🌷 माझे घर,माझे मंदिर 🌷
जिथे नाही प्रवेश मला
तिथे मी कशाला जाऊ ...?
विनाकारण नको तिथे
माझी शक्ती का दावू ...?
नाही जाणार मी कधीच
कोणत्याही मंदिरात ..
आहेत सारे देव देवता
जर माझ्याच घरात ...!!
माझ्या घरातील देव्हारा
जसा मंदिरातील गाभारा
येता जाता दर्शन घेता
निघून जाई शीण सारा ...!!
प्रिय आई बाप माझे
सासू सासरे ही माझे
सदा आशीर्वाद देणारे
देव्हाऱ्यातील देव माझे ...!!
बहिण-भावंडे , दिर-जावा
केसावानी दाट गण गोत
सुखा दुःखात साथ सोबत
जसे पंढरीचे वारकरी होत ...!!
पवित्र गाभारी शिजतो
खमंग देवाचा प्रसाद
चिल्यापिल्यांना हाक देतो
जसा मंदिरी घंटानाद ...!!
विष्णुची मी लक्ष्मी
रामाची मी सीता
नाही गरज कोणत्याही
दगडी देवाची आता ...!!
माझे घर,माझे मंदिर
तन मन धनाने पुजते
सुखी समाधानी संसार
प्रेमाची ज्योत तेवते ...!!
🌷🌷🌷🌷🌷🌷
प्रा. सौ.संगिता भालसिंग
24/02/16
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.