मराठी निबंध
मी दुष्काळग्रस्त शेतकरी बोलतोय....!
माझे नाव भाऊसाहेब आणि महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील एका खेड्यात मी राहतो. माझ्या घरात माझे आईवडील,पत्नी आणि शाळेत जाणारी दोन मुले आहेत. परंतु
मी एक दुष्काळग्रस्त शेतकरी आहे. माझे संपूर्ण जीवन शेतीवर अवलंबून आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ आमच्या पाचवीला पुजलाय...! पावसाच्या प्रत्येक थेंबावर माझ्या कुटुंबाचे भविष्य ठरते. परंतु गेल्या काही वर्षांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे माझ्या जीवनात अंधार दाटून आला आहे. दुष्काळ हे माझ्यासाठी केवळ नैसर्गिक संकट नसून, ते एक सतत जळणारे दुःख आहे.
जगावे की मरावे? असा प्रश्न मला नेहमीच पडतो.
शेती ही माझी उपजीविकेचे एकमेव साधन आहे. बी-बियाणे, खत, औषधे यासाठी मी कर्ज काढतो. कर्जाचा फास गळ्यात आवळत जातोय.पेरणी करताना मनात आशा असते की यंदा तरी पीक चांगले येईल. पण पाऊस वेळेवर न पडल्यामुळे पीक वाळून जाते. जमिनीत भेगा पडतात, विहिरी आटतात आणि शेत ओस पडते.
बोअर तरी किती घेणार ? या काळया आईच्या पोटात किती छिद्र पाडणार ? परिणामी मेहनत, पैसा आणि स्वप्ने सगळेच मातीत मिसळते.
दुष्काळाचा परिणाम फक्त शेतीपुरता मर्यादित नसतो. कुटुंबाचा उदरनिर्वाह कठीण होतो. मुलांच्या शिक्षणाची चिंता वाढते. जनावरांसाठी चारा मिळत नाही. अनेक वेळा गाव सोडून शहराकडे स्थलांतर करावे लागते. मजुरी करून पोट भरण्याची वेळ येते. शेतकऱ्याच्या आत्मसन्मानाला मोठा धक्का बसतो.
सरकारकडून कर्जमाफी, पीकविमा, दुष्काळी मदत मिळते; पण ती अपुरी आणि उशिरा मिळते. अनेक शेतकरी कागदपत्रांच्या फेऱ्यात अडकतात. काहीजण नैराश्याला बळी पडतात. दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मानसिक आरोग्यही बिघडते, हे समाजाने समजून घेतले पाहिजे.
दुष्काळावर मात करण्यासाठी दीर्घकालीन उपाय गरजेचे आहेत. पाणी साठवणूक, जलसंधारण, ठिबक सिंचन, पावसाच्या पाण्याचे नियोजन यावर भर दिला पाहिजे. पीक पद्धतीत बदल करून कमी पाण्यात येणारी पिके घ्यावी लागतील. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणेही आवश्यक आहे.
शेतकरी जगला तरच देश जगेल. माझ्या कष्टाचे चीज व्हावे, मला भीक नको तर न्याय हवा. योग्य नियोजन, शासनाची संवेदनशीलता आणि समाजाचा पाठिंबा मिळाला तर दुष्काळग्रस्त शेतकरीही नव्या आशेने उभा राहू शकतो. मला अजूनही विश्वास आहे की एक दिवस माझ्या शेतात पुन्हा हिरवळ फुलेल.
Sangita Bhalsing
Ahilyanagar
Maharashtra
