शिस्त म्हणजे प्रगतीचा श्वास ! मराठी निबंध
शिस्त (कुटुंबात, समाजात, देशात) Marathi Essay
प्रस्तावना
शिस्त म्हणजे नियम, मूल्ये , कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पाळून वागण्याची सवय. शिस्त ही केवळ बाह्य बंधन नसून ती अंतःकरणातून स्वीकारलेली जीवनपद्धती आहे. स्वातंत्र्य जितके आवश्यक आहे, तितकीच शिस्त देखील आवश्यक आहे.व्यक्तीपासून कुटुंब, समाज आणि अखेर संपूर्ण देशाच्या प्रगतीचा पाया शिस्तीवरच उभा असतो.
१) कुटुंबात शिस्त
कुटुंब हे शिस्तीचे पहिले विद्यालय आहे. लहानपणी मिळालेल्या सवयी पुढील आयुष्य घडवतात. पालकांनी कुटुंबात शिस्तीचा संस्कार प्रथम केला पाहिजे.इथे आईची भूमिका अधिक महत्त्वाची आहे हे नाकारता येणार नाही.घराचे इंजिन म्हणून , दिशादर्शक म्हणून तिचे महत्व आहे. स्त्री पुरुष समानता या मूल्याची पायाभरणी तर कुटुंबातच झाली पाहिजे.
वेळेचे नियोजन : उठणे, अभ्यास, काम, विश्रांती यांचे वेळापत्रक.
संस्कार व मूल्ये : आदर, प्रामाणिकपणा, सचोटी , भूतदया,सहकार्य, संयम.
जबाबदारीची जाणीव : घरातील लहानमोठी कामे वाटून घेणे. मुलगा किंवा मुलगी असा भेद न करता मूल्यशिक्षण देणे आवश्यक आहे. जबाबदार नागरिक जबाबदार कुटुंबातच घडू शकतो.
शिस्तबद्ध कुटुंबात परस्पर प्रेम,विश्वास वाढतो, मतभेद कमी होतात आणि मुलांचे व्यक्तिमत्त्व सशक्त घडते. कुटुंबातील मतभेद मुलांना कमजोर बनवतात.
२) समाजात शिस्त
समाजातील शिस्त म्हणजे सार्वजनिक नियमांचे पालन आणि एकमेकांबद्दलची कर्तव्यभावना.
आपण समाजाचे काही देणे लागतो ही जाणीव असणे. सामाजिक ऋण फेडण्याचे भान असणं.
कायदे व नियम पाळणे : वाहतूक नियम, स्वच्छता, सार्वजनिक शिस्त. कायद्याचा आदर करणे.
सामाजिक सलोखा : जात-धर्म-पंथ न पाहता माणुसकी जपणे. मानवता धर्म मानून सामाजिक वर्तन करणे.
सहकार्य व सेवा : गरजूंस मदत, स्वयंसेवी उपक्रमांत सहभाग. इतरांच्या प्रति प्रेमाने आणि सहानुभूती पूर्वक वर्तन.
शिस्तबद्ध समाजात सुरक्षितता, सुव्यवस्था आणि विकासाची गती वाढते. व्यक्तिविकास झाला की देशाचा विकास होतो.
३) देशात शिस्त
देशपातळीवरील शिस्त ही राष्ट्रनिर्मितीसाठी अत्यावश्यक आहे. देशप्रेम, देशभक्ती या शब्दांचा खरा अर्थ मनाला भिडला पाहिजे.
संविधान व कायद्यांचा सन्मान : अधिकारांसोबत कर्तव्येही निभावणे. हक्क व कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे समजून वर्तन आवश्यक आहे.
राष्ट्रीय मालमत्तेचे संरक्षण : सार्वजनिक साधनसंपत्तीची काळजी.
कामातील प्रामाणिकपणा : प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडणे. प्रामाणिकपणा हा जीवनाच्या सर्वच पातळीवर अविभाज्य भाग असला पाहिजे.
शिस्तबद्ध देश आंतरराष्ट्रीय पातळीवर विश्वासार्ह ठरतो आणि प्रगतीकडे वेगाने वाटचाल करतो.
शिस्त नसल्याचे दुष्परिणाम
अव्यवस्था आणि अराजकता
सामाजिक तणाव व गुन्हेगारी, व्यसन
विकासाला अडथळे, भ्रष्टाचार
निष्कर्ष
शिस्त ही बंधन नसून स्वातंत्र्याचा योग्य वापर शिकवणारी शक्ती आहे. कुटुंबात रुजलेली शिस्त समाजात विस्तारते आणि समाजातील शिस्त देशाला बळकट करते. म्हणूनच प्रत्येक नागरिकाने स्वतःपासून शिस्तीची सुरुवात करणे, हीच खऱ्या अर्थाने राष्ट्रसेवा, देशसेवा आहे. प्रत्येक व्यक्ती सीमेवर जाऊन सैनिक बनू शकत नाही. पण आपण जे काम करत आहोत ते प्रामाणिकपणे, देशसेवा म्हणून केले पाहिजे.
