गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१८

प्रिया आज माझी

वृत्त-  भुजंगप्रयात
लगागा लगागा लगागा लगागा
गजल

    प्रिया आज माझी

प्रिया आज माझी , रुसे का कळेना
असे वाद खोटे , अबोला टळेना...

तिच्या भावनेला , किती मान देऊ
तरी काळजाची , अढी का सुटेना...

सुनी रात जाते , कुशी हात नाही
नकोसा दुरावा , असा साहवेना...

जरी पावलाची , असे आस छोटी
हवासा तरीही , झुला ही झुलेना...

दिले दान घ्यावे , वसा घेतलेला
सुखाच्या जपाने , कळी का खुलेना...

मिठीचा उबारा , तुला आवडेना
प्रितीचा फुलोरा , मला आढळेना...

दिले हात हाती , जरा साथ नाही
उरी भावनेचा , पुरावा मिळेना...

मनासारखे तू , तसे वाग आता
जसे पावलाला , खडा ही सलेना...

उभा आज दारी , उदासी बिचारा
नको दार लावू , जरी मी हलेना...

तुझ्या आठवांची ,  गुलाबी क्षणांची
कुपी अत्तराची , मला का फुटेना...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲