रविवार, १ फेब्रुवारी, २०२६

चहाचा कप - एक भावस्पर्शी कौटुंबिक कथा

 *चहाचा कप* मराठी कथा 


 सकाळी सकाळी सासू- सुनेचा संवाद अगदी सहजपणे माझ्या कानावर पडत होता.हॉल आणि किचन मधलं अंतर तरी कितीसं..!



सुनबाई म्हणत होती,"सकाळी घाई घाईत मी माझा चहाचा कप धुवायला विसरले,बाळ ही रडत होतं ..!नंतर मी धुऊन टाकला असता की,तुम्ही तो कप असा बाजूला काढून का ठेवला?तुम्हाला धुण्यासाठी मी नव्हता ठेवला.तुम्ही कप धुवावा किंवा माझं काम करावं ही अपेक्षाच नाही

 आणि कामवालीला इतर सर्व भांड्या बरोबर कप ही घासायला दयायचा की, तुम्ही घासावा म्हणून मी तिथे ठेवला नव्हता.. मी नंतर धूतला असता कप...त्यात काय एवढं !तुम्ही असा बाजूला ठेवायला नको होता मला फार वाईट वाटले" असं म्हणत सुनबाई काम करताना,मुसमुसत होती. शेवटी डोळे पुसत पुसत ती बेडरूममध्ये निघून गेली. मी तिथं असूनही मध्ये बोलण्याचा काही प्रश्नच नव्हता ,खरेतर हिंमतही नव्हती,वेळही  नव्हती बोलण्याची...!आणि मध्ये बोलणे योग्य ही वाटत नव्हते.

संध्याकाळी आम्हा उभयतांची मंदिरात जायची वेळ झाली होती. बाळाला आम्ही कधी कधी फिरायला नेत असू,पण बाळ झोपलं होतं म्हणून दोघेच निघालो.ताटात हार-फुलं आणि अगरबत्ती ठेवत होती .मी तिच्याकडे पाहत होतो आणि काहीतरी मनाशी ठरवलं होतंच...आणि जे ठरवलं होतं त्याला पूरक परिस्थितीही लगेच निर्माण झाली...!

 मंदिरात देव दर्शन झालं आणि बाहेर हिरवळीवर आम्ही दोघ नेहमीप्रमाणे गप्पा करत  निवांत बसलो. खडीसाखरेचा प्रसाद खात होतो ,तेवढ्यात तिच्या फोनची रिंग वाजली.

बोलण्या वरून लक्षात आले की, आमच्या लाडक्या कन्येचा फोन होता आणि बाईसाहेब फोनवर रडत होत्या. सासूचे आणि तिचं कुठल्यातरी कारणावरून भांडण झालं होतं

आणि ही तिला समजावून सांगत होती. तिच्या सासूला नाव ठेवत होती. एवढं वय झालं कळत नाही का? असं म्हणत होती .तिला मुलगी नाही का ?आणि तुझ्या नवऱ्याला काही कळत नाही का ?त्याला दिसत नाही का? आपली आई कशी वागते...! असं सांगत होती. मी मात्र गप्प होतो

तिने त्रासिक मुद्रेने फोन ठेवला आणि माझ्याकडे रडवेल्या नजरेने पाहिलं .खूप वैतागलेला चेहरा दिसत होता मलाही ते सर्व काही सांगणार होती, तेवढ्यात मी तिला म्हणालो ," आपल्या सूनबाईने पण सकाळी तुला हेच सांगितलं की... आपली मुलगी जशी दुसऱ्या घरी गेली तुला काळजी वाटते तशीच आपली  घरी देखील परक्याची मुळी आली आहे. तुला स्वतःच्या मुलीची काळजी वाटतेय..मग सुनेला आपली का म्हणू शकत नाहीस. ती आपल सर्व काम करते .गरज पडली तर माझे,तुझे कपडे धुते. भांडी स्वयंपाक काम करते आणि तू तिचा कप बाजूला काढून ठेवला ...हे शोभत का तुला? हे पटलं का तुला? तुझ्या मुलीला असं केलं तर तुला चालत नाही मग तू दुसऱ्याच्या मुलीला असं का करते आणि हे बघ आपला मुलगा जेव्हा तीच्या घरी त्याच्या सासरी जातो तेव्हा तिचे आईवडील त्याचा सर्व पाहूणचार करतात,मानसन्मान करतात. मग तुझी जबाबदारी नाही का तिला मुलीप्रमाणे वागवायची ?जीव लावायची ?

तुला आठवतंय मागे तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं ,चांगली दोन महिने बेडवर आराम करत होतीस. हॉस्पिटलमध्ये चार दिवस होतीस तेंव्हा कोणी सेवा केली तुझी ! सुनबाईनेच जागेवर जेवण दिलं, आंघोळ घातली... एखाद्या मुलीप्रमाणे तुझी सेवा करत होती.. दिवसभर काम करत होती ,रजा घेऊन..!  आणि घरातील सर्व काम देखील व्यवस्थित, नीटनेटके करते,आग्रहाने खायला घालते. तुझ्याकडून कोणत्या कामाच्या अपेक्षा केली नाही.

आणि शेवटी हे बघ आपला एकुलता एक मुलगा आणि एकुलती एक असून आपल्याला त्यांच्या शिवाय कोण आहे? नातेवाईक कोण कोणाचे ?ते थोडीच आपली सेवा करणार आहेत? शेवटी म्हातारपणी आपली सेवा तिच तर करणार आहे हे ध्यानात ठेव. आपली मुलगी येईल फक्त चौकशी पुरती..!आणि तिच्यामागे लहान लेकरू आहे, नोकरी करते ,घरही सांभाळते मग तिच्याबरोबर तू बरोबरी का करते ...! तिला त्रास देण्यापेक्षा समजून घे ,प्रेम दे .शेवटी आपल्यापेक्षा लहानच आहे ती, चुका झाल्यात तर पोटात घालाव्यात ...समजून सांगावं. स्वतःच्या मुलांना जसं समजून घेतो तसेकंग समजून घेतलं पाहिजे.मुलगा आपलाच रहावा अस वाटत असेल तर सुनेलाच जीव लावावा लागतो.जुने लोक म्हणत असत " सोन्यासाठी चिंधी सांभाळावी लागते " म्हणून आज तिला जसे आपण वागवू तसेच ती आपल्याला वागविल..!

आपण जे देऊ तेच परत मिळेल.हे लक्षात ठेव.

आपल्या मुलाचे सुख तेच आपले सुख आहे.कुटुंब सुखात,आनंदात ठेवायचे असेल तर आपणच अधिक प्रयत्न करायला हवेत.त्यांच्या आयुष्यात अधिक ढवळाढवेळ न करता...!

आणि मी तिच्या आई बापाला लग्नापूर्वी म्हणालो होतो की आम्ही तिचे आईबाप बनू, तिला तुमची आठवण येणार नाही असा मी बाप होईल,मुलगी म्हणून मान सन्मान मिळेल तिला आमच्याकडे...."

ती शांतपणे सर्व ऐकून घेत होती न बोलता डोळ्याच्या पापण्या पुसत होती...

आणि हे बघ आपलं नशीब चांगलं आहे बरं...! कारण ती सतत नवऱ्याला आपलं भांडण ,वाद सांगत बसत नाही .तुझ्याबद्दल तक्रारी करत नाही, तिच्या आईबापाला ही ती आपल्या घरातील अशा गोष्टी सांगत नाही.समजूतदार आहे ती..!नाहीतर बघ अशा वाद विवादाने पोराचं डोकं फिरलं तर ...! तो कसा माथेफिरू आहे हे तुला चांगलंच माहीत आहे .कुटुंबात कलह निर्माण होईल भांडण होतील ....जॉब करतात दोघं ...टेन्शन असतं त्यांना..! ते ऑफिस पाहतील   की घरातले भांडण पाहतील. विचार कर ,त्यांना शांतता देऊ शकतो आपण .आपले हात-पाय चालत आहे तोपर्यंत..! आपण त्यांना मदत केली तर नक्कीच आपलं म्हातारपण सुखात जाईल. आपण आजूबाजूला पाहतोय की, समाजात काही ठिकाणी वृद्धांची अवस्था  फार वाईट आहे.वृद्धाश्रमाची संख्याही  वाढत चालली आहे.पण आपण नक्कीच भाग्यवान आहोत बघ...!आपल्याला वाईट वेळ येणार नाही ही खात्री आहे.आपण मुलाला चांगले संस्कार दिले आहेत आणि सुनबाई देखील चांगल्या संस्कारी घरातील आहे. माझा तुझ्यावर जसा विश्वास आहे तसा मुलावर विश्वास आहे आणि सर्वात जास्त माझ्या सुनेवर विश्वास आहे.खूप चांगली मुलगी आहे.आपल्या घरात ही तुळस छान रुजलीय....!  तू नक्कीच हुशार आहेस समजून घेशील .

संध्याकाळी घरी गेलो तर हॉलमध्ये नातवाने रडून गोंधळ चालवला होता आणि सुनबाई त्याला समजवत होती. पण लबाड रडायचा थांबत नव्हता...! काय बिनसलं होतं कोण जाणे..! स्वयंपाकाची तयारी बाकी होती...

ही म्हणाली,आरती तू सांभाळ त्याला...मी पाहते स्वयंपाकाचं !आणि आपल्याला फक्कडसा चहा पण करते ...! असं म्हणताना तिने हळूच माझ्याकडे पाहिलं आमच्या डोळ्यांची भाषा आमची आम्हाला समजली आणि हलकीशी स्मितरेषा चेहऱ्यावर होती दोघांच्याही..! आणि आमच्या दोघांच्या कडे पाहून सूनबाई चेहऱ्यावरही हलकस हसू होतं .कळी खुलली होती आणि सकाळच्या चहाच्या कपातील वादळ ,संध्याकाळच्या चहाच्या कपात शमलं होतं.


प्रा.सौ.संगिता भरतकुमार भालसिंग

उपशिक्षिका

शाळेचे नाव:- श्री घोडेश्वरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर, घोडेगाव

ता.नेवासा

जि. अहमदनगर


कथा आवडल्यास कृपया नक्की शेअर करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲