अध्याय ३ - लेख क्रमांक १ श्री गजानन महाराज शेगाव
*श्री गणगणरामाय नमः*
अध्याय तिसरा
लेख क्रमांक १
*काशीच्या गोसाव्याचा नवस*
वंदितो काशी काशेश्वरा
हर हर विश्वी विश्वेश्वरा
काशी,काशीपती,काशीनाथ
काश्याधिपती केशवनाथ
काशी रंग रंगाया या
काशी संग संगाया या
केशरी रंग रंगाया या
केशरी कथा कथाया या
*कथा सुत्र उकलाया या*
कथासुत्र कळवाया या
कळवून कळविती गणगणराम
सिता सितापती सीताराम।।ॐ।।
शेगावचे स्वामी हे श्रोत्रीय ब्रम्हनिष्ठ सद्गुरु असून त्यांच्या चरणी श्रद्धा,भक्ती असल्यास भक्तांच्या मनोकामना सहज पूर्ण होतात अशी स्वामींची ख्याती चहूदिशांना पसरत होती.त्यामुळे दुरदुरुन भक्त बंकटलालांच्या घरी स्वामींच्या दर्शनासाठी येत असत. मनातील ईच्छा पूर्ण होण्यासाठी नवस सुद्धा बोलत असत.त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्या की, शेगावला स्वामींच्या दर्शनासाठी येऊन नवसाची सांगता करीत. असेच काही भक्त ज्यांच्या मनोकामना स्वामींच्या चरणी भाव धरल्यामुळे पूर्ण झाल्यात, ते काशीला विश्वेश्वर स्वामींच्या दर्शनासाठी आले होते.धर्मशाळेत वास्तव्यास असतांना त्यांची भेट एका मराठी भाषिक साधूशी झाली. गप्पाच्या ओघात त्यांनी काशीच्या साधूला शेगावच्या स्वामी विषयी माहिती दिली की ,स्वामी हे श्रोत्रीय ब्रम्हनिष्ठ सद्गुरु आहेत.ते भक्तांच्या मनातील भावना जाणतात म्हणजे ते अंतर्यामी आहेत.काशीच्या साधूलाही वाटलं की अशा सद्गुरुंपासून दीक्षा घेतल्यास आपल्याला भगवंताचे दर्शन होऊ शकेल.कारण सद्गुरुंना शरण गेल्याशिवाय भगवंताचे दर्शन व अपरोक्षानुभूती होणारच नाही हे त्याला माहीत होते.म्हणून त्याने काशीत बसून नवस केला की, स्वामी मी हातात समीधा घेऊन न येता गांजा घेऊन शेगावला येत आहे. कारण काशीतील वैराग्यवान साधूंना विश्वनाथ स्वामींच्या भक्तांकडून गांजा सहज उपलब्ध होतो.मी विश्वेश्वरांचा वैराग्यवान अकाम उपासक आहे.
हा नवस केल्यानंतर गोसाव्यास काही दिवसातच उपासना करतांना दिव्य अनुभूती येऊ लागली व एके दिवशी तो गोसावी डोक्यावर फाटलेला भगवा दुपट्टा, काखेत झोळी व जीर्ण लंगोटी नेसून शेगावात नवस सांगता करण्यासाठी आला. त्यांच्या खांद्यावर मृगाजीन होते. म्हणजे साधू उपासक होता. मृगाजीनावर बसून उपासना करण्याचा त्याचा परिपाठ होता. स्वामींच्या दर्शनासाठी भक्त बंकटलालच्या घरी येत होते.त्यांच्यात मिसळून गोसावी दूर कोपऱ्यात कोणाशीही न बोलता एकटा बसला. तो विचार करु लागला की स्वामींच्या सभोवताली धनवान माणसे बसली आहेत.येथे कोणीही गंजेडी दिसत नाही.ह्या लोकांच्या उपस्थितीत मी माझ्या नवस सांगतेची गोष्ट काढली तर लोक मला असभ्य समजतील. परंतू मला तर नवस फेडायचा आहे. असे अनेक विचार त्याच्या मनात घोंघावत होते.स्वामींनी हे सर्व जाणले.व त्यांनी बंकटास कोपऱ्यात बसलेल्या काशीच्या गोसाव्यास समोर आणावयास सांगितले. गोसाव्याने समोर येऊन स्वामींच्या चरणार्विंदावर मस्तक ठेवले.तेंव्हा स्वामींनी त्याच्या काखेतील झोळी हिसकली. व त्यातून गांजाची पुडी व चिलीम काढली.व गोसाव्यास सांगितले की गांजा घोटून चिलीम भर म्हणजे आपण गांजा फुंकु.हे शब्द ऐकून गोसावी थोडासा घाबरला व विचार करु लागला की, स्वामींना गांजा बाबत कसे कळले.परंतू स्वामी अंतर्यामी आहेत हे जे त्याने तीर्थयात्रींकडून काशीला ऐकले होते त्याचा त्याला प्रत्यय आला. म्हणून गोसावी स्वामींना नम्रतेने म्हणाला की, मी गांजा घोटून चिलीम भरतो व आपण गांजा फुंकु सुद्धा.पण सद्गुरुस माझी एक विनंती आहे की,मी काशीला परत गेल्यावर, मला आपल्या भेटीची ओढ झाल्यास आपली सिद्ध भेट गांजा ओढतांना व्हावी म्हणून आपण वरचेवर गांजा ओढावा अशी माझी ईच्छा आहे.म्हणजे प्रत्येक भेटीत मी सद्गुरुंना वंदन करीन.हे गोसाव्याचे वाक्य ऐकून स्वामी विचारात पडले.व नंतर त्याची विनंती मान्य केली.
बंकट तो आणा आणा
गोसावी पाहुणा आणा
हिसकली फुकणी,फुकविणी
घोटा,घोटा शंभिणी
देवा, देवा असे कसे?
गांजा गंजेडी म्हणे असे
गांजा मोडून घोटू जरी
घोट घोटूनी ओढू जरी
*ओढ ओढता भेटू जरी*
*ओढा गांजा वरी वरी*
गांजा गाजो गणगणराम
सिता सितापती सीताराम।।ॐ।।
म्हणजे गोसाव्याने गांजाचे निमित्त करून स्वामींना सिद्ध भेटीचे दान मागितले.तसेच जर कोणत्याही भक्ताने आपणास चिलीमधारी रुपात उपासनेसाठी आलंबन बनविल्यास त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात.म्हणजे जर कोल्हापूरच्या श्रीधर काळे प्रमाणे "भूती काम" म्हणजे भौतिक सुख साधनांच्या ईच्छेने चिलीमधारी स्वामींची उपासना केल्यास त्याचा हेतू पूर्ण व्हावा. तसेच निष्काम भक्ताने चिलीमधारी रुपात स्वामींची उपासना केल्यास त्यास हिरण्यगर्भावस्था प्राप्त व्हावी.म्हणून स्वामींच्या उपासकांमधे चिलीम धारी रुपाचे आलंबन अकाम भक्तास विशेष आवडते .कारण त्यामुळे शरीराचे उपादान कारण नृबीज नष्ट होते.व पुन्हा त्याचा मृत्यु लोकात जन्म होत नाही. म्हणून स्वामींची कामनारहित होऊन चिलीमधारी रुपात उपासना करावी.
आणि उपासना सिद्ध झाल्यास उपासक वृती रहित होऊन आपल्यातच आपली आपल्याशीच भेट होते.
म्हणजे काशीच्या गोसाव्याने स्वानंदाच्या अनुभूती साठी,व त्या निमित्ताने स्वामींची त्यांच्याबरोबर सिद्ध भेट व्हावी म्हणून, सद्गुरुंनीच गांजा ओढावा असा नवस केला व करुणाकरा ने सर्व भक्तांच्या हितासाठी गांजाची चिलीम ओठास लावली. स्वामी भक्तांना वरवर गांजा फुंकतांना दिसत असले तरी त्यांच्या अंतरी अखंड हरिनाम जप सुरूच असतो.त्यांची जगातील कोणत्याही वस्तूत आसक्ती नव्हती . अधूनमधून स्वामी वेदांच्या ऋचा म्हणत.म्हणजे स्वामी वैदिक शास्त्र किंवा वेदान्ताचे मर्मज्ञ होते. स्पष्ट सांगायचे तर स्वामी सर्वज्ञ, सर्वव्यापी, सर्वशक्तिमान होते. चंदन चावल बेलकी पतीया हे मीराबाई चे भजन आवडीने म्हणत असत. पौराणीक कथांचे मर्म सांगत.असे असतांना गोसाव्याने केलेला गांजाचा नवस विश्वेश्वराच्या सत्य संकल्पानेच प्रेरीत होऊन काशीच्या गोसाव्याने केला असावा असे वाटते. कारण दासगणू महाराज गजानन विजय ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात लिहीतात की,माघ वद्य सप्तमीस जेंव्हा स्वामी पहिल्यांदा पातुरकरांच्या वाड्यसमोर दिसले तेव्हा त्यांच्या जवळ पाणी पिण्यासाठी एक भोपळा होता व त्यांनी स्वत: बनविलेली मातीची चिलीम होती. सप्तमीस तर कोणी नवस केला नव्हता. मग त्यांच्या जवळ चिलीम असण्याचे कारण काय ?
पात्र पाणी प्यावयाचे |होता एक भोपळा ॥८९॥
कच्ची चिलीम हातात | ती होती त्यांची स्वकृत |कुंभाराच्या भट्टीप्रत | जिने नव्हते पाहीले ॥९०॥
म्हणून ही चिलीम काशी विश्वेश्वराचा सत्य संकल्प वाटतो.व गोसावी निमीत्त वाटतो.
फुंके गांजा वरीवरी
गावे अंतरी हरि हरि
जीव,जीवनामृत, जीवनाधार
जीवनरस जीवनरससार
जीवन जगती असे जसे
पद्मपत्र पाण्यात जसे
रसरसलेली गीत असे
शारदेचे संगीत असे
ब्रम्हाचे निःश्वास असे
पुराणोक्त विविधान असे
विधी विधाने गणगणराम
सिता सितापती सीताराम।।ॐ।।
रघुपती राघव राजाराम
पतित पावन सिताराम
श्री गणगणरामार्पणमस्तू
जगन्नाथ गांधी
मुंबई मालाड (प)
९७६९५१८८५८






