निबंध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
निबंध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १३ जानेवारी, २०२६

वृक्षारोपण - काळाची गरज ! मराठी निबंध

 वृक्षारोपण - काळाची गरज ! मराठी निबंध 

✍️ निबंध (१२ वी बोर्ड परीक्षा साठी)

प्रस्तावना :

‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे’ असे संत तुकाराम महाराज म्हणतात. झाडे म्हणजे आपल्या जीवनाचा आधारस्तंभ आहेत. मानवाचे अस्तित्व झाडांशिवाय अशक्य आहे. त्यामुळे वृक्षारोपणाचे महत्त्व आज अधिक वाढले आहे. अविरतपणे ऑक्सिजन देण्याचे काम ते निस्वार्थीपणे करत असतात. त्यांच्यावर कुऱ्हाड चालवून मानवाने आपलेच नुकसान करून घेणे योग्य आहे का?

विद्यार्थी व शिक्षक वृक्षारोपण करताना – पर्यावरण संरक्षणाचा संदेश


मुख्य भाग :

आज वाढत्या लोकसंख्येमुळे जंगलांची नासधूस मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. पाऊस कमी पडतो, तापमान वाढते आणि हवामानातील अनियमितता वाढत चालली आहे. या समस्येवर एकमेव उपाय म्हणजे — वृक्षारोपण. 

झाडे आपल्याला प्राणवायू देतात, कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात, पावसाचे प्रमाण टिकवतात, तसेच पक्षी, प्राणी यांना निवासस्थान देतात. प्रत्येकाने आपल्या परिसरात किमान एक झाड लावावे व त्याचे संगोपन करावे.

सरकार, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था सर्वांनी मिळून वृक्षारोपण मोहिमा राबवाव्यात.

परंतु महत्त्वाची बाब अशी आहे की, वृक्षारोपण करणे यापेक्षाही महत्त्वाचे आहे त्याला जगवणे....!

उपसंहार :

झाडे म्हणजे आपल्या पृथ्वीचे अलंकार आहेत. झाडे लावणे हे फक्त कर्तव्य नाही, तर ते भविष्यातील पिढ्यांप्रती आपले देणे आहे.

“एक झाड – लाखो श्वास” ही भावना मनात ठेवून सर्वांनी वृक्षारोपण करावे.

अनेक लोक, संस्था वगैरे असे प्रयत्न नक्कीच करत आहेत ,पण ते अपुरे आहेत.

वृक्ष संवर्धन का गरजेचे आहे?

विकास हा निश्चितच व्हायला हवा पण त्याचबरोबर वृक्षांचे व परमेश्वराने निसर्ग रुपी  अनमोल ठेव्याचेही रक्षण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. सिमेंटचे जंगल बनवताना सहजीवनाची साखळी तोडण्याचे काम आज सर्वत्र सुरू आहे. एक वृक्ष हा मानवच नव्हे तर सूक्ष्म जीव, जंतू पशु, पक्षी या सर्वांना निस्वार्थ लाभ प्रदान करत असतो.

म्हणूनच "झाडे लावा, झाडे जगवा"

Sangita Bhalsing 

Ahilyanagar 

Maharashtra

शनिवार, १० जानेवारी, २०२६

सोशल मीडियाचा किशोरवयीन मुलांवर होणारा परिणाम” निबंध

 मराठी निबंध 

“सोशल मीडियाचा किशोरवयीन मुलांवर होणारा परिणाम”

प्रस्तावना - 

आधुनिक युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे युग आहे. इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या क्रांतीमुळे सोशल मीडिया हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. विशेषतः किशोरवयीन मुलांमध्ये सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसून येतो. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब यांसारख्या माध्यमांमुळे त्यांच्या विचारसरणीवर, वागणुकीवर आणि जीवनशैलीवर सकारात्मक व नकारात्मक असे दोन्ही प्रकारचे परिणाम होत आहेत.

सोशल मीडियाचा किशोरवयीन मुलांवर होणारा परिणाम”


 सोशल मीडियाचे सकारात्मक परिणाम - 

सोशल मीडियामुळे किशोरवयीन मुलांना ज्ञानाचे नवे दालन खुले झाले आहे. विविध शैक्षणिक व्हिडिओ, ऑनलाइन अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यामुळे त्यांच्या अभ्यासाला चालना मिळते.

त्याचप्रमाणे, सोशल मीडिया संवादाचे प्रभावी साधन ठरले आहे. दूर असलेल्या मित्रांशी व नातेवाइकांशी संपर्क ठेवणे सोपे झाले आहे.

स्वतःचे विचार, कला, लेखन, गायन, नृत्य यांसारखी कौशल्ये सादर करण्यासाठी सोशल मीडिया हे उत्तम व्यासपीठ बनले आहे.

 सोशल मीडियाचे नकारात्मक परिणाम - 

अतिवापरामुळे किशोरवयीन मुलांमध्ये मानसिक तणाव, एकटेपणा व नैराश्य वाढताना दिसते. सतत मोबाईल वापरामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते व एकाग्रता कमी होते.

सोशल मीडियावर दिसणाऱ्या कृत्रिम जीवनशैलीची तुलना स्वतःशी केल्याने न्यूनगंड निर्माण होतो.

तसेच, सायबर गुन्हेगारी, चुकीची माहिती, अश्लीलता व व्यसनाधीनता यांचा धोका वाढतो. आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होतो.

विनोदाने असे म्हणावे वाटते की, येणाऱ्या पिढीची मान सतत झुकल्याने वाकडी झालेली असेल.

 योग्य वापराची गरज - 

सोशल मीडिया पूर्णपणे वाईट नाही; मात्र त्याचा योग्य आणि मर्यादित वापर करणे आवश्यक आहे.  सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे.म्हणून पालकांनी व शिक्षकांनी किशोरवयीन मुलांना योग्य मार्गदर्शन करावे.

वेळेचे नियोजन, अभ्यास व मैदानी खेळ यांना प्राधान्य दिल्यास सोशल मीडियाचे दुष्परिणाम टाळता येऊ शकतात.

 निष्कर्ष - 

सोशल मीडिया हे किशोरवयीन मुलांसाठी वरदानही ठरू शकते आणि शापही. त्याचा वापर कसा केला जातो यावर त्याचे परिणाम अवलंबून आहेत. योग्य दिशा, संयम व जागरूकता असल्यास सोशल मीडिया हे व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी साधन ठरू शकते.


Sangita Bhalsing 

Ahilyanagar 

Maharashtra

शुक्रवार, ९ जानेवारी, २०२६

निबंध - मराठी भाषेची थोरवी/महती

 

निबंध - मराठी भाषेची थोरवी/महती 

(मराठी भाषेची थोरवी, महती ,महत्त्व)

मराठी भाषा ही महाराष्ट्राची मातृभाषा तसेच राजभाषा असून ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची व अस्मितेची ओळख आहे. भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती समाजाच्या विचारांचे प्रतिबिंब असते. मराठी भाषेची थोरवी, तिची महती व तिचे महत्त्व यामुळेच ती आजही जिवंत व समृद्ध आहे.

मराठी भाषेचा इतिहास प्राचीन आहे. संस्कृत व प्राकृत भाषांच्या प्रभावातून मराठी भाषेचा विकास झाला. यादवकाळात मराठी राजभाषा म्हणून वापरली जाऊ लागली. संत ज्ञानेश्वरांनी

“अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके”

असे सांगून मराठी भाषेची महानता स्पष्ट केली. ज्ञानेश्वरीमुळे मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळाला. संत नामदेव, एकनाथ व तुकाराम यांनी अभंग, ओवी व भारुडांच्या माध्यमातून मराठी भाषा सामान्य जनतेपर्यंत पोहोचवली.






मराठी भाषेची महती तिच्या समृद्ध साहित्य परंपरेतून दिसून येते. संत साहित्य, शाहिरी पोवाडे, कीर्तन, भारुडे तसेच आधुनिक काळातील कविता, कादंबरी व नाटक यांमुळे मराठी भाषा वैविध्यपूर्ण बनली आहे. वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, आचार्य अत्रे यांसारख्या साहित्यिकांनी मराठीला वैचारिक खोली दिली.

“भाषा म्हणजे विचारांची वाहिनी” हा सुविचार मराठी भाषेच्या सामर्थ्याचे उत्तम उदाहरण आहे.

मराठी भाषेचे महत्त्व सामाजिक, शैक्षणिक व राष्ट्रीय जीवनात मोठे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीला राज्य कारभाराची भाषा बनवून स्वराज्याची ओळख निर्माण केली. आज शिक्षण, प्रशासन, न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे, नाट्य व चित्रपट क्षेत्रात मराठी भाषेचा प्रभाव दिसून येतो.

“मातृभाषेतील शिक्षण विचारक्षम बनवते” हे याचे उत्तम उदाहरण आहे.

आजच्या जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजीचे महत्त्व वाढले असले तरी मातृभाषेचे स्थान अनन्यसाधारण आहे. मातृभाषेतून व्यक्त होणारे विचार अधिक सहज, प्रभावी व भावपूर्ण असतात. म्हणूनच “स्वभाषा श्रेष्ठ” हा सुविचार आजही तितकाच महत्त्वाचा आहे.

अशा प्रकारे मराठी भाषा ही आपली ओळख, वैभव व सांस्कृतिक वारसा आहे. तिची थोरवी, महती व महत्त्व ओळखून तिचा अभिमान बाळगणे, शुद्ध वापर करणे व तिचे संवर्धन करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे.


Sangita Bhalsing 

Ahilyanagar 

Maharashtra 

मंगळवार, १८ जुलै, २०१७

जसा आहार,तसे विचार ! मराठी निबंध १२ वी (मराठी लेख)

जसा आहार,तसे विचार ! मराठी निबंध (मराठी लेख) मराठी निबंध १२ वी

मंगळवार दि.१८ जुलै २०१७ रोजी माझा लेख

"जसा आहार,तसे विचार" एकमत वर्तमान पत्रात  प्रकाशित झाला.....

🌹जसा आहार,तसे विचार🌹

जसा आहार तसे विचार – समतोल व सात्त्विक मराठी जेवण


भगवदगीतेतील एका श्लोकात म्हटले आहे की,

"युक्ताहार विहारस्य

युक्तचेष्टस्य कर्मसु ।।

युक्तस्वप्नावबोधस्य

योगों भवति दुखहा ।।

याचा अर्थ असा की ,

" ज्याचा आहार, विहार माफक,संयमित आहे,कर्माचरण योग्य, परिमित आहे व ज्याची झोप तसेच जागरण नियंत्रित,आटोपशीर आहे त्याला हा योग सुखावह होतो"

आरोग्याचे रहस्य आहार ,विहार,झोप आणि आचरण या चतुसूत्रीत दडलेले आहे.यातील एक जरी गोष्ट बिघडली तर आरोग्य ही बिघडते. आपल्या व्यक्तिमत्व विकसित होण्यासाठी आहार हा घटक अतिशय महत्वाचा आहे.

भगवान श्रीकृष्णानी भगवत गीतेत सात्विक,राजस,तामस अशा तीन प्रकारच्या आहाराचे वर्णन केलेले आहे.जसा आहार घेतला जातो तसे माणसाचे तन आणि मन बनते. आपल्या आहारावर आपला स्वभाव अवलंबून असतो हे वैद्यकशास्त्रानुसार देखील सिद्ध झालेले आहे.

आज विज्ञानयुगात जीवन खूप धावपळीचे आणि गुंतागुंतीचे झालेले आहे. त्यामुळे योग्य आहारा बाबतची उदासीन वृत्ती वाढत चालली आहे.मिळेल ते कसे तरी खायचे व पोट भरायचे  हाच माफक हेतू उरला आहे. खाणे फक्त जीभेसाठी केले जाते, आरोग्यासाठी नाही.याचा पुरावा म्हणजे आज रस्तोरस्ती दिसणाऱ्या खाद्य पदार्थांच्या हातगाडया आणि तेथील गर्दी...!! इंस्टंट फूड,जंक फूड,चटपटीत पदार्थ,शीतपेये ,आइस क्रीम आजच्या पिढीचा जीव की प्राण आहे.हे पदार्थ आरोग्यासाठी घातक आहेत याचे भान उरलेले नाही.शरीर पोषण हा विचार आज हरवला आहे अस वाटतंय ...आजारी पडल्यावर मात्र पथ्य सुरु होते.परंतु तो पर्यन्त खूप उशीर झालेला असतो.

आज लहान मुलांचा विचार केल्यास ....ही मुले फक्त जीभे साठी खात असल्याचे दिसते.घरात बनवलेले सकस अन्न टाळून ,बाहेरचे पदार्थ खांन्याकड़े त्यांचा कल दिसून येतोय.शाला कॉलेज मधील मुले वेळे अभावी बाहेराचे अन्न पदार्थ घेत आहेत.पालक सुद्धा कधी कधी हतबल होतात आणि मूल उपाशी राहू नये म्हणून जे हवे ते मुलांना देत असतात.

पुढे त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात,मग होतात सुरु डॉक्टर च्या भेटी आणि दवाखान्याच्या वाऱ्या...

लहान वयात अनेक समस्या निर्माण होतात.

उदाहरण. चश्मा लागने, केस पांढरे होणे, चेहरा निस्तेज होणे, हीमोग्लोबिन कमी असणे,

अशा विविध कारणाने आजार वाढने, ऋतु बदल होताना अनेक संसर्ग जन्य आजार होतात.

यावर उपाय योजना करणे फार आवश्यक झाले आहे.

समतोल आहार म्हणजे काय?विरुद्ध पदार्थ कोणते? जेवण कसे करावे?याबाबत पालकानी स्वतः आचरण करावे आणि मुलानाही हेच शिक़वावे.

विरुध्दाहार

ज्या दोन वस्तू वेगवेगळया खाण्याने अपाय होत नाही परंतु, त्याच वस्तू एकत्र करून, मिसळून खाल्ल्या तर त्या शरीराला विषाप्रमाणे अपायकारक होतात. अशा वस्तू एकत्र करणे म्हणजे विरुध्दाहार होय.

दूध व आंबट फळे (कैरी, चिंच, करवंद, अननस, मोसंबी, द्राक्ष) एकत्र करुन खाणे.

वरी, मटकी, कुळीथ, उडीद, वाटाणे, वाल दुधाबरोबर खाणे. 

कच्चा मुळा व दूध एकमेकांअगोदर खाऊ नयेत, त्याने चामडीचे विकार होण्याची शक्यता असते.

दूध, भात, मीठ एकत्र खाणे. दूध व मासे एकत्र खाणे.

दही कधीही तापवून खाऊ नये.

ताक किंवा दह्याबरोबर केळ खाणे.

गरमागरम जेवणानंतर आईस्क्रीम किंवा शितपेये घेणे.

तूप व मध सम प्रमाणात एकत्र खाणे.

मोहरीच्या तेलात परतलेले मासे, हळकुंड.

मध, दही, मद्य यापैकी कशाबरोबरही उष्ण पदार्थ खाणे.

ताक व कारल्याची भाजी एकत्र खाणे.

रात्री झोपतांना सातूचे पीठ खाणे.

उन्हात तापलेल्या शरीराने थंड दूध किंवा पाणी प्यायल्याने रक्तपित्त होते.

या बाबी जाणीव पूर्वक मुलांना माहित करुण देणे हे पालक या नात्याने आद्य कर्तव्य मानावे.

त्याच प्रमाणे भोजन कसे करावे याबाबत ची माहिती द्यावी.

आपल्या जेवणाचे प्रमाण ठरवण्यसाठी साधे सोपे गणित पूर्वजानी सांगितले आहे. आपल्या जठराचे ४ भाग करा. त्यातील २/३ भाग घन/ठोस आहार (भात, भाजी, चपाती इ.) घ्या. १/४ भाग द्रवाहार घ्या (दूध, ताक, रस, सूप इ.). उरलेल्या १/४ भाग रिकामा ठेवा. यामुळे जठरात त्याचे चलनवलन नीट होऊन त्याचे पचन नीट होते. म्हणून तर आपल्याकडे म्हणतात, 'सावकाश = स+अवकाश' जेवावे.

जेवणाचे पुढील ३ प्रकार आहेत,यापैकी सत्व गुंण युक्त आहार घेतला पाहिजे.

त्यातून आरोग्य आणि विचार यांचे पोषण होईल ...

1. सत्त्व– तेलमय ,रसभर ,पौष्टीक

२.राजस- आंबट, खारट, गरम, सुखे ,भाजलेले पदार्थ

३.तामस- वाईट वास येणारे , अर्धवट भाजलेले व शिजलेले ,अशुद्ध, शिळे

निष्कर्ष -

अति लठ्ठ व्यक़्क्तिने डायट करणे हा योग्य मार्ग नव्हे ! 

तर समतोल आहार आणि व्यायाम यांची सांगड घातली पाहिजे

"जैसा खाए अन्न वैसा होय मन"

या उक्तीप्रमाणे लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत खाण्याचा प्रमाण तसेच पोषकतेवरून शरीर मन दिसून येते . 

म्हणूनच योग्य आहार आणि विहार हा सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे.


प्रा.सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर/अहिल्यानगर, महाराष्ट्र 

ब्लॉग पोस्ट आवडल्यास कृपया शेअर नक्की करा.




New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...