साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २ फेब्रुवारी, २०२६

अध्याय २ - लेख क्रमांक ५ - श्री गजानन महाराज शेगाव

अध्याय २ - लेख क्रमांक ५ - श्री गजानन महाराज शेगाव 

                    श्री गणगणरामाय नमः

                       लेख क्रमांक ५

                       *अध्याय दुसराप*

                  *भागवत वत् जगा साचे*

अध्याय २ - लेख क्रमांक ५ - श्री गजानन महाराज शेगाव धार्मिक लेख


            स्वामी देविदास पातुरकरांच्या घरासमोरील वटवृक्षाखाली जेवले.व उनाड नाल्यात शुद्ध निर्मळ जल निर्माण करुन पाणी प्यायले व निघून गेले.बंकट पुन्हा नाल्याजवळ आले तेव्हा स्वामी त्यांना दिसले नाहीत. तेंव्हापासून त्यांच्या मनाने स्वामींच्या दर्शनाचा ध्यास घेतला. व गांवभर हिंडून स्वामींना शोधू लागले. एकादशी निमित्त मोट्याच्या शिवमंदीरात गोविंद बुवा टाकळीकरांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. गोविंदबुवा विद्वान व प्रख्यात किर्तनकार होते.

           मागील चार दिवसांपासून बंकट स्वामींना धुंडत होते.आज पाचव्या दिवशी बंकट पितांबरादी मित्रांबरोबर गप्पा करीत बसले.परंतू  त्या गप्पांमधे बंकटांचे मन रमत नव्हते.राहून राहून बंकटांच्या मनात स्वामी विषयी विचार येत होते. पिताबंराला बंकटांने  स्वामींबाबत  सांगितले. ते ऐकून पितांबरांच्याही मनात स्वामींच्या दर्शनाची ईच्छा जागृत झाली. एकादशी असल्याने बंकट व  पितांबर दोघांनी मोट्याच्या मंदिरात महादेवाचे दर्शन घेऊन किर्तन ऐकण्याचे ठरविले. त्यासाठी ईतर मित्रांना कटवून बंकट व पितांबर दोघे मंदिरात दर्शनासाठी निघाले. महादेव मंदिरासमोर असलेल्या कडूनिंबाच्या  झाडावर बसलेली टिटवी टिटवू लागल्यामुळे बंकटाचे लक्ष झाडावरील टिटवी कडे गेले.तेंव्हा बंकटाला स्वामीं झाडाच्या सहाऱ्याने पहुडले असलेले आढळले. स्वामींना बघून दोघांनाही आनंद झाला.व लगेच स्वामीजवळ येऊन दोघे स्वामींच्या पाया पडून जेवणाची विनंती करु लागले.

            तेंव्हा स्वामी बंकटाला म्हणाले की,तुझी गरज असेल तर आसोलकर माळीणीच्या घरी भिक्षा मागून भाकर आण. त्याप्रमाणे बंकट आसोलकरांच्या घरी गेले. व माळीणबाईंना भाकर मागितली. माळीणबाईंनी दिलेली भाजी भाकर बंकटांनी स्वामींना अर्पण  केली. स्वामीं  भाजी भाकर जेवू लागले. जेवतांना स्वामी पितांबराला म्हणाले, ह्या तुंब्यात उनाड नाल्यातून पाणी भरुन आण.कोणाच्याही घरुन पाणी आणू नकोस. पितांबर तुंबा घेऊन उनाड नाल्याजवळ आले. नाल्यात पायाची तळवे भिजतील एवढेही पाणी नव्हते.परंतू स्वामींचा आदेश म्हणून पितांबरांनी तुंबा नाल्यात बुडविला.आणि ज्या ठिकाणी तुंबा बुडविला त्या ठिकाणी खड्डा पडून शुद्ध निर्मळ जल वर आले.व त्या निर्मळ जलाने तुंबा भरल्या गेला.हे बघून पितांबर आश्चर्यचकित झाले. परिणामी, तुंब्यातील निर्मळ जला प्रमाणेच पितांबरांचे हृदय भक्तीने भरुन गेले. भरलेला तुंबा घेऊन पितांबर स्वामीजवळ आले.स्वामींचं जेवण झाले होते.स्वामी तुंब्यातील गंगाजल प्यायले.तेंव्हा बंकटाने "पंढरीनाथ भगवान की जय"असा जयघोष केला. व खिश्यातून काही चिल्लर पैसे काढून स्वामींना देऊ केले.तेंव्हा स्वामी म्हणाले ह्या दक्षिणेची गरज जे साधू संन्याशी व्यापारीवृत्तीचे  असतात त्यांना  असते. तुझ्याजवळ भाव भक्ती होता म्हणून मी तुला दुसऱ्यांदा भेटलो. पहिल्या वेळेस तू पातुरकरांच्या येथून जेवण  आणले. आता आसोलकरांच्या येथून जेवण आणले.म्हणजे तुझी पंढरी परभारे झाली व फुकटात पंढरीनाथाची प्रसादी सुद्धा मिळाली.आता तुझ्या खिशात असलेलं सुपारीचे खांड काढ व मला दे.स्वामींनी सुपारी खाल्ली. मग स्वामी म्हणाले आता दोघेही किर्तनात जा.व लक्ष देउन किर्तन ऐका.


         गोविंदबुवा किर्तनात आले. त्यांचा संगीताचा अभ्यास असल्यामुळे  ते एकच अभंग निरनिराळ्या रागात गाऊन  दाखवत. शास्त्रीय विषय तोही संगीतातून. म्हणून त्यांच्या किर्तनाला आजु बाजुच्या  खेडेगावातून बरीच धार्मिक मंडळी हजेरी लावायची. त्यामुळै त्यांना दक्षिणा सुद्धा भरपूर मिळत असे.परंतू पैसा कितीही मिळाला तरी तो अधिकाधिक जमा करण्याचा मोह आवरणे अशक्य असते.त्यामुळे कीर्तनाच्या बरोबर वित्ताची अभिलाषा सुद्धा विद्वान पुरुषाचा स्थायी भाव होतो.म्हणून गोविंद बुवा अत्यंत विद्वान किर्तनकार असून सुद्धा त्यांचे वागणं  भागवत वत् न होता ते भागवतात भाग घेतल्या प्रमाणे होत होते.कारण भागवत ह्या शब्दाची फोड (१) भाग (२) वत् ,अशी केल्यास, भागवतकाराच्या दोन संभावना निर्माण होतात.(१) भागवतात भाग घेणारा किर्तनकार किंवा (२) भागवत वत् होणारा किर्तनकार 

      जे किर्तनकार भागवतात भाग घेतात त्यांना मिळणारे फळ हे शाळेत शाळकरी मुले  जसे शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतात त्या प्रमाणे होते. म्हणजे प्रेक्षकांचे मनोरंजन व भाग घेणाऱ्यांना संस्थेकडून  प्रमाणपत्र.परंतू जे किर्तनकार परमेश्वराचे नाम संकीर्तन करीत किर्तन करतात ते किर्तन त्या किर्तनकाराची साधना होते.

           गोविंद बुवांनी गजरागजर संपल्यावर पदे गाईली व नंतर हंसगीतेतील प्रसंग निरुपणास सुरवात केली. त्यात गोविंदबुवा म्हणाले ,एकदा सनकादिकांनी ब्रम्हदेवास प्रश्न विचारला की, विषय चित्तात व चित्त विषयात शिरले की विषय त्याग शक्य होत नाही.तर तो कसा करावा.परंतू ह्या प्रश्नाचे उत्तर ब्रम्हदेवांना सुचले नाही.म्हणून मानस पुत्रांची जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी त्यांनी सच्चिदानंद स्वरुप परब्रम्हाचे म्हणजे श्रीहरि चे स्मरण केले.व ब्रम्हदेवाच्या आळवण्याने श्रीहरि हंसरुपाने सनकादिक ऋषी व ब्रम्हदेवासमोर अवतीर्ण झाले.हे हंस कोण आहेत हे ब्रम्हदेव सुद्धा जाणू शकले नाहीत. परंतू आपले अज्ञान लपविण्यासाठी ब्रम्हदेव काहीच बोलले नाहीत. म्हणून सनक ऋषींनी हंसस्वरुप श्रीहरिंना विचारले की "तुम्ही कोण" त्यावर कडूनिंबाच्या झाडाजवळ बसलेले परमहंस स्वामी  जागेवरुनच उत्तरले की, "जो तू आहेस ,तोच मी आहे" . हे उत्तर ऐकून गोविंद बुवा व श्रोते  चकीत झाले. परंतू गोविंद बुवांनी पुन्हा प्रश्न उपस्थित केला की, तुम्ही व मी निरनिराळे आहोत. मग तुम्ही व मी एक कसे?

            त्यावर परमहंस स्वामी म्हणाले "तू देहाच्या दृष्टीने विचारतोस की चैतन्याचा दृष्टीने ?".त्यावर गोविंद बुवा म्हणाले"दोन्ही दृष्टीने".

            पुन्हा परमहंस स्वामी म्हणाले तुझा आणि माझा देह एकाच पंचिकृत पंचमहाभूतांनी बनलेला असून दोघांच्याही शरीरात नव्हे नव्हे चराचर विश्वात एकच ब्रम्हचैतन्य ओतप्रोत भरले आहे.म्हणून जो तू आहेस तोच मी आहे.


किर्तनी उद्धब ऊधे प्रश्ना

          ऊत्तर ऊते हंसकृष्णा 

उत्तर ऊते प्रश्नोप्रश्नी 

          गोविंद बुवास श्रीकृष्णी 

 

प.पू.संत एकनाथ महाराज भागवतातील हंसगीतेत लिहितात


सनकादिकांसमान । उद्धवा तुज मी मानी जाण । यालागी त्यांचे ज्ञानकथन । ऐक सांगेन म्हणतसे।।३०७।।


म्हणजे सनकादिकांनी विचारलेले प्रश्नच उद्धवाचे आहेत असे समजून भगवंतानी उत्तरे दिली आहेत तीच उत्तरे स्वामींनी गोविंदबुवांना दिली.

        ही उत्तरे ऐकून गोविंद बुवांनी समोर बसलेल्या श्रोत्यांना उत्तर देणाऱ्या परमहंस स्वामींना मंचावर घेऊन येण्यास सांगितले. सर्वात अगोदर बंकट,पितांबर पोहोचले. त्यांच्या पाठोपाठ ईतरही काही श्रोते आले.स्वामींनी सर्वांना  परत जा व मांडी मांडून किर्तन ऐका असे सांगून परत पाठविले. तेंव्हा गोविंद बुवा स्वतः स्वामींजवळ आले.व हात जोडून स्वामींना किर्तनात चलण्याची विनंती करु लागले.

           तेंव्हा स्वामी गोविंदबुवांना म्हणाले आत्ताच तू निरुपण केले की जे चैतन्य चराचर विश्वात ओतप्रोत भरले तेच चैतन्य हंसरुपाने सनकादिक व ब्रम्हदेवासमोर अवतीर्ण झाले. असे असतांना तू मला मंदिरात कशाला नेतोस ? ते ब्रम्हचैतन्य येथे नाही काय? तुझ्यासारखा  मदोन्मत्त, अहंकारी, पोटभऱ्या किर्तनकार ही भूमाता-भूदेव  पुन्हा जगात कधीही प्रगट न करोत.दासगणू महाराज सुद्धा त्यांच्या गजानन विजय ग्रंथातील दुसऱ्या अध्यायात लिहीतात की,


पोटभऱ्या कथेकरी

तू न व्हावे भूमीवरी।।६७।। तसेच


जे जे जयाने सांगावे

ते ते त्याने आचरावे

शब्दच्छलासी न करावे

साधकाने केंव्हाही।।६५।।


आणि माणसातील अहंकार हरि कृपेनेच नष्ट होतो.म्हणून हरि भजन करणे  हा अहंकार नष्ट करण्याचा एकमेव मार्ग आहे.व भगवंताच्या अनुकंपेने तो नष्ट होतो. प.पू.एकनाथ महाराज सुद्धा हंसगीतेच्या निरुपणात लिहीतात की,


यालागी सांडावा अभिमान।ते तुटे सकळ बंधन । अभिमान निरसावया जाण। माझे भजन करावे.।।३६८।।


म्हणून परत जा व परमेश्वराच्या नामसंकीर्तनाचे किर्तन करा.राम, रामेश्वर,किंवा परमेश्वर एकरुप आहेत.कोणत्याही संताच्या कृपेने भवबंधन एकसमानच कटते. कमी जास्त कटत नाही.असे बोलून स्वामींनी गोविंदबुवांना भागवत वत् बनून परमेश्वराचे संकीर्तन करीत निरुपण करण्यास सांगितले.

              गोविंद बुवा मंचावर आले.आणि नाचून  परमेश्वराचे संकीर्तन "राम कृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि  " गाऊ लागले. टाळकरी सुद्धा नव शक्ती संचारल्या प्रमाणे टाळांचा टणकार  करीत नामसंकीर्तन करु लागले.गोविंदबुवा निरुपणात प्रथम स्वामींना वंदन करुन नाम संकीर्तनाचा महिमा वर्णू लागले.व म्हणाले आत्ताच शेगावात प्रगट झालेल्या स्वामींच्या उपदेशानुसार श्रोत्यांनी आपल्या ऊपास्य देवतेचा जास्तीत जास्त नामजप करुन भागवत वत् जीवन  जगण्याचा प्रयत्न करावा. ह्यातच जीवनाची सार्थकता आहे.श्रोतेसुद्धा भागवत वत् निरुपण करणाऱ्या गोविंद बुवांच्या किर्तनात तल्लीन झाले होते.शेवटी गोविद बुवांनी पसायदान म्हणून कीर्तन संपविले. किर्तन संपताच बंकट व पितांबर स्वामींना घरी नेण्यासाठी कडूनिंबाच्या झाडाजवळ आले.पण स्वामी अगोदरच तेथून निघून गेले होते.


रघुपती राघव राजाराम

           पतित पावन सिताराम


            श्री गणगणरामार्पणमस्तू


जगन्नाथ गांधी

मुंबई मालाड (प)

९७६९५१८८५८

रविवार, १ फेब्रुवारी, २०२६

अध्याय २ - लेख क्रमांक ३ - श्री गजानन महाराज शेगाव

 अध्याय २ - लेख क्रमांक ३ - श्री गजानन महाराज शेगाव 

                   श्री गणगणरामाय नमः

                      लेख क्रमांक ३

                       अध्याय दुसरा 

                 *प्रगटले स्वामी गणगणराज*

   

अध्याय २ - लेख क्रमांक ३ - श्री गजानन महाराज शे

                 प. पू.दासगणू महाराजांनी, स्वामींची लिहीलेली उत्कृष्ट आरती म्हणजे " जय जय सत् चित् स्वरुपा स्वामी गणराया" ही आहे.ह्याआरतीच्या ध्रुवपदात महाराजांनी स्वामींचे स्वरुप लक्षण सत्,चित् ,आनंद आहे असे सांगून पुन्हा अंतरात, स्वरुप लक्षण व तटस्थ लक्षण लिहीले आहे."धाता हरिहर गुरुवर तूची सुखसदना"  हे परब्रम्हाचे तटस्थ लक्षण आहे.कारण ,

१)धाता =विधाता=ब्रम्हा=जगाचे उत्पत्ती कर्ता

२)हरि =जगाचा पालन कर्ता

३)हर= जगाचा संहार कर्ता 

        म्हणजे हे स्वामी! तुम्ही जगाचे उत्पत्ती, स्थिती व प्रलय  कर्ता असून तुम्हीच आनंद स्वरुप स्वामी आहात.ह्या परमतत्वालाच सर्व भक्त सद्गुरु म्हणतात व स्वामींची उपासना करतात. हे परब्रम्ह स्वरुपच जगाचे अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. ज्ञानेश्वरीत माऊलींनी सुद्धा  वेदांनी प्रतिपादन केलेल्या, स्वसंवेद्य ओंकार स्वरुप परब्रम्हालाच  नमन केले आहे.


ॐ नमाजी आद्या। वेद प्रतिपाद्या।

जय जय स्वसंवेद्या। आत्मरुपा ।।


प.पू तुकाराम महाराजांनी सुद्धा,"अठराही पुराणे हरिसी गाती" असे वर्णन केले आहे.येथे श्रीहरि म्हणजे वेदांनी प्रतिपादन केलेले आद्य तत्व म्हणजे श्रीविठ्ठल होय.म्हणूनच संत एकनाथ महाराज म्हणतात


 कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा

चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा 


म्हणजे  आपण ज्याची उपासना करतो ते आपल्यासारखे पूर्व जन्मात  कलेले कृतकर्म भोगण्यासाठी आईच्या पोटी जन्मलेले स्वामी नाहीत.तर ते स्वयंभू प्रगट झालेले परमात्म तत्व आहे.म्हणजे जे अगोदर अव्यक्त होते ते भक्तांच्या उपासनेसाठी आलंबन म्हणून व्यक्त  झाले आहे.किंवा अमूर्त तत्वाने मुर्त रुप धारण केले आहे. स्वामींची उपासना करणारे भक्त दोन प्रकारचे असतात.(१)देवा कडून मागणारे याचक.जसे भगवद्गीतेत वर्णिल्या प्रमाणे आर्त किंवा अर्थार्थी आणि दुसरे(२) जे फक्त भगवंताची निष्काम भावनेने उपासना करणारे जिज्ञासू किंवा ज्ञानीभक्त.ह्यांना भगवंताकडून काहीच नको असते फक्त देवच हवा असतो.हेच खरे उपासनेचे अधिकारी भक्त आहेत. ह्या उपासकांना व्याघ्र दृष्टी उपासक म्हणतात.व देवाकडून जड भौतिक पदार्थांची  अपेक्षा असणाऱ्या भक्तांना श्वानदृष्टी उपासक म्हणतात.

             आपल्या वैदिक ग्रंथात व वारकरी संप्रदायातील सर्वच साधू संतांनी परब्रम्ह स्वरुप सद्गुरू चे प्रतिपादन खालील प्रमाणे केले आहे.

        

जगत्व्याप्त,जग,जगआधार .

       जनजीवन , जनजीवन सार 

घेऊन रुप सगुण साकार

          साकारले दीगंबराकार 

अजर अमर ऋषी अविनाशी

          नाशी अन्न मुखी ग्रासी 


 

 म्हणजे परब्रम्ह परमात्म्याने आपल्याच योगमायेचा अंगीकार करुन सगुण साकार रुप धारण केले आहे. म्हणजे अजर अमर, अविनाशी असे शबलीत परब्रम्हच दीगंबराकार रुपात शेगावला शालिवाहन शके अठराशे साली माघ वद्य सप्तमीला देवीदास पातुरकरांच्या वाड्यसमोरील  वटवृक्षाखाली प्रगट झाले.ह्यालाच आम्ही"प्रगटले स्वामी गणगणराज" म्हणतो. ते उष्ट्या पत्रावळीतील भाताची  शिते उचलून,त्याचे निरिक्षण करुन तोंडात टाकून खातांना बंकटलाल अग्रवाल ह्यांनी पाहिले.ह्या कृतीतून जणू स्वामींना सुचवायचे होते की,


अन्नं परब्रम्ह वेदोक्ती

         ब्रम्हं अन्नं दर्पोक्ती


अन्न हे परब्रम्ह आहे  असे समजून  प्रसाद ग्रहण करणाऱ्या सज्जनांचे रक्षण करण्यासाठी व  जो परब्रम्ह स्वरुप जगाला अन्न समजतो म्हणजे जो दीन, दुबळ्या गोरगरीबांना माजलेल्या सांडाप्रमाणे ताडतो किंवा लुटतो अशांचा दर्प नष्ट करुन धर्म संस्थापनेसाठी स्वामीं प्रगट झाले होते.भगवद्गीतेत भगवंतानी चवथ्या अध्यायात परमेश्वराच्या अवतार कार्याचे तीनच प्रयोजन सांगितले आहे.(१)साधू , सज्जनांचे रक्षण (२) दुष्टांचे निर्दालन (३) धर्माचे संस्थापन.


परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम् ।

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे।।८।।


        म्हणून स्वामी वरील तीन उद्दिष्टांसाठी प्रगट होऊन भाताच्या  शितांबरोबर खेळत होते.

बंकटलालांना  स्वामींच्या पत्रावळीतून शीते उचलून तोंडात टाकण्याच्या खेळाचे मोठे आश्चर्य वाटले.म्हणून ते स्वामींच्या जवळ आले तेंव्हा स्वामी त्यांना खेळाच्या बरोबर मुखाने"गण गण गणात बोते" हा जप करीत असतांना दिसले. तेंव्हा बंकटलालांना वाटले की,आज पातुरकरांच्या मुलाच्या ऋतु शांति च्या कार्यक्रमा निमीत्त भोजनाचे आयोजन आहे.म्हणून बंकटलाल ला वाटले ह्या पत्रावळीशी खेळणाऱ्या माणसाने देविदास पातुरकरांना अन्न मागितले असते  तर त्यांनी ते निश्चित दिले असते कारण कोणताही सज्जन माणूस याचकाला परत पाठवित नाही.म्हणून बंकटलालाने पातुरकरांना सांगून अन्नाची पत्रावळ स्वामींसाठी बोलावली. व दोघांनी स्वामींना अन्न सेवन करण्यास सांगितले. स्वामींनी पत्रावळीतील संपूर्ण अन्नाचा काला केला व जेवण करु लागले. स्वामींचं जेवण पूर्ण होत असतांना बंकटलाल ने स्वामींना पाणी आणू कां ? असे विचारल्यावर स्वामी म्हणाले हा साधा व्यवहार तुम्हास कळायला हवा की जेवतांना पाणी वाढले पाहिजे.म्हणून बंकटलाल पाणी आणावयास पातुरकरांच्या वाड्यात गेले असता स्वामी सरळ उनाड नाल्यावर गेले.


   निरसून नीर निर्मळ भगवान

             गट्गट् गिळती गटारपान

   गिळवून गिळविती गणगणराम

             सिता सितापती सीताराम।।ॐ।।

      

 

म्हणजे त्या उनाड नाल्यातून  स्वामींसाठी शुद्ध निर्मळ जल उत्पन्न झाले.व स्वामी निर्मळ जल पिऊ लागले.तेवढ्यात बंकट पाण्याचा गडवा घेऊन उनाड नाल्याजवळ आला व  स्वामींना म्हणाला की स्वामी! नाल्यात गढूळ पाणी आहे ते पिऊ नका.तेंव्हा स्वामी म्हणाले सर्व ठिकाणी शुद्ध, निर्मळ परब्रम्ह ओतप्रोत भरलेले आहे.येथे गढूळ किंवा घाणेरडे म्हणून काही नाही.शुद्ध मनाने आपणास आवडत असेलेल्या ईश्वराची किंवा संताची मुर्ती हृदयात बसवा.व शांत मनाने  ईश्वराचे चिंतन करा हीच उपासना आहे.आणि ह्या उपासनेने त्रिवीध ताप नष्ट होऊन ईश्वर साक्षात्कार होतो.बंकटास वाटले गडवा परत केल्यानंतर स्वामींशी बोलू.म्हणून  बंकट गडवा द्यावयास वाड्यात गेले  तेंव्हा स्वामी वायुवेगाने निघून गेले.बंकट परत नाल्याजवळ आले  तर त्यांना स्वामी दिसलेच नाहीत.बंकट हिरमुसल्या मुखाने स्वामींचा शोध घेऊ लागले.

             खरं तर बंकटांचे पुर्व सुकृत फळा आले होते.म्हणून स्वामींच्या कडे त्यांचे लक्ष जाऊन परभारे कां होईना,बंकटाने स्वामींना भोजन करविले.पण बंकटांनी आणलेल्या गडव्यातून स्वामी पाणी प्यायले नाहीत. विचार केला तर ती माऊली कीती पुण्यवान असेल जीच्या ऋतुशांतीच्या कार्यक्रमास स्वामींनी हजेरी लावली .व तिच्या दारावर स्वामी जेवले.कांही कां असेना , बंकटलालांना स्वामींचा ध्यास लागला.ते संपूर्ण गावात हिंडून स्वामींचा शोधू घेऊ  लागले.स्वामी गावात दिसले नाहीत म्हणून जंगलातून त्यांनी तहान भूक विसरुन स्वामींचा शोध सुरू ठेवला.स्वामींनी बंकटलालास भक्तीचे संक्षिप्त सुत्रच सांगून दिले होते.म्हणून , अध्यात्माची आवड असल्याने लोकांना गप्पांच्या ओघात स्वामीबद्ल विचारु लागले. बंकटाच्या घराशेजारी राहणाऱ्या वयोवृद्ध रामोजीराव देशमुखांनी बंकटांच्या मानसिक स्थितीचे निरीक्षण करुन विचारले की, बंकटा ! तुम्हाला कशाची चिंता सतावत आहे .मी बघतो की मागील दोन दिवसांपासून तुम्ही भयाण चेहऱ्याने गावभर हिंडत आहात.बाप्पा बंकटा ! मला सांगा,तुमच्यावर कोणतं संकट कोसळलं.तेंव्हा बंकटांनी स्वामींची आश्चर्यकारक कथा बाप्पूंना सांगितली.तेंव्हा बाप्पू म्हणाले ते कोणीतरी योगी असावेत.तुम्ही मोठे भाग्यवान आहात म्हणूनच तुम्हाला स्वामींचे दर्शन झाले.आता पुन्हा स्वामींचे दर्शन झाल्यास मला सुद्धा स्वामींचे दर्शन घडवा.

       मग  बंकट तेथून उठून दुसऱ्या ठिकाणी स्वामींना शोधावयास  निघून गेलेत.


रघुपती राघव राजाराम

          पतित पावन सिताराम


           श्री गणगणरामार्पणमस्तू


जगन्नाथ गांधी

मुंबई मालाड (प)

९७६९५१८८५८

अध्याय २ - लेख क्रमांक १ - श्री गजानन महाराज - शेगाव

    अध्याय २ - श्री गजानन महाराज - शेगाव 

                         

गणगण काव्यमाला – जीवभावाची ओवाळणी | श्री गजानन महाराज

                     *श्री गणगणरामाय नमः*

                         लेख क्रमांक १

                      *अध्याय दुसरा*

        *जीवभावाची ओवाळणी करतो* “जीवभाव म्हणजे काय?”

श्री गजानन महाराज शेगाव – जीवभावाची ओवाळणी, गणगण काव्यमाला अध्याय २


""ओवाळितो गुरुराया

             जीव भाव ओवाळूनीया"

ध्यान स्वरूपा ध्यानी यावे 

            ध्यानी "रघुपती "पद गावे 

मुखी नित्य गणगण गावे 

             गणगण गीत मुखी यावे 

गणगण गीत वदाया या 

              गणगण गीत गावाया या 

भक्ती स्वरूप वदाया या 

               पद भक्ती शिकवाया या 

शिक्षण शिकवे गणगणराम 

               सिता सितापती सीताराम  ॥१॥

         "गणगण काव्यमाला "ह्या ग्रंथातील दुसऱ्या अध्यायातील पहिल्या युग्मातील  जीवभावाचे चिंतन.व भक्ती स्वरुप शिकवण्या साठी सद्गुरू चरणी प्रार्थना

 जीव कल्पयते पूर्वं,

         ततो भावान् पृथग्विधान्

बाह्यान् आध्यात्मिकाश्चैव

          यथा विद्या यथा स्मृति

     आपण बाह्य पदार्थ पाहिले, इंद्रियांनी अनुभवले की, आपल्या मनावर त्याचे संस्कार होतात.व त्या संस्कारांच्या मधून आंतरिक मनोकल्पीत पदार्थांची निर्मिती होते.त्या कल्पनांच्या मधून पुन्हा बाह्य पदार्थ सत्य वाटायला लागतात.येथे शंका येते की,

१) ह्या सर्वांचे मूळ कारण काय?

२) ह्या सर्व कल्पना कोण करतो?

३)ह्या कल्पनांचे मूळ निमित्त काय आहे?

              सर्वप्रथम आत्मदेव, प्रभू, जगत्कारण ईश्वर, विशीष्ट जीवाची कल्पना करतो.विशीष्ट जीव म्हणजे शुद्ध स्वरूप  पारमार्थिक जीवाची कल्पना करतो.म्हणजे ईश्वर स्वतःच जीव भावाला प्राप्त होतो.श्रृती वर्णन करते

    "तत्सृष्ट्वा तदेवानुप्राविशत"

ईश्वराने विश्व निर्मिती करुन त्या मधे प्रवेश केला.अद्वय , आनंद स्वरुप असणारा परमात्माच  स्वतः विश्वरुप झाला.व त्याने सर्वांमध्ये जीवरुपाने प्रवेश केला.परमात्माच जीव रुपाला प्राप्त होऊन नंतर त्याने अनेक अंतर्बाह्य नानाविध पदार्थांची निर्मिती केली.सुख, दुःख, ज्ञान,राग वगैरे आंतरिक पदार्थ असून यासाठी निमित्त कारण होणारे घटपटादी हे बाह्य पदार्थ आहेत.हे सर्वच पदार्थ कल्पित आहेत.

प्रश्न:- ह्या सर्व कल्पित पदार्थांचे मूळ कारण काय आहे?की,हे सर्व पदार्थ "ख " पुष्पा प्रमाणे अगदीच असत् आहेत. स्वामी सांगतात, निर्गुण, निर्विशेष,निरुपाधिक आत्मस्वरूपामधे सर्वप्रथम "हेतु-फलात्मक " जीवाची कल्पना निर्माण होते.

प्रश्न:- हेतु फलात्मक जीव म्हणजे काय?

   प्रत्येक जीव सर्व प्रथम मी कर्ता आहे अशी कर्तृत्व भावना निर्माण करतो.त्यामुळे तो चांगल्या -वाईट अनेक प्रकारच्या कर्माच्या मध्ये प्रवृत्त होतो.त्यामुळे त्या कर्माप्रमाणे फळ प्राप्त होते.तेंव्हा जीवाला वाटते मला सुख, दुःख झाले.ही भोक्तृत्व भावना त्यांच्या मधे निर्माण होते.अशाप्रकारे जीव "मी"  करतो ह्या कर्तृत्व भावनेने व "मी ' सुखी दुःखी ह्या भोक्तृत्व भावनेने युक्त होतो.म्हणून येथे कर्तृत्व भावना हे कारण व भोक्तृत्व भावना हे त्यांचे फळ आहे.

"अहंकार विमूढात्मा कर्ता अहं इती मन्यते "

अहंकाराने विमूढ झालेला जीव स्वतःलाच कर्ता म्हणवून घेतो.अशा ह्या कर्तृत्व व भोक्तृत्व भावनेने युक्त असलेल्या अज्ञानी जीवालाच हेतु फलात्मक जीव असे म्हणतात. कर्तृत्व भावना हा हेतु म्हणजे कारण व सुख दुःख हे त्याचे फळ आहे.जीव ह्या हेतू फळांनी म्हणजे कर्म -कर्मफळांनी बध्द, मर्यादित व संसारीं होतो.

     वस्तूतः प्रत्येक जीव हा स्वतः ईश्वर स्वरूप, शुध्द चैतन्य स्वरुप, परिपूर्ण,व आनंदरस  आहे.परंतू ह्या शुध्द आत्मचैतन्यामधे हेतू फलात्मक बध्द जीवाची कल्पना निर्माण होते

प्रश्न:- कशी?

उत्तर:-रज्ज्वां इव सर्प कल्पयते

    ज्याप्रमाणे शुध्द,स्थिर रज्जुवर चंचल, अस्थिर सर्पाची कल्पना निर्माण होते, त्याप्रमाणे शुध्द आत्मचैतन्यामधे हेतू फलात्मक जीवाची म्हणजे बध्द, संसारीं जीवाची कल्पना निर्माण होते.एकदा हा अज्ञानमूलक जीव भाव निर्माण झाला की त्यापासून पुढे सर्व अनर्थ परंपरा निर्माण होते.

          आपल्याला आता काहीतरी मिळवायचे आहे अशी भावना निर्माण झाली की मग ती पूर्ण करण्यासाठी क्रिया -कारक -फलभेदाने युक्त असणाऱ्या अनेकविध बाह्य व आंतर अनंत पदार्थांची कल्पना निर्माण होते.

प्रश्न:- ह्या सर्व अंतर्बाह्य कल्पित पदार्थांचे कारण काय?

                 जो जीव स्वतः आत्मचैतन्यामध्ये कल्पित आहे तोच कल्पित जीव ह्या सर्व पदार्थांचे कारण आहे.त्या जीवाचे जसे ज्ञान -विज्ञान असेल त्याप्रमाणे त्याला स्मरण होते.जसे,अन्न, पाणी वगैरे पदार्थांमुळे भूक तहान शांत होते व आपणास तृप्ती चा अनुभव येतो.मात्र हे पदार्थ नसतील तर तृप्तीचा अनुभव येत नाही .तहान भुकेमुळे व्याकुळ होतो.अशावेळी भोजनाची कल्पना जागृत होते.तृप्ती मिळविण्यासाठी आपण जेवले पाहिजे.म्हणजे जेवण हा हेतु व तृप्ती हे त्याचे फळ.म्हणजे आपणास भोजनादी हेतुचे व तृप्ती ह्या फळाचे स्मरण होऊन, हेतूस्मरण व फलस्मरण ह्याचे विज्ञान होते.

        याप्रकारे जीवाला अनंत हेतूंचे व अनंत फळांचे स्मरण होत असते.आपल्याला हवे तेवढे अन्न वस्त्र मिळाले म्हणजे आपण सुखी होऊ ह्या कल्पनेने जीव इच्छीत वस्तू मिळविण्यासाठी अनेक कार्यामध्ये प्रवृत्त होतो.व कर्म केले की त्याचे फळ मिळते व मनाला समाधान प्राप्त होते.त्या समाधानाच्या स्मरणाने पुन्हा त्या वस्तू मिळविण्यासाठी जीव कर्म प्रवृत्त होतो.पुन्हा त्याला कर्माचे फळ मिळते व तो समाधानी होतो.व पुन्हा त्या समाधानाच्या स्मरणाने हेतुभूत भोग्य पदार्थांची कल्पना करतो.

अशा प्रकारे अनंत कल्पनांच्या प्रवाहाने बनलेला हा संसार सागर आहे.जीव सतत ह्या बाह्य व आंतरीक पदार्थांची निमित्त नैमित्तिक, साध्य -साधन भावाने कल्पना करत राहतो.विषयांचे संस्कार, त्यामधून स्मृती, स्मृती मधून संकल्प,संकल्पामधून क्रिया, क्रिया घडविण्यासाठी साधनीभूत कारक, त्यामधून क्रियेचे फळ,फळाचा उपभोग , पुन्हा संस्कार असे अव्याहत चक्र सुरूच राहते.

    याप्रकारे संस्कार -स्मृती-संकल्प-क्रिया-कारक-फळ-उपभोग व पुन्हा संस्कार हे असे सर्व परस्परांना कारण व कार्य होतात. ह्याप्रमाणे जीव अनंत साध्य साधनांनी युक्त असणाऱ्या अनेकविध कल्पना करतो.म्हणजे जीव आपल्या अंतःकरणात अशा अनंत कल्पनांचे जंजाळ निर्माण करतो.व कल्पनांच्या तरंगामधे जीवन जगतो.

        थोडक्यात , जीव स्वतः कल्पित आहे.स्वत:ला देह समजून, ह्या देहासाठी तो जीव अनेक कल्पना निर्माण करून जीवनभर त्या कल्पनांच्यामध्ये बध्द व मर्यादित होऊन राहतो.म्हणूनच त्याला सुखदुखात्मक संसाराचा अनुभव येतो.

          जोपर्यंत स्वतः च्या पारमार्थिक आत्मचैतन्य स्वरूपाचे अज्ञान असते, तोपर्यंत तो जीव स्वतः मध्येच अनात्म्याचा आरोप करुन निरनिराळ्या विषयांच्या कल्पना निर्माण करतो. कर्तृत्व , भोक्तृत्व भाव निर्माण करून संसारीं होतो.म्हणून जो पर्यंत कल्पना आहेत तोपर्यंत जन्मानुजन्मे हा अज्ञानमूलक संसार अखंड अव्याहतपणे चालूच राहतो.म्हणून ह्या कल्पनेला परमेश्वर चरणी अर्पण करण्यासाठी परमेश्वराच्या नामस्मरणाचा व रुप डोळ्यांत साठविण्याचा अभ्यास केला तर केंव्हातरी करुणाकराला करुणा येऊन आपल्या जवळ ठेवून घेतील व स्वस्वरुपाचा बोध करतील व मंत्र देतील. जसे 

"ध्यान स्वरूपा ध्यानी यावे 

        ध्यानी" रघुपती पद" गावे"

      येथे "रघुपती पद" म्हणजे रघुपती राघव राजाराम, पतित पावन सिताराम 

    स्वामी हे संपूर्ण पद एवढ्या जलद पण स्पष्ट रीतीने गात होते,की  मला वाटले स्वामी" रघुपती  पदाच्या" ऐवजी" गणगण "म्हणत आहेत .म्हणजे स्वामी परमेश्वराचे नामस्मरण करतात पण आपल्याला गणगण ऐकायला येते.आणि हीच गणगण सद्गुरू कृपेने आपल्या मुखात आली  म्हणजे आपला जीव भाव सद्गुरु चरणी अर्पण केल्या जाईल.असा सुदिन,सर्व भक्तांच्या भाग्याचा  उजळो ही प्रार्थना करुन सद्गुरु चरणी बोबडे बोल अर्पण करतो.


रघूपती राघव राजाराम

          पतित पावन सिताराम 

            श्रीगणगणरामार्पणमस्तू


जगन्नाथ गांधी 

मुंबई मालाड (प)

९७६९५१८८५८

खालील लिंक क्रोम ब्राउझर वर ओपन करा.

https://youtu.be/gMMRfsLdBaM?si=ItjyoeqbrSLcIXIc

ब्लॉग पोस्ट आणि  यू ट्यूब व्हिडिओ आवडल्यास कृपया शेअर नक्की करा.

Sangita Bhalsing 

Ahilyanagar Maharashtra 

चहाचा कप - एक भावस्पर्शी कौटुंबिक कथा

 *चहाचा कप* मराठी कथा 


 सकाळी सकाळी सासू- सुनेचा संवाद अगदी सहजपणे माझ्या कानावर पडत होता.हॉल आणि किचन मधलं अंतर तरी कितीसं..!



सुनबाई म्हणत होती,"सकाळी घाई घाईत मी माझा चहाचा कप धुवायला विसरले,बाळ ही रडत होतं ..!नंतर मी धुऊन टाकला असता की,तुम्ही तो कप असा बाजूला काढून का ठेवला?तुम्हाला धुण्यासाठी मी नव्हता ठेवला.तुम्ही कप धुवावा किंवा माझं काम करावं ही अपेक्षाच नाही

 आणि कामवालीला इतर सर्व भांड्या बरोबर कप ही घासायला दयायचा की, तुम्ही घासावा म्हणून मी तिथे ठेवला नव्हता.. मी नंतर धूतला असता कप...त्यात काय एवढं !तुम्ही असा बाजूला ठेवायला नको होता मला फार वाईट वाटले" असं म्हणत सुनबाई काम करताना,मुसमुसत होती. शेवटी डोळे पुसत पुसत ती बेडरूममध्ये निघून गेली. मी तिथं असूनही मध्ये बोलण्याचा काही प्रश्नच नव्हता ,खरेतर हिंमतही नव्हती,वेळही  नव्हती बोलण्याची...!आणि मध्ये बोलणे योग्य ही वाटत नव्हते.

संध्याकाळी आम्हा उभयतांची मंदिरात जायची वेळ झाली होती. बाळाला आम्ही कधी कधी फिरायला नेत असू,पण बाळ झोपलं होतं म्हणून दोघेच निघालो.ताटात हार-फुलं आणि अगरबत्ती ठेवत होती .मी तिच्याकडे पाहत होतो आणि काहीतरी मनाशी ठरवलं होतंच...आणि जे ठरवलं होतं त्याला पूरक परिस्थितीही लगेच निर्माण झाली...!

 मंदिरात देव दर्शन झालं आणि बाहेर हिरवळीवर आम्ही दोघ नेहमीप्रमाणे गप्पा करत  निवांत बसलो. खडीसाखरेचा प्रसाद खात होतो ,तेवढ्यात तिच्या फोनची रिंग वाजली.

बोलण्या वरून लक्षात आले की, आमच्या लाडक्या कन्येचा फोन होता आणि बाईसाहेब फोनवर रडत होत्या. सासूचे आणि तिचं कुठल्यातरी कारणावरून भांडण झालं होतं

आणि ही तिला समजावून सांगत होती. तिच्या सासूला नाव ठेवत होती. एवढं वय झालं कळत नाही का? असं म्हणत होती .तिला मुलगी नाही का ?आणि तुझ्या नवऱ्याला काही कळत नाही का ?त्याला दिसत नाही का? आपली आई कशी वागते...! असं सांगत होती. मी मात्र गप्प होतो

तिने त्रासिक मुद्रेने फोन ठेवला आणि माझ्याकडे रडवेल्या नजरेने पाहिलं .खूप वैतागलेला चेहरा दिसत होता मलाही ते सर्व काही सांगणार होती, तेवढ्यात मी तिला म्हणालो ," आपल्या सूनबाईने पण सकाळी तुला हेच सांगितलं की... आपली मुलगी जशी दुसऱ्या घरी गेली तुला काळजी वाटते तशीच आपली  घरी देखील परक्याची मुळी आली आहे. तुला स्वतःच्या मुलीची काळजी वाटतेय..मग सुनेला आपली का म्हणू शकत नाहीस. ती आपल सर्व काम करते .गरज पडली तर माझे,तुझे कपडे धुते. भांडी स्वयंपाक काम करते आणि तू तिचा कप बाजूला काढून ठेवला ...हे शोभत का तुला? हे पटलं का तुला? तुझ्या मुलीला असं केलं तर तुला चालत नाही मग तू दुसऱ्याच्या मुलीला असं का करते आणि हे बघ आपला मुलगा जेव्हा तीच्या घरी त्याच्या सासरी जातो तेव्हा तिचे आईवडील त्याचा सर्व पाहूणचार करतात,मानसन्मान करतात. मग तुझी जबाबदारी नाही का तिला मुलीप्रमाणे वागवायची ?जीव लावायची ?

तुला आठवतंय मागे तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं ,चांगली दोन महिने बेडवर आराम करत होतीस. हॉस्पिटलमध्ये चार दिवस होतीस तेंव्हा कोणी सेवा केली तुझी ! सुनबाईनेच जागेवर जेवण दिलं, आंघोळ घातली... एखाद्या मुलीप्रमाणे तुझी सेवा करत होती.. दिवसभर काम करत होती ,रजा घेऊन..!  आणि घरातील सर्व काम देखील व्यवस्थित, नीटनेटके करते,आग्रहाने खायला घालते. तुझ्याकडून कोणत्या कामाच्या अपेक्षा केली नाही.

आणि शेवटी हे बघ आपला एकुलता एक मुलगा आणि एकुलती एक असून आपल्याला त्यांच्या शिवाय कोण आहे? नातेवाईक कोण कोणाचे ?ते थोडीच आपली सेवा करणार आहेत? शेवटी म्हातारपणी आपली सेवा तिच तर करणार आहे हे ध्यानात ठेव. आपली मुलगी येईल फक्त चौकशी पुरती..!आणि तिच्यामागे लहान लेकरू आहे, नोकरी करते ,घरही सांभाळते मग तिच्याबरोबर तू बरोबरी का करते ...! तिला त्रास देण्यापेक्षा समजून घे ,प्रेम दे .शेवटी आपल्यापेक्षा लहानच आहे ती, चुका झाल्यात तर पोटात घालाव्यात ...समजून सांगावं. स्वतःच्या मुलांना जसं समजून घेतो तसेकंग समजून घेतलं पाहिजे.मुलगा आपलाच रहावा अस वाटत असेल तर सुनेलाच जीव लावावा लागतो.जुने लोक म्हणत असत " सोन्यासाठी चिंधी सांभाळावी लागते " म्हणून आज तिला जसे आपण वागवू तसेच ती आपल्याला वागविल..!

आपण जे देऊ तेच परत मिळेल.हे लक्षात ठेव.

आपल्या मुलाचे सुख तेच आपले सुख आहे.कुटुंब सुखात,आनंदात ठेवायचे असेल तर आपणच अधिक प्रयत्न करायला हवेत.त्यांच्या आयुष्यात अधिक ढवळाढवेळ न करता...!

आणि मी तिच्या आई बापाला लग्नापूर्वी म्हणालो होतो की आम्ही तिचे आईबाप बनू, तिला तुमची आठवण येणार नाही असा मी बाप होईल,मुलगी म्हणून मान सन्मान मिळेल तिला आमच्याकडे...."

ती शांतपणे सर्व ऐकून घेत होती न बोलता डोळ्याच्या पापण्या पुसत होती...

आणि हे बघ आपलं नशीब चांगलं आहे बरं...! कारण ती सतत नवऱ्याला आपलं भांडण ,वाद सांगत बसत नाही .तुझ्याबद्दल तक्रारी करत नाही, तिच्या आईबापाला ही ती आपल्या घरातील अशा गोष्टी सांगत नाही.समजूतदार आहे ती..!नाहीतर बघ अशा वाद विवादाने पोराचं डोकं फिरलं तर ...! तो कसा माथेफिरू आहे हे तुला चांगलंच माहीत आहे .कुटुंबात कलह निर्माण होईल भांडण होतील ....जॉब करतात दोघं ...टेन्शन असतं त्यांना..! ते ऑफिस पाहतील   की घरातले भांडण पाहतील. विचार कर ,त्यांना शांतता देऊ शकतो आपण .आपले हात-पाय चालत आहे तोपर्यंत..! आपण त्यांना मदत केली तर नक्कीच आपलं म्हातारपण सुखात जाईल. आपण आजूबाजूला पाहतोय की, समाजात काही ठिकाणी वृद्धांची अवस्था  फार वाईट आहे.वृद्धाश्रमाची संख्याही  वाढत चालली आहे.पण आपण नक्कीच भाग्यवान आहोत बघ...!आपल्याला वाईट वेळ येणार नाही ही खात्री आहे.आपण मुलाला चांगले संस्कार दिले आहेत आणि सुनबाई देखील चांगल्या संस्कारी घरातील आहे. माझा तुझ्यावर जसा विश्वास आहे तसा मुलावर विश्वास आहे आणि सर्वात जास्त माझ्या सुनेवर विश्वास आहे.खूप चांगली मुलगी आहे.आपल्या घरात ही तुळस छान रुजलीय....!  तू नक्कीच हुशार आहेस समजून घेशील .

संध्याकाळी घरी गेलो तर हॉलमध्ये नातवाने रडून गोंधळ चालवला होता आणि सुनबाई त्याला समजवत होती. पण लबाड रडायचा थांबत नव्हता...! काय बिनसलं होतं कोण जाणे..! स्वयंपाकाची तयारी बाकी होती...

ही म्हणाली,आरती तू सांभाळ त्याला...मी पाहते स्वयंपाकाचं !आणि आपल्याला फक्कडसा चहा पण करते ...! असं म्हणताना तिने हळूच माझ्याकडे पाहिलं आमच्या डोळ्यांची भाषा आमची आम्हाला समजली आणि हलकीशी स्मितरेषा चेहऱ्यावर होती दोघांच्याही..! आणि आमच्या दोघांच्या कडे पाहून सूनबाई चेहऱ्यावरही हलकस हसू होतं .कळी खुलली होती आणि सकाळच्या चहाच्या कपातील वादळ ,संध्याकाळच्या चहाच्या कपात शमलं होतं.


प्रा.सौ.संगिता भरतकुमार भालसिंग

उपशिक्षिका

शाळेचे नाव:- श्री घोडेश्वरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर, घोडेगाव

ता.नेवासा

जि. अहमदनगर


कथा आवडल्यास कृपया नक्की शेअर करा.

मंगळवार, २७ जानेवारी, २०२६

शिस्त म्हणजे प्रगतीचा श्वास ! मराठी निबंध

 शिस्त म्हणजे प्रगतीचा श्वास ! मराठी निबंध 


शिस्त (कुटुंबात, समाजात, देशात) Marathi Essay 

मराठी निबंध शिस्त कुटुंब, समाज आणि देशात


प्रस्तावना

शिस्त म्हणजे नियम, मूल्ये , कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पाळून वागण्याची सवय. शिस्त ही केवळ बाह्य बंधन नसून ती अंतःकरणातून स्वीकारलेली जीवनपद्धती आहे. स्वातंत्र्य जितके आवश्यक आहे, तितकीच शिस्त देखील आवश्यक आहे.व्यक्तीपासून कुटुंब, समाज आणि अखेर संपूर्ण देशाच्या प्रगतीचा पाया शिस्तीवरच उभा असतो.

१) कुटुंबात शिस्त

कुटुंब हे शिस्तीचे पहिले विद्यालय आहे. लहानपणी मिळालेल्या सवयी पुढील आयुष्य घडवतात. पालकांनी कुटुंबात शिस्तीचा संस्कार प्रथम केला पाहिजे.इथे आईची भूमिका अधिक महत्त्वाची आहे हे नाकारता येणार नाही.घराचे इंजिन म्हणून , दिशादर्शक म्हणून तिचे महत्व आहे. स्त्री पुरुष समानता या मूल्याची पायाभरणी तर कुटुंबातच झाली पाहिजे.

वेळेचे नियोजन : उठणे, अभ्यास, काम, विश्रांती यांचे वेळापत्रक.

संस्कार व मूल्ये : आदर, प्रामाणिकपणा, सचोटी , भूतदया,सहकार्य, संयम.

जबाबदारीची जाणीव : घरातील लहानमोठी कामे वाटून घेणे. मुलगा किंवा मुलगी असा भेद न करता मूल्यशिक्षण देणे आवश्यक आहे. जबाबदार नागरिक जबाबदार कुटुंबातच घडू शकतो.

शिस्तबद्ध कुटुंबात परस्पर प्रेम,विश्वास वाढतो, मतभेद कमी होतात आणि मुलांचे व्यक्तिमत्त्व सशक्त घडते. कुटुंबातील मतभेद मुलांना कमजोर बनवतात.

२) समाजात शिस्त

समाजातील शिस्त म्हणजे सार्वजनिक नियमांचे पालन आणि एकमेकांबद्दलची कर्तव्यभावना.

आपण समाजाचे काही देणे लागतो ही जाणीव असणे. सामाजिक ऋण फेडण्याचे भान असणं.

कायदे व नियम पाळणे : वाहतूक नियम, स्वच्छता, सार्वजनिक शिस्त. कायद्याचा आदर करणे.

सामाजिक सलोखा : जात-धर्म-पंथ न पाहता माणुसकी जपणे. मानवता धर्म मानून सामाजिक वर्तन करणे.

सहकार्य व सेवा : गरजूंस मदत, स्वयंसेवी उपक्रमांत सहभाग. इतरांच्या प्रति प्रेमाने आणि सहानुभूती पूर्वक वर्तन.

शिस्तबद्ध समाजात सुरक्षितता, सुव्यवस्था आणि विकासाची गती वाढते. व्यक्तिविकास झाला की देशाचा विकास होतो.

३) देशात शिस्त

देशपातळीवरील शिस्त ही राष्ट्रनिर्मितीसाठी अत्यावश्यक आहे. देशप्रेम, देशभक्ती या शब्दांचा खरा अर्थ मनाला भिडला पाहिजे.

संविधान व कायद्यांचा सन्मान : अधिकारांसोबत कर्तव्येही निभावणे. हक्क व कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे समजून वर्तन आवश्यक आहे.

राष्ट्रीय मालमत्तेचे संरक्षण : सार्वजनिक साधनसंपत्तीची काळजी.

कामातील प्रामाणिकपणा : प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडणे. प्रामाणिकपणा हा जीवनाच्या सर्वच पातळीवर अविभाज्य भाग असला पाहिजे.

शिस्तबद्ध देश आंतरराष्ट्रीय पातळीवर विश्वासार्ह ठरतो आणि प्रगतीकडे वेगाने वाटचाल करतो.


शिस्त नसल्याचे दुष्परिणाम

अव्यवस्था आणि अराजकता

सामाजिक तणाव व गुन्हेगारी, व्यसन 

विकासाला अडथळे, भ्रष्टाचार 

निष्कर्ष

शिस्त ही बंधन नसून स्वातंत्र्याचा योग्य वापर शिकवणारी शक्ती आहे. कुटुंबात रुजलेली शिस्त समाजात विस्तारते आणि समाजातील शिस्त देशाला बळकट करते. म्हणूनच प्रत्येक नागरिकाने स्वतःपासून शिस्तीची सुरुवात करणे, हीच खऱ्या अर्थाने राष्ट्रसेवा, देशसेवा आहे. प्रत्येक व्यक्ती सीमेवर जाऊन सैनिक बनू शकत नाही. पण आपण जे काम करत आहोत ते प्रामाणिकपणे, देशसेवा म्हणून केले पाहिजे.


बोधवाक्य : शिस्त म्हणजे प्रगतीचा श्वास.


घर असो वा दार 
शिस्त हवी फार

Sangita Bhalsing 
Ahilyanagar Maharashtra 

बुधवार, १४ जानेवारी, २०२६

मकर संक्रांत – सण, परंपरा आणि सामाजिक संदेश.

 मकर संक्रांत – सण, परंपरा आणि सामाजिक संदेश.

✨ प्रस्तावना

मकर संक्रांत हा भारतातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सण आहे. हा सण दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे या सणाला धार्मिक, वैज्ञानिक आणि सामाजिक महत्त्व आहे.

तिळगुळ हातात धरलेली महिला – मकर संक्रांतीच्या शुभेच्छा


🌞 मकर संक्रांतीचे धार्मिक महत्त्व

मकर संक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. उत्तरायण हा काळ शुभ मानला जातो. या दिवशी स्नान, दान, पूजा यांना विशेष महत्त्व आहे. गंगेतील स्नान केल्यास पुण्य लाभते, अशी लोकांची श्रद्धा आहे.या दिवशी तिळगुळ वाटून, नवीन कपडे घालून, सुगड पूजन करून सूर्यदेवाची पूजा केली जाते,

सूर्य  मकर राशीत प्रवेश करतो, ज्यामुळे सूर्याचे उत्तरायण सुरू होते. यानंतर दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते.

🍬 तिळगुळाचे महत्त्व

“तिळगुळ घ्या – गोड गोड बोला” हा या सणाचा सुंदर संदेश आहे.

तीळ शरीराला उष्णता देतात तर गूळ ऊर्जा देतो. त्यामुळे आरोग्यदृष्ट्याही तिळगुळाचे सेवन उपयुक्त आहे. या सणातून मिठास,प्रेम आणि आपुलकी जपण्याचा संदेश दिला जातो.

🪁 पतंग आणि आनंद

मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या दिवशी आनंदाने पतंग उडवतात. रंगीबेरंगी पतंगांमुळे आकाशात उत्सवाचे वातावरण निर्माण होते. विशेषतः शहरी भागात लोक पतंग उडवून जल्लोष करतात. मात्र बऱ्याच वेळा पतंग उडविताना अपघात ही होतात.

🌾 शेतकरी आणि पीक सण

हा सण शेतकऱ्यांसाठीही विशेष आहे. नवीन पीक घरात येते आणि शेतकरी आनंद साजरा करतात. त्यामुळे मकर संक्रांत हा कृतज्ञतेचा आणि समृद्धीचा सण मानला जातो.

🤝 सामाजिक संदेश.

मकर संक्रांत आपल्याला एकोप्याचा, प्रेमाचा आणि सद्भावनेचा संदेश देते. राग, द्वेष विसरून नातेसंबंध गोड करण्याचा हा सण आहे. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे.

🌸 निष्कर्ष

मकर संक्रांत हा केवळ सण नसून तो जीवनात सकारात्मकता, गोडवा आणि नवे विचार घेऊन येतो. तिळगुळासारखी गोडी आपल्या बोलण्यात आणि वागण्यात कायम राहो, हीच सदिच्छा.


*म - मधुर सदैव वाणी असावी.*

*क -कटुता स्नेहात कधी न यावी.*

*र - रस गंधांची उधळण व्हावी.*

*सं - संस्कारांची मांदियाळी दिसावी.*

*क्रां - क्रांती विचारांची मनी ठसावी.*

*ती - तीनही लोकी कीर्ती व्हावी.* 


*मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा.*☘️🪴

Sangita Bhalsing 

Ahilyanagar 

Maharashtra 

रविवार, १८ ऑक्टोबर, २०२०

चारोळी

मी पण...


जसजसे मी पण सरते
तसतसे हृदयी प्रेम भरते ..
जरी उन सावली खेळ करते
तरी अंतरंग निष्काम उरते...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

शुक्रवार, १ मे, २०२०

नाते - चारोळी

नाते 


   फुलले अतूट नाते
        घट्ट आहे रुजून...

          पण हिशेब थोडा
                 बाकी आहे अजून..

प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर


बुधवार, १६ ऑक्टोबर, २०१९

सावरु दे - कविता

सावरु दे...


मुक्तपणे हवे तसे
वावरू दे मला...

डोईवर भार असे
सावरू दे मला...

भरारते पंख असे
पाखरू दे मला...

उबदार जिद्द अशी
पांघरू दे मला...

हिरकणी चालते अशी
ना हरू दे मला...

संगिता भालसिंग

मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१९

गझल - गुलाबी

गझल 


वृत्त आनंदकंद
लगावली..गागाल गालगागा गागाल गालगागा
*****
Marathi मराठी साहित्य प्रकार मराठी गजल गुलाबी


गुलाबी 

केसात घातलेली होती फुले गुलाबी
कानात घातलेली होती डुले गुलाबी

पदरास लावलेले रेशीम पैठणीला
गोंडयास लावलेले मोती झुले गुलाबी

वाळूत उमटलेल्या होत्या खुणा शराबी
वेगात चाललेली ती पाउले गुलाबी

जाळ्यात अडकलेला भुंगा नसे विषारी
आरास पाकळ्याची गाली खुले गुलाबी

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

अंतरंग - चारोळी

अंतरंग 


जसजसे मी पण सरते
तसतसे हृदयी प्रेम भरते ..
जरी उन सावली खेळ करते
तरी अंतरंग निष्काम उरते...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९

ओंजळ - चारोळी

ओंजळ - चारोळी 

ओंजळ - चारोळी


मोजली नाही कधी
प्रेमाची गती नि मिती...

जरी उधळून केलय प्रेम
तरी माझी ओंजळ रिती...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

सत्य - चारोळी

सत्य - चारोळी 


सत्याची चाड वाटे...

असत्याची चीड वाटे..

अहंकार किड वाटे

अभिमान भीड वाटे...
चारोळी मराठी साहित्य




सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर


गडबड - गझल

गडबड - गझल 


पादाकुलक मात्रा वृत्त
8,8

गागागागा गागागागा

 सत्य बोलता गडबड झाली
रीत जगाची अवघड झाली...

उंच मनोरे बांधू कोठे
पायाचीही पडझड झाली...

भेटी गाठी  वादा वादी
काळजातली धडधड झाली...

नको विसंबू वचनावरती
विश्वासाची रडरड झाली...

वाट वाकडी वळणावरची
पंखाचीही फडफड झाली...

दोष लपाया,होश टिकाया
किती निरर्थक बडबड झाली...

संगिता भालसिंग
अहमदनगर
शनिवार 21 सप्टेंबर 2019

वंदन - कविता

वंदन - कविता 


मन भरले भरले
दुःख सरले सरले
आसू विरले विरले
सुख उरले उरले...

हाती हात सजनाचा
वाट प्रेमाची गुलाबी
क्षण क्षण अमृताचे
जीव झालाय शराबी...

गुंफिले काळजात
विश्वासाचे चंदन...
मिळो जन्मभर साथ
करू देवाला वंदन....

संगिता भालसिंग
अहमदनगर
शनिवार 21.09.2019


💖 कवितेचा भावार्थ
ही कविता प्रेम, विश्वास आणि आयुष्याच्या समाधानाची सुंदर अभिव्यक्ती आहे.
दुःख, अश्रू आणि वेदना मागे पडून मन सुखाने भरून येते.
प्रिय व्यक्तीचा हात हातात घेतला की जीवनाची वाट गुलाबी होते.
प्रत्येक क्षण अमृतासारखा वाटतो आणि जीवन नशेत बुडाल्यासारखे भासते.
विश्वासाचे चंदन काळजात गुंफून
जन्मभर साथ मिळावी,
अशी देवाकडे केलेली ही प्रार्थना म्हणजेच
प्रेमाचे आणि नात्यांचे पवित्र वंदन.

✨ कवितेचा संदेश
प्रेम हे दुःखावर मात करते
विश्वास नात्यांना बळ देतो
साथ लाभली तर जीवन सुंदर होते
कृतज्ञतेने देवाला वंदन करावे

फुले - चारोळी

फुले - चारोळी 

चारोळी मराठी साहित्य प्रकार - फुले



वेदनांच्या कळ्या
आसवांची फुले...
दुःखाच्या पुलावर
हिंमतीने झुले ...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

नौका - चारोळी

नौका - चारोळी 


वेदनांच्या कळ्या
फुले आसवांची ...
सुगंधी पुलावर
 नौका भावनांची...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

आशा - गझल

आशा - गझल 


जलौघवेगा वृत्त
लगालगागा लगालगागा
आशा - गझल , साहित्य प्रकार, कविता



मनात आशा जिवंत नाही
तरी जिवाला खंत नाही

कशास मागे वळून पाहू
तुलाच आता उसंत नाही

उगाच वचनास जागताना
गुलाम होणे पसंत नाही

तुझीच मीरा तुझीच राधा
अशा भक्तीलाच अंत नाही

जहर पिताना खुशीत होती
उगाच किर्ती दिगंत नाही

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
रविवार 22.09.2019

प्रेम - चारोळी

प्रेम - चारोळी

प्रेम चारोळी, मराठी साहित्य



जहाँ जितना क्रोध होगा ,
वही उतना ही प्रेम होगा ...

जहाँ जितना प्रेम होगा ,
वही उतनाही शक होगा.....

Sangita B Bhalsing

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१९

व्यापार - गझल

व्यापार - गझल 


भावनेचा मांडला बाजार आहे
सांग आता तू खरा का यार आहे ...

दाविशी स्वार्थात लोकांना उणीवा
या मनाला त्रास याचा फार आहे...

वेदनांचे केवढे आघात सारे
कोवळ्याशा काळजावर वार आहे ...

रोज होतो हा तमाशा लावणीचा
नाचताना अंतरात्मा ठार आहे ...

उमगली सारी टवाळी या जगाची
साथ खोटी प्रेम ही व्यापार आहे ...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर


New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...