी तोडू नका हो,
पांगताना सावली !!०३!!

भक्ती अशी दावू नको तू ,
कोरड्या टाळातली...
सोडू नको वेडया अशी तू ,
साधना नामातली !!०४!!

जाऊ नको आईस बोले ,
पकड ही बोटातली...
साडी अशी ओढू नको तू ,
कोवळ्या हातातली !!०५!!

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
शनिवार दि.14.12.18

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...