अध्याय २ - लेख क्रमांक ६ श्री गजानन महाराज शेगाव
श्री गणगणरामाय नमः
लेख क्रमांक ६
*अध्याय दुसरा*
*मंगल स्नानी स्नान करे*
गुरुवारी , विजया एकादशीला गोविंदबुवा टाकळीकरांचे किर्तन मोट्याच्या महादेव मंदिरात संपन्न झाले. किर्तनात गोविंदबुवां च्या स्वामींबरोबर झालेल्या प्रश्नोत्तरामुळे बंकट व पितांबर भारावल्या गेले होते.स्वामींनी बंकटास,तुझ्याजवळ भावभक्ती होती म्हणून मी तुला दुसऱ्यांदा भेटलो, असे वाक्य बोलल्यामुळे बंकट आशावादी होते की,स्वामी त्यांना तिसऱ्या वेळेसही भेटतील. म्हणून शुक्रवारी बंकटांनी आपल्या वडिलांना म्हणजे भवानीराम शेठजींना गोविंद बुवांच्या किर्तनात स्वामींनी प्रश्नोत्तराचा भरलेला रंग कथन केला. गोविंदबुवां स्वामींच्या पाया पडून स्वामींना मंदिरात चलण्याची विनंती करु लागले तेंव्हा स्वामींनी जागेवरुनच गोविंदबुवां ना दिलेला भागवत वत् जगण्याचा उपदेश त्यांनी कीर्तनातून कथन केला. त्याच प्रमाणे त्याने स्वत: आसोलकरांच्या येथून भिक्षा मागून आणलेली भाजी भाकर स्वामी जेवत असतांना,त्यांनी पिताबरास नाल्यातून तुंबा बुडवून पाणी आणण्यास सांगितले .तेंव्हा तुंबा नाल्यात ज्या ठिकाणी बुडविला त्या ठिकाणी खड्डा पडून शुद्ध निर्मळ जल तुंब्यात आले.तेच निर्मळ जल स्वामी प्यायल्यानंतर त्यांनी मला सुपारीचे खांड मागितले. तेंव्हा भवानीराम शेठजींना आश्चर्य वाटले.ही वेळ साधून बंकटाने वडिलांजवळ स्वामींना आपल्या घरी आणून गुरुपूजन करण्याचा मनोदय व्यक्त केला.त्यास भवानीराम शेठजींनी संमती दिली.
शनिवारी बंकटाचा प्रदोष व्रत होता.प्रदोष व्रतामुळे स्वामींना घरी आणण्यास प्रतिबंध निर्माण करणारे दोष नष्ट होऊन, शिवाय पूर्वसुकृता मुळे निर्माण झालेले, अपूर्व, श्रीहरि च्या आज्ञेने फळ देण्यास प्रवृत्त झाले
प्रदोषी दोष नष्ट झाले
पर्वापूर्व काळ आले
अशा भाग्यवान बंकटाला रसरस भक्तीचा आनंद प्राशन करविण्यासाठी , मोट्याच्या मंदिराजवळील माणिक चौकात, आता त्याला सावता माळी चौक म्हणतात त्या ठिकाणी संध्याकाळी गोधुली वेळेस ज्ञानसूर्य प्रगट झाले. माउली ज्ञानेश्वरीच्या सोळाव्या अध्यायाची सुरवात करतांनाच आपल्या सद्गुरुस वंदन करतात.
मावळवीत विश्वाभासु । नवल उदयला चंडाशु । अद्वयाब्जिनी विकाशु। वंदू आता।।१।।
अर्थ:- श्री माऊलींनी श्रीसद्गुरुला ज्ञानरुपी सुर्याची उपमा देऊन रुपक केले आहे.ते म्हणतात विश्वरुपी आभास नाहीसा करुन, अद्वैत स्थिती रुपी कमलाचा विकास करणारा आश्चर्यकारक सद्गुरु रुपी सुर्य उगवला आहे.त्या ज्ञानरुपी सुर्याला माझे वंदन असो.
माउलींनी सद्गुरु स्वरूप ज्ञान सुर्याची तुलना भौतिक, रोज उगवणाऱ्या व मावळणार्या सुर्याशी फारच सुंदर रितीने केली.ते म्हणतात, भौतिक सुर्य उगवला की द्वैतरूपी जगाचे व्यवहार प्रकाशीत होतात पण सद्गुरु स्वरूप ज्ञान सुर्य उगवला की द्वैत मावळते व अद्वैत प्रकाशीत होते.अशा परब्रम्हाला मौनातूनच वंदन केले पाहीजे.अशाच प्रकारचे वंदन मौनातून करतांना बंकट स्वामींच्या पाया पडले.व स्वामींना घरी चलण्याची विनंती केली. स्वामींनी "जशी तुझी ईच्छा" म्हणत त्यांच्या प्रस्तावास संमती दिली.
सद्गुरु ची कीर किर्ती अशी
ईच्छा ईच्छे भक्त जशी
स्वामी बंकटा बरोबर घरी येत असतांना त्यांच्या पाठीमागे बरेच लोक बंकटाच्या घरी आले.त्यामधे काही गोविंदबुवांच्या किर्तनास उपस्थित असलेले होते.तर काही बघे होते.स्वामी घरी पोहोचल्यावर भवानीराम शेठजींनी स्वामींना साष्टांग दंडवत घालून उच्चासनावर बसविले.नंतर शेठजींनी परातीत स्वामींचे पादपद्म ठेवून धुतले. व पादपद्मांची पूजा करुन, महादेवाची आरती गाऊन स्वामींना ओवाळले.
रसयुक्त पदार्थांची रसोई तयार झाल्यानंतर स्वामींच्या साठी जेवणाचे ताट वाढण्यात आले. रसयुक्त पदार्थ व फळे ताटीकात वाढले.व ईतर पदार्थ ताटात वाढले.स्वामी प्रसादी ग्रहण करण्यासाठी बसल्यावर स्वामींनी सर्व पदार्थांचा काला करुन जेवण्यास सुरवात केली.ताटातील काला संपल्यावर शेठजींनी पुन्हा पदार्थ ताटात वाढले.तेही स्वामींनी खाल्ले.शेठजी हौसेने वाढत होते आणि स्वामी त्यांची हौस पुरवित होते.अशाप्रकारे स्वामी तीन शेर अन्न जेवले.नंतर शेठजींनी स्वतःच वाढ थांबविली.स्वामी बंकट च्या घरी आले आहेत ही वार्ता लवकरच गावात पसरली. त्यामुळे गावातील पुष्कळ लोक स्वामींच्या दर्शनासाठी आले त्यामुळे घराला गोकुळाचे स्वरुप प्राप्त झाले होते.
रात्री स्वामींना मऊ गादी असलेल्या सागी पलंगावर निजविले. सकाळी प्रातर्विधी उरकल्यावर स्वामींच्या स्नानाची तयारी केली. वास्तविक स्वामींचे आंतरीक मंगल स्नान झालेलेच होते.
मंगलस्नानी स्नान करे
नर नारी घागरी भरे
शीतोष्णक जल जलधारा
हर हर गंगे गंगधारा
गंध सुगंध उधळे वारा
स्नायु स्नानविती धारा
स्नायु साबणे रगरगडून
ईत्र ईत्ररे वरी चपडून
चपडून चपडवी गणगणराम
सिता सितापती सीताराम।।ॐ।।
विचार केला तर, प्रत्येकाचे अंतःकरण शुद्ध सात्विकच आहे.कारण पृथ्वी , आप, तेज, वायु,आकाश ह्या पंचमहाभूतांच्या सात्विक अंशाच्या मिश्रणाने प्रत्येकाचे अंतःकरण बनले आहे.परंतू माणसाने आपली जीवसृष्टी निर्माण करुन अंतकरणात राग ,द्वेष,अहंता ममता इत्यादी दोष भरुन ठेवले आहेत.म्हणून अंतकरणात आलेली ही अशुद्धता आगंतुक आहे.जसे पाणी मुळात थंड, शितल आहे.ह्या पाण्याला अग्नी च्या सहाय्याने तापविले तर पाणी गरम होते. म्हणजे ही उष्णता आंगतुक आहे.ही उष्णता नष्ट करण्यासाठी अग्नी विझवा व पाणी तसेच पडून राहू द्या.थोड्या वेळाने पाणी आपोआप थंड होईल.त्याचप्रमाणे विषयात चित्त व चित्तात विषय घुसले तर विषय त्यागासाठी,चित्ताला विषयापासून दूर करणे हा उपाय आहे.परंतू आपण विषयापासून जरी दूर झालो तरी चित्त विषयाचे स्मरण करीतच राहते.म्हणजे अग्नी पेटलेलाच राहतो.मी विषया शिवाय जिवंत राहू शकत नाही ही वेडी कल्पना दूर करण्यासाठी राजमार्ग म्हणजे परमेश्वराचे रुप डोळ्यात साठवून, नामस्मरण करावे. दीर्धकाळ नामस्मरण केल्यास व सद्गुरुच्या कृपेने परमेश्वराच्या दिव्य गुणांविषयी आवड निर्माण झाल्यास,आपण विषयांना दिलेली सत्यत्व बुद्धी गळुन पडते.कारण आपणांस विषयांपेक्षा भव्यदिव्य वस्तू मिळाली आहे.म्हणून साधू संत नामस्मरण करण्यास सांगतात.
आता स्वामींच्या शरीराचे स्नान होणार होते.म्हणून विहीरीच्या कोमट पाण्याने स्वामींना सर्वप्रथम बाया, माणसांनी "हर हर गंगे" म्हणत अभिषेक केला.नंतर स्नायुंना सुगंधीत साबणाने रगडून स्वच्छ केले.हेच बाह्य शरीराचे दोषापयन झाले.नंतर निरनिराळे अत्तर, सुगंधी तेल शरीराला चपडले अत्तराचा सुगंध वाऱ्यामुळे आजूबाजूला पसरुन वातावरण सुगंधित झाले होते.म्हणजे हे शरीराचे गुणाधान झाले.नंतर स्वामींना पिताबर नेसवून गुरु स्थानी बैसविले.स्वामीना पगडी धारण करवून मस्तकावर चंदन, बुक्का,टीळा लावला.व सद्गुरुंचे पूजन केले.ह्यावेळेस स्वामी सनकादिकांप्रमाणे शोभून दिसत होते.ही स्वामींच्या शरीराची हीनांगपूर्ती होय.स्वामींच्या अभ्यंगस्नानास व गुरुपूजनास बंकटाच्या घरी बरीच मंडळी जमली होती.
जमलेल्या मंडळी मधून काही लोक स्वामींना गुरुपूजनास घरी घेऊन जाण्यासाठी शेठजी जवळ आग्रह धरु लागले. शेठजींनी सुद्धा स्वामींना ज्यांची श्रद्धा आहे अशा भक्तांच्या घरी बंकटाबरोबर पाठविले. बंकटाचे महत् भाग्य म्हणजे प्रत्येकाच्या घरी गुरुपूजन सोहळ्यास बंकट उपस्थित होते.
सोमवारी संध्याकाळी, सोमवती अमावस्येला ईच्छाराम शेठजी स्नान करून बंकटाच्या घरी आले.स्वामींना साष्टांग दंडवत घातला व स्वामींच्या समोर हात जोडून उभे राहिले. दृष्टी चरणावर ठेवून स्वामींना घरी भोजनास्तव चलण्यास विनंती करु लागले.स्वामींनी "मला भुक नाही" असे म्हणून त्यांच्या घरी चलण्यास असमर्थता दर्शवली. पण ईच्छाराम शेठजी आग्रहाने म्हणू लागले,स्वामी आपण पुष्कळ भक्तांच्या घरी गेले.मी सुद्धा ईतर भक्ताप्रमाणे आपला भक्त आहे. त्यामुळे माझी सुद्धा ईच्छा पुरवावी ही आग्रहाची विनंती. शिवाय मी स्वयंपाकाची तयारी रविवारीच केली होती.व आता स्वयंपाक तयार आहे. आपण न आल्यास मी उपवास सोडणार नाही.उपाशी राहील.पुढे आपली ईच्छा.
म्हणून स्वामी ईच्छाराम शेठजींच्या घरी जाण्यास तयार झाले.स्वामी घरी आल्यावर शेठजींनी स्वामींचे पाय धुऊन पुजन केले.व जेवण्यास बसविले.पहिल्या वेळेसच दोन माणसांना पुरेल एवढे अन्न वाढले.स्वामींनी ते सर्व खाल्ले.परंतू ईच्छाराम आग्रह करुन स्वामींना वाढू लागले.परंतू ते स्वामींना अशा पद्धतीने वाढत होते जणूकाही ते अलप वाढत आहे.हा त्यांचा वेडगळ पणाच होता.स्वामी जे समजायचे ते समजून गेले.
वाढे ढोरासम ऐसा
समजे ढोर ढोरजैसा
समजूत समजले गणगणराम
सिता सितापती सीताराम।।ॐ।।
स्वामींनी ईच्छारामांनी वाढलेले संपूर्ण जेवण संपविले.व लगेच खाल्लेल्या अन्नाची ओकारी केली. त्यामुळे स्वामींनी खाल्लेलं सारं अन्न ईच्छाराम शेठजींच्या च्या घरात ओकारी रुपाने पडलं. नंतर बंकट स्वामींना घरी घेऊन आले. स्वामींना साबणाने स्नान घातलं.ईच्छाराम शेठजींची एवढी चूक सोडली तर शेठजी प्रांजळ मनाचे होते.ते शेवट पर्यंत स्वामी भक्त होते.
त्याचवेळेस बंकटांच्या घरी सांप्रदायिक भजनाच्या दोन दिंड्या आल्या होत्या. त्यादिवशी रात्रभर भजन चालले.स्वामी सुद्धा गणगण भजन म्हणत रात्रभर भजनाचा आनंद घेत होते.
रघुपती राघव राजाराम
पतित पावन सिताराम
श्री गणगणरामार्पणमस्तू
जगन्नाथ गांधी
मुंबई मालाड (प)
९७६९५१८८५८
