मराठी निबंध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी निबंध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ३१ जानेवारी, २०२६

मराठी निबंध - प्रयत्न हाच परमेश्वर

 

प्रयत्न हाच परमेश्वर - निबंध (मराठी लेख) इयत्ता 12 वी 

 मंगळवार दि.३१ जाने.२०१७ एकमत वर्तमान पत्रातील "साक्षी " पुरवणी मधे माझा निबंध/लेख प्रकाशित.

🌷 प्रयत्न हाच परमेश्वर 🌷

शासकीय कार्यालयात धार्मिक पूजा-अर्चा करन्यास बंदीची बातमी आज दूरदर्शनवर ऐकली ...अणि लगेचच मला

प्रयत्न हाच परमेश्वर - निबंध (मराठी लेख) इयत्ता 12 वी   मंगळवार दि.३१ जाने.२०१७ एकमत वर्तमान पत्रातील "साक्षी " पुरवणी मधे माझा लेख प्रकाशित.


"प्रयत्नान्ति परमेश्वर " या अचूक अणि अजरामर सुवचनाची आठवण झाली....यशस्वी होण्यासाठी प्रयत्न अणि उत्तम कार्य करण्याची गरज आहे,धार्मिक कर्मकांड करण्याची नव्हे...!!या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगाची ही अत्यावश्यक गरज आहे.प्रगत देश आज चंद्र अणि मंगळावर निवास करण्यासाठी धडपडत आहेत अणि आपण मात्र धार्मिक बाबीला चिकटून आहोत.परदेशात विद्यार्थी रोबोट बनवन्यात मग्न आहेत अणि आपली मुले आरती करन्यात गुंग झाले आहेत.मग भारत कसा प्रगत बनणार? जागतिक स्पर्धेत कसा टिकाव धरणार? परमेश्वराची आळवणी करुन अभ्यास न करता यशकसे मिळणार? जाती धर्म उंबऱ्याच्या आतच असला पाहिजे.

श्रद्धा असावी पण डोळस....!!अंधश्रद्धा काय कामाची ? आपले दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलाम ,राष्ट्रपिता म.गांधी अणि इतर अनेक थोर महान व्यक्तिमत्व असलेल्यानी अथक प्रयत्नावर भर दिला आहे.रिलायंस कंपनीचे निर्माते धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर नोकरीला होते.गरीबीत जीवन कंठणारी व्यक्ती आपल्या योग्य प्रयातनांच्या जोरावर देशातील महान उदयोगपती ठरली.

"असाध्य ते साध्य सायास करीता" असे तुकाराम महाराज म्हणतात तर, संत रामदास म्हणतात,

" जो दुसऱ्यावरी विसंबला,त्याचा कार्यभाग बुडाला 

जो आपणची कष्टत गेला,तोचि भला...!!" सर्वच संतांचा असा उपदेश आहे.

"केल्याने होत आहे रे,आधी केलेचि पाहिजे"

दैवावर विसंबुन रहा ,असा उपदेश कोणीच केला नाही.

म्हणून सतत उत्तम कार्य करीत रहा, प्रयत्ना शिवाय कोणतीही गोष्ट प्राप्त होत नाही. योग्य मार्गाने जाणाऱ्या ला नक्की यश मिळते हा विश्वास बाळगा.प्रसिद्ध प्रशासक किरण बेदी म्हणतात की, "माझ्या आयुष्याचे एक ब्रीद आहे,ते म्हणजे जगात अशक्य असे काहीच नाही, कोणतेही ध्येय अप्राप्य नसते, फ़क्त अतोनात असे अथक परिश्रम करावे लागतात"

संत रामदास म्हणतात, "म्हणोंन आळस सोडावा,यत्न साक्षेपे जोडावा"

आळस एक नंबर चा शत्रू आहे. चिकाटी ,उत्साह यांनी सतत काष्टाचा मार्ग अवलंब करा.यश मिळविण्या साठी कोणताही शार्ट कट नाही देवाला नवस करुन अणि तीर्थ क्षेत्री जाऊन किंवा प्रदक्षिणा करुन यशमिळेल याची खात्री नाही.

यशाचा मूलमंत्र म्हणजे फ़क्त कठोर परिश्रम....!!

ससा अणि कासव यांच्या गोष्टीतील कासवाची चिकाटी ,अविचल राहण्याची प्रवृत्ती धारण केल्यास नक्की यश मिळेल. अभ्यास न करता नवरात्र उत्सव काळात अनवानी चालून,उपवास करुन परीक्षेत यश कसे मिळणार.

सार्वजनिक उत्सव सर्वच वाईट आहेत असे नव्हे,पण वेळेचा अपव्यय

अणि इतर लोकांना त्रास होतो ,पैशाचा गैरवापर ही ध्यानात घेतले पाहिजे.


धार्मिक कार्य घराच्या आत करुन  सात्विक समाधान मिळू शकते याचे सार्वजनिक प्रदर्शन कशाला? देव भक्ती आजकल प्रदर्शनीय झालेली दिसून येते,खरा भक्तिभावहरवून गेलेला दिसतो. केवळ इच्छा नि संकल्प करुण उद्दिष्ट पूर्ण होत नाही, त्याला प्रयातनांची जोड़ द्यावी लागते.

आजच्या पिढी समोर आपण कोणते आदर्श ठेवत आहोत ,यांचा विचार केला पाहिजे. आजच्या तरुणाईला आपण खूप दोष देतो पण त्यांच्या समोर आपण कोणत्या चांगल्या बाबी मांडत आहोत का?

हे विचार वाचून कदाचित असे वाटेल, की मी नास्तिक आहे की काय? पण तसे नव्हे ...!! घराच्याउंबरयाच्या आत धार्मिक बाबी असाव्या ,अणि श्रद्धा डोळस असावी इतकेच माझे मत आहे.


सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर/अहिल्यानगर, महाराष्ट्र 
Copyright


ब्लॉग पोस्ट/निबंध आवडल्यास नक्की शेअर करा.


मंगळवार, २७ जानेवारी, २०२६

शिस्त म्हणजे प्रगतीचा श्वास ! मराठी निबंध

 शिस्त म्हणजे प्रगतीचा श्वास ! मराठी निबंध 


शिस्त (कुटुंबात, समाजात, देशात) Marathi Essay 

मराठी निबंध शिस्त कुटुंब, समाज आणि देशात


प्रस्तावना

शिस्त म्हणजे नियम, मूल्ये , कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पाळून वागण्याची सवय. शिस्त ही केवळ बाह्य बंधन नसून ती अंतःकरणातून स्वीकारलेली जीवनपद्धती आहे. स्वातंत्र्य जितके आवश्यक आहे, तितकीच शिस्त देखील आवश्यक आहे.व्यक्तीपासून कुटुंब, समाज आणि अखेर संपूर्ण देशाच्या प्रगतीचा पाया शिस्तीवरच उभा असतो.

१) कुटुंबात शिस्त

कुटुंब हे शिस्तीचे पहिले विद्यालय आहे. लहानपणी मिळालेल्या सवयी पुढील आयुष्य घडवतात. पालकांनी कुटुंबात शिस्तीचा संस्कार प्रथम केला पाहिजे.इथे आईची भूमिका अधिक महत्त्वाची आहे हे नाकारता येणार नाही.घराचे इंजिन म्हणून , दिशादर्शक म्हणून तिचे महत्व आहे. स्त्री पुरुष समानता या मूल्याची पायाभरणी तर कुटुंबातच झाली पाहिजे.

वेळेचे नियोजन : उठणे, अभ्यास, काम, विश्रांती यांचे वेळापत्रक.

संस्कार व मूल्ये : आदर, प्रामाणिकपणा, सचोटी , भूतदया,सहकार्य, संयम.

जबाबदारीची जाणीव : घरातील लहानमोठी कामे वाटून घेणे. मुलगा किंवा मुलगी असा भेद न करता मूल्यशिक्षण देणे आवश्यक आहे. जबाबदार नागरिक जबाबदार कुटुंबातच घडू शकतो.

शिस्तबद्ध कुटुंबात परस्पर प्रेम,विश्वास वाढतो, मतभेद कमी होतात आणि मुलांचे व्यक्तिमत्त्व सशक्त घडते. कुटुंबातील मतभेद मुलांना कमजोर बनवतात.

२) समाजात शिस्त

समाजातील शिस्त म्हणजे सार्वजनिक नियमांचे पालन आणि एकमेकांबद्दलची कर्तव्यभावना.

आपण समाजाचे काही देणे लागतो ही जाणीव असणे. सामाजिक ऋण फेडण्याचे भान असणं.

कायदे व नियम पाळणे : वाहतूक नियम, स्वच्छता, सार्वजनिक शिस्त. कायद्याचा आदर करणे.

सामाजिक सलोखा : जात-धर्म-पंथ न पाहता माणुसकी जपणे. मानवता धर्म मानून सामाजिक वर्तन करणे.

सहकार्य व सेवा : गरजूंस मदत, स्वयंसेवी उपक्रमांत सहभाग. इतरांच्या प्रति प्रेमाने आणि सहानुभूती पूर्वक वर्तन.

शिस्तबद्ध समाजात सुरक्षितता, सुव्यवस्था आणि विकासाची गती वाढते. व्यक्तिविकास झाला की देशाचा विकास होतो.

३) देशात शिस्त

देशपातळीवरील शिस्त ही राष्ट्रनिर्मितीसाठी अत्यावश्यक आहे. देशप्रेम, देशभक्ती या शब्दांचा खरा अर्थ मनाला भिडला पाहिजे.

संविधान व कायद्यांचा सन्मान : अधिकारांसोबत कर्तव्येही निभावणे. हक्क व कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे समजून वर्तन आवश्यक आहे.

राष्ट्रीय मालमत्तेचे संरक्षण : सार्वजनिक साधनसंपत्तीची काळजी.

कामातील प्रामाणिकपणा : प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडणे. प्रामाणिकपणा हा जीवनाच्या सर्वच पातळीवर अविभाज्य भाग असला पाहिजे.

शिस्तबद्ध देश आंतरराष्ट्रीय पातळीवर विश्वासार्ह ठरतो आणि प्रगतीकडे वेगाने वाटचाल करतो.


शिस्त नसल्याचे दुष्परिणाम

अव्यवस्था आणि अराजकता

सामाजिक तणाव व गुन्हेगारी, व्यसन 

विकासाला अडथळे, भ्रष्टाचार 

निष्कर्ष

शिस्त ही बंधन नसून स्वातंत्र्याचा योग्य वापर शिकवणारी शक्ती आहे. कुटुंबात रुजलेली शिस्त समाजात विस्तारते आणि समाजातील शिस्त देशाला बळकट करते. म्हणूनच प्रत्येक नागरिकाने स्वतःपासून शिस्तीची सुरुवात करणे, हीच खऱ्या अर्थाने राष्ट्रसेवा, देशसेवा आहे. प्रत्येक व्यक्ती सीमेवर जाऊन सैनिक बनू शकत नाही. पण आपण जे काम करत आहोत ते प्रामाणिकपणे, देशसेवा म्हणून केले पाहिजे.


बोधवाक्य : शिस्त म्हणजे प्रगतीचा श्वास.


घर असो वा दार 
शिस्त हवी फार

Sangita Bhalsing 
Ahilyanagar Maharashtra 

गुरुवार, १५ जानेवारी, २०२६

पर्यावरण संवर्धन : काळाची अत्यंत गरज ! मराठी निबंध

 पर्यावरण संवर्धन : काळाची अत्यंत गरज

🟢 १२ वी बोर्ड परीक्षा निबंध

विषय : पर्यावरण संवर्धन काळाची गरज

पर्यावरण संवर्धन दर्शवणारे वृक्षारोपण व स्वच्छ निसर्गाचे चित्र


प्रस्तावना

आजचा मानव विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अत्यंत सुखसोयींचे , आरामाचे जीवन जगत आहे. मात्र या प्रगतीसोबतच निसर्गाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. वृक्षतोड, प्रदूषण, जागतिक तापमानवाढ, पाण्याची टंचाई, नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शहरी भागातीलच नव्हे तर शहरी भागातील ही समस्या प्रचंड वाढलेल्या आहेत.त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन करणे ही केवळ गरज नसून मानवजातीचे कर्तव्य बनले आहे.

पर्यावरण म्हणजे काय?

पर्यावरण म्हणजे आपल्याभोवती असलेली हवा, पाणी, माती, वनस्पती, प्राणी, पर्वत, नद्या आणि समुद्र यांचा समुच्चय होय. मानवाचे अस्तित्व पर्यावरणावर पूर्णपणे अवलंबून आहे. पर्यावरण संतुलित असेल तरच सजीवांचे जीवन सुरक्षित राहते. सजीव आणि निर्जीव सृष्टीचे रक्षण आवश्यक आहे.

पर्यावरण ऱ्हासाची कारणे

औद्योगिकीकरण, शहरीकरण, वाढती लोकसंख्या, अनियंत्रित वृक्षतोड, प्लास्टिकचा अति वापर आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण , जल प्रदूषण ही पर्यावरण ऱ्हासाची प्रमुख कारणे आहेत. नद्या प्रदूषित होत आहेत, जंगलांचे क्षेत्र कमी होत आहे, सिमेंटचे जंगल उभे केले जात आहे आणि अनेक प्राणी-पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व

पर्यावरण संवर्धनामुळे नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण होते. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि सुपीक जमीन मिळते. नैसर्गिक आपत्तींचा धोका कमी होतो. मानवाचे आरोग्य सुधारते आणि भावी पिढ्यांसाठी सुरक्षित पृथ्वी तयार होते.

पर्यावरण संवर्धनासाठी उपाय

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे,

प्लास्टिकचा वापर टाळणे,

पाण्याची बचत करणे,

सौर व पवन ऊर्जेचा वापर वाढवणे,

सार्वजनिक वाहतूक वापरणे,

कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे,

पर्यावरण विषयक जनजागृती करणे.

संविधानातील कर्तव्य: भारतीय संविधानाच्या कलम ५१-अ (जी) नुसार प्रत्येक नागरिकाचे हे कर्तव्य आहे की त्याने नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करावे.

निष्कर्ष

'एक व्यक्ती, एक झाड' या संकल्पनेपासून सुरुवात करून, आपण सर्व मिळून पर्यावरणाचे रक्षण करू शकतो आणि पृथ्वीला पुन्हा हिरवीगार बनवू शकतो. सुजलाम सुफलाम धरणी माता करण्यासाठी समूहाने प्रयत्न केला पाहिजे.

“निसर्ग वाचवा म्हणजे भविष्य वाचवा” हे वाक्य आज अत्यंत सार्थ ठरते. पर्यावरण संवर्धन ही फक्त सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आज आपण निसर्गाची काळजी घेतली तरच उद्याची पिढी सुरक्षित आणि सुखी जीवन जगू शकेल. त्यामुळे पर्यावरण संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.


Sangita Bhalsing 

Ahilyanagar 

Mahrashtra

शनिवार, १० जानेवारी, २०२६

सोशल मीडियाचा किशोरवयीन मुलांवर होणारा परिणाम” निबंध

 मराठी निबंध 

“सोशल मीडियाचा किशोरवयीन मुलांवर होणारा परिणाम”

प्रस्तावना - 

आधुनिक युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे युग आहे. इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या क्रांतीमुळे सोशल मीडिया हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. विशेषतः किशोरवयीन मुलांमध्ये सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसून येतो. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब यांसारख्या माध्यमांमुळे त्यांच्या विचारसरणीवर, वागणुकीवर आणि जीवनशैलीवर सकारात्मक व नकारात्मक असे दोन्ही प्रकारचे परिणाम होत आहेत.

सोशल मीडियाचा किशोरवयीन मुलांवर होणारा परिणाम”


 सोशल मीडियाचे सकारात्मक परिणाम - 

सोशल मीडियामुळे किशोरवयीन मुलांना ज्ञानाचे नवे दालन खुले झाले आहे. विविध शैक्षणिक व्हिडिओ, ऑनलाइन अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यामुळे त्यांच्या अभ्यासाला चालना मिळते.

त्याचप्रमाणे, सोशल मीडिया संवादाचे प्रभावी साधन ठरले आहे. दूर असलेल्या मित्रांशी व नातेवाइकांशी संपर्क ठेवणे सोपे झाले आहे.

स्वतःचे विचार, कला, लेखन, गायन, नृत्य यांसारखी कौशल्ये सादर करण्यासाठी सोशल मीडिया हे उत्तम व्यासपीठ बनले आहे.

 सोशल मीडियाचे नकारात्मक परिणाम - 

अतिवापरामुळे किशोरवयीन मुलांमध्ये मानसिक तणाव, एकटेपणा व नैराश्य वाढताना दिसते. सतत मोबाईल वापरामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते व एकाग्रता कमी होते.

सोशल मीडियावर दिसणाऱ्या कृत्रिम जीवनशैलीची तुलना स्वतःशी केल्याने न्यूनगंड निर्माण होतो.

तसेच, सायबर गुन्हेगारी, चुकीची माहिती, अश्लीलता व व्यसनाधीनता यांचा धोका वाढतो. आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होतो.

विनोदाने असे म्हणावे वाटते की, येणाऱ्या पिढीची मान सतत झुकल्याने वाकडी झालेली असेल.

 योग्य वापराची गरज - 

सोशल मीडिया पूर्णपणे वाईट नाही; मात्र त्याचा योग्य आणि मर्यादित वापर करणे आवश्यक आहे.  सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे.म्हणून पालकांनी व शिक्षकांनी किशोरवयीन मुलांना योग्य मार्गदर्शन करावे.

वेळेचे नियोजन, अभ्यास व मैदानी खेळ यांना प्राधान्य दिल्यास सोशल मीडियाचे दुष्परिणाम टाळता येऊ शकतात.

 निष्कर्ष - 

सोशल मीडिया हे किशोरवयीन मुलांसाठी वरदानही ठरू शकते आणि शापही. त्याचा वापर कसा केला जातो यावर त्याचे परिणाम अवलंबून आहेत. योग्य दिशा, संयम व जागरूकता असल्यास सोशल मीडिया हे व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी साधन ठरू शकते.


Sangita Bhalsing 

Ahilyanagar 

Maharashtra

मी दुष्काळ ग्रस्त शेतकरी बोलतोय! मराठी निबंध

 मराठी निबंध 

मी दुष्काळग्रस्त शेतकरी बोलतोय....!

माझे नाव भाऊसाहेब आणि महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील एका खेड्यात मी राहतो. माझ्या घरात माझे आईवडील,पत्नी आणि शाळेत जाणारी दोन मुले आहेत. परंतु

दुष्काळग्रस्त भागातील शेतात कष्ट करत असलेला भारतीय शेतकरी, शेतीवर अवलंबून असलेले जीवन दर्शवणारे चित्र.


मी एक दुष्काळग्रस्त शेतकरी आहे. माझे संपूर्ण जीवन शेतीवर अवलंबून आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ आमच्या पाचवीला पुजलाय...! पावसाच्या प्रत्येक थेंबावर माझ्या कुटुंबाचे भविष्य ठरते. परंतु गेल्या काही वर्षांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे माझ्या जीवनात अंधार दाटून आला आहे. दुष्काळ हे माझ्यासाठी केवळ नैसर्गिक संकट नसून, ते एक सतत जळणारे दुःख आहे.

जगावे की मरावे? असा प्रश्न मला नेहमीच पडतो.

शेती ही माझी उपजीविकेचे एकमेव साधन आहे. बी-बियाणे, खत, औषधे यासाठी मी कर्ज काढतो. कर्जाचा फास गळ्यात आवळत जातोय.पेरणी करताना मनात आशा असते की यंदा तरी पीक चांगले येईल. पण पाऊस वेळेवर न पडल्यामुळे पीक वाळून जाते. जमिनीत भेगा पडतात, विहिरी आटतात आणि शेत ओस पडते.

बोअर तरी किती घेणार ? या काळया आईच्या पोटात किती छिद्र पाडणार ? परिणामी मेहनत, पैसा आणि स्वप्ने सगळेच मातीत मिसळते.

दुष्काळाचा परिणाम फक्त शेतीपुरता मर्यादित नसतो. कुटुंबाचा उदरनिर्वाह कठीण होतो. मुलांच्या शिक्षणाची चिंता वाढते. जनावरांसाठी चारा मिळत नाही. अनेक वेळा गाव सोडून शहराकडे स्थलांतर करावे लागते. मजुरी करून पोट भरण्याची वेळ येते. शेतकऱ्याच्या आत्मसन्मानाला मोठा धक्का बसतो.

सरकारकडून कर्जमाफी, पीकविमा, दुष्काळी मदत मिळते; पण ती अपुरी आणि उशिरा मिळते. अनेक शेतकरी कागदपत्रांच्या फेऱ्यात अडकतात. काहीजण नैराश्याला बळी पडतात. दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मानसिक आरोग्यही बिघडते, हे समाजाने समजून घेतले पाहिजे.

दुष्काळावर मात करण्यासाठी दीर्घकालीन उपाय गरजेचे आहेत. पाणी साठवणूक, जलसंधारण, ठिबक सिंचन, पावसाच्या पाण्याचे नियोजन यावर भर दिला पाहिजे. पीक पद्धतीत बदल करून कमी पाण्यात येणारी पिके घ्यावी लागतील. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणेही आवश्यक आहे.

शेतकरी जगला तरच देश जगेल. माझ्या कष्टाचे चीज व्हावे, मला भीक नको तर न्याय हवा. योग्य नियोजन, शासनाची संवेदनशीलता आणि समाजाचा पाठिंबा मिळाला तर दुष्काळग्रस्त शेतकरीही नव्या आशेने उभा राहू शकतो. मला अजूनही विश्वास आहे की एक दिवस माझ्या शेतात पुन्हा हिरवळ फुलेल.


Sangita Bhalsing 

Ahilyanagar 

Maharashtra





New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...