अध्याय २ - लेख क्रमांक ५ - श्री गजानन महाराज शेगाव
श्री गणगणरामाय नमः
लेख क्रमांक ५
*अध्याय दुसराप*
*भागवत वत् जगा साचे*
स्वामी देविदास पातुरकरांच्या घरासमोरील वटवृक्षाखाली जेवले.व उनाड नाल्यात शुद्ध निर्मळ जल निर्माण करुन पाणी प्यायले व निघून गेले.बंकट पुन्हा नाल्याजवळ आले तेव्हा स्वामी त्यांना दिसले नाहीत. तेंव्हापासून त्यांच्या मनाने स्वामींच्या दर्शनाचा ध्यास घेतला. व गांवभर हिंडून स्वामींना शोधू लागले. एकादशी निमित्त मोट्याच्या शिवमंदीरात गोविंद बुवा टाकळीकरांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. गोविंदबुवा विद्वान व प्रख्यात किर्तनकार होते.
मागील चार दिवसांपासून बंकट स्वामींना धुंडत होते.आज पाचव्या दिवशी बंकट पितांबरादी मित्रांबरोबर गप्पा करीत बसले.परंतू त्या गप्पांमधे बंकटांचे मन रमत नव्हते.राहून राहून बंकटांच्या मनात स्वामी विषयी विचार येत होते. पिताबंराला बंकटांने स्वामींबाबत सांगितले. ते ऐकून पितांबरांच्याही मनात स्वामींच्या दर्शनाची ईच्छा जागृत झाली. एकादशी असल्याने बंकट व पितांबर दोघांनी मोट्याच्या मंदिरात महादेवाचे दर्शन घेऊन किर्तन ऐकण्याचे ठरविले. त्यासाठी ईतर मित्रांना कटवून बंकट व पितांबर दोघे मंदिरात दर्शनासाठी निघाले. महादेव मंदिरासमोर असलेल्या कडूनिंबाच्या झाडावर बसलेली टिटवी टिटवू लागल्यामुळे बंकटाचे लक्ष झाडावरील टिटवी कडे गेले.तेंव्हा बंकटाला स्वामीं झाडाच्या सहाऱ्याने पहुडले असलेले आढळले. स्वामींना बघून दोघांनाही आनंद झाला.व लगेच स्वामीजवळ येऊन दोघे स्वामींच्या पाया पडून जेवणाची विनंती करु लागले.
तेंव्हा स्वामी बंकटाला म्हणाले की,तुझी गरज असेल तर आसोलकर माळीणीच्या घरी भिक्षा मागून भाकर आण. त्याप्रमाणे बंकट आसोलकरांच्या घरी गेले. व माळीणबाईंना भाकर मागितली. माळीणबाईंनी दिलेली भाजी भाकर बंकटांनी स्वामींना अर्पण केली. स्वामीं भाजी भाकर जेवू लागले. जेवतांना स्वामी पितांबराला म्हणाले, ह्या तुंब्यात उनाड नाल्यातून पाणी भरुन आण.कोणाच्याही घरुन पाणी आणू नकोस. पितांबर तुंबा घेऊन उनाड नाल्याजवळ आले. नाल्यात पायाची तळवे भिजतील एवढेही पाणी नव्हते.परंतू स्वामींचा आदेश म्हणून पितांबरांनी तुंबा नाल्यात बुडविला.आणि ज्या ठिकाणी तुंबा बुडविला त्या ठिकाणी खड्डा पडून शुद्ध निर्मळ जल वर आले.व त्या निर्मळ जलाने तुंबा भरल्या गेला.हे बघून पितांबर आश्चर्यचकित झाले. परिणामी, तुंब्यातील निर्मळ जला प्रमाणेच पितांबरांचे हृदय भक्तीने भरुन गेले. भरलेला तुंबा घेऊन पितांबर स्वामीजवळ आले.स्वामींचं जेवण झाले होते.स्वामी तुंब्यातील गंगाजल प्यायले.तेंव्हा बंकटाने "पंढरीनाथ भगवान की जय"असा जयघोष केला. व खिश्यातून काही चिल्लर पैसे काढून स्वामींना देऊ केले.तेंव्हा स्वामी म्हणाले ह्या दक्षिणेची गरज जे साधू संन्याशी व्यापारीवृत्तीचे असतात त्यांना असते. तुझ्याजवळ भाव भक्ती होता म्हणून मी तुला दुसऱ्यांदा भेटलो. पहिल्या वेळेस तू पातुरकरांच्या येथून जेवण आणले. आता आसोलकरांच्या येथून जेवण आणले.म्हणजे तुझी पंढरी परभारे झाली व फुकटात पंढरीनाथाची प्रसादी सुद्धा मिळाली.आता तुझ्या खिशात असलेलं सुपारीचे खांड काढ व मला दे.स्वामींनी सुपारी खाल्ली. मग स्वामी म्हणाले आता दोघेही किर्तनात जा.व लक्ष देउन किर्तन ऐका.
गोविंदबुवा किर्तनात आले. त्यांचा संगीताचा अभ्यास असल्यामुळे ते एकच अभंग निरनिराळ्या रागात गाऊन दाखवत. शास्त्रीय विषय तोही संगीतातून. म्हणून त्यांच्या किर्तनाला आजु बाजुच्या खेडेगावातून बरीच धार्मिक मंडळी हजेरी लावायची. त्यामुळै त्यांना दक्षिणा सुद्धा भरपूर मिळत असे.परंतू पैसा कितीही मिळाला तरी तो अधिकाधिक जमा करण्याचा मोह आवरणे अशक्य असते.त्यामुळे कीर्तनाच्या बरोबर वित्ताची अभिलाषा सुद्धा विद्वान पुरुषाचा स्थायी भाव होतो.म्हणून गोविंद बुवा अत्यंत विद्वान किर्तनकार असून सुद्धा त्यांचे वागणं भागवत वत् न होता ते भागवतात भाग घेतल्या प्रमाणे होत होते.कारण भागवत ह्या शब्दाची फोड (१) भाग (२) वत् ,अशी केल्यास, भागवतकाराच्या दोन संभावना निर्माण होतात.(१) भागवतात भाग घेणारा किर्तनकार किंवा (२) भागवत वत् होणारा किर्तनकार
जे किर्तनकार भागवतात भाग घेतात त्यांना मिळणारे फळ हे शाळेत शाळकरी मुले जसे शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतात त्या प्रमाणे होते. म्हणजे प्रेक्षकांचे मनोरंजन व भाग घेणाऱ्यांना संस्थेकडून प्रमाणपत्र.परंतू जे किर्तनकार परमेश्वराचे नाम संकीर्तन करीत किर्तन करतात ते किर्तन त्या किर्तनकाराची साधना होते.
गोविंद बुवांनी गजरागजर संपल्यावर पदे गाईली व नंतर हंसगीतेतील प्रसंग निरुपणास सुरवात केली. त्यात गोविंदबुवा म्हणाले ,एकदा सनकादिकांनी ब्रम्हदेवास प्रश्न विचारला की, विषय चित्तात व चित्त विषयात शिरले की विषय त्याग शक्य होत नाही.तर तो कसा करावा.परंतू ह्या प्रश्नाचे उत्तर ब्रम्हदेवांना सुचले नाही.म्हणून मानस पुत्रांची जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी त्यांनी सच्चिदानंद स्वरुप परब्रम्हाचे म्हणजे श्रीहरि चे स्मरण केले.व ब्रम्हदेवाच्या आळवण्याने श्रीहरि हंसरुपाने सनकादिक ऋषी व ब्रम्हदेवासमोर अवतीर्ण झाले.हे हंस कोण आहेत हे ब्रम्हदेव सुद्धा जाणू शकले नाहीत. परंतू आपले अज्ञान लपविण्यासाठी ब्रम्हदेव काहीच बोलले नाहीत. म्हणून सनक ऋषींनी हंसस्वरुप श्रीहरिंना विचारले की "तुम्ही कोण" त्यावर कडूनिंबाच्या झाडाजवळ बसलेले परमहंस स्वामी जागेवरुनच उत्तरले की, "जो तू आहेस ,तोच मी आहे" . हे उत्तर ऐकून गोविंद बुवा व श्रोते चकीत झाले. परंतू गोविंद बुवांनी पुन्हा प्रश्न उपस्थित केला की, तुम्ही व मी निरनिराळे आहोत. मग तुम्ही व मी एक कसे?
त्यावर परमहंस स्वामी म्हणाले "तू देहाच्या दृष्टीने विचारतोस की चैतन्याचा दृष्टीने ?".त्यावर गोविंद बुवा म्हणाले"दोन्ही दृष्टीने".
पुन्हा परमहंस स्वामी म्हणाले तुझा आणि माझा देह एकाच पंचिकृत पंचमहाभूतांनी बनलेला असून दोघांच्याही शरीरात नव्हे नव्हे चराचर विश्वात एकच ब्रम्हचैतन्य ओतप्रोत भरले आहे.म्हणून जो तू आहेस तोच मी आहे.
किर्तनी उद्धब ऊधे प्रश्ना
ऊत्तर ऊते हंसकृष्णा
उत्तर ऊते प्रश्नोप्रश्नी
गोविंद बुवास श्रीकृष्णी
प.पू.संत एकनाथ महाराज भागवतातील हंसगीतेत लिहितात
सनकादिकांसमान । उद्धवा तुज मी मानी जाण । यालागी त्यांचे ज्ञानकथन । ऐक सांगेन म्हणतसे।।३०७।।
म्हणजे सनकादिकांनी विचारलेले प्रश्नच उद्धवाचे आहेत असे समजून भगवंतानी उत्तरे दिली आहेत तीच उत्तरे स्वामींनी गोविंदबुवांना दिली.
ही उत्तरे ऐकून गोविंद बुवांनी समोर बसलेल्या श्रोत्यांना उत्तर देणाऱ्या परमहंस स्वामींना मंचावर घेऊन येण्यास सांगितले. सर्वात अगोदर बंकट,पितांबर पोहोचले. त्यांच्या पाठोपाठ ईतरही काही श्रोते आले.स्वामींनी सर्वांना परत जा व मांडी मांडून किर्तन ऐका असे सांगून परत पाठविले. तेंव्हा गोविंद बुवा स्वतः स्वामींजवळ आले.व हात जोडून स्वामींना किर्तनात चलण्याची विनंती करु लागले.
तेंव्हा स्वामी गोविंदबुवांना म्हणाले आत्ताच तू निरुपण केले की जे चैतन्य चराचर विश्वात ओतप्रोत भरले तेच चैतन्य हंसरुपाने सनकादिक व ब्रम्हदेवासमोर अवतीर्ण झाले. असे असतांना तू मला मंदिरात कशाला नेतोस ? ते ब्रम्हचैतन्य येथे नाही काय? तुझ्यासारखा मदोन्मत्त, अहंकारी, पोटभऱ्या किर्तनकार ही भूमाता-भूदेव पुन्हा जगात कधीही प्रगट न करोत.दासगणू महाराज सुद्धा त्यांच्या गजानन विजय ग्रंथातील दुसऱ्या अध्यायात लिहीतात की,
पोटभऱ्या कथेकरी
तू न व्हावे भूमीवरी।।६७।। तसेच
जे जे जयाने सांगावे
ते ते त्याने आचरावे
शब्दच्छलासी न करावे
साधकाने केंव्हाही।।६५।।
आणि माणसातील अहंकार हरि कृपेनेच नष्ट होतो.म्हणून हरि भजन करणे हा अहंकार नष्ट करण्याचा एकमेव मार्ग आहे.व भगवंताच्या अनुकंपेने तो नष्ट होतो. प.पू.एकनाथ महाराज सुद्धा हंसगीतेच्या निरुपणात लिहीतात की,
यालागी सांडावा अभिमान।ते तुटे सकळ बंधन । अभिमान निरसावया जाण। माझे भजन करावे.।।३६८।।
म्हणून परत जा व परमेश्वराच्या नामसंकीर्तनाचे किर्तन करा.राम, रामेश्वर,किंवा परमेश्वर एकरुप आहेत.कोणत्याही संताच्या कृपेने भवबंधन एकसमानच कटते. कमी जास्त कटत नाही.असे बोलून स्वामींनी गोविंदबुवांना भागवत वत् बनून परमेश्वराचे संकीर्तन करीत निरुपण करण्यास सांगितले.
गोविंद बुवा मंचावर आले.आणि नाचून परमेश्वराचे संकीर्तन "राम कृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि " गाऊ लागले. टाळकरी सुद्धा नव शक्ती संचारल्या प्रमाणे टाळांचा टणकार करीत नामसंकीर्तन करु लागले.गोविंदबुवा निरुपणात प्रथम स्वामींना वंदन करुन नाम संकीर्तनाचा महिमा वर्णू लागले.व म्हणाले आत्ताच शेगावात प्रगट झालेल्या स्वामींच्या उपदेशानुसार श्रोत्यांनी आपल्या ऊपास्य देवतेचा जास्तीत जास्त नामजप करुन भागवत वत् जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. ह्यातच जीवनाची सार्थकता आहे.श्रोतेसुद्धा भागवत वत् निरुपण करणाऱ्या गोविंद बुवांच्या किर्तनात तल्लीन झाले होते.शेवटी गोविद बुवांनी पसायदान म्हणून कीर्तन संपविले. किर्तन संपताच बंकट व पितांबर स्वामींना घरी नेण्यासाठी कडूनिंबाच्या झाडाजवळ आले.पण स्वामी अगोदरच तेथून निघून गेले होते.
रघुपती राघव राजाराम
पतित पावन सिताराम
श्री गणगणरामार्पणमस्तू
जगन्नाथ गांधी
मुंबई मालाड (प)
९७६९५१८८५८

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.