मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१९

गझल - गुलाबी

गझल 


वृत्त आनंदकंद
लगावली..गागाल गालगागा गागाल गालगागा
*****
Marathi मराठी साहित्य प्रकार मराठी गजल गुलाबी


गुलाबी 

केसात घातलेली होती फुले गुलाबी
कानात घातलेली होती डुले गुलाबी

पदरास लावलेले रेशीम पैठणीला
गोंडयास लावलेले मोती झुले गुलाबी

वाळूत उमटलेल्या होत्या खुणा शराबी
वेगात चाललेली ती पाउले गुलाबी

जाळ्यात अडकलेला भुंगा नसे विषारी
आरास पाकळ्याची गाली खुले गुलाबी

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

अंतरंग - चारोळी

अंतरंग 


जसजसे मी पण सरते
तसतसे हृदयी प्रेम भरते ..
जरी उन सावली खेळ करते
तरी अंतरंग निष्काम उरते...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९

ओंजळ - चारोळी

ओंजळ - चारोळी 

ओंजळ - चारोळी


मोजली नाही कधी
प्रेमाची गती नि मिती...

जरी उधळून केलय प्रेम
तरी माझी ओंजळ रिती...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

पान - चारोळी

पान - चारोळी 


कोवळ्या उन्हाचा स्पर्श
वाटे किती छान छान...
मंद वाऱ्यात झोके घेत
नाचे कोवळे हिरवे पान...


सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

सत्य - चारोळी

सत्य - चारोळी 


सत्याची चाड वाटे...

असत्याची चीड वाटे..

अहंकार किड वाटे

अभिमान भीड वाटे...
चारोळी मराठी साहित्य




सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर


गडबड - गझल

गडबड - गझल 


पादाकुलक मात्रा वृत्त
8,8

गागागागा गागागागा

 सत्य बोलता गडबड झाली
रीत जगाची अवघड झाली...

उंच मनोरे बांधू कोठे
पायाचीही पडझड झाली...

भेटी गाठी  वादा वादी
काळजातली धडधड झाली...

नको विसंबू वचनावरती
विश्वासाची रडरड झाली...

वाट वाकडी वळणावरची
पंखाचीही फडफड झाली...

दोष लपाया,होश टिकाया
किती निरर्थक बडबड झाली...

संगिता भालसिंग
अहमदनगर
शनिवार 21 सप्टेंबर 2019

वंदन - कविता

वंदन - कविता 


मन भरले भरले
दुःख सरले सरले
आसू विरले विरले
सुख उरले उरले...

हाती हात सजनाचा
वाट प्रेमाची गुलाबी
क्षण क्षण अमृताचे
जीव झालाय शराबी...

गुंफिले काळजात
विश्वासाचे चंदन...
मिळो जन्मभर साथ
करू देवाला वंदन....

संगिता भालसिंग
अहमदनगर
शनिवार 21.09.2019


💖 कवितेचा भावार्थ
ही कविता प्रेम, विश्वास आणि आयुष्याच्या समाधानाची सुंदर अभिव्यक्ती आहे.
दुःख, अश्रू आणि वेदना मागे पडून मन सुखाने भरून येते.
प्रिय व्यक्तीचा हात हातात घेतला की जीवनाची वाट गुलाबी होते.
प्रत्येक क्षण अमृतासारखा वाटतो आणि जीवन नशेत बुडाल्यासारखे भासते.
विश्वासाचे चंदन काळजात गुंफून
जन्मभर साथ मिळावी,
अशी देवाकडे केलेली ही प्रार्थना म्हणजेच
प्रेमाचे आणि नात्यांचे पवित्र वंदन.

✨ कवितेचा संदेश
प्रेम हे दुःखावर मात करते
विश्वास नात्यांना बळ देतो
साथ लाभली तर जीवन सुंदर होते
कृतज्ञतेने देवाला वंदन करावे

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...