मराठी कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १ फेब्रुवारी, २०२६

चहाचा कप - एक भावस्पर्शी कौटुंबिक कथा

 *चहाचा कप* मराठी कथा 


 सकाळी सकाळी सासू- सुनेचा संवाद अगदी सहजपणे माझ्या कानावर पडत होता.हॉल आणि किचन मधलं अंतर तरी कितीसं..!



सुनबाई म्हणत होती,"सकाळी घाई घाईत मी माझा चहाचा कप धुवायला विसरले,बाळ ही रडत होतं ..!नंतर मी धुऊन टाकला असता की,तुम्ही तो कप असा बाजूला काढून का ठेवला?तुम्हाला धुण्यासाठी मी नव्हता ठेवला.तुम्ही कप धुवावा किंवा माझं काम करावं ही अपेक्षाच नाही

 आणि कामवालीला इतर सर्व भांड्या बरोबर कप ही घासायला दयायचा की, तुम्ही घासावा म्हणून मी तिथे ठेवला नव्हता.. मी नंतर धूतला असता कप...त्यात काय एवढं !तुम्ही असा बाजूला ठेवायला नको होता मला फार वाईट वाटले" असं म्हणत सुनबाई काम करताना,मुसमुसत होती. शेवटी डोळे पुसत पुसत ती बेडरूममध्ये निघून गेली. मी तिथं असूनही मध्ये बोलण्याचा काही प्रश्नच नव्हता ,खरेतर हिंमतही नव्हती,वेळही  नव्हती बोलण्याची...!आणि मध्ये बोलणे योग्य ही वाटत नव्हते.

संध्याकाळी आम्हा उभयतांची मंदिरात जायची वेळ झाली होती. बाळाला आम्ही कधी कधी फिरायला नेत असू,पण बाळ झोपलं होतं म्हणून दोघेच निघालो.ताटात हार-फुलं आणि अगरबत्ती ठेवत होती .मी तिच्याकडे पाहत होतो आणि काहीतरी मनाशी ठरवलं होतंच...आणि जे ठरवलं होतं त्याला पूरक परिस्थितीही लगेच निर्माण झाली...!

 मंदिरात देव दर्शन झालं आणि बाहेर हिरवळीवर आम्ही दोघ नेहमीप्रमाणे गप्पा करत  निवांत बसलो. खडीसाखरेचा प्रसाद खात होतो ,तेवढ्यात तिच्या फोनची रिंग वाजली.

बोलण्या वरून लक्षात आले की, आमच्या लाडक्या कन्येचा फोन होता आणि बाईसाहेब फोनवर रडत होत्या. सासूचे आणि तिचं कुठल्यातरी कारणावरून भांडण झालं होतं

आणि ही तिला समजावून सांगत होती. तिच्या सासूला नाव ठेवत होती. एवढं वय झालं कळत नाही का? असं म्हणत होती .तिला मुलगी नाही का ?आणि तुझ्या नवऱ्याला काही कळत नाही का ?त्याला दिसत नाही का? आपली आई कशी वागते...! असं सांगत होती. मी मात्र गप्प होतो

तिने त्रासिक मुद्रेने फोन ठेवला आणि माझ्याकडे रडवेल्या नजरेने पाहिलं .खूप वैतागलेला चेहरा दिसत होता मलाही ते सर्व काही सांगणार होती, तेवढ्यात मी तिला म्हणालो ," आपल्या सूनबाईने पण सकाळी तुला हेच सांगितलं की... आपली मुलगी जशी दुसऱ्या घरी गेली तुला काळजी वाटते तशीच आपली  घरी देखील परक्याची मुळी आली आहे. तुला स्वतःच्या मुलीची काळजी वाटतेय..मग सुनेला आपली का म्हणू शकत नाहीस. ती आपल सर्व काम करते .गरज पडली तर माझे,तुझे कपडे धुते. भांडी स्वयंपाक काम करते आणि तू तिचा कप बाजूला काढून ठेवला ...हे शोभत का तुला? हे पटलं का तुला? तुझ्या मुलीला असं केलं तर तुला चालत नाही मग तू दुसऱ्याच्या मुलीला असं का करते आणि हे बघ आपला मुलगा जेव्हा तीच्या घरी त्याच्या सासरी जातो तेव्हा तिचे आईवडील त्याचा सर्व पाहूणचार करतात,मानसन्मान करतात. मग तुझी जबाबदारी नाही का तिला मुलीप्रमाणे वागवायची ?जीव लावायची ?

तुला आठवतंय मागे तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं ,चांगली दोन महिने बेडवर आराम करत होतीस. हॉस्पिटलमध्ये चार दिवस होतीस तेंव्हा कोणी सेवा केली तुझी ! सुनबाईनेच जागेवर जेवण दिलं, आंघोळ घातली... एखाद्या मुलीप्रमाणे तुझी सेवा करत होती.. दिवसभर काम करत होती ,रजा घेऊन..!  आणि घरातील सर्व काम देखील व्यवस्थित, नीटनेटके करते,आग्रहाने खायला घालते. तुझ्याकडून कोणत्या कामाच्या अपेक्षा केली नाही.

आणि शेवटी हे बघ आपला एकुलता एक मुलगा आणि एकुलती एक असून आपल्याला त्यांच्या शिवाय कोण आहे? नातेवाईक कोण कोणाचे ?ते थोडीच आपली सेवा करणार आहेत? शेवटी म्हातारपणी आपली सेवा तिच तर करणार आहे हे ध्यानात ठेव. आपली मुलगी येईल फक्त चौकशी पुरती..!आणि तिच्यामागे लहान लेकरू आहे, नोकरी करते ,घरही सांभाळते मग तिच्याबरोबर तू बरोबरी का करते ...! तिला त्रास देण्यापेक्षा समजून घे ,प्रेम दे .शेवटी आपल्यापेक्षा लहानच आहे ती, चुका झाल्यात तर पोटात घालाव्यात ...समजून सांगावं. स्वतःच्या मुलांना जसं समजून घेतो तसेकंग समजून घेतलं पाहिजे.मुलगा आपलाच रहावा अस वाटत असेल तर सुनेलाच जीव लावावा लागतो.जुने लोक म्हणत असत " सोन्यासाठी चिंधी सांभाळावी लागते " म्हणून आज तिला जसे आपण वागवू तसेच ती आपल्याला वागविल..!

आपण जे देऊ तेच परत मिळेल.हे लक्षात ठेव.

आपल्या मुलाचे सुख तेच आपले सुख आहे.कुटुंब सुखात,आनंदात ठेवायचे असेल तर आपणच अधिक प्रयत्न करायला हवेत.त्यांच्या आयुष्यात अधिक ढवळाढवेळ न करता...!

आणि मी तिच्या आई बापाला लग्नापूर्वी म्हणालो होतो की आम्ही तिचे आईबाप बनू, तिला तुमची आठवण येणार नाही असा मी बाप होईल,मुलगी म्हणून मान सन्मान मिळेल तिला आमच्याकडे...."

ती शांतपणे सर्व ऐकून घेत होती न बोलता डोळ्याच्या पापण्या पुसत होती...

आणि हे बघ आपलं नशीब चांगलं आहे बरं...! कारण ती सतत नवऱ्याला आपलं भांडण ,वाद सांगत बसत नाही .तुझ्याबद्दल तक्रारी करत नाही, तिच्या आईबापाला ही ती आपल्या घरातील अशा गोष्टी सांगत नाही.समजूतदार आहे ती..!नाहीतर बघ अशा वाद विवादाने पोराचं डोकं फिरलं तर ...! तो कसा माथेफिरू आहे हे तुला चांगलंच माहीत आहे .कुटुंबात कलह निर्माण होईल भांडण होतील ....जॉब करतात दोघं ...टेन्शन असतं त्यांना..! ते ऑफिस पाहतील   की घरातले भांडण पाहतील. विचार कर ,त्यांना शांतता देऊ शकतो आपण .आपले हात-पाय चालत आहे तोपर्यंत..! आपण त्यांना मदत केली तर नक्कीच आपलं म्हातारपण सुखात जाईल. आपण आजूबाजूला पाहतोय की, समाजात काही ठिकाणी वृद्धांची अवस्था  फार वाईट आहे.वृद्धाश्रमाची संख्याही  वाढत चालली आहे.पण आपण नक्कीच भाग्यवान आहोत बघ...!आपल्याला वाईट वेळ येणार नाही ही खात्री आहे.आपण मुलाला चांगले संस्कार दिले आहेत आणि सुनबाई देखील चांगल्या संस्कारी घरातील आहे. माझा तुझ्यावर जसा विश्वास आहे तसा मुलावर विश्वास आहे आणि सर्वात जास्त माझ्या सुनेवर विश्वास आहे.खूप चांगली मुलगी आहे.आपल्या घरात ही तुळस छान रुजलीय....!  तू नक्कीच हुशार आहेस समजून घेशील .

संध्याकाळी घरी गेलो तर हॉलमध्ये नातवाने रडून गोंधळ चालवला होता आणि सुनबाई त्याला समजवत होती. पण लबाड रडायचा थांबत नव्हता...! काय बिनसलं होतं कोण जाणे..! स्वयंपाकाची तयारी बाकी होती...

ही म्हणाली,आरती तू सांभाळ त्याला...मी पाहते स्वयंपाकाचं !आणि आपल्याला फक्कडसा चहा पण करते ...! असं म्हणताना तिने हळूच माझ्याकडे पाहिलं आमच्या डोळ्यांची भाषा आमची आम्हाला समजली आणि हलकीशी स्मितरेषा चेहऱ्यावर होती दोघांच्याही..! आणि आमच्या दोघांच्या कडे पाहून सूनबाई चेहऱ्यावरही हलकस हसू होतं .कळी खुलली होती आणि सकाळच्या चहाच्या कपातील वादळ ,संध्याकाळच्या चहाच्या कपात शमलं होतं.


प्रा.सौ.संगिता भरतकुमार भालसिंग

उपशिक्षिका

शाळेचे नाव:- श्री घोडेश्वरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर, घोडेगाव

ता.नेवासा

जि. अहमदनगर


कथा आवडल्यास कृपया नक्की शेअर करा.

मंगळवार, १३ जून, २०१७

जावई माझा भला! प्रकाशित मराठी कथा (लेख)

जावई माझा भला! प्रकाशित मराठी लेख(कथा)

मंगळवार दि. 13 जून 2017 रोजी "एकमत"वर्तमान पत्रातील "साक्षी"पुरवणी मधे
माझा लेख प्रकाशित ....

" जावई माझा भला "  हृदयस्पर्शी मराठी कौटुंबिक लेख/कथा 

जावई माझा भला – एअरपोर्टवरील प्रसंगातून जावयाचे माणुसकीपूर्ण रूप दाखवणारे मराठी लेखाचे चित्र


💐 जावई माझा भला 💐

मम्मी, आवर लवकर .....

उशीर होतोय...अशी गडबड सकाळच्या वेळी माझ्या मुलांची चालली होती.असा प्रसंग घरात रोजचाच ....पण आज माझी मुलगी आणि मुलगा पुण्याला जाणार होते.दुपार पर्यंत त्यांना एअर पोर्ट वर जाने आवश्यक होते. कारण माझे जावई पुण्याला होते.त्यांना हैदराबाद ला जायचे होते म्हणून च निरोप देण्या साठी माझी मुले निघाली होती.

बाहेर चे खाद्य पदार्थ टाळण्यासाठी मी लंच पैक करत होते.भाजी, पोळी, चटणी, लोणचे,

आणि काही फळं ही दिली.मोसंबी,सफरचंद,आणि द्राक्ष प्लास्टिक च्या पिशवी मधे ठेवली ....

आणि फ्रूट कापण्यास एक अगदी लहानसा चाकू त्यात टाकला.

खरे तर मी सर्व पैकिंग माझ्या नेहमीच्या सवयी प्रमाणेच केले होते.....

मुले अशा घाईतच पुण्याला निघाली...

तिथे त्यानी दुपारी एक फ़िल्म पहिंली आणि नंतर एअर पोर्ट वर जाताना गाड़ीत बसूनच जेवण केले.....

संध्याकाळी मुलीचा फोन आला की,मम्मी तू लंच पैक मधे चाकू दिला होता का?मी हो म्हणाले आणि विचारले की काय झाले?

तिने सांगितले की,जावयाला एअर पोर्ट अडविले आहे आणि त्यांची चौकशी सुरु आहे....

बापरे,मी तर हादरूनच गेले...कधी मनात ही कुविचार न करणारी आम्ही साधी,मध्यम वर्गीय लोक ....अशी कृती मी मुद्दाम केली नव्हती,तरी यांची खूप बोलणी खावी लागली.मनावर प्रचंड दडपण आले होते,काय करावे तेच सुचेना.... नको नको ते विचार मनात येऊ लागले.....पोलिस चौकशी आणि जावई ...असे चित्र नजरे समोर येऊ लागले...आम्ही

एअर पोर्ट फक्त चित्र पटातच पहिलेले...त्यामुळे तिथे नक्की काय कशी परिस्थिति असते याची अजिबात कल्पना नसलेले आम्ही मध्यम वर्गीय सामान्य लोक...

त्यांची सुटका कशी होईल या चिंतेत आम्ही ....

फ्लाइट चुकेल याची काळजी....

मुलांची आणि आमची फोनाफोनी सुरु च होती...

शेवटी मूली ने सांगितले की, त्यांची चौकशी करुन

सोडण्यात आले आहे....

मी मूली ला खूप रागवले की,तुला समजले नाही का?चाकू त्यांना का दिला?तू पाहिला नव्हता का ?

ती म्हणाली की आम्हाला

उशीर झाला होता आणि गाड़ी तुन उतर ताना त्यांना फ्रूट्स ची पिशवी दिली होती पण त्यानी त्यातील सफरचंद आणि ।मोसंबी काढून दिली आणि फक्त द्राक्ष नेली.

पण दुर्दैव असे की त्याच द्राक्षया खाली चाकू होता.

तो दिसला च नाही...


खरे तर इथे चूक कोणाची च नव्हती ,अनवधानाने ही

घटना घडली होती,मात्र आम्ही सर्वजण ऐकमेंकाना दोष देत होतो.मी तर भयंकर अस्वस्थ झालेली होते.माझ्या मुळे च जावई

संकटात सापडले होते.

पण सदैव आमचे असे की

जावयांनी फोन करुण मला सांगितले की ,तुम्ही मनाला लावून घेऊ नका,

आणि मुलीला रागवु नका,चूक माझीच आहे,मीच घाईने ती फ्रूट्स ची पिशवी घेतली....

अधिकाऱ्यानी मला चाकू बद्दल विचारले...मी सांगितले की फ्रूट्स कापन्यासाठी मम्मीने चाकू ठेवला असेल...

मात्र पिशवी मधे फक्त द्राक्ष होती ....आणि चाकू ने द्राक्ष कापणाऱ्या व्यक्ति कड़े अधिकारी संशयाने पाहत होते....शेवटी

मग  सर्व प्रकारे आपली ओळख पटवून दिली,शिक्षण,नोकरी याबाबत संदर्भ दिले....त्यांची खात्री झाल्यावर सुटका झाली....

एक वाक्य ते फार गमतिशिर म्हणाले की,मम्मी मी तुमचा चाकू परत देऊ शकणार नाही,

तो एअर पोर्ट वर जप्त करण्यात आला आहे.

त्यांच्या बोलण्यातून या

कठिण प्रसंगातील गांभीर्य थोड़े कमी झाले....

पण यातून माझी विचार प्रक्रिया सुरु झाली

खरोखर आम्ही भाग्यवंत ...!!जावई म्हणजे आजच्या काळात मुलगाच मानतात.यात काही खोटे नाही.इतक्या सहज पने खेळपने त्यानी कठिन प्रसंग हाताळला. स्वतः ला त्रास झाला तरी सहन केला....दुसऱ्या व्यक्ति ला दोष न देता ,नाती कशी जपावी याचा वस्तुपाठच त्यानी घालून दिला.... धन्य ते माता पिता...असा सुपुत्र त्यांच्या पोटी जन्माला आला... खरे तर,

जावयाला ‘जामातो दशमो ग्रह’ असे थट्टेने म्हणतात, कारण जावई जर भला नसेल तर कन्या राशीत असल्याने तो तापदायक ठरण्याचा संभव असतो.

परंतु माझ्या बाबतीत उलटच किस्सा घडला आणि 'जावई माझा भला' याची प्रचिती आली.

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर/अहिल्यानगर

महाराष्ट्र 

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...