अध्यात्म लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अध्यात्म लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १ फेब्रुवारी, २०२६

अध्याय २ - लेख क्रमांक १ - श्री गजानन महाराज - शेगाव

    अध्याय २ - श्री गजानन महाराज - शेगाव 

                         

गणगण काव्यमाला – जीवभावाची ओवाळणी | श्री गजानन महाराज

                     *श्री गणगणरामाय नमः*

                         लेख क्रमांक १

                      *अध्याय दुसरा*

        *जीवभावाची ओवाळणी करतो* “जीवभाव म्हणजे काय?”

श्री गजानन महाराज शेगाव – जीवभावाची ओवाळणी, गणगण काव्यमाला अध्याय २


""ओवाळितो गुरुराया

             जीव भाव ओवाळूनीया"

ध्यान स्वरूपा ध्यानी यावे 

            ध्यानी "रघुपती "पद गावे 

मुखी नित्य गणगण गावे 

             गणगण गीत मुखी यावे 

गणगण गीत वदाया या 

              गणगण गीत गावाया या 

भक्ती स्वरूप वदाया या 

               पद भक्ती शिकवाया या 

शिक्षण शिकवे गणगणराम 

               सिता सितापती सीताराम  ॥१॥

         "गणगण काव्यमाला "ह्या ग्रंथातील दुसऱ्या अध्यायातील पहिल्या युग्मातील  जीवभावाचे चिंतन.व भक्ती स्वरुप शिकवण्या साठी सद्गुरू चरणी प्रार्थना

 जीव कल्पयते पूर्वं,

         ततो भावान् पृथग्विधान्

बाह्यान् आध्यात्मिकाश्चैव

          यथा विद्या यथा स्मृति

     आपण बाह्य पदार्थ पाहिले, इंद्रियांनी अनुभवले की, आपल्या मनावर त्याचे संस्कार होतात.व त्या संस्कारांच्या मधून आंतरिक मनोकल्पीत पदार्थांची निर्मिती होते.त्या कल्पनांच्या मधून पुन्हा बाह्य पदार्थ सत्य वाटायला लागतात.येथे शंका येते की,

१) ह्या सर्वांचे मूळ कारण काय?

२) ह्या सर्व कल्पना कोण करतो?

३)ह्या कल्पनांचे मूळ निमित्त काय आहे?

              सर्वप्रथम आत्मदेव, प्रभू, जगत्कारण ईश्वर, विशीष्ट जीवाची कल्पना करतो.विशीष्ट जीव म्हणजे शुद्ध स्वरूप  पारमार्थिक जीवाची कल्पना करतो.म्हणजे ईश्वर स्वतःच जीव भावाला प्राप्त होतो.श्रृती वर्णन करते

    "तत्सृष्ट्वा तदेवानुप्राविशत"

ईश्वराने विश्व निर्मिती करुन त्या मधे प्रवेश केला.अद्वय , आनंद स्वरुप असणारा परमात्माच  स्वतः विश्वरुप झाला.व त्याने सर्वांमध्ये जीवरुपाने प्रवेश केला.परमात्माच जीव रुपाला प्राप्त होऊन नंतर त्याने अनेक अंतर्बाह्य नानाविध पदार्थांची निर्मिती केली.सुख, दुःख, ज्ञान,राग वगैरे आंतरिक पदार्थ असून यासाठी निमित्त कारण होणारे घटपटादी हे बाह्य पदार्थ आहेत.हे सर्वच पदार्थ कल्पित आहेत.

प्रश्न:- ह्या सर्व कल्पित पदार्थांचे मूळ कारण काय आहे?की,हे सर्व पदार्थ "ख " पुष्पा प्रमाणे अगदीच असत् आहेत. स्वामी सांगतात, निर्गुण, निर्विशेष,निरुपाधिक आत्मस्वरूपामधे सर्वप्रथम "हेतु-फलात्मक " जीवाची कल्पना निर्माण होते.

प्रश्न:- हेतु फलात्मक जीव म्हणजे काय?

   प्रत्येक जीव सर्व प्रथम मी कर्ता आहे अशी कर्तृत्व भावना निर्माण करतो.त्यामुळे तो चांगल्या -वाईट अनेक प्रकारच्या कर्माच्या मध्ये प्रवृत्त होतो.त्यामुळे त्या कर्माप्रमाणे फळ प्राप्त होते.तेंव्हा जीवाला वाटते मला सुख, दुःख झाले.ही भोक्तृत्व भावना त्यांच्या मधे निर्माण होते.अशाप्रकारे जीव "मी"  करतो ह्या कर्तृत्व भावनेने व "मी ' सुखी दुःखी ह्या भोक्तृत्व भावनेने युक्त होतो.म्हणून येथे कर्तृत्व भावना हे कारण व भोक्तृत्व भावना हे त्यांचे फळ आहे.

"अहंकार विमूढात्मा कर्ता अहं इती मन्यते "

अहंकाराने विमूढ झालेला जीव स्वतःलाच कर्ता म्हणवून घेतो.अशा ह्या कर्तृत्व व भोक्तृत्व भावनेने युक्त असलेल्या अज्ञानी जीवालाच हेतु फलात्मक जीव असे म्हणतात. कर्तृत्व भावना हा हेतु म्हणजे कारण व सुख दुःख हे त्याचे फळ आहे.जीव ह्या हेतू फळांनी म्हणजे कर्म -कर्मफळांनी बध्द, मर्यादित व संसारीं होतो.

     वस्तूतः प्रत्येक जीव हा स्वतः ईश्वर स्वरूप, शुध्द चैतन्य स्वरुप, परिपूर्ण,व आनंदरस  आहे.परंतू ह्या शुध्द आत्मचैतन्यामधे हेतू फलात्मक बध्द जीवाची कल्पना निर्माण होते

प्रश्न:- कशी?

उत्तर:-रज्ज्वां इव सर्प कल्पयते

    ज्याप्रमाणे शुध्द,स्थिर रज्जुवर चंचल, अस्थिर सर्पाची कल्पना निर्माण होते, त्याप्रमाणे शुध्द आत्मचैतन्यामधे हेतू फलात्मक जीवाची म्हणजे बध्द, संसारीं जीवाची कल्पना निर्माण होते.एकदा हा अज्ञानमूलक जीव भाव निर्माण झाला की त्यापासून पुढे सर्व अनर्थ परंपरा निर्माण होते.

          आपल्याला आता काहीतरी मिळवायचे आहे अशी भावना निर्माण झाली की मग ती पूर्ण करण्यासाठी क्रिया -कारक -फलभेदाने युक्त असणाऱ्या अनेकविध बाह्य व आंतर अनंत पदार्थांची कल्पना निर्माण होते.

प्रश्न:- ह्या सर्व अंतर्बाह्य कल्पित पदार्थांचे कारण काय?

                 जो जीव स्वतः आत्मचैतन्यामध्ये कल्पित आहे तोच कल्पित जीव ह्या सर्व पदार्थांचे कारण आहे.त्या जीवाचे जसे ज्ञान -विज्ञान असेल त्याप्रमाणे त्याला स्मरण होते.जसे,अन्न, पाणी वगैरे पदार्थांमुळे भूक तहान शांत होते व आपणास तृप्ती चा अनुभव येतो.मात्र हे पदार्थ नसतील तर तृप्तीचा अनुभव येत नाही .तहान भुकेमुळे व्याकुळ होतो.अशावेळी भोजनाची कल्पना जागृत होते.तृप्ती मिळविण्यासाठी आपण जेवले पाहिजे.म्हणजे जेवण हा हेतु व तृप्ती हे त्याचे फळ.म्हणजे आपणास भोजनादी हेतुचे व तृप्ती ह्या फळाचे स्मरण होऊन, हेतूस्मरण व फलस्मरण ह्याचे विज्ञान होते.

        याप्रकारे जीवाला अनंत हेतूंचे व अनंत फळांचे स्मरण होत असते.आपल्याला हवे तेवढे अन्न वस्त्र मिळाले म्हणजे आपण सुखी होऊ ह्या कल्पनेने जीव इच्छीत वस्तू मिळविण्यासाठी अनेक कार्यामध्ये प्रवृत्त होतो.व कर्म केले की त्याचे फळ मिळते व मनाला समाधान प्राप्त होते.त्या समाधानाच्या स्मरणाने पुन्हा त्या वस्तू मिळविण्यासाठी जीव कर्म प्रवृत्त होतो.पुन्हा त्याला कर्माचे फळ मिळते व तो समाधानी होतो.व पुन्हा त्या समाधानाच्या स्मरणाने हेतुभूत भोग्य पदार्थांची कल्पना करतो.

अशा प्रकारे अनंत कल्पनांच्या प्रवाहाने बनलेला हा संसार सागर आहे.जीव सतत ह्या बाह्य व आंतरीक पदार्थांची निमित्त नैमित्तिक, साध्य -साधन भावाने कल्पना करत राहतो.विषयांचे संस्कार, त्यामधून स्मृती, स्मृती मधून संकल्प,संकल्पामधून क्रिया, क्रिया घडविण्यासाठी साधनीभूत कारक, त्यामधून क्रियेचे फळ,फळाचा उपभोग , पुन्हा संस्कार असे अव्याहत चक्र सुरूच राहते.

    याप्रकारे संस्कार -स्मृती-संकल्प-क्रिया-कारक-फळ-उपभोग व पुन्हा संस्कार हे असे सर्व परस्परांना कारण व कार्य होतात. ह्याप्रमाणे जीव अनंत साध्य साधनांनी युक्त असणाऱ्या अनेकविध कल्पना करतो.म्हणजे जीव आपल्या अंतःकरणात अशा अनंत कल्पनांचे जंजाळ निर्माण करतो.व कल्पनांच्या तरंगामधे जीवन जगतो.

        थोडक्यात , जीव स्वतः कल्पित आहे.स्वत:ला देह समजून, ह्या देहासाठी तो जीव अनेक कल्पना निर्माण करून जीवनभर त्या कल्पनांच्यामध्ये बध्द व मर्यादित होऊन राहतो.म्हणूनच त्याला सुखदुखात्मक संसाराचा अनुभव येतो.

          जोपर्यंत स्वतः च्या पारमार्थिक आत्मचैतन्य स्वरूपाचे अज्ञान असते, तोपर्यंत तो जीव स्वतः मध्येच अनात्म्याचा आरोप करुन निरनिराळ्या विषयांच्या कल्पना निर्माण करतो. कर्तृत्व , भोक्तृत्व भाव निर्माण करून संसारीं होतो.म्हणून जो पर्यंत कल्पना आहेत तोपर्यंत जन्मानुजन्मे हा अज्ञानमूलक संसार अखंड अव्याहतपणे चालूच राहतो.म्हणून ह्या कल्पनेला परमेश्वर चरणी अर्पण करण्यासाठी परमेश्वराच्या नामस्मरणाचा व रुप डोळ्यांत साठविण्याचा अभ्यास केला तर केंव्हातरी करुणाकराला करुणा येऊन आपल्या जवळ ठेवून घेतील व स्वस्वरुपाचा बोध करतील व मंत्र देतील. जसे 

"ध्यान स्वरूपा ध्यानी यावे 

        ध्यानी" रघुपती पद" गावे"

      येथे "रघुपती पद" म्हणजे रघुपती राघव राजाराम, पतित पावन सिताराम 

    स्वामी हे संपूर्ण पद एवढ्या जलद पण स्पष्ट रीतीने गात होते,की  मला वाटले स्वामी" रघुपती  पदाच्या" ऐवजी" गणगण "म्हणत आहेत .म्हणजे स्वामी परमेश्वराचे नामस्मरण करतात पण आपल्याला गणगण ऐकायला येते.आणि हीच गणगण सद्गुरू कृपेने आपल्या मुखात आली  म्हणजे आपला जीव भाव सद्गुरु चरणी अर्पण केल्या जाईल.असा सुदिन,सर्व भक्तांच्या भाग्याचा  उजळो ही प्रार्थना करुन सद्गुरु चरणी बोबडे बोल अर्पण करतो.


रघूपती राघव राजाराम

          पतित पावन सिताराम 

            श्रीगणगणरामार्पणमस्तू


जगन्नाथ गांधी 

मुंबई मालाड (प)

९७६९५१८८५८

खालील लिंक क्रोम ब्राउझर वर ओपन करा.

https://youtu.be/gMMRfsLdBaM?si=ItjyoeqbrSLcIXIc

ब्लॉग पोस्ट आणि  यू ट्यूब व्हिडिओ आवडल्यास कृपया शेअर नक्की करा.

Sangita Bhalsing 

Ahilyanagar Maharashtra 

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...