शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१८

सप्तपदी

चारोळी

सप्तपदी

सप्तपदी चालू
हात हाती घेऊन..
संसार रथ ओढू
वचने याद ठेऊन ...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

बुधवार, २६ डिसेंबर, २०१८

भारत माझा देश आहे

कविता
भारत माझा देश आहे

भारत माझा देश आहे
तिरंगी झेंड्याचा
अशोक चक्राचा
स्वातंत्र्य,समता
आणि बंधुतेचा
मानवी मूल्याचा वेष आहे
भारत माझा देश आहे!!०१!!

गंगा यमुना
सरस्वतीचा
विंध्य सह्याद्री
हिमालयाचा
पहाडी छातीचा कोष आहे
भारत माझा देश आहे !!०२!!

हिंदू मुस्लिम
शीख ईसाई
विविधतेत एकता
राष्ट्रीय एकात्मता
एक मुठीचा जोश आहे
भारत माझा देश आहे!!०३!!

संस्कृतीचा पाईक
संस्काराची खाण
सीमेवर लढती
भारतीय जवान
रक्त सांडून परिपोष आहे
भारत माझा देश आहे!!०४!!

तरुण लोकसंख्येचा
ज्ञानसंग्रही ज्येष्ठांचा
सत्य अहिंसेचा अन
सुजलाम सुफलाम सृष्टीचा
विज्ञान भरारीने जगही बेहोष आहे
भारत माझा देश आहे!!०५!!

आहेत किती अन
होतील किती
हिंदुस्तान देशा
ना अंत ना मिती
प्रतिकारातही होश आहे
भारत माझा देश आहे!!०६!!

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

विठ्ठल

( जुगलबंदी -   नितीन मोकल  सोबत जुगलबंदी )
माझ्या रचना-

सावळा विठ्ठल

विठुच्या नामाचा
सूर ग लागला...
थकल्या देहाला
विसावा मिळाला ...

सोन्याचा कळस
दुरुन दिसला ....
सखा पांडुरंग
गालात हसला ...

विठुच्या मंदिरा
सोन्याचा कळस ...
वारीला जायला
नाही मला आळस ...

कळस पाहयाला
लाख लोक जाती ...
कपाळी लावती
पंढरीची माती...

पंढरीची माती
कपाळी गिलावा...
वारकऱ्याच्या मनी
प्रेमाचा ओलावा ...

डोईला तुळस
चालते पायी पायी
उन्हाचा चटका
मला जाणवत नाई....

पंढरीची माती
मऊ मऊ किती...
वैष्णवांचा मेळा
पायाने तुडविती ...

पंढरपुरात आला
वारकरयांचा ग लोंढा....
सावळया विठुला शोभे
मोतियाचा गोंडा ....

माऊलीच्या घोड्याला
रंगीबेरंगी झुल ...
विठुच्या नामात हाले
माझ्या कानातलं डुल ...

माऊलीच्या घोड्याला
रंगीबेरंगी मऊ झुल ...
विठुच्या नामाची
मला पडली ग भुल ...

जनाईच्या संग
विठु फुगडी खेळतो ...
पहाटेच्या पारी संग
दळण बी दळीतो ...

ओवी विठ्ठलाची
दळताना गाते...
जाते ओढ़ताना
काम हलके करते ...

विठुच्या हाताचा होई
जात्याला ग स्पर्श ...
सुपातल्या डाळीला
होई वेगळाच हर्ष ...

डाळ पाखडली
फ़ोलं उडाली उडाली....
विठ्ठलाची ओवी
काळजात ग भिडली ...

विठुच्या मंदिरी
सोन्याची पालखी
वारीला जायाला
जीवाची तलखी ...

विठुला भेटाया
पंढरीला जाऊ ..
सावळी मुरत
काळजात ठेऊ ...!!

शितल गारवा ..
टिळा चंदनाचा
उपाय विठुला
भक्ताच्या त्रासाचा...

वारीला चालले
आयाबाया संग..
हातामधी टाळ
भजनात दंग...

तुळशीची माळ
गळ्यात घातली ..
काडीवानी काया
विठु नामाने चेतली ...

सावळया विठुची
रुक्मिणी सावळी ..
अंगामधी ल्याली
जरीकाठी चोळी ...

सावळी रुक्मिन
हाती पंचारती ताट ...
आली विठ्ठलाची स्वारी
सोडा सोडा जरा वाट ...

सौ.संगिता भालसिंगप्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर
www.tufaan.in

शनिवार, १५ डिसेंबर, २०१८

गुळणा गुळणी

गुळणा गुळणी...
जुने ते सोने....
किती सुंदर चित्र....
किती सुंदर प्रसंग ...
नववधू आणि वर यांची अजिबात ओळख नाही,फक्त एकदाच एकमेकांना पाहिलेले ..
प्रेमा बिमाची भानगड अजिबात नाही...
लग्न जमल्यावर भेट अशक्य...
फोन कॉल, मेसेज चा प्रश्नच नाही
कारण फोन अस्तित्वातच नव्हते...
एकमेकांची ओळख व्हावी तरी कशी?
संकोच पडदा गाळावा तरी कसा?
विवाहानंतर परस्परांना जाणून घेण्यासाठी
केलेली सुंदर, प्रेमळ,खोडकर खेळाची योजना...
विवाहानंतर ची पहिली आंघोळ...
एकमेकांच्या अंगावर चूळ भरून पाणी उडवणे...
कंकण सोडविणे,पाण्यात अंगठी शोधणे...
खोड्या करणे....
खरेच गेले ते दिवस
राहिल्या त्या आठवणी...
आजच्या पिढीला या गोष्टी खूप हास्यास्पद वाटतील,वेडेपणा वाटेल,
पण ज्यांनी या प्रसंगाचा अनुभव घेतलेला आहे,त्यांच्या संसाराची फिफ्टी नक्कीच झालेली आहे...
  • Sangita Bhalsing

गजल

मंदाकिनी
गागालगा गागालगा गागालगा गागालगा

वाणी अशी बहरून
यावी,रेशमी ओठातली
माया अशी उमलून यावी, काळजाच्या आतली

डोळे किती आतूर झाले भाकरीच्या चांदवा
तृष्णा अशी समजून घ्यावी मोकळ्या पोटातली

माझे तुझे वादात कोरा भावनांचा कालवा
नाती अशी तोडू नका हो पांगताना सावली

भक्ती अशी दावू नको तू कोरड्या टाळातली
सोडू नको वेडया अशी तू साधना नामातली

जाऊ नको आईस बोले पकड ही बोटातली
साडी अशी ओढू नको तू कोवळ्या हातातली

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
स्पर्धेत समाविष्ट रचना
शनिवार दि.14.12.18

दिलदार मित्र

क्रांतीची फुले स्पर्धा 02

उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त रचना

दिलदार मित्र

माझा दिलदार मित्र
आनंदाचा झरा आहे
असत्याचा राग भारी
स्वभावाने खरा आहे ...

गरिबाला मदतीचा
नेहमीच देतो हात
समाजाच्या भल्यासाठी
झटतोय दिन रात....

भुकेल्याला अन्न देई
भूतदया वसा घेई
दिव्यांगाची सेवा करी
कौटुंबिक कर्म करी ...

भाग्यवान आहो आम्ही
सच्चा मित्र जीवनात
सद्गुणांचा हा पुतळा
घर केले काळजात ...

सौ.संगिता भालसिंग@
अहमदनगर
( अष्टाक्षरी काव्य रचना)

सायकल

मुंबई मध्ये ' सायकल ऑन रेंट ' संकल्पना तुफान लोकप्रिय झाल्याची बातमी वाचली,आणि बालपणाच्या आठवणी जाग्या झाल्या.
     पूर्वी चारचाकी,दुचाकी फार कमी होत्या, मात्र सायकल प्रत्येक घरोघरी असत.सायकल चालवायला शिकणे मुला मुलींचा खेळ असे,पण वडिलांना चोरून त्यांची सायकल शिकायला नेली जात असे.कारण वडील सायकल ची इतकी काळजी घेत असत,जपत असत,मुले सायकल पाडतील, तोडतील आणि मुलांना ही इजा होईल म्हणून सायकल देत नसत.
    मग मुले भाड्याची सायकल आणत असत,तासा नुसार सायकल दुकानात मिळत असे,परिचित,ओळखीच्या लोकांनाच सायकल दिली जाई. मग काय एक दोन रुपयात चांगली 2 तास सायकल चालवली जायची.
घराजवळील मोकळ्या जागेत मुलांचा गोंधळ सुरू होई,प्रथम एक पाय मध्ये टाकून पायडल मारायचे,हळूहळू दुसरा पाय टाकायला शिकायचे,नंतर नळी वर बसून आणि शेवटी सीट वर बसून सायकल चालवायला शिकायचे...
  एवढ्या सर्व कार्यात मित्रांची साथ असायची ती सायकल धरायला.
यात किती वेळा मुले पडायची,गुडघे फुटायचे,खरचटायचे, पण डॉ कडे जाणे माहीत नव्हते ,उलट पालकांच्या पासून या जखमा दडवून ठेवल्या जात..सायकल शिकताना
खूप गमती जमती घडत असत.ज्याने सायकल धरली आहे,तोअचानक मधेच सोडून देत असे,घाबरवत असे,पण तरी ही मुले धमाल करीत....
आजच्या पिढीला मात्र हा आनंद नाही,कारण लहानपणी च त्यांना दोन्ही बाजूला स्टँड असणारी सायकल दिली जाते,लवकरच गाडी ही दिली जाते त्यामुळे बॅलन्स करण्याची कला ही मुले खूप लवकर शिकतात.
   आता पुन्हा सायकल वापराचा नवीन फंडा निघाला आहे...व्यायाम आणि इंधन बचत या दोन्ही गोष्टी होतील.
सौ.संगिता भालसिंग@
अहमदनगर
शनिवार दि.१५.१२.१८

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...