🌹 पवित्र बंधन 🌹
मानवी जीवनातील पूर्ण बहराचा काळ म्हणजे " गृहस्थाश्रम "
सर्व समाजाचा आधार म्हणजे
गृहस्थाश्रम होय.तो उत्तम भविष्यकाळ निर्माण करतो ,समाजाचे उत्तम नागरिक घडवितो.
उत्तम संतती जन्मास घालून आपली
वंश परंपरा टिकविन्याचा काळ...!!
गृहस्थाश्रम म्हणजे समाजाची धारणा.
त्याची थोरवी सर्वानी सांगितली आहे.
" धन्यो गृहस्थाश्रम "
' हा गृहस्थाश्रम धन्य आहे'
परंतु अशी धन्यता सहज लाभत नाही.
ती प्रयत्न साध्य आहे,खूप कष्ट साध्य आहे.
गृहस्थाश्रमात पति पत्नीची शरीर अणि मन दोन्ही निरोगी हवित.
एकमेकांशी खूप विश्वास अणि निष्ठे ने
,प्रेमाने वागले पाहिजे.
ज्या विवाह विधिने पती पत्नी चे नाते
निर्माण केले,सप्तपदी ने अतूट बंधन
निर्माण केले,त्यातील काही मंत्र
किती सुंदर आहेत....!!
वाड.निश्चयाच्या वेळी मंत्र उच्चार ....
समानी व आकूति: समाना हृदयानि व:
समानमस्तु वो मनः यथा वः सुसहासति ....!!
याचा अर्थ असा की,
'तुमचा हेतू एक असो,तुमची मने एक असोत. तुमची हृदये एकरूप असोत.
तुमच्या सर्व संघटनास सामर्थ्य येईल
अशा रीतीने वागा.'
तसेच विवाहाच्या वेळी वर म्हणतो,
"ध्योरहं पृथ्वी त्वं सामाहमृक्त्वम
संप्रियौ रोचिष्णु सुमंत्स्यमानौ
जीवेव शरदः शतम..."
याचा अर्थ असा की,
" मी आकाश आहे,तू पृथ्वी आहेस,
मी सामवेद आहे,तू ऋग्वेद आहेस,
आपण एकमेकांवर प्रेम करू.
एकमेकांस शोभवू, एकमेकांस आवडते होऊ,एकमेकांशी निष्ठेने वागून शतायुषी होऊ ..."
त्यानंतर सप्तपदी होऊन नव्या लक्ष्मी सह गृहप्रवेश
करताना वर म्हणतो,
" हे वधू, तू सासू सासऱ्यावर, नणंद
दिरावर प्रेमाची सत्ता चालवणारी हो."
सर्व देव आमची हृदये मोकळी करोत,
आमची मने निर्मल करोत ....!!
माता,विश्व,विधाता, सरस्वती आमची
जीवने परस्परांशी जोड़ोत..."
गृह प्रवेश करताना मंत्र म्हणतात.
"हे वधू, तू या कुळात येत आहेस,
येथे संतती युक्त होऊन तुला आनंद मिळो. या घरात खऱ्या गृहिणीची
सर्व कर्तव्ये प्रेमाने पार पाड. कुटुंबात
आनंदाने रहा.तुम्ही या घरात खूप काळ राहून सुखी झालात ,असे लोक
म्हणू देत..."
विवाह सूक्तात वधूला अघोरचक्षु व शिवा,सुमना व तेजस्वी,वीरप्रसू व श्रद्धाळू अशी विशेषणे लावली आहेत.
अघोरचक्षु हे विशेषण दोघांनी घ्यानात घेणे आवश्यक आहे.
एकमेकांची दृष्टी प्रेमळ असू दे भयावह किंवा क्रूर नसू दे....!!
वधू वराने एकमेकांस वर माला घालणे म्हणजे ह्रदय सुमने परस्परास
अर्पण करणे. लग्न म्हणजे केवळ बाह्य लग्न नव्हे,तर मनाचे लग्न होय.
अग्नी भोवती सात पावले चालणे
म्हणजे जन्मोजन्मी बरोबर चालणे,
मग ते सुख असो की दुःखः....!!
त्यांच्या भोवती जे सूत गुंडाळले जाते,
पती अणि पत्नी चा जीवन पट आता
एकत्र विणला जाईल.
आता सर्व काही एक...स्वतंत्र काही च नाही...!!
दिव्याच्या काचेला आतील ज्योती मुळे महत्व आहे.तसे पत्नी ने दिव्याची ज्योत बनले पाहिजे.
पती पत्नी ने संसारात प्रेमाची कमले
फुलवावी.संसारातच मोक्ष शोधावा.
एकमेकांचा आदर राखून स्पर्धा टाळावी, संसार रथाची दोन्ही चाके समान असतात,हे ध्यानात ठेवा.
एक चाक जरी डगमगले तरी
रथाचा खड़खडाट होईल.संसार रथाला सतत प्रेमाचे वंगण असावे....!!
गृहथाश्रमात त्यागाचे धड़े आहेत.
दुसऱ्याचे सुख पाहणे, दुसऱ्या च्या
सुखात सुख मानणे, मी पणा सोडणे,
अहंकार त्यागणे हे गृहस्थाश्रमाचे
खरे शिक्षण आहे .
संयम,त्याग,प्रेम,सहकार्य,संस्कार अशा विविध गुणांचे शिक्षण इथेच मिळते. संसार फुलत जातो तशी
परिपूर्णता अणि पक्वता येते.जीवनाचा नाना विध अनुभव येतो.अनुभवाचा खजिना समृद्ध होत
जातो.जीवनात मधुरता येते.
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
15/12/16
sangita _bhalsing@rediffmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.