शुक्रवार, १२ जुलै, २०१९

भरवसा



भरवसा का टाकते मी
आसवे का गाळते मी

शुष्क झाल्या,गंध गेल्या
त्या फुलांना माळते मी

हा अबोला सोड आता
का हक्काने सांगते मी

त्या नभाच्या तोरणाला
वेदनांना टांगते मी

हा विषाचा स्पर्श प्याला
आज ओठी लावते मी

प्रा.सौ.संगिता भालसिंग

सैराट



सैराट

का अशी सैराट झाली
का नव्याने लाट आली ...

जिंदगी ही झिंगलेली
केवढी झिंगाट झाली ...

त्या फुलांचा बहर सारा
ही सुगंधी वाट झाली ...

जा सुखाने बीनधास्त
मान आता ताठ झाली ...

जा पडू दे पाय पंगू
पाठ आता राठ झाली ...

Sangita Bhalsing

चूक



 चूक 

काय झाली चूक माझी सांग आता ,
दोष माझे आसमंती टांग आता ...

बाण येऊ दे जरासे खोचलेले ,
दाखवाया काळजाचा थांग आता ...

साहलेले वेद होते आणि ऋचा ,
राहिले ते कोणते वेदांग आता ...

हरभऱ्याचे झाड आता मोडलेले ,
दुर्गुणांची लावली का रांग आता ...

काळजाशी खेळ केला वेदनेने ,
जिंकण्याने फेडले का पांग आता ...

प्रा.सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

काळीज



काळीज

काळजाचे पान करते
शब्द माझे प्राण करते ...

मांडण्याला गजल आता
लेखणीला छान करते ...

भावनेचा दर्द भरण्या
या जिवाचे रान करते ...

वाचतांना ईतरांचे
ऐकण्याला कान करते

समज आहे थोडकीशी
शेर थोडे सान करते ...

Sangita Bhalsing

सावल्या



💐 सावल्या 💐

कंठ दाटे का कळेना
बांध घालाया वळेना

जीर्ण झाले पान आता
ते अजूनी का गळेना

भोग सारे भोगलेले
भावना ही का जळेना

गुंतलेले बंध सारे
ते अजूनी का छळेना

सावल्याही पांगलेल्या
पापण्या त्या का ढळेना...

Sangita Bhalsing

व्यापार - गझल



  व्यापार

मांडला बाजार आहे
तू खरा का यार आहे ...

सांग लोकांना उणीवा
त्रास याचा फार आहे...

केवढे आघात सारे
काळजावर वार आहे ...

हा तमाशा लावणीचा
आज आत्मा ठार आहे ...

उमगली सारी टवाळी
प्रेम ही व्यापार आहे ...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर


मेघराजा

गजल

 मेघराजा 

मेघराजा धाव रे
या बळीला पाव रे...

मांडशी का खेळ हा
मोड आता डाव रे ...

थेंबमोती बरसण्या
दे सरीला वाव तू...

या पिकाच्या झालरी
दे विकाया भाव तू...

झोपडीला बनव तू
बहरलेले गाव तू...

पैलतीरा लाव तू
जीवनाची नाव तू...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...