21 आनंदकंद
गागालगा लगागा गागालगा लगागा
जोडू नकोस नाते , आता उगीच वरवर
सोडून काल गेला , पडले विशाल अंतर
ती सांजवेळ होती , हातात हात होता
दाबून टाकलेली , ओठात काल थरथर
तू चढवलास झोका,डोळे मिटून होते
आंब्यास बांधलेल्या , झोक्यात काल गरगर
दावू नको जगाला , काळीज फाटलेले
धागे कसे बसे ही , जोडून आज भरभर
श्वासात श्वास होता , विश्वास काल होता
नात्यास लागलेली , बाधीत आज घरघर
होत्या चुका कुणाच्या , हे आज सांगताना
वागू नकोस खोटे , बोलून आज चरचर
थांबू नकोस आता , सांधू नकोस आता
कापून टाकलेले , काळीज आज करकर
स्वप्नात मांडलेली , वचने नकोस काढू
या जीवनी तसेही , घडते असेच जरतर
ही संगिता मनाने , बांधून वेदनेला
ते शेर काळजाचे , गजलेत आज भरभर
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.