श्री गजानन महाराज शेगाव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
श्री गजानन महाराज शेगाव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २ फेब्रुवारी, २०२६

अध्याय २ - लेख क्रमांक ६ श्री गजानन महाराज शेगाव

  अध्याय २ - लेख क्रमांक ६ श्री गजानन महाराज शेगाव 

                   श्री गणगणरामाय नमः

                      लेख क्रमांक ६

                     *अध्याय दुसरा*

                 *मंगल स्नानी स्नान करे*

अध्याय २ - लेख क्रमांक ६ श्री गजानन महाराज शेगाव



              गुरुवारी ,  विजया एकादशीला गोविंदबुवा टाकळीकरांचे किर्तन मोट्याच्या महादेव मंदिरात संपन्न झाले. किर्तनात गोविंदबुवां च्या स्वामींबरोबर झालेल्या प्रश्नोत्तरामुळे बंकट व पितांबर भारावल्या गेले होते.स्वामींनी बंकटास,तुझ्याजवळ भावभक्ती होती म्हणून मी तुला दुसऱ्यांदा भेटलो, असे वाक्य बोलल्यामुळे बंकट आशावादी होते की,स्वामी त्यांना तिसऱ्या वेळेसही भेटतील. म्हणून शुक्रवारी बंकटांनी आपल्या वडिलांना म्हणजे भवानीराम शेठजींना गोविंद बुवांच्या किर्तनात स्वामींनी  प्रश्नोत्तराचा  भरलेला रंग कथन केला. गोविंदबुवां स्वामींच्या पाया पडून  स्वामींना मंदिरात चलण्याची विनंती करु लागले तेंव्हा स्वामींनी जागेवरुनच गोविंदबुवां ना दिलेला भागवत वत् जगण्याचा उपदेश त्यांनी कीर्तनातून कथन केला. त्याच प्रमाणे त्याने स्वत: आसोलकरांच्या येथून  भिक्षा मागून आणलेली भाजी भाकर स्वामी जेवत असतांना,त्यांनी पिताबरास नाल्यातून तुंबा बुडवून पाणी आणण्यास सांगितले .तेंव्हा तुंबा नाल्यात ज्या ठिकाणी बुडविला त्या ठिकाणी खड्डा पडून शुद्ध निर्मळ जल तुंब्यात आले.तेच निर्मळ जल स्वामी प्यायल्यानंतर त्यांनी मला सुपारीचे खांड मागितले. तेंव्हा भवानीराम शेठजींना आश्चर्य वाटले.ही वेळ साधून बंकटाने वडिलांजवळ स्वामींना आपल्या घरी आणून गुरुपूजन करण्याचा मनोदय व्यक्त केला.त्यास भवानीराम शेठजींनी संमती दिली.

            शनिवारी बंकटाचा प्रदोष व्रत होता.प्रदोष व्रतामुळे स्वामींना घरी आणण्यास प्रतिबंध निर्माण करणारे दोष नष्ट होऊन, शिवाय पूर्वसुकृता मुळे निर्माण झालेले, अपूर्व, श्रीहरि च्या आज्ञेने फळ देण्यास प्रवृत्त झाले


प्रदोषी दोष नष्ट झाले 

           पर्वापूर्व काळ आले 

       

      अशा भाग्यवान बंकटाला रसरस भक्तीचा आनंद प्राशन करविण्यासाठी , मोट्याच्या मंदिराजवळील माणिक चौकात, आता त्याला सावता माळी चौक म्हणतात त्या ठिकाणी संध्याकाळी गोधुली वेळेस ज्ञानसूर्य प्रगट झाले. माउली ज्ञानेश्वरीच्या सोळाव्या अध्यायाची सुरवात करतांनाच आपल्या सद्गुरुस वंदन करतात.


मावळवीत विश्वाभासु । नवल उदयला चंडाशु । अद्वयाब्जिनी विकाशु। वंदू आता।।१।।


अर्थ:- श्री माऊलींनी श्रीसद्गुरुला ज्ञानरुपी सुर्याची उपमा देऊन रुपक केले आहे.ते म्हणतात विश्वरुपी आभास नाहीसा करुन, अद्वैत स्थिती रुपी कमलाचा विकास करणारा आश्चर्यकारक सद्गुरु रुपी सुर्य उगवला आहे.त्या ज्ञानरुपी सुर्याला माझे वंदन असो.

      माउलींनी सद्गुरु स्वरूप ज्ञान सुर्याची तुलना भौतिक, रोज उगवणाऱ्या व मावळणार्‍या सुर्याशी फारच सुंदर रितीने केली.ते म्हणतात, भौतिक सुर्य उगवला की द्वैतरूपी जगाचे व्यवहार प्रकाशीत होतात पण सद्गुरु स्वरूप ज्ञान सुर्य उगवला की द्वैत मावळते व अद्वैत प्रकाशीत होते.अशा परब्रम्हाला मौनातूनच वंदन केले पाहीजे.अशाच प्रकारचे वंदन  मौनातून  करतांना बंकट स्वामींच्या पाया पडले.व स्वामींना घरी चलण्याची विनंती केली. स्वामींनी "जशी तुझी ईच्छा" म्हणत त्यांच्या प्रस्तावास संमती दिली. 


  सद्गुरु ची कीर किर्ती अशी

                ईच्छा ईच्छे भक्त जशी


स्वामी बंकटा बरोबर घरी येत असतांना त्यांच्या पाठीमागे बरेच लोक बंकटाच्या घरी आले.त्यामधे काही गोविंदबुवांच्या किर्तनास उपस्थित असलेले होते.तर काही बघे होते.स्वामी घरी पोहोचल्यावर भवानीराम शेठजींनी स्वामींना साष्टांग दंडवत घालून उच्चासनावर बसविले.नंतर शेठजींनी परातीत स्वामींचे पादपद्म ठेवून धुतले. व  पादपद्मांची पूजा करुन, महादेवाची आरती गाऊन स्वामींना ओवाळले.

              रसयुक्त पदार्थांची रसोई तयार झाल्यानंतर स्वामींच्या साठी जेवणाचे ताट वाढण्यात आले. रसयुक्त पदार्थ व फळे ताटीकात वाढले.व ईतर पदार्थ ताटात वाढले.स्वामी प्रसादी ग्रहण करण्यासाठी बसल्यावर स्वामींनी सर्व पदार्थांचा काला करुन जेवण्यास सुरवात केली.ताटातील काला संपल्यावर शेठजींनी पुन्हा पदार्थ ताटात वाढले.तेही स्वामींनी खाल्ले.शेठजी हौसेने वाढत होते आणि स्वामी त्यांची हौस पुरवित होते.अशाप्रकारे स्वामी तीन शेर अन्न जेवले.नंतर शेठजींनी स्वतःच वाढ थांबविली.स्वामी बंकट च्या घरी आले आहेत ही वार्ता लवकरच गावात पसरली. त्यामुळे गावातील पुष्कळ लोक स्वामींच्या दर्शनासाठी आले त्यामुळे घराला गोकुळाचे स्वरुप प्राप्त झाले होते.

            रात्री स्वामींना मऊ गादी असलेल्या सागी पलंगावर निजविले. सकाळी प्रातर्विधी उरकल्यावर स्वामींच्या स्नानाची तयारी केली. वास्तविक स्वामींचे आंतरीक मंगल स्नान झालेलेच होते.


मंगलस्नानी स्नान करे

          नर नारी घागरी भरे

शीतोष्णक जल जलधारा

           हर हर गंगे गंगधारा

गंध सुगंध उधळे वारा

           स्नायु स्नानविती धारा

स्नायु साबणे रगरगडून

           ईत्र ईत्ररे वरी चपडून

चपडून चपडवी गणगणराम

           सिता सितापती सीताराम।।ॐ।।


         

            विचार केला तर, प्रत्येकाचे अंतःकरण शुद्ध सात्विकच आहे.कारण पृथ्वी , आप, तेज, वायु,आकाश ह्या पंचमहाभूतांच्या सात्विक अंशाच्या मिश्रणाने प्रत्येकाचे अंतःकरण बनले आहे.परंतू माणसाने आपली जीवसृष्टी निर्माण करुन अंतकरणात  राग ,द्वेष,अहंता ममता इत्यादी दोष भरुन ठेवले आहेत.म्हणून अंतकरणात आलेली ही अशुद्धता आगंतुक आहे.जसे पाणी मुळात थंड, शितल आहे.ह्या पाण्याला अग्नी च्या सहाय्याने तापविले तर पाणी गरम होते. म्हणजे ही उष्णता आंगतुक आहे.ही उष्णता नष्ट करण्यासाठी अग्नी विझवा व पाणी तसेच पडून राहू द्या.थोड्या वेळाने पाणी आपोआप थंड होईल.त्याचप्रमाणे विषयात चित्त व चित्तात विषय घुसले तर विषय त्यागासाठी,चित्ताला विषयापासून दूर करणे हा उपाय आहे.परंतू आपण विषयापासून जरी दूर झालो तरी चित्त विषयाचे स्मरण करीतच राहते.म्हणजे अग्नी पेटलेलाच राहतो.मी  विषया शिवाय जिवंत राहू शकत नाही ही वेडी कल्पना दूर करण्यासाठी राजमार्ग म्हणजे परमेश्वराचे रुप डोळ्यात साठवून, नामस्मरण करावे. दीर्धकाळ नामस्मरण केल्यास व सद्गुरुच्या कृपेने परमेश्वराच्या दिव्य गुणांविषयी आवड निर्माण झाल्यास,आपण विषयांना दिलेली सत्यत्व बुद्धी गळुन पडते.कारण आपणांस विषयांपेक्षा भव्यदिव्य  वस्तू मिळाली आहे.म्हणून साधू संत नामस्मरण करण्यास सांगतात. 

            आता स्वामींच्या शरीराचे स्नान होणार होते.म्हणून विहीरीच्या  कोमट पाण्याने स्वामींना सर्वप्रथम बाया, माणसांनी "हर हर गंगे" म्हणत अभिषेक केला.नंतर स्नायुंना सुगंधीत साबणाने रगडून स्वच्छ केले.हेच बाह्य शरीराचे दोषापयन झाले.नंतर निरनिराळे अत्तर, सुगंधी तेल शरीराला चपडले अत्तराचा सुगंध वाऱ्यामुळे आजूबाजूला पसरुन वातावरण सुगंधित झाले होते.म्हणजे हे शरीराचे गुणाधान झाले.नंतर स्वामींना पिताबर नेसवून गुरु स्थानी बैसविले.स्वामीना पगडी धारण करवून मस्तकावर चंदन, बुक्का,टीळा लावला.व सद्गुरुंचे पूजन केले.ह्यावेळेस स्वामी सनकादिकांप्रमाणे शोभून दिसत होते.ही स्वामींच्या शरीराची हीनांगपूर्ती होय.स्वामींच्या अभ्यंगस्नानास व गुरुपूजनास बंकटाच्या घरी बरीच मंडळी जमली होती.

            जमलेल्या मंडळी मधून काही लोक स्वामींना गुरुपूजनास घरी घेऊन जाण्यासाठी शेठजी जवळ आग्रह धरु लागले. शेठजींनी सुद्धा स्वामींना ज्यांची श्रद्धा आहे अशा भक्तांच्या घरी बंकटाबरोबर पाठविले. बंकटाचे महत्  भाग्य म्हणजे प्रत्येकाच्या घरी गुरुपूजन सोहळ्यास बंकट उपस्थित होते.

              सोमवारी संध्याकाळी, सोमवती अमावस्येला ईच्छाराम शेठजी स्नान करून बंकटाच्या घरी आले.स्वामींना साष्टांग दंडवत घातला व स्वामींच्या समोर हात जोडून उभे राहिले. दृष्टी चरणावर ठेवून स्वामींना घरी भोजनास्तव चलण्यास विनंती करु लागले.स्वामींनी "मला भुक नाही" असे म्हणून त्यांच्या घरी चलण्यास असमर्थता दर्शवली. पण ईच्छाराम शेठजी आग्रहाने म्हणू लागले,स्वामी आपण पुष्कळ भक्तांच्या घरी गेले.मी सुद्धा ईतर भक्ताप्रमाणे आपला भक्त आहे. त्यामुळे माझी सुद्धा ईच्छा पुरवावी ही आग्रहाची विनंती. शिवाय मी स्वयंपाकाची तयारी रविवारीच केली होती.व आता स्वयंपाक तयार आहे. आपण न आल्यास मी उपवास सोडणार नाही.उपाशी राहील.पुढे आपली ईच्छा. 

           म्हणून स्वामी ईच्छाराम शेठजींच्या घरी जाण्यास तयार झाले.स्वामी घरी आल्यावर शेठजींनी स्वामींचे पाय धुऊन पुजन केले.व जेवण्यास बसविले.पहिल्या वेळेसच दोन माणसांना पुरेल एवढे अन्न वाढले.स्वामींनी ते सर्व खाल्ले.परंतू ईच्छाराम आग्रह करुन स्वामींना वाढू लागले.परंतू ते स्वामींना अशा पद्धतीने वाढत होते जणूकाही ते  अलप वाढत आहे.हा त्यांचा वेडगळ पणाच होता.स्वामी जे समजायचे ते समजून गेले.


वाढे ढोरासम ऐसा

         समजे ढोर ढोरजैसा

समजूत समजले गणगणराम

         सिता सितापती सीताराम।।ॐ।।


       स्वामींनी ईच्छारामांनी  वाढलेले संपूर्ण जेवण संपविले.व लगेच खाल्लेल्या अन्नाची ओकारी केली. त्यामुळे स्वामींनी खाल्लेलं सारं अन्न ईच्छाराम शेठजींच्या च्या घरात ओकारी रुपाने पडलं. नंतर बंकट स्वामींना घरी घेऊन आले. स्वामींना साबणाने स्नान घातलं.ईच्छाराम शेठजींची एवढी चूक सोडली तर शेठजी प्रांजळ मनाचे होते.ते शेवट पर्यंत स्वामी भक्त होते.

          त्याचवेळेस  बंकटांच्या घरी सांप्रदायिक भजनाच्या दोन दिंड्या आल्या होत्या. त्यादिवशी रात्रभर भजन चालले.स्वामी सुद्धा गणगण भजन म्हणत रात्रभर भजनाचा आनंद घेत होते.



रघुपती राघव राजाराम

            पतित पावन सिताराम


        श्री गणगणरामार्पणमस्तू 


जगन्नाथ गांधी

मुंबई मालाड (प)

९७६९५१८८५८

अध्याय २ - लेख क्रमांक ५ - श्री गजानन महाराज शेगाव

अध्याय २ - लेख क्रमांक ५ - श्री गजानन महाराज शेगाव 

                    श्री गणगणरामाय नमः

                       लेख क्रमांक ५

                       *अध्याय दुसराप*

                  *भागवत वत् जगा साचे*

अध्याय २ - लेख क्रमांक ५ - श्री गजानन महाराज शेगाव धार्मिक लेख


            स्वामी देविदास पातुरकरांच्या घरासमोरील वटवृक्षाखाली जेवले.व उनाड नाल्यात शुद्ध निर्मळ जल निर्माण करुन पाणी प्यायले व निघून गेले.बंकट पुन्हा नाल्याजवळ आले तेव्हा स्वामी त्यांना दिसले नाहीत. तेंव्हापासून त्यांच्या मनाने स्वामींच्या दर्शनाचा ध्यास घेतला. व गांवभर हिंडून स्वामींना शोधू लागले. एकादशी निमित्त मोट्याच्या शिवमंदीरात गोविंद बुवा टाकळीकरांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. गोविंदबुवा विद्वान व प्रख्यात किर्तनकार होते.

           मागील चार दिवसांपासून बंकट स्वामींना धुंडत होते.आज पाचव्या दिवशी बंकट पितांबरादी मित्रांबरोबर गप्पा करीत बसले.परंतू  त्या गप्पांमधे बंकटांचे मन रमत नव्हते.राहून राहून बंकटांच्या मनात स्वामी विषयी विचार येत होते. पिताबंराला बंकटांने  स्वामींबाबत  सांगितले. ते ऐकून पितांबरांच्याही मनात स्वामींच्या दर्शनाची ईच्छा जागृत झाली. एकादशी असल्याने बंकट व  पितांबर दोघांनी मोट्याच्या मंदिरात महादेवाचे दर्शन घेऊन किर्तन ऐकण्याचे ठरविले. त्यासाठी ईतर मित्रांना कटवून बंकट व पितांबर दोघे मंदिरात दर्शनासाठी निघाले. महादेव मंदिरासमोर असलेल्या कडूनिंबाच्या  झाडावर बसलेली टिटवी टिटवू लागल्यामुळे बंकटाचे लक्ष झाडावरील टिटवी कडे गेले.तेंव्हा बंकटाला स्वामीं झाडाच्या सहाऱ्याने पहुडले असलेले आढळले. स्वामींना बघून दोघांनाही आनंद झाला.व लगेच स्वामीजवळ येऊन दोघे स्वामींच्या पाया पडून जेवणाची विनंती करु लागले.

            तेंव्हा स्वामी बंकटाला म्हणाले की,तुझी गरज असेल तर आसोलकर माळीणीच्या घरी भिक्षा मागून भाकर आण. त्याप्रमाणे बंकट आसोलकरांच्या घरी गेले. व माळीणबाईंना भाकर मागितली. माळीणबाईंनी दिलेली भाजी भाकर बंकटांनी स्वामींना अर्पण  केली. स्वामीं  भाजी भाकर जेवू लागले. जेवतांना स्वामी पितांबराला म्हणाले, ह्या तुंब्यात उनाड नाल्यातून पाणी भरुन आण.कोणाच्याही घरुन पाणी आणू नकोस. पितांबर तुंबा घेऊन उनाड नाल्याजवळ आले. नाल्यात पायाची तळवे भिजतील एवढेही पाणी नव्हते.परंतू स्वामींचा आदेश म्हणून पितांबरांनी तुंबा नाल्यात बुडविला.आणि ज्या ठिकाणी तुंबा बुडविला त्या ठिकाणी खड्डा पडून शुद्ध निर्मळ जल वर आले.व त्या निर्मळ जलाने तुंबा भरल्या गेला.हे बघून पितांबर आश्चर्यचकित झाले. परिणामी, तुंब्यातील निर्मळ जला प्रमाणेच पितांबरांचे हृदय भक्तीने भरुन गेले. भरलेला तुंबा घेऊन पितांबर स्वामीजवळ आले.स्वामींचं जेवण झाले होते.स्वामी तुंब्यातील गंगाजल प्यायले.तेंव्हा बंकटाने "पंढरीनाथ भगवान की जय"असा जयघोष केला. व खिश्यातून काही चिल्लर पैसे काढून स्वामींना देऊ केले.तेंव्हा स्वामी म्हणाले ह्या दक्षिणेची गरज जे साधू संन्याशी व्यापारीवृत्तीचे  असतात त्यांना  असते. तुझ्याजवळ भाव भक्ती होता म्हणून मी तुला दुसऱ्यांदा भेटलो. पहिल्या वेळेस तू पातुरकरांच्या येथून जेवण  आणले. आता आसोलकरांच्या येथून जेवण आणले.म्हणजे तुझी पंढरी परभारे झाली व फुकटात पंढरीनाथाची प्रसादी सुद्धा मिळाली.आता तुझ्या खिशात असलेलं सुपारीचे खांड काढ व मला दे.स्वामींनी सुपारी खाल्ली. मग स्वामी म्हणाले आता दोघेही किर्तनात जा.व लक्ष देउन किर्तन ऐका.


         गोविंदबुवा किर्तनात आले. त्यांचा संगीताचा अभ्यास असल्यामुळे  ते एकच अभंग निरनिराळ्या रागात गाऊन  दाखवत. शास्त्रीय विषय तोही संगीतातून. म्हणून त्यांच्या किर्तनाला आजु बाजुच्या  खेडेगावातून बरीच धार्मिक मंडळी हजेरी लावायची. त्यामुळै त्यांना दक्षिणा सुद्धा भरपूर मिळत असे.परंतू पैसा कितीही मिळाला तरी तो अधिकाधिक जमा करण्याचा मोह आवरणे अशक्य असते.त्यामुळे कीर्तनाच्या बरोबर वित्ताची अभिलाषा सुद्धा विद्वान पुरुषाचा स्थायी भाव होतो.म्हणून गोविंद बुवा अत्यंत विद्वान किर्तनकार असून सुद्धा त्यांचे वागणं  भागवत वत् न होता ते भागवतात भाग घेतल्या प्रमाणे होत होते.कारण भागवत ह्या शब्दाची फोड (१) भाग (२) वत् ,अशी केल्यास, भागवतकाराच्या दोन संभावना निर्माण होतात.(१) भागवतात भाग घेणारा किर्तनकार किंवा (२) भागवत वत् होणारा किर्तनकार 

      जे किर्तनकार भागवतात भाग घेतात त्यांना मिळणारे फळ हे शाळेत शाळकरी मुले  जसे शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतात त्या प्रमाणे होते. म्हणजे प्रेक्षकांचे मनोरंजन व भाग घेणाऱ्यांना संस्थेकडून  प्रमाणपत्र.परंतू जे किर्तनकार परमेश्वराचे नाम संकीर्तन करीत किर्तन करतात ते किर्तन त्या किर्तनकाराची साधना होते.

           गोविंद बुवांनी गजरागजर संपल्यावर पदे गाईली व नंतर हंसगीतेतील प्रसंग निरुपणास सुरवात केली. त्यात गोविंदबुवा म्हणाले ,एकदा सनकादिकांनी ब्रम्हदेवास प्रश्न विचारला की, विषय चित्तात व चित्त विषयात शिरले की विषय त्याग शक्य होत नाही.तर तो कसा करावा.परंतू ह्या प्रश्नाचे उत्तर ब्रम्हदेवांना सुचले नाही.म्हणून मानस पुत्रांची जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी त्यांनी सच्चिदानंद स्वरुप परब्रम्हाचे म्हणजे श्रीहरि चे स्मरण केले.व ब्रम्हदेवाच्या आळवण्याने श्रीहरि हंसरुपाने सनकादिक ऋषी व ब्रम्हदेवासमोर अवतीर्ण झाले.हे हंस कोण आहेत हे ब्रम्हदेव सुद्धा जाणू शकले नाहीत. परंतू आपले अज्ञान लपविण्यासाठी ब्रम्हदेव काहीच बोलले नाहीत. म्हणून सनक ऋषींनी हंसस्वरुप श्रीहरिंना विचारले की "तुम्ही कोण" त्यावर कडूनिंबाच्या झाडाजवळ बसलेले परमहंस स्वामी  जागेवरुनच उत्तरले की, "जो तू आहेस ,तोच मी आहे" . हे उत्तर ऐकून गोविंद बुवा व श्रोते  चकीत झाले. परंतू गोविंद बुवांनी पुन्हा प्रश्न उपस्थित केला की, तुम्ही व मी निरनिराळे आहोत. मग तुम्ही व मी एक कसे?

            त्यावर परमहंस स्वामी म्हणाले "तू देहाच्या दृष्टीने विचारतोस की चैतन्याचा दृष्टीने ?".त्यावर गोविंद बुवा म्हणाले"दोन्ही दृष्टीने".

            पुन्हा परमहंस स्वामी म्हणाले तुझा आणि माझा देह एकाच पंचिकृत पंचमहाभूतांनी बनलेला असून दोघांच्याही शरीरात नव्हे नव्हे चराचर विश्वात एकच ब्रम्हचैतन्य ओतप्रोत भरले आहे.म्हणून जो तू आहेस तोच मी आहे.


किर्तनी उद्धब ऊधे प्रश्ना

          ऊत्तर ऊते हंसकृष्णा 

उत्तर ऊते प्रश्नोप्रश्नी 

          गोविंद बुवास श्रीकृष्णी 

 

प.पू.संत एकनाथ महाराज भागवतातील हंसगीतेत लिहितात


सनकादिकांसमान । उद्धवा तुज मी मानी जाण । यालागी त्यांचे ज्ञानकथन । ऐक सांगेन म्हणतसे।।३०७।।


म्हणजे सनकादिकांनी विचारलेले प्रश्नच उद्धवाचे आहेत असे समजून भगवंतानी उत्तरे दिली आहेत तीच उत्तरे स्वामींनी गोविंदबुवांना दिली.

        ही उत्तरे ऐकून गोविंद बुवांनी समोर बसलेल्या श्रोत्यांना उत्तर देणाऱ्या परमहंस स्वामींना मंचावर घेऊन येण्यास सांगितले. सर्वात अगोदर बंकट,पितांबर पोहोचले. त्यांच्या पाठोपाठ ईतरही काही श्रोते आले.स्वामींनी सर्वांना  परत जा व मांडी मांडून किर्तन ऐका असे सांगून परत पाठविले. तेंव्हा गोविंद बुवा स्वतः स्वामींजवळ आले.व हात जोडून स्वामींना किर्तनात चलण्याची विनंती करु लागले.

           तेंव्हा स्वामी गोविंदबुवांना म्हणाले आत्ताच तू निरुपण केले की जे चैतन्य चराचर विश्वात ओतप्रोत भरले तेच चैतन्य हंसरुपाने सनकादिक व ब्रम्हदेवासमोर अवतीर्ण झाले. असे असतांना तू मला मंदिरात कशाला नेतोस ? ते ब्रम्हचैतन्य येथे नाही काय? तुझ्यासारखा  मदोन्मत्त, अहंकारी, पोटभऱ्या किर्तनकार ही भूमाता-भूदेव  पुन्हा जगात कधीही प्रगट न करोत.दासगणू महाराज सुद्धा त्यांच्या गजानन विजय ग्रंथातील दुसऱ्या अध्यायात लिहीतात की,


पोटभऱ्या कथेकरी

तू न व्हावे भूमीवरी।।६७।। तसेच


जे जे जयाने सांगावे

ते ते त्याने आचरावे

शब्दच्छलासी न करावे

साधकाने केंव्हाही।।६५।।


आणि माणसातील अहंकार हरि कृपेनेच नष्ट होतो.म्हणून हरि भजन करणे  हा अहंकार नष्ट करण्याचा एकमेव मार्ग आहे.व भगवंताच्या अनुकंपेने तो नष्ट होतो. प.पू.एकनाथ महाराज सुद्धा हंसगीतेच्या निरुपणात लिहीतात की,


यालागी सांडावा अभिमान।ते तुटे सकळ बंधन । अभिमान निरसावया जाण। माझे भजन करावे.।।३६८।।


म्हणून परत जा व परमेश्वराच्या नामसंकीर्तनाचे किर्तन करा.राम, रामेश्वर,किंवा परमेश्वर एकरुप आहेत.कोणत्याही संताच्या कृपेने भवबंधन एकसमानच कटते. कमी जास्त कटत नाही.असे बोलून स्वामींनी गोविंदबुवांना भागवत वत् बनून परमेश्वराचे संकीर्तन करीत निरुपण करण्यास सांगितले.

              गोविंद बुवा मंचावर आले.आणि नाचून  परमेश्वराचे संकीर्तन "राम कृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि  " गाऊ लागले. टाळकरी सुद्धा नव शक्ती संचारल्या प्रमाणे टाळांचा टणकार  करीत नामसंकीर्तन करु लागले.गोविंदबुवा निरुपणात प्रथम स्वामींना वंदन करुन नाम संकीर्तनाचा महिमा वर्णू लागले.व म्हणाले आत्ताच शेगावात प्रगट झालेल्या स्वामींच्या उपदेशानुसार श्रोत्यांनी आपल्या ऊपास्य देवतेचा जास्तीत जास्त नामजप करुन भागवत वत् जीवन  जगण्याचा प्रयत्न करावा. ह्यातच जीवनाची सार्थकता आहे.श्रोतेसुद्धा भागवत वत् निरुपण करणाऱ्या गोविंद बुवांच्या किर्तनात तल्लीन झाले होते.शेवटी गोविद बुवांनी पसायदान म्हणून कीर्तन संपविले. किर्तन संपताच बंकट व पितांबर स्वामींना घरी नेण्यासाठी कडूनिंबाच्या झाडाजवळ आले.पण स्वामी अगोदरच तेथून निघून गेले होते.


रघुपती राघव राजाराम

           पतित पावन सिताराम


            श्री गणगणरामार्पणमस्तू


जगन्नाथ गांधी

मुंबई मालाड (प)

९७६९५१८८५८

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...