वृक्षारोपण - काळाची गरज ! मराठी निबंध
✍️ निबंध (१२ वी बोर्ड परीक्षा साठी)
प्रस्तावना :
‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे’ असे संत तुकाराम महाराज म्हणतात. झाडे म्हणजे आपल्या जीवनाचा आधारस्तंभ आहेत. मानवाचे अस्तित्व झाडांशिवाय अशक्य आहे. त्यामुळे वृक्षारोपणाचे महत्त्व आज अधिक वाढले आहे. अविरतपणे ऑक्सिजन देण्याचे काम ते निस्वार्थीपणे करत असतात. त्यांच्यावर कुऱ्हाड चालवून मानवाने आपलेच नुकसान करून घेणे योग्य आहे का?
मुख्य भाग :
आज वाढत्या लोकसंख्येमुळे जंगलांची नासधूस मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. पाऊस कमी पडतो, तापमान वाढते आणि हवामानातील अनियमितता वाढत चालली आहे. या समस्येवर एकमेव उपाय म्हणजे — वृक्षारोपण.
झाडे आपल्याला प्राणवायू देतात, कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात, पावसाचे प्रमाण टिकवतात, तसेच पक्षी, प्राणी यांना निवासस्थान देतात. प्रत्येकाने आपल्या परिसरात किमान एक झाड लावावे व त्याचे संगोपन करावे.
सरकार, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था सर्वांनी मिळून वृक्षारोपण मोहिमा राबवाव्यात.
परंतु महत्त्वाची बाब अशी आहे की, वृक्षारोपण करणे यापेक्षाही महत्त्वाचे आहे त्याला जगवणे....!
उपसंहार :
झाडे म्हणजे आपल्या पृथ्वीचे अलंकार आहेत. झाडे लावणे हे फक्त कर्तव्य नाही, तर ते भविष्यातील पिढ्यांप्रती आपले देणे आहे.
“एक झाड – लाखो श्वास” ही भावना मनात ठेवून सर्वांनी वृक्षारोपण करावे.
अनेक लोक, संस्था वगैरे असे प्रयत्न नक्कीच करत आहेत ,पण ते अपुरे आहेत.
वृक्ष संवर्धन का गरजेचे आहे?
विकास हा निश्चितच व्हायला हवा पण त्याचबरोबर वृक्षांचे व परमेश्वराने निसर्ग रुपी अनमोल ठेव्याचेही रक्षण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. सिमेंटचे जंगल बनवताना सहजीवनाची साखळी तोडण्याचे काम आज सर्वत्र सुरू आहे. एक वृक्ष हा मानवच नव्हे तर सूक्ष्म जीव, जंतू पशु, पक्षी या सर्वांना निस्वार्थ लाभ प्रदान करत असतो.
म्हणूनच "झाडे लावा, झाडे जगवा"
Sangita Bhalsing
Ahilyanagar
Maharashtra
