बुधवार, ७ नोव्हेंबर, २०१८

गुलाबी

जलौघवेगा
लगालगागा लगालगागा

गुलाबी

उडून गेला पदर गुलाबी
गढून गेली नजर गुलाबी...

नकारघंटा लपून ठेवी
नकोस देऊ जहर गुलाबी...

भिजून गेली दवात थंडी
कुशीत आला बहर गुलाबी...

जगास दावू नको पुरावे
उगाच होई कहर गुलाबी...

भरून वाहे रसाळ वाणी
अधीर झाले अधर गुलाबी...

असे सांजवेळी मिटून डोळे
उरात झाकू प्रहर गुलाबी...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
06.11.18

दिवाळी


दिवाळी

वाजत आली आज दिवाळी
आतिषबाजी साज दिवाळी...

पाच दिसाची जंत्री जमली
सणात राजा ताज दिवाळी...

झोपडीतला अंधार पहा
श्रीमंताचा माज दिवाळी...

कागद पैसा कागदावरी
फटाक्यात आवाज दिवाळी...

मिणमिण पणती कोनाड्याशी
गरिबावर नाराज दिवाळी...

हिंदू मुस्लिम भाई भाई
दिप लावी शहनाज दिवाळी...

प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
7.11.18

रविवार, ४ नोव्हेंबर, २०१८

कर म्हणाले

मात्रा वृत्त पादाकुलक
8+8 = 16

कर म्हणाले

मनासारखे कर म्हणाले
पण सत्यालाच धर म्हणाले

त्यांच्या नाही मालकीच्याच
बांधावर तू चर म्हणाले

नकोस धावू सैरावैरा
घाल ज्ञानात भर म्हणाले

विश्वासाने भरलेल्या त्या
चार भिंतीस घर म्हणाले

तो एक कटाक्ष भेदले हृदय
त्या नायनांना शर म्हणाले

मान ठेवतो नारीचा जो
त्यालाच खरा नर म्हणाले

सत्कर्माचे रचून ठेवा
एकावरी एक थर म्हणाले

नाही हुंडा नाही रुखवत
त्या वरास मी वर म्हणाले

संगीताचे ऐकत नाही
रागावूनी मर म्हणाले

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
रविवार दिनांक 4.11.18

आली दिवाळी

स्पर्धेत सहभागी रचना

ओसरीवरील कविता

आली दिवाळी

वाजत गाजत
आलीय दिवाळी
उदंड वाहते
प्रकाशाची जाळी ...

दिव्यांची आरास
पणत्यांचा थाट
शिरशिरी अंगी
गुलाबी पहाट ...

अंगणी रांगोळी
पान फुले नक्षी
मंजुळ सनई
वृंदावन साक्षी ..

मुलांचा गलका
फटाक्यांचा बार
दाराला तोरण
सुगंधाचा हार ...

लाडू चकलीचा
खमंग सुवास
नैवेद्य ठेवूया
पहिला देवास ...

पैठणी नेसली
जरतारी काठ
हळूच पाहते
भाऊबीज वाट ...

सुगंधाची उटी
लेकरांच्या पाठी
माऊली जगते
कुटुंबाच्या साठी...

प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
रविवार दिनांक ०४.११.१८

गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१८

झोका

उंच माझा झोका
दोराला पीळ का पडे ...
गरगर गुंता सोडवते
जरी हाती चरचर चरे जडे ...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

प्रिया आज माझी

वृत्त-  भुजंगप्रयात
लगागा लगागा लगागा लगागा
गजल

    प्रिया आज माझी

प्रिया आज माझी , रुसे का कळेना
असे वाद खोटे , अबोला टळेना...

तिच्या भावनेला , किती मान देऊ
तरी काळजाची , अढी का सुटेना...

सुनी रात जाते , कुशी हात नाही
नकोसा दुरावा , असा साहवेना...

जरी पावलाची , असे आस छोटी
हवासा तरीही , झुला ही झुलेना...

दिले दान घ्यावे , वसा घेतलेला
सुखाच्या जपाने , कळी का खुलेना...

मिठीचा उबारा , तुला आवडेना
प्रितीचा फुलोरा , मला आढळेना...

दिले हात हाती , जरा साथ नाही
उरी भावनेचा , पुरावा मिळेना...

मनासारखे तू , तसे वाग आता
जसे पावलाला , खडा ही सलेना...

उभा आज दारी , उदासी बिचारा
नको दार लावू , जरी मी हलेना...

तुझ्या आठवांची ,  गुलाबी क्षणांची
कुपी अत्तराची , मला का फुटेना...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

बुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१८

नाते

21 आनंदकंद
गागालगा लगागा गागालगा लगागा

जोडू नकोस नाते , आता उगीच वरवर
सोडून काल गेला , पडले विशाल अंतर

ती सांजवेळ होती , हातात हात होता
दाबून टाकलेली , ओठात काल थरथर

तू चढवलास झोका,डोळे मिटून होते
आंब्यास बांधलेल्या , झोक्यात काल गरगर

दावू नको जगाला , काळीज फाटलेले
धागे कसे बसे ही , जोडून आज भरभर

श्वासात श्वास होता , विश्वास काल होता
नात्यास लागलेली , बाधीत आज घरघर

होत्या चुका कुणाच्या , हे आज सांगताना
वागू नकोस खोटे , बोलून आज चरचर

थांबू नकोस आता , सांधू नकोस आता
कापून टाकलेले , काळीज आज करकर

स्वप्नात मांडलेली , वचने नकोस काढू
या जीवनी तसेही , घडते असेच जरतर

ही संगिता मनाने , बांधून वेदनेला
ते शेर काळजाचे , गजलेत आज भरभर

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...