![]() |
11वी,12वी Arts, Commerce, Science विषयांचे मराठी नोट्स, PDF, प्रश्नपत्रिका व मार्गदर्शन तसेच साहित्य.
मंगळवार, १९ मे, २०२६
एक सुंदर अनुभव
मंगळवार, ३ फेब्रुवारी, २०२६
अध्याय ३ - लेख क्रमांक १ श्री गजानन महाराज शेगाव
अध्याय ३ - लेख क्रमांक १ श्री गजानन महाराज शेगाव
*श्री गणगणरामाय नमः*
अध्याय तिसरा
लेख क्रमांक १
*काशीच्या गोसाव्याचा नवस*
वंदितो काशी काशेश्वरा
हर हर विश्वी विश्वेश्वरा
काशी,काशीपती,काशीनाथ
काश्याधिपती केशवनाथ
काशी रंग रंगाया या
काशी संग संगाया या
केशरी रंग रंगाया या
केशरी कथा कथाया या
*कथा सुत्र उकलाया या*
कथासुत्र कळवाया या
कळवून कळविती गणगणराम
सिता सितापती सीताराम।।ॐ।।
शेगावचे स्वामी हे श्रोत्रीय ब्रम्हनिष्ठ सद्गुरु असून त्यांच्या चरणी श्रद्धा,भक्ती असल्यास भक्तांच्या मनोकामना सहज पूर्ण होतात अशी स्वामींची ख्याती चहूदिशांना पसरत होती.त्यामुळे दुरदुरुन भक्त बंकटलालांच्या घरी स्वामींच्या दर्शनासाठी येत असत. मनातील ईच्छा पूर्ण होण्यासाठी नवस सुद्धा बोलत असत.त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्या की, शेगावला स्वामींच्या दर्शनासाठी येऊन नवसाची सांगता करीत. असेच काही भक्त ज्यांच्या मनोकामना स्वामींच्या चरणी भाव धरल्यामुळे पूर्ण झाल्यात, ते काशीला विश्वेश्वर स्वामींच्या दर्शनासाठी आले होते.धर्मशाळेत वास्तव्यास असतांना त्यांची भेट एका मराठी भाषिक साधूशी झाली. गप्पाच्या ओघात त्यांनी काशीच्या साधूला शेगावच्या स्वामी विषयी माहिती दिली की ,स्वामी हे श्रोत्रीय ब्रम्हनिष्ठ सद्गुरु आहेत.ते भक्तांच्या मनातील भावना जाणतात म्हणजे ते अंतर्यामी आहेत.काशीच्या साधूलाही वाटलं की अशा सद्गुरुंपासून दीक्षा घेतल्यास आपल्याला भगवंताचे दर्शन होऊ शकेल.कारण सद्गुरुंना शरण गेल्याशिवाय भगवंताचे दर्शन व अपरोक्षानुभूती होणारच नाही हे त्याला माहीत होते.म्हणून त्याने काशीत बसून नवस केला की, स्वामी मी हातात समीधा घेऊन न येता गांजा घेऊन शेगावला येत आहे. कारण काशीतील वैराग्यवान साधूंना विश्वनाथ स्वामींच्या भक्तांकडून गांजा सहज उपलब्ध होतो.मी विश्वेश्वरांचा वैराग्यवान अकाम उपासक आहे.
हा नवस केल्यानंतर गोसाव्यास काही दिवसातच उपासना करतांना दिव्य अनुभूती येऊ लागली व एके दिवशी तो गोसावी डोक्यावर फाटलेला भगवा दुपट्टा, काखेत झोळी व जीर्ण लंगोटी नेसून शेगावात नवस सांगता करण्यासाठी आला. त्यांच्या खांद्यावर मृगाजीन होते. म्हणजे साधू उपासक होता. मृगाजीनावर बसून उपासना करण्याचा त्याचा परिपाठ होता. स्वामींच्या दर्शनासाठी भक्त बंकटलालच्या घरी येत होते.त्यांच्यात मिसळून गोसावी दूर कोपऱ्यात कोणाशीही न बोलता एकटा बसला. तो विचार करु लागला की स्वामींच्या सभोवताली धनवान माणसे बसली आहेत.येथे कोणीही गंजेडी दिसत नाही.ह्या लोकांच्या उपस्थितीत मी माझ्या नवस सांगतेची गोष्ट काढली तर लोक मला असभ्य समजतील. परंतू मला तर नवस फेडायचा आहे. असे अनेक विचार त्याच्या मनात घोंघावत होते.स्वामींनी हे सर्व जाणले.व त्यांनी बंकटास कोपऱ्यात बसलेल्या काशीच्या गोसाव्यास समोर आणावयास सांगितले. गोसाव्याने समोर येऊन स्वामींच्या चरणार्विंदावर मस्तक ठेवले.तेंव्हा स्वामींनी त्याच्या काखेतील झोळी हिसकली. व त्यातून गांजाची पुडी व चिलीम काढली.व गोसाव्यास सांगितले की गांजा घोटून चिलीम भर म्हणजे आपण गांजा फुंकु.हे शब्द ऐकून गोसावी थोडासा घाबरला व विचार करु लागला की, स्वामींना गांजा बाबत कसे कळले.परंतू स्वामी अंतर्यामी आहेत हे जे त्याने तीर्थयात्रींकडून काशीला ऐकले होते त्याचा त्याला प्रत्यय आला. म्हणून गोसावी स्वामींना नम्रतेने म्हणाला की, मी गांजा घोटून चिलीम भरतो व आपण गांजा फुंकु सुद्धा.पण सद्गुरुस माझी एक विनंती आहे की,मी काशीला परत गेल्यावर, मला आपल्या भेटीची ओढ झाल्यास आपली सिद्ध भेट गांजा ओढतांना व्हावी म्हणून आपण वरचेवर गांजा ओढावा अशी माझी ईच्छा आहे.म्हणजे प्रत्येक भेटीत मी सद्गुरुंना वंदन करीन.हे गोसाव्याचे वाक्य ऐकून स्वामी विचारात पडले.व नंतर त्याची विनंती मान्य केली.
बंकट तो आणा आणा
गोसावी पाहुणा आणा
हिसकली फुकणी,फुकविणी
घोटा,घोटा शंभिणी
देवा, देवा असे कसे?
गांजा गंजेडी म्हणे असे
गांजा मोडून घोटू जरी
घोट घोटूनी ओढू जरी
*ओढ ओढता भेटू जरी*
*ओढा गांजा वरी वरी*
गांजा गाजो गणगणराम
सिता सितापती सीताराम।।ॐ।।
म्हणजे गोसाव्याने गांजाचे निमित्त करून स्वामींना सिद्ध भेटीचे दान मागितले.तसेच जर कोणत्याही भक्ताने आपणास चिलीमधारी रुपात उपासनेसाठी आलंबन बनविल्यास त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात.म्हणजे जर कोल्हापूरच्या श्रीधर काळे प्रमाणे "भूती काम" म्हणजे भौतिक सुख साधनांच्या ईच्छेने चिलीमधारी स्वामींची उपासना केल्यास त्याचा हेतू पूर्ण व्हावा. तसेच निष्काम भक्ताने चिलीमधारी रुपात स्वामींची उपासना केल्यास त्यास हिरण्यगर्भावस्था प्राप्त व्हावी.म्हणून स्वामींच्या उपासकांमधे चिलीम धारी रुपाचे आलंबन अकाम भक्तास विशेष आवडते .कारण त्यामुळे शरीराचे उपादान कारण नृबीज नष्ट होते.व पुन्हा त्याचा मृत्यु लोकात जन्म होत नाही. म्हणून स्वामींची कामनारहित होऊन चिलीमधारी रुपात उपासना करावी.
आणि उपासना सिद्ध झाल्यास उपासक वृती रहित होऊन आपल्यातच आपली आपल्याशीच भेट होते.
म्हणजे काशीच्या गोसाव्याने स्वानंदाच्या अनुभूती साठी,व त्या निमित्ताने स्वामींची त्यांच्याबरोबर सिद्ध भेट व्हावी म्हणून, सद्गुरुंनीच गांजा ओढावा असा नवस केला व करुणाकरा ने सर्व भक्तांच्या हितासाठी गांजाची चिलीम ओठास लावली. स्वामी भक्तांना वरवर गांजा फुंकतांना दिसत असले तरी त्यांच्या अंतरी अखंड हरिनाम जप सुरूच असतो.त्यांची जगातील कोणत्याही वस्तूत आसक्ती नव्हती . अधूनमधून स्वामी वेदांच्या ऋचा म्हणत.म्हणजे स्वामी वैदिक शास्त्र किंवा वेदान्ताचे मर्मज्ञ होते. स्पष्ट सांगायचे तर स्वामी सर्वज्ञ, सर्वव्यापी, सर्वशक्तिमान होते. चंदन चावल बेलकी पतीया हे मीराबाई चे भजन आवडीने म्हणत असत. पौराणीक कथांचे मर्म सांगत.असे असतांना गोसाव्याने केलेला गांजाचा नवस विश्वेश्वराच्या सत्य संकल्पानेच प्रेरीत होऊन काशीच्या गोसाव्याने केला असावा असे वाटते. कारण दासगणू महाराज गजानन विजय ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात लिहीतात की,माघ वद्य सप्तमीस जेंव्हा स्वामी पहिल्यांदा पातुरकरांच्या वाड्यसमोर दिसले तेव्हा त्यांच्या जवळ पाणी पिण्यासाठी एक भोपळा होता व त्यांनी स्वत: बनविलेली मातीची चिलीम होती. सप्तमीस तर कोणी नवस केला नव्हता. मग त्यांच्या जवळ चिलीम असण्याचे कारण काय ?
पात्र पाणी प्यावयाचे |होता एक भोपळा ॥८९॥
कच्ची चिलीम हातात | ती होती त्यांची स्वकृत |कुंभाराच्या भट्टीप्रत | जिने नव्हते पाहीले ॥९०॥
म्हणून ही चिलीम काशी विश्वेश्वराचा सत्य संकल्प वाटतो.व गोसावी निमीत्त वाटतो.
फुंके गांजा वरीवरी
गावे अंतरी हरि हरि
जीव,जीवनामृत, जीवनाधार
जीवनरस जीवनरससार
जीवन जगती असे जसे
पद्मपत्र पाण्यात जसे
रसरसलेली गीत असे
शारदेचे संगीत असे
ब्रम्हाचे निःश्वास असे
पुराणोक्त विविधान असे
विधी विधाने गणगणराम
सिता सितापती सीताराम।।ॐ।।
रघुपती राघव राजाराम
पतित पावन सिताराम
श्री गणगणरामार्पणमस्तू
जगन्नाथ गांधी
मुंबई मालाड (प)
९७६९५१८८५८
सोमवार, २ फेब्रुवारी, २०२६
अध्याय २ - लेख क्रमांक ६ श्री गजानन महाराज शेगाव
अध्याय २ - लेख क्रमांक ६ श्री गजानन महाराज शेगाव
श्री गणगणरामाय नमः
लेख क्रमांक ६
*अध्याय दुसरा*
*मंगल स्नानी स्नान करे*
गुरुवारी , विजया एकादशीला गोविंदबुवा टाकळीकरांचे किर्तन मोट्याच्या महादेव मंदिरात संपन्न झाले. किर्तनात गोविंदबुवां च्या स्वामींबरोबर झालेल्या प्रश्नोत्तरामुळे बंकट व पितांबर भारावल्या गेले होते.स्वामींनी बंकटास,तुझ्याजवळ भावभक्ती होती म्हणून मी तुला दुसऱ्यांदा भेटलो, असे वाक्य बोलल्यामुळे बंकट आशावादी होते की,स्वामी त्यांना तिसऱ्या वेळेसही भेटतील. म्हणून शुक्रवारी बंकटांनी आपल्या वडिलांना म्हणजे भवानीराम शेठजींना गोविंद बुवांच्या किर्तनात स्वामींनी प्रश्नोत्तराचा भरलेला रंग कथन केला. गोविंदबुवां स्वामींच्या पाया पडून स्वामींना मंदिरात चलण्याची विनंती करु लागले तेंव्हा स्वामींनी जागेवरुनच गोविंदबुवां ना दिलेला भागवत वत् जगण्याचा उपदेश त्यांनी कीर्तनातून कथन केला. त्याच प्रमाणे त्याने स्वत: आसोलकरांच्या येथून भिक्षा मागून आणलेली भाजी भाकर स्वामी जेवत असतांना,त्यांनी पिताबरास नाल्यातून तुंबा बुडवून पाणी आणण्यास सांगितले .तेंव्हा तुंबा नाल्यात ज्या ठिकाणी बुडविला त्या ठिकाणी खड्डा पडून शुद्ध निर्मळ जल तुंब्यात आले.तेच निर्मळ जल स्वामी प्यायल्यानंतर त्यांनी मला सुपारीचे खांड मागितले. तेंव्हा भवानीराम शेठजींना आश्चर्य वाटले.ही वेळ साधून बंकटाने वडिलांजवळ स्वामींना आपल्या घरी आणून गुरुपूजन करण्याचा मनोदय व्यक्त केला.त्यास भवानीराम शेठजींनी संमती दिली.
शनिवारी बंकटाचा प्रदोष व्रत होता.प्रदोष व्रतामुळे स्वामींना घरी आणण्यास प्रतिबंध निर्माण करणारे दोष नष्ट होऊन, शिवाय पूर्वसुकृता मुळे निर्माण झालेले, अपूर्व, श्रीहरि च्या आज्ञेने फळ देण्यास प्रवृत्त झाले
प्रदोषी दोष नष्ट झाले
पर्वापूर्व काळ आले
अशा भाग्यवान बंकटाला रसरस भक्तीचा आनंद प्राशन करविण्यासाठी , मोट्याच्या मंदिराजवळील माणिक चौकात, आता त्याला सावता माळी चौक म्हणतात त्या ठिकाणी संध्याकाळी गोधुली वेळेस ज्ञानसूर्य प्रगट झाले. माउली ज्ञानेश्वरीच्या सोळाव्या अध्यायाची सुरवात करतांनाच आपल्या सद्गुरुस वंदन करतात.
मावळवीत विश्वाभासु । नवल उदयला चंडाशु । अद्वयाब्जिनी विकाशु। वंदू आता।।१।।
अर्थ:- श्री माऊलींनी श्रीसद्गुरुला ज्ञानरुपी सुर्याची उपमा देऊन रुपक केले आहे.ते म्हणतात विश्वरुपी आभास नाहीसा करुन, अद्वैत स्थिती रुपी कमलाचा विकास करणारा आश्चर्यकारक सद्गुरु रुपी सुर्य उगवला आहे.त्या ज्ञानरुपी सुर्याला माझे वंदन असो.
माउलींनी सद्गुरु स्वरूप ज्ञान सुर्याची तुलना भौतिक, रोज उगवणाऱ्या व मावळणार्या सुर्याशी फारच सुंदर रितीने केली.ते म्हणतात, भौतिक सुर्य उगवला की द्वैतरूपी जगाचे व्यवहार प्रकाशीत होतात पण सद्गुरु स्वरूप ज्ञान सुर्य उगवला की द्वैत मावळते व अद्वैत प्रकाशीत होते.अशा परब्रम्हाला मौनातूनच वंदन केले पाहीजे.अशाच प्रकारचे वंदन मौनातून करतांना बंकट स्वामींच्या पाया पडले.व स्वामींना घरी चलण्याची विनंती केली. स्वामींनी "जशी तुझी ईच्छा" म्हणत त्यांच्या प्रस्तावास संमती दिली.
सद्गुरु ची कीर किर्ती अशी
ईच्छा ईच्छे भक्त जशी
स्वामी बंकटा बरोबर घरी येत असतांना त्यांच्या पाठीमागे बरेच लोक बंकटाच्या घरी आले.त्यामधे काही गोविंदबुवांच्या किर्तनास उपस्थित असलेले होते.तर काही बघे होते.स्वामी घरी पोहोचल्यावर भवानीराम शेठजींनी स्वामींना साष्टांग दंडवत घालून उच्चासनावर बसविले.नंतर शेठजींनी परातीत स्वामींचे पादपद्म ठेवून धुतले. व पादपद्मांची पूजा करुन, महादेवाची आरती गाऊन स्वामींना ओवाळले.
रसयुक्त पदार्थांची रसोई तयार झाल्यानंतर स्वामींच्या साठी जेवणाचे ताट वाढण्यात आले. रसयुक्त पदार्थ व फळे ताटीकात वाढले.व ईतर पदार्थ ताटात वाढले.स्वामी प्रसादी ग्रहण करण्यासाठी बसल्यावर स्वामींनी सर्व पदार्थांचा काला करुन जेवण्यास सुरवात केली.ताटातील काला संपल्यावर शेठजींनी पुन्हा पदार्थ ताटात वाढले.तेही स्वामींनी खाल्ले.शेठजी हौसेने वाढत होते आणि स्वामी त्यांची हौस पुरवित होते.अशाप्रकारे स्वामी तीन शेर अन्न जेवले.नंतर शेठजींनी स्वतःच वाढ थांबविली.स्वामी बंकट च्या घरी आले आहेत ही वार्ता लवकरच गावात पसरली. त्यामुळे गावातील पुष्कळ लोक स्वामींच्या दर्शनासाठी आले त्यामुळे घराला गोकुळाचे स्वरुप प्राप्त झाले होते.
रात्री स्वामींना मऊ गादी असलेल्या सागी पलंगावर निजविले. सकाळी प्रातर्विधी उरकल्यावर स्वामींच्या स्नानाची तयारी केली. वास्तविक स्वामींचे आंतरीक मंगल स्नान झालेलेच होते.
मंगलस्नानी स्नान करे
नर नारी घागरी भरे
शीतोष्णक जल जलधारा
हर हर गंगे गंगधारा
गंध सुगंध उधळे वारा
स्नायु स्नानविती धारा
स्नायु साबणे रगरगडून
ईत्र ईत्ररे वरी चपडून
चपडून चपडवी गणगणराम
सिता सितापती सीताराम।।ॐ।।
विचार केला तर, प्रत्येकाचे अंतःकरण शुद्ध सात्विकच आहे.कारण पृथ्वी , आप, तेज, वायु,आकाश ह्या पंचमहाभूतांच्या सात्विक अंशाच्या मिश्रणाने प्रत्येकाचे अंतःकरण बनले आहे.परंतू माणसाने आपली जीवसृष्टी निर्माण करुन अंतकरणात राग ,द्वेष,अहंता ममता इत्यादी दोष भरुन ठेवले आहेत.म्हणून अंतकरणात आलेली ही अशुद्धता आगंतुक आहे.जसे पाणी मुळात थंड, शितल आहे.ह्या पाण्याला अग्नी च्या सहाय्याने तापविले तर पाणी गरम होते. म्हणजे ही उष्णता आंगतुक आहे.ही उष्णता नष्ट करण्यासाठी अग्नी विझवा व पाणी तसेच पडून राहू द्या.थोड्या वेळाने पाणी आपोआप थंड होईल.त्याचप्रमाणे विषयात चित्त व चित्तात विषय घुसले तर विषय त्यागासाठी,चित्ताला विषयापासून दूर करणे हा उपाय आहे.परंतू आपण विषयापासून जरी दूर झालो तरी चित्त विषयाचे स्मरण करीतच राहते.म्हणजे अग्नी पेटलेलाच राहतो.मी विषया शिवाय जिवंत राहू शकत नाही ही वेडी कल्पना दूर करण्यासाठी राजमार्ग म्हणजे परमेश्वराचे रुप डोळ्यात साठवून, नामस्मरण करावे. दीर्धकाळ नामस्मरण केल्यास व सद्गुरुच्या कृपेने परमेश्वराच्या दिव्य गुणांविषयी आवड निर्माण झाल्यास,आपण विषयांना दिलेली सत्यत्व बुद्धी गळुन पडते.कारण आपणांस विषयांपेक्षा भव्यदिव्य वस्तू मिळाली आहे.म्हणून साधू संत नामस्मरण करण्यास सांगतात.
आता स्वामींच्या शरीराचे स्नान होणार होते.म्हणून विहीरीच्या कोमट पाण्याने स्वामींना सर्वप्रथम बाया, माणसांनी "हर हर गंगे" म्हणत अभिषेक केला.नंतर स्नायुंना सुगंधीत साबणाने रगडून स्वच्छ केले.हेच बाह्य शरीराचे दोषापयन झाले.नंतर निरनिराळे अत्तर, सुगंधी तेल शरीराला चपडले अत्तराचा सुगंध वाऱ्यामुळे आजूबाजूला पसरुन वातावरण सुगंधित झाले होते.म्हणजे हे शरीराचे गुणाधान झाले.नंतर स्वामींना पिताबर नेसवून गुरु स्थानी बैसविले.स्वामीना पगडी धारण करवून मस्तकावर चंदन, बुक्का,टीळा लावला.व सद्गुरुंचे पूजन केले.ह्यावेळेस स्वामी सनकादिकांप्रमाणे शोभून दिसत होते.ही स्वामींच्या शरीराची हीनांगपूर्ती होय.स्वामींच्या अभ्यंगस्नानास व गुरुपूजनास बंकटाच्या घरी बरीच मंडळी जमली होती.
जमलेल्या मंडळी मधून काही लोक स्वामींना गुरुपूजनास घरी घेऊन जाण्यासाठी शेठजी जवळ आग्रह धरु लागले. शेठजींनी सुद्धा स्वामींना ज्यांची श्रद्धा आहे अशा भक्तांच्या घरी बंकटाबरोबर पाठविले. बंकटाचे महत् भाग्य म्हणजे प्रत्येकाच्या घरी गुरुपूजन सोहळ्यास बंकट उपस्थित होते.
सोमवारी संध्याकाळी, सोमवती अमावस्येला ईच्छाराम शेठजी स्नान करून बंकटाच्या घरी आले.स्वामींना साष्टांग दंडवत घातला व स्वामींच्या समोर हात जोडून उभे राहिले. दृष्टी चरणावर ठेवून स्वामींना घरी भोजनास्तव चलण्यास विनंती करु लागले.स्वामींनी "मला भुक नाही" असे म्हणून त्यांच्या घरी चलण्यास असमर्थता दर्शवली. पण ईच्छाराम शेठजी आग्रहाने म्हणू लागले,स्वामी आपण पुष्कळ भक्तांच्या घरी गेले.मी सुद्धा ईतर भक्ताप्रमाणे आपला भक्त आहे. त्यामुळे माझी सुद्धा ईच्छा पुरवावी ही आग्रहाची विनंती. शिवाय मी स्वयंपाकाची तयारी रविवारीच केली होती.व आता स्वयंपाक तयार आहे. आपण न आल्यास मी उपवास सोडणार नाही.उपाशी राहील.पुढे आपली ईच्छा.
म्हणून स्वामी ईच्छाराम शेठजींच्या घरी जाण्यास तयार झाले.स्वामी घरी आल्यावर शेठजींनी स्वामींचे पाय धुऊन पुजन केले.व जेवण्यास बसविले.पहिल्या वेळेसच दोन माणसांना पुरेल एवढे अन्न वाढले.स्वामींनी ते सर्व खाल्ले.परंतू ईच्छाराम आग्रह करुन स्वामींना वाढू लागले.परंतू ते स्वामींना अशा पद्धतीने वाढत होते जणूकाही ते अलप वाढत आहे.हा त्यांचा वेडगळ पणाच होता.स्वामी जे समजायचे ते समजून गेले.
वाढे ढोरासम ऐसा
समजे ढोर ढोरजैसा
समजूत समजले गणगणराम
सिता सितापती सीताराम।।ॐ।।
स्वामींनी ईच्छारामांनी वाढलेले संपूर्ण जेवण संपविले.व लगेच खाल्लेल्या अन्नाची ओकारी केली. त्यामुळे स्वामींनी खाल्लेलं सारं अन्न ईच्छाराम शेठजींच्या च्या घरात ओकारी रुपाने पडलं. नंतर बंकट स्वामींना घरी घेऊन आले. स्वामींना साबणाने स्नान घातलं.ईच्छाराम शेठजींची एवढी चूक सोडली तर शेठजी प्रांजळ मनाचे होते.ते शेवट पर्यंत स्वामी भक्त होते.
त्याचवेळेस बंकटांच्या घरी सांप्रदायिक भजनाच्या दोन दिंड्या आल्या होत्या. त्यादिवशी रात्रभर भजन चालले.स्वामी सुद्धा गणगण भजन म्हणत रात्रभर भजनाचा आनंद घेत होते.
रघुपती राघव राजाराम
पतित पावन सिताराम
श्री गणगणरामार्पणमस्तू
जगन्नाथ गांधी
मुंबई मालाड (प)
९७६९५१८८५८
अध्याय २ - लेख क्रमांक ५ - श्री गजानन महाराज शेगाव
अध्याय २ - लेख क्रमांक ५ - श्री गजानन महाराज शेगाव
श्री गणगणरामाय नमः
लेख क्रमांक ५
*अध्याय दुसराप*
*भागवत वत् जगा साचे*
स्वामी देविदास पातुरकरांच्या घरासमोरील वटवृक्षाखाली जेवले.व उनाड नाल्यात शुद्ध निर्मळ जल निर्माण करुन पाणी प्यायले व निघून गेले.बंकट पुन्हा नाल्याजवळ आले तेव्हा स्वामी त्यांना दिसले नाहीत. तेंव्हापासून त्यांच्या मनाने स्वामींच्या दर्शनाचा ध्यास घेतला. व गांवभर हिंडून स्वामींना शोधू लागले. एकादशी निमित्त मोट्याच्या शिवमंदीरात गोविंद बुवा टाकळीकरांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. गोविंदबुवा विद्वान व प्रख्यात किर्तनकार होते.
मागील चार दिवसांपासून बंकट स्वामींना धुंडत होते.आज पाचव्या दिवशी बंकट पितांबरादी मित्रांबरोबर गप्पा करीत बसले.परंतू त्या गप्पांमधे बंकटांचे मन रमत नव्हते.राहून राहून बंकटांच्या मनात स्वामी विषयी विचार येत होते. पिताबंराला बंकटांने स्वामींबाबत सांगितले. ते ऐकून पितांबरांच्याही मनात स्वामींच्या दर्शनाची ईच्छा जागृत झाली. एकादशी असल्याने बंकट व पितांबर दोघांनी मोट्याच्या मंदिरात महादेवाचे दर्शन घेऊन किर्तन ऐकण्याचे ठरविले. त्यासाठी ईतर मित्रांना कटवून बंकट व पितांबर दोघे मंदिरात दर्शनासाठी निघाले. महादेव मंदिरासमोर असलेल्या कडूनिंबाच्या झाडावर बसलेली टिटवी टिटवू लागल्यामुळे बंकटाचे लक्ष झाडावरील टिटवी कडे गेले.तेंव्हा बंकटाला स्वामीं झाडाच्या सहाऱ्याने पहुडले असलेले आढळले. स्वामींना बघून दोघांनाही आनंद झाला.व लगेच स्वामीजवळ येऊन दोघे स्वामींच्या पाया पडून जेवणाची विनंती करु लागले.
तेंव्हा स्वामी बंकटाला म्हणाले की,तुझी गरज असेल तर आसोलकर माळीणीच्या घरी भिक्षा मागून भाकर आण. त्याप्रमाणे बंकट आसोलकरांच्या घरी गेले. व माळीणबाईंना भाकर मागितली. माळीणबाईंनी दिलेली भाजी भाकर बंकटांनी स्वामींना अर्पण केली. स्वामीं भाजी भाकर जेवू लागले. जेवतांना स्वामी पितांबराला म्हणाले, ह्या तुंब्यात उनाड नाल्यातून पाणी भरुन आण.कोणाच्याही घरुन पाणी आणू नकोस. पितांबर तुंबा घेऊन उनाड नाल्याजवळ आले. नाल्यात पायाची तळवे भिजतील एवढेही पाणी नव्हते.परंतू स्वामींचा आदेश म्हणून पितांबरांनी तुंबा नाल्यात बुडविला.आणि ज्या ठिकाणी तुंबा बुडविला त्या ठिकाणी खड्डा पडून शुद्ध निर्मळ जल वर आले.व त्या निर्मळ जलाने तुंबा भरल्या गेला.हे बघून पितांबर आश्चर्यचकित झाले. परिणामी, तुंब्यातील निर्मळ जला प्रमाणेच पितांबरांचे हृदय भक्तीने भरुन गेले. भरलेला तुंबा घेऊन पितांबर स्वामीजवळ आले.स्वामींचं जेवण झाले होते.स्वामी तुंब्यातील गंगाजल प्यायले.तेंव्हा बंकटाने "पंढरीनाथ भगवान की जय"असा जयघोष केला. व खिश्यातून काही चिल्लर पैसे काढून स्वामींना देऊ केले.तेंव्हा स्वामी म्हणाले ह्या दक्षिणेची गरज जे साधू संन्याशी व्यापारीवृत्तीचे असतात त्यांना असते. तुझ्याजवळ भाव भक्ती होता म्हणून मी तुला दुसऱ्यांदा भेटलो. पहिल्या वेळेस तू पातुरकरांच्या येथून जेवण आणले. आता आसोलकरांच्या येथून जेवण आणले.म्हणजे तुझी पंढरी परभारे झाली व फुकटात पंढरीनाथाची प्रसादी सुद्धा मिळाली.आता तुझ्या खिशात असलेलं सुपारीचे खांड काढ व मला दे.स्वामींनी सुपारी खाल्ली. मग स्वामी म्हणाले आता दोघेही किर्तनात जा.व लक्ष देउन किर्तन ऐका.
गोविंदबुवा किर्तनात आले. त्यांचा संगीताचा अभ्यास असल्यामुळे ते एकच अभंग निरनिराळ्या रागात गाऊन दाखवत. शास्त्रीय विषय तोही संगीतातून. म्हणून त्यांच्या किर्तनाला आजु बाजुच्या खेडेगावातून बरीच धार्मिक मंडळी हजेरी लावायची. त्यामुळै त्यांना दक्षिणा सुद्धा भरपूर मिळत असे.परंतू पैसा कितीही मिळाला तरी तो अधिकाधिक जमा करण्याचा मोह आवरणे अशक्य असते.त्यामुळे कीर्तनाच्या बरोबर वित्ताची अभिलाषा सुद्धा विद्वान पुरुषाचा स्थायी भाव होतो.म्हणून गोविंद बुवा अत्यंत विद्वान किर्तनकार असून सुद्धा त्यांचे वागणं भागवत वत् न होता ते भागवतात भाग घेतल्या प्रमाणे होत होते.कारण भागवत ह्या शब्दाची फोड (१) भाग (२) वत् ,अशी केल्यास, भागवतकाराच्या दोन संभावना निर्माण होतात.(१) भागवतात भाग घेणारा किर्तनकार किंवा (२) भागवत वत् होणारा किर्तनकार
जे किर्तनकार भागवतात भाग घेतात त्यांना मिळणारे फळ हे शाळेत शाळकरी मुले जसे शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतात त्या प्रमाणे होते. म्हणजे प्रेक्षकांचे मनोरंजन व भाग घेणाऱ्यांना संस्थेकडून प्रमाणपत्र.परंतू जे किर्तनकार परमेश्वराचे नाम संकीर्तन करीत किर्तन करतात ते किर्तन त्या किर्तनकाराची साधना होते.
गोविंद बुवांनी गजरागजर संपल्यावर पदे गाईली व नंतर हंसगीतेतील प्रसंग निरुपणास सुरवात केली. त्यात गोविंदबुवा म्हणाले ,एकदा सनकादिकांनी ब्रम्हदेवास प्रश्न विचारला की, विषय चित्तात व चित्त विषयात शिरले की विषय त्याग शक्य होत नाही.तर तो कसा करावा.परंतू ह्या प्रश्नाचे उत्तर ब्रम्हदेवांना सुचले नाही.म्हणून मानस पुत्रांची जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी त्यांनी सच्चिदानंद स्वरुप परब्रम्हाचे म्हणजे श्रीहरि चे स्मरण केले.व ब्रम्हदेवाच्या आळवण्याने श्रीहरि हंसरुपाने सनकादिक ऋषी व ब्रम्हदेवासमोर अवतीर्ण झाले.हे हंस कोण आहेत हे ब्रम्हदेव सुद्धा जाणू शकले नाहीत. परंतू आपले अज्ञान लपविण्यासाठी ब्रम्हदेव काहीच बोलले नाहीत. म्हणून सनक ऋषींनी हंसस्वरुप श्रीहरिंना विचारले की "तुम्ही कोण" त्यावर कडूनिंबाच्या झाडाजवळ बसलेले परमहंस स्वामी जागेवरुनच उत्तरले की, "जो तू आहेस ,तोच मी आहे" . हे उत्तर ऐकून गोविंद बुवा व श्रोते चकीत झाले. परंतू गोविंद बुवांनी पुन्हा प्रश्न उपस्थित केला की, तुम्ही व मी निरनिराळे आहोत. मग तुम्ही व मी एक कसे?
त्यावर परमहंस स्वामी म्हणाले "तू देहाच्या दृष्टीने विचारतोस की चैतन्याचा दृष्टीने ?".त्यावर गोविंद बुवा म्हणाले"दोन्ही दृष्टीने".
पुन्हा परमहंस स्वामी म्हणाले तुझा आणि माझा देह एकाच पंचिकृत पंचमहाभूतांनी बनलेला असून दोघांच्याही शरीरात नव्हे नव्हे चराचर विश्वात एकच ब्रम्हचैतन्य ओतप्रोत भरले आहे.म्हणून जो तू आहेस तोच मी आहे.
किर्तनी उद्धब ऊधे प्रश्ना
ऊत्तर ऊते हंसकृष्णा
उत्तर ऊते प्रश्नोप्रश्नी
गोविंद बुवास श्रीकृष्णी
प.पू.संत एकनाथ महाराज भागवतातील हंसगीतेत लिहितात
सनकादिकांसमान । उद्धवा तुज मी मानी जाण । यालागी त्यांचे ज्ञानकथन । ऐक सांगेन म्हणतसे।।३०७।।
म्हणजे सनकादिकांनी विचारलेले प्रश्नच उद्धवाचे आहेत असे समजून भगवंतानी उत्तरे दिली आहेत तीच उत्तरे स्वामींनी गोविंदबुवांना दिली.
ही उत्तरे ऐकून गोविंद बुवांनी समोर बसलेल्या श्रोत्यांना उत्तर देणाऱ्या परमहंस स्वामींना मंचावर घेऊन येण्यास सांगितले. सर्वात अगोदर बंकट,पितांबर पोहोचले. त्यांच्या पाठोपाठ ईतरही काही श्रोते आले.स्वामींनी सर्वांना परत जा व मांडी मांडून किर्तन ऐका असे सांगून परत पाठविले. तेंव्हा गोविंद बुवा स्वतः स्वामींजवळ आले.व हात जोडून स्वामींना किर्तनात चलण्याची विनंती करु लागले.
तेंव्हा स्वामी गोविंदबुवांना म्हणाले आत्ताच तू निरुपण केले की जे चैतन्य चराचर विश्वात ओतप्रोत भरले तेच चैतन्य हंसरुपाने सनकादिक व ब्रम्हदेवासमोर अवतीर्ण झाले. असे असतांना तू मला मंदिरात कशाला नेतोस ? ते ब्रम्हचैतन्य येथे नाही काय? तुझ्यासारखा मदोन्मत्त, अहंकारी, पोटभऱ्या किर्तनकार ही भूमाता-भूदेव पुन्हा जगात कधीही प्रगट न करोत.दासगणू महाराज सुद्धा त्यांच्या गजानन विजय ग्रंथातील दुसऱ्या अध्यायात लिहीतात की,
पोटभऱ्या कथेकरी
तू न व्हावे भूमीवरी।।६७।। तसेच
जे जे जयाने सांगावे
ते ते त्याने आचरावे
शब्दच्छलासी न करावे
साधकाने केंव्हाही।।६५।।
आणि माणसातील अहंकार हरि कृपेनेच नष्ट होतो.म्हणून हरि भजन करणे हा अहंकार नष्ट करण्याचा एकमेव मार्ग आहे.व भगवंताच्या अनुकंपेने तो नष्ट होतो. प.पू.एकनाथ महाराज सुद्धा हंसगीतेच्या निरुपणात लिहीतात की,
यालागी सांडावा अभिमान।ते तुटे सकळ बंधन । अभिमान निरसावया जाण। माझे भजन करावे.।।३६८।।
म्हणून परत जा व परमेश्वराच्या नामसंकीर्तनाचे किर्तन करा.राम, रामेश्वर,किंवा परमेश्वर एकरुप आहेत.कोणत्याही संताच्या कृपेने भवबंधन एकसमानच कटते. कमी जास्त कटत नाही.असे बोलून स्वामींनी गोविंदबुवांना भागवत वत् बनून परमेश्वराचे संकीर्तन करीत निरुपण करण्यास सांगितले.
गोविंद बुवा मंचावर आले.आणि नाचून परमेश्वराचे संकीर्तन "राम कृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि " गाऊ लागले. टाळकरी सुद्धा नव शक्ती संचारल्या प्रमाणे टाळांचा टणकार करीत नामसंकीर्तन करु लागले.गोविंदबुवा निरुपणात प्रथम स्वामींना वंदन करुन नाम संकीर्तनाचा महिमा वर्णू लागले.व म्हणाले आत्ताच शेगावात प्रगट झालेल्या स्वामींच्या उपदेशानुसार श्रोत्यांनी आपल्या ऊपास्य देवतेचा जास्तीत जास्त नामजप करुन भागवत वत् जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. ह्यातच जीवनाची सार्थकता आहे.श्रोतेसुद्धा भागवत वत् निरुपण करणाऱ्या गोविंद बुवांच्या किर्तनात तल्लीन झाले होते.शेवटी गोविद बुवांनी पसायदान म्हणून कीर्तन संपविले. किर्तन संपताच बंकट व पितांबर स्वामींना घरी नेण्यासाठी कडूनिंबाच्या झाडाजवळ आले.पण स्वामी अगोदरच तेथून निघून गेले होते.
रघुपती राघव राजाराम
पतित पावन सिताराम
श्री गणगणरामार्पणमस्तू
जगन्नाथ गांधी
मुंबई मालाड (प)
९७६९५१८८५८
अध्याय २ - लेख क्रमांक ४ - श्री गजानन महाराज शेगाव
अध्याय २ - लेख क्रमांक ४ - श्री गजानन महाराज शेगाव
*श्रीगणगणरामाय नम:*
लेख क्रमांक ४
*अध्याय दुसरा*
*गणात बोते करुणाघन*
शके शत अठरा माघमासी
कृष्ण सप्तमी सप्तर्षी
ऋषी वदे वाणी" गणगण
गणात बोते "करुणाघन
सीता गण,सितापती गण
सिताराम "श्री " गणात गण
गणगण गणात बोते म्हणा
मंत्र श्रेष्ठ श्री मंत्र म्हणा
मंत्र मंत्रवी सिताराम
यंत्र यंत्रवी राजाराम
यंत्र नियंत्रा गणगणराम
सिता सीतापती सिताराम ॥ॐ॥
शालिवाहन शक १८०० माघ वद्य सप्तमीस बंकटलालांना पातुरकरांच्या वाड्यासमोर स्वामी उष्ट्या पत्रावळीतील शीते वेचतांना दिसले.स्वामींचा शीते वेचण्याचा खेळ बघून आश्चर्य चकित झालेले लाला ,स्वामी जवळ आले असता स्वामी शिते वेचता॔ना " गणगण गणात बोते " हे भजन स्वत:शीच गुणगुणत आहेत असे दिसले.परंतु गणगण गणात बोते ह्या मंत्राचा अर्थ काय?
गण गण ह्या पदातील पहिल्या गण ह्या शब्दाचा अर्थ होतो पुरुष गण किंवा स्त्री गण .पुरूष गणास आपण राम म्हणू शकतो व स्त्री गणास आपण सिता संबोधू शकतो. प्रभू श्रीरामचंद्र ज्याचे उपास्य आहेत असा उपासक जेव्हा राम, किंवा श्रीराम ह्या मंत्राचा जप करतो तेव्हा उपासक हा स्वतःच कीट-भृगी न्यायानुसार उपास्य होतो म्हणजे राम होतो.व त्याच्या आयुष्यात सीता प्रगट होते.वाल्मिक ऋषीनी 'राम ' ह्या मंत्राचा जप केला होता व त्याच्या आश्रमात सीता प्रगट झाली होती.ऊपासकाच्या मनात ऊपासना करताना ज्या प्रकारचे विचार आपल्या,उपास्याबद्दल किवा,श्रीरामा बद्दल येतील तशाच प्रकारचा उपास्य हा उपासक बनतो.म्हणजे तशा प्रकारचा राम बनतो. व तशीच सीता त्याच्या जीवनात प्रगट होते.
जर सितेला उपास्य मानून उपासना केली तर उपासक स्वत: सिता होतो.व त्याच्या जीवनात राम प्रगट होतात. मधुर भावाची उपासना करणारे "राधे-राधे" हा मंत्र जप करतात. व उपासक स्वतः श्रीराधा होतो.व त्याच्या जीवनात श्रीकृष्ण प्रगट होतात. उपासना करताना जसे विचार श्रीराधे बद्दल असतील तशा प्रकारची राधा ,उपासक बनतो.व त्या राधेला अनुरूप असा श्रीकृष्ण त्या राधेच्या जीवनात प्रगट होतो. उपासना परिपक्व झाल्यावर राधेच्या जीवनात" वासुदेव सर्वमिती " ही स्थिती येते.परंतू उपासनेत भगवान श्रीकृष्ण पति असल्यामुळे जग ह्या राधेला पतिमय होते.परंतू "वासुदेव सर्वमिती" ह्या अवस्थेतील वासुदेव हा भाव सुद्धा जेव्हा गळून पडतो ते॔व्हा नुसती चिन्मात्र अवस्था निर्माण होतो.ह्या अवस्थेलाच" आहेनाही पणाच्या पलीकडील "अवस्था म्हणून माउलीनी अमृतानुभवात संबोधिले आहे.आणि हीच शेवटची अवस्था आहे.ह्या अवस्थेत कोणताही तर्क जात नाही.असो.
परंतू उपासकाने युगल स्वरूपाची म्हणजे सिताराम किंवा विठ्ठल रुखमाई किवा रुक्मिणी कृष्णाची उपासना केली तर त्या उपासकात युगल स्वरूपाबद्दल दास्य भाव निर्माण होतो.व त्याचा संसार आनंदमय होतो.
ही स्थिति काही अल्पावधीत प्राप्त होत नाही तर दीर्घ काळ उपासना करावी लागते. कदाचित काही जन्म सुद्धा लागू शकतात. ज्ञानेश्वरीतील नवव्या अध्यायात वर्णिलेल्या भक्तीच्या स्वरुपा प्रमाणे उपासना नेटाने चालविल्यास भगवंत निश्चितपणे कृपा करतात. माउली लिहितात
जयाचिये वाचे माझे आलाप | दृष्टी भोगी माझेचि रुप | जयाचे मन संकल्प |माझाचि वाहे ॥९-४४५॥
माझिया किर्तीविण |जयाचे रिते नाही श्रवण | जया सर्वागी भूषण |माझी सेवा ॥४४६॥
जयाचे ज्ञान विषो नेणे |जाणीव मज एकांतेची जाणे |जया ऐसे लाभे तरी जिणे | एर्हवी मरण ॥४४७॥
ऐसा आघवाची परी पांडवा |जिही आपुलीया सर्वभावा | जियावयालागी वोलावा | मीचि केला ॥४४८॥
अशाच प्रकारे बापूना काळेची विठ्ठल रखुमाई उपासना किवा बाळकृष्ण बिडवाई महाराजाची रामदास स्वामीची उपासना परिपक्व झाल्यामुळे स्वामीनी त्या॔ना त्याच्याच हृदयातील उपास्याचे दर्शन घडविले. हे दर्शन जसे आपण आपल्याच मुखाचे प्रतिबिंब आरशात पाहतो त्या प्रमाणे होते. चांगदेव पासष्टीत माउली लिहितात की.
नुसधे मुख जैसे |देखिजतसे दर्पण मिसे | वायाचि देखणे ऐसे |गमो लागे॥२०॥
तैसे न वचता भेदा | संवित्ती गमे त्रिधा | हेचि जाणे प्रसिद्धा |उपपत्ती इया ॥२१॥
आणि अशाच उपासकाची गणना "श्री "गणात किवा "बोते " गणात केल्या जाते.
म्हणून स्वामी म्हणतात हे उपासकांनो, जो उपासक कीट भृ॔गी न्यायानुसार उपास्य झाला त्याची गणना "बोते" म्हणजे "श्री "गणात करा.म्हणजे बोते हा स्वामीचा शब्द शुद्ध असून त्याचा अर्थ "श्री "असाच होतो.
रघुपती राघव राजाराम
पतित पावन सिताराम
श्रीगणगणरामार्पणमस्तू
जगन्नाथ गांधी
मुंबई मालाड (प)
९७६९५१८८५८
रविवार, १ फेब्रुवारी, २०२६
अध्याय २ - लेख क्रमांक ३ - श्री गजानन महाराज शेगाव
अध्याय २ - लेख क्रमांक ३ - श्री गजानन महाराज शेगाव
श्री गणगणरामाय नमः
लेख क्रमांक ३
अध्याय दुसरा
*प्रगटले स्वामी गणगणराज*
प. पू.दासगणू महाराजांनी, स्वामींची लिहीलेली उत्कृष्ट आरती म्हणजे " जय जय सत् चित् स्वरुपा स्वामी गणराया" ही आहे.ह्याआरतीच्या ध्रुवपदात महाराजांनी स्वामींचे स्वरुप लक्षण सत्,चित् ,आनंद आहे असे सांगून पुन्हा अंतरात, स्वरुप लक्षण व तटस्थ लक्षण लिहीले आहे."धाता हरिहर गुरुवर तूची सुखसदना" हे परब्रम्हाचे तटस्थ लक्षण आहे.कारण ,
१)धाता =विधाता=ब्रम्हा=जगाचे उत्पत्ती कर्ता
२)हरि =जगाचा पालन कर्ता
३)हर= जगाचा संहार कर्ता
म्हणजे हे स्वामी! तुम्ही जगाचे उत्पत्ती, स्थिती व प्रलय कर्ता असून तुम्हीच आनंद स्वरुप स्वामी आहात.ह्या परमतत्वालाच सर्व भक्त सद्गुरु म्हणतात व स्वामींची उपासना करतात. हे परब्रम्ह स्वरुपच जगाचे अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. ज्ञानेश्वरीत माऊलींनी सुद्धा वेदांनी प्रतिपादन केलेल्या, स्वसंवेद्य ओंकार स्वरुप परब्रम्हालाच नमन केले आहे.
ॐ नमाजी आद्या। वेद प्रतिपाद्या।
जय जय स्वसंवेद्या। आत्मरुपा ।।
प.पू तुकाराम महाराजांनी सुद्धा,"अठराही पुराणे हरिसी गाती" असे वर्णन केले आहे.येथे श्रीहरि म्हणजे वेदांनी प्रतिपादन केलेले आद्य तत्व म्हणजे श्रीविठ्ठल होय.म्हणूनच संत एकनाथ महाराज म्हणतात
कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा
चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा
म्हणजे आपण ज्याची उपासना करतो ते आपल्यासारखे पूर्व जन्मात कलेले कृतकर्म भोगण्यासाठी आईच्या पोटी जन्मलेले स्वामी नाहीत.तर ते स्वयंभू प्रगट झालेले परमात्म तत्व आहे.म्हणजे जे अगोदर अव्यक्त होते ते भक्तांच्या उपासनेसाठी आलंबन म्हणून व्यक्त झाले आहे.किंवा अमूर्त तत्वाने मुर्त रुप धारण केले आहे. स्वामींची उपासना करणारे भक्त दोन प्रकारचे असतात.(१)देवा कडून मागणारे याचक.जसे भगवद्गीतेत वर्णिल्या प्रमाणे आर्त किंवा अर्थार्थी आणि दुसरे(२) जे फक्त भगवंताची निष्काम भावनेने उपासना करणारे जिज्ञासू किंवा ज्ञानीभक्त.ह्यांना भगवंताकडून काहीच नको असते फक्त देवच हवा असतो.हेच खरे उपासनेचे अधिकारी भक्त आहेत. ह्या उपासकांना व्याघ्र दृष्टी उपासक म्हणतात.व देवाकडून जड भौतिक पदार्थांची अपेक्षा असणाऱ्या भक्तांना श्वानदृष्टी उपासक म्हणतात.
आपल्या वैदिक ग्रंथात व वारकरी संप्रदायातील सर्वच साधू संतांनी परब्रम्ह स्वरुप सद्गुरू चे प्रतिपादन खालील प्रमाणे केले आहे.
जगत्व्याप्त,जग,जगआधार .
जनजीवन , जनजीवन सार
घेऊन रुप सगुण साकार
साकारले दीगंबराकार
अजर अमर ऋषी अविनाशी
नाशी अन्न मुखी ग्रासी
म्हणजे परब्रम्ह परमात्म्याने आपल्याच योगमायेचा अंगीकार करुन सगुण साकार रुप धारण केले आहे. म्हणजे अजर अमर, अविनाशी असे शबलीत परब्रम्हच दीगंबराकार रुपात शेगावला शालिवाहन शके अठराशे साली माघ वद्य सप्तमीला देवीदास पातुरकरांच्या वाड्यसमोरील वटवृक्षाखाली प्रगट झाले.ह्यालाच आम्ही"प्रगटले स्वामी गणगणराज" म्हणतो. ते उष्ट्या पत्रावळीतील भाताची शिते उचलून,त्याचे निरिक्षण करुन तोंडात टाकून खातांना बंकटलाल अग्रवाल ह्यांनी पाहिले.ह्या कृतीतून जणू स्वामींना सुचवायचे होते की,
अन्नं परब्रम्ह वेदोक्ती
ब्रम्हं अन्नं दर्पोक्ती
अन्न हे परब्रम्ह आहे असे समजून प्रसाद ग्रहण करणाऱ्या सज्जनांचे रक्षण करण्यासाठी व जो परब्रम्ह स्वरुप जगाला अन्न समजतो म्हणजे जो दीन, दुबळ्या गोरगरीबांना माजलेल्या सांडाप्रमाणे ताडतो किंवा लुटतो अशांचा दर्प नष्ट करुन धर्म संस्थापनेसाठी स्वामीं प्रगट झाले होते.भगवद्गीतेत भगवंतानी चवथ्या अध्यायात परमेश्वराच्या अवतार कार्याचे तीनच प्रयोजन सांगितले आहे.(१)साधू , सज्जनांचे रक्षण (२) दुष्टांचे निर्दालन (३) धर्माचे संस्थापन.
परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे।।८।।
म्हणून स्वामी वरील तीन उद्दिष्टांसाठी प्रगट होऊन भाताच्या शितांबरोबर खेळत होते.
बंकटलालांना स्वामींच्या पत्रावळीतून शीते उचलून तोंडात टाकण्याच्या खेळाचे मोठे आश्चर्य वाटले.म्हणून ते स्वामींच्या जवळ आले तेंव्हा स्वामी त्यांना खेळाच्या बरोबर मुखाने"गण गण गणात बोते" हा जप करीत असतांना दिसले. तेंव्हा बंकटलालांना वाटले की,आज पातुरकरांच्या मुलाच्या ऋतु शांति च्या कार्यक्रमा निमीत्त भोजनाचे आयोजन आहे.म्हणून बंकटलाल ला वाटले ह्या पत्रावळीशी खेळणाऱ्या माणसाने देविदास पातुरकरांना अन्न मागितले असते तर त्यांनी ते निश्चित दिले असते कारण कोणताही सज्जन माणूस याचकाला परत पाठवित नाही.म्हणून बंकटलालाने पातुरकरांना सांगून अन्नाची पत्रावळ स्वामींसाठी बोलावली. व दोघांनी स्वामींना अन्न सेवन करण्यास सांगितले. स्वामींनी पत्रावळीतील संपूर्ण अन्नाचा काला केला व जेवण करु लागले. स्वामींचं जेवण पूर्ण होत असतांना बंकटलाल ने स्वामींना पाणी आणू कां ? असे विचारल्यावर स्वामी म्हणाले हा साधा व्यवहार तुम्हास कळायला हवा की जेवतांना पाणी वाढले पाहिजे.म्हणून बंकटलाल पाणी आणावयास पातुरकरांच्या वाड्यात गेले असता स्वामी सरळ उनाड नाल्यावर गेले.
निरसून नीर निर्मळ भगवान
गट्गट् गिळती गटारपान
गिळवून गिळविती गणगणराम
सिता सितापती सीताराम।।ॐ।।
म्हणजे त्या उनाड नाल्यातून स्वामींसाठी शुद्ध निर्मळ जल उत्पन्न झाले.व स्वामी निर्मळ जल पिऊ लागले.तेवढ्यात बंकट पाण्याचा गडवा घेऊन उनाड नाल्याजवळ आला व स्वामींना म्हणाला की स्वामी! नाल्यात गढूळ पाणी आहे ते पिऊ नका.तेंव्हा स्वामी म्हणाले सर्व ठिकाणी शुद्ध, निर्मळ परब्रम्ह ओतप्रोत भरलेले आहे.येथे गढूळ किंवा घाणेरडे म्हणून काही नाही.शुद्ध मनाने आपणास आवडत असेलेल्या ईश्वराची किंवा संताची मुर्ती हृदयात बसवा.व शांत मनाने ईश्वराचे चिंतन करा हीच उपासना आहे.आणि ह्या उपासनेने त्रिवीध ताप नष्ट होऊन ईश्वर साक्षात्कार होतो.बंकटास वाटले गडवा परत केल्यानंतर स्वामींशी बोलू.म्हणून बंकट गडवा द्यावयास वाड्यात गेले तेंव्हा स्वामी वायुवेगाने निघून गेले.बंकट परत नाल्याजवळ आले तर त्यांना स्वामी दिसलेच नाहीत.बंकट हिरमुसल्या मुखाने स्वामींचा शोध घेऊ लागले.
खरं तर बंकटांचे पुर्व सुकृत फळा आले होते.म्हणून स्वामींच्या कडे त्यांचे लक्ष जाऊन परभारे कां होईना,बंकटाने स्वामींना भोजन करविले.पण बंकटांनी आणलेल्या गडव्यातून स्वामी पाणी प्यायले नाहीत. विचार केला तर ती माऊली कीती पुण्यवान असेल जीच्या ऋतुशांतीच्या कार्यक्रमास स्वामींनी हजेरी लावली .व तिच्या दारावर स्वामी जेवले.कांही कां असेना , बंकटलालांना स्वामींचा ध्यास लागला.ते संपूर्ण गावात हिंडून स्वामींचा शोधू घेऊ लागले.स्वामी गावात दिसले नाहीत म्हणून जंगलातून त्यांनी तहान भूक विसरुन स्वामींचा शोध सुरू ठेवला.स्वामींनी बंकटलालास भक्तीचे संक्षिप्त सुत्रच सांगून दिले होते.म्हणून , अध्यात्माची आवड असल्याने लोकांना गप्पांच्या ओघात स्वामीबद्ल विचारु लागले. बंकटाच्या घराशेजारी राहणाऱ्या वयोवृद्ध रामोजीराव देशमुखांनी बंकटांच्या मानसिक स्थितीचे निरीक्षण करुन विचारले की, बंकटा ! तुम्हाला कशाची चिंता सतावत आहे .मी बघतो की मागील दोन दिवसांपासून तुम्ही भयाण चेहऱ्याने गावभर हिंडत आहात.बाप्पा बंकटा ! मला सांगा,तुमच्यावर कोणतं संकट कोसळलं.तेंव्हा बंकटांनी स्वामींची आश्चर्यकारक कथा बाप्पूंना सांगितली.तेंव्हा बाप्पू म्हणाले ते कोणीतरी योगी असावेत.तुम्ही मोठे भाग्यवान आहात म्हणूनच तुम्हाला स्वामींचे दर्शन झाले.आता पुन्हा स्वामींचे दर्शन झाल्यास मला सुद्धा स्वामींचे दर्शन घडवा.
मग बंकट तेथून उठून दुसऱ्या ठिकाणी स्वामींना शोधावयास निघून गेलेत.
रघुपती राघव राजाराम
पतित पावन सिताराम
श्री गणगणरामार्पणमस्तू
जगन्नाथ गांधी
मुंबई मालाड (प)
९७६९५१८८५८
अध्याय २ - लेख क्रमांक २ - श्री गजानन महाराज शेगाव
अध्याय २ - लेख क्रमांक २ - श्री गजानन महाराज शेगाव
*श्री गणगणरामाय नमः*
लेख क्रमांक २
*अध्याय दुसरा*
*स्वामींचा प्रगटोत्सव*
प्रगटले स्वामी गणगणराज
समर्थ योगी योगीराज
उधळे भक्तीरस रसराज
लीला लिलये करे गणराज।।धृ।।
जगत् व्याप्त,जग,जग आधार
जनजीवन जनजीवनसार
घेऊन रुप सगुण साकार
साकारले दीगंबराकार
अजर, अमर, ऋषी ,अविनाशी
नाशी अन्न मुखी ग्रासी
"अन्नं परब्रह्म" वेदोक्ती
"ब्रम्हं अन्नं" दर्पोक्ती
दर्प दर्पीचे दडपाया
दुख दुखितांचे दर्शाया
दर्शन दर्शवी गणगणराम
सिता ,सितापती सिताराम।।ॐ।।
सद्गुरू सांगतात की, जे ज्ञेय परब्रह्म आहे ते
(१)संपूर्ण जगाला व्यापून आहे (२)ते जगाचे अभिन्न निमित्तोपादान कारण आहे.
(३) संपूर्ण जग त्या ज्ञेय परब्रम्हावरच आधारित आहे.(४)संपूर्ण जगातील लोकांच्या जीवनाचे संप्रेरक तेच ज्ञेय परब्रम्ह आहे
(५)आणि प्रत्येकाच्या जीवनाचे सार सुद्धा तेच परब्रह्म आहे.
ज्ञेय म्हणजे ,जाणून घेण्याची गोष्ट. समजा समोर एक वस्तू ठेवलेली आहे.ती वस्तू काय आहे ते मला जाणावयाचे आहे. तेव्हा मी झालो ज्ञाता.समोरची वस्तु झाली ज्ञेय.आणि ती वस्तु जाणणे ,हे झाले ज्ञान. आणि ज्ञाता,ज्ञेय,ज्ञान ह्यास त्रिपुटी म्हणतात. पंच ज्ञानेंद्रियाद्वारे जाणलेल्या ज्ञानामुळे ,ज्ञाता केंव्हाही ज्ञेय होत नाही.समजा समोर ज्ञेय, गुलाबाचे फुल आहे.परंतू ज्ञाता केव्हाही गुलाबाचे फुल होणार नाही.
परंतू परब्रह्माचे विशेष हे आहे की ,ते ज्ञेय परब्रह्म जाणता क्षणीच जाणणारा स्वतः परब्रम्ह होतो.व तो जीवन्मुक्त महापुरुष नित्यानंदात लीन होतो.माउली ज्ञानेश्वरीत लिहितात की,"आणि जाणितलेया वरौते |काहीच करणे नाही जेथे |जाणणेचि तन्मयाते | आणि जयाचे ॥१३\८६५॥
अर्थ:-ते ज्ञेयस्वरुप जाणल्यामुळे, ज्ञाता संसाराचा निरास करून नित्यानंद स्वरूप होतो.म्हणजे ज्ञेय स्वरूप होतो.ह्यासच अमृतत्वाची प्राप्ती म्हणतात.
हे ज्ञेय परब्रम्ह जगास आतून व बाहेरून पुर्णपणे व्यापून आहे. भगवान भगवद्गीतेत सांगतात की, "सर्वत: पाणिपादं तत्सर्वतोऽक्षिशिरोमुखम् |सर्वत: श्रुतिमल्लोके सर्वमावॄत्य तिष्ठति ॥
१३-१३॥
अर्थ :-ते सर्वत्र हात, पाय, डोळे, नाक, कान, मुख,असलेले आहे. कारण ते विश्वाला व्यापून राहीले आहे.
ह्यावरून कोणास असे वाटेल की परब्रह्म उपाधी युक्त आहे.परंतू माउली लिहितात की,ते परब्रह्म निरुपाधिक आहे. ते ज्ञेय परब्रम्ह सर्व व्यापक आहे हे दाखविण्यासाठी श्रृती मधे सुद्धा असाच उल्लेख आहे."वाचूनि हस्त, नेत्र पाये | हे भाष तेथ के आहे | सर्व शुन्यत्वाचा न साहे | निष्कर्षु जे ॥१३-८८४॥
अर्थ:- एरव्ही ब्रम्ह हे सर्व शुन्यपणाचा शेवट आहे.हा सिद्धांत सुद्धा ज्या ठिकाणी सहन होत नाही, त्या परब्रम्हाच्या ठिकाणी हात, पाय, डोळे हे बोलणे कोठे आहे.
हे परब्रह्म "आहे" असेही म्हणता येत नाही.व "नाही " असेही म्हणत येत नाही. माऊली ज्ञानेश्वरीत लिहीतात की,"जे नाही म्हणो जाइजे | तव विश्वाकारे देखिजे |विश्वचि ऐसे म्हणिजे | तरि हे माया ॥१३-८६८॥
म्हणजे परब्रम्हास नाकाराबे ,तर जे जगाच्या आकाराने आपणांस दिसते, मग त्यासाठी उपादान व निमित्त कारण कोणते ?ह्या प्रश्नास उत्तर मिळत नाही.व जगच परब्रम्ह म्हणावे तर ही माया आहे किंवा परमात्म्याचे तेज किवा प्रकाश आहे.म्हणूनच भक्तिमार्गात "जे जे भेटे भूत | तया मानिजे भगवंत "| असा भाव ठेवतात. ह्यावरून हाच निष्कर्ष निघतो की जग व जगाचा आधार एक परमात्माच आहे.
*जनजीवन जनजीवनसार*:- केनोपनिषदात ऋषी लिहितात की, यन्मनसा न मनुते येनाहुर्मनो मतम् |
तदेव ब्रम्ह त्वं विद्धि नेदं यदिदमुपासते.॥५॥
अर्थ:- ज्याचे मनाने मनन करता येत नाही ,पण ज्याच्यामुळे मनाला मनन करण्याची शक्ती प्राप्त होते,तेच ब्रम्ह स्वरुप आहे असे तू निश्चितपणे जाण.ज्याची तू उपासना करतोस, ते ब्रम्ह स्वरुप नाही.तसेच ज्याच्यामुळे डोळ्यांना बघण्याची शक्ती ,वाचेला बोलण्याची शक्ती,पायाला चालण्याची शक्ती, म्हणजे जी जी क्रिया कर्मेद्रियानी ,किंवा ज्ञानेंद्रियानी करतो त्या सर्व कार्यास ज्याच्यामुळे शक्ती प्राप्त होते ते परब्रम्ह आहे.म्हणून सर्व प्राण्यांच्या जीवनाचे कारण एक परब्रम्हच आहे व सर्वाच्या जीवनाचे सार सुद्धा परब्रम्हच आहे.
अशा विलक्षण सर्वज्ञ,सर्व व्यापी, सर्व शक्तीमान परब्रम्हाची शक्ती घेऊन ब्रम्हलोकातून स्वामी माघ वद्य सप्तमीस शेगावात पातुरकरांच्या वाड्यासमोर प्रगट झाले.व लीलये पत्रावळीतील उष्ट्यी भाताची शीते वेचून खाऊ लागले. ह्या स्वामीच्या लीलेचा असा अर्थ होतो की ,आपणास जे काही मिळते तो भगवंताचा प्रसाद म्हणून आनंदाने ग्रहण करावा कारण तो प्रसाद म्हणजेच परब्रम्ह आहे.व हीच वेदाची सुद्धा शिकवण आहे.ह्या उलट जो ब्रम्ह स्वरुप प्राण्याना अन्न समजतो म्हणजे दीन दुबळ्या ,गरीब लोकांना लुटतो ,छळतो किंवा त्याच्यावर अन्याय करतो हा त्या दुर्जनांचा दर्प आहे.व हा दर्प दडपण्या साठीच स्वामी ब्रम्हलोकातून पृथ्वीवर अवतीर्ण झाले. स्वामी ब्रम्हलोकातून अवतीर्ण झाले ह्या वाक्याची मीमांसा अशी आहे की, प्रत्येक कार्याला काहीतरी कारण असतेच व ते कारण त्या कार्यामधे सुक्ष्म रुपात अनुस्यूत असते. स्वामीनी आपल्या सर्व भक्ताना नामस्मरण करुन उपास्याचे रूप डोळ्यांत साठविण्यास शिकविले.व भक्ताना क्रम मुक्तीच्या मार्गाद्वारे मुक्त होण्यासाठी ब्रम्हलोकात पाठविले.म्हणून ह्या कार्याच्या कारणावरुन आपण तर्क बांधू शकतो की स्वामी सुद्धा ब्रम्ह लोकातून आले आहेत.त्याचप्रमाणे तेलंगी ब्राह्मण जे स्वामीच्या समोर चुकलेली ऋचा म्हणत होते ,त्यांना स्वामी म्हणाले होते,
म्हणा असे मी जसे म्हणू
ब्रम्हा म्हणती तसे म्हणू
त्याचप्रमाणे,
म्हणवून म्हणविली ऋचा अशी
ब्रम्ह ब्रम्हदेव वदे जशी
वरील सर्व कारणावरून हाच निष्कर्ष निघतो की स्वामी ब्रम्हलोकातून अवतीर्ण झालेले महापुरुष आहेत.
महाभारताचे युद्ध संपल्यावर अर्जुनाने भगवंताना पुन्हा एकदा भगवद्गीता कथन करण्यास सांगितली तेव्हा भगवान म्हणाले त्या वेळेस मी तुला योगयुक्त अवस्थेत उपदेश केला.आता तो उपदेश पुन्हा सांगणे मला शक्य नाही.पण मी तुला ब्रम्हलोकातून आलेल्या ऋषीनी दिलेली उत्तरे सांगतो असे सांगून अर्जुनाची ईच्छा तृप्त केली.त्या उत्तरानाच *अनुगीता* म्हणतात. ह्यावरून ब्रम्हलोकातून आलेल्या ऋषींचे महत्त्व कळते.आपले सद्गुरू देहधारी दिसत होते तरी ते परब्रम्ह स्वरुप अजर,अमर,अविनाशी असे ऋषी होते.माऊली लिहीतात की,
नाम,रुप, संबंधु |जाति,क्रिया,भेदू | हा आकारासीच प्रवादू | वस्तुसि नाही॥१३-९०४॥
अर्थ:- नाम,रुपादी संबंध व जाति क्रियादी भेद हे आकारावरच नांदतात. त्याची भाषा ब्रम्हवस्तुला लागु पडत नाही. भगवान सुद्धा भगवद्गीतेच्या दुसर्या अध्यायात लिहीतात की, अविनाशि तुद्विध्दि येन सर्वमिदं ततम् | विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ॥१७॥
अर्थ:-नाशरहित असे तेच ज्ञेय आहे की,ज्याने हे हे सर्व जग व्याप्त केले आहे.त्या अविनाशी तत्वाचा नाश कोणीही करु शकत नाही.
अशा तत्वाच्या प्राप्तीचा एकमेव उपाय म्हणजे सद्गुरूंना शरण जाऊन त्यांची अहंकार रहित भक्ती करणे हा होय.ह्या भक्तीत सद्गुरुंचा शब्द प्रमाण असतो.अशी भक्ती जेव्हा पुर्णता गाठते,तेव्हा भक्ताचा जीवभाव टाकून दिल्या जातो.व स्वामी त्यास मंत्र दीक्षा देतात. भक्त रात्रंदिवस मंत्राचा जप करतो. जसे चिचोलीचे माधवराव कुळकर्णी.ह्या जपातूनच त्या उपासकाला जीवनाचे रहस्य कळते व भक्त कृतकृत्य होतो.ही कृतकृत्यता आम्हांसही मिळावी हीच सद्गुरु चरणी प्रार्थना.
ओवाळितो गुरूराया
जीवभाव ओवाळूनिया
ध्यान स्वरुपा ध्यानी यावे
ध्यानी रघुपती पद गावे
मुखी नित्य गणगण गावे
गणगण गीत मुखी यावे.
गणगण गीत वदाया या
गणगण गीत गावाया या
भक्ती स्वरुप वदाया या
पद भक्ती शिकवाया या
शिक्षण शिकवे गणगणराम
सिता सितापती सिताराम ॥ॐ॥
रघुपती राघव राजाराम
पतित पावन सिताराम
श्रीगणगणरामार्पणमस्तू
जगन्नाथ गांधी
मुंबई मालाड (प)
९७३९५१८८५८
New Post
क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...
-
मराठी १२ वी - बोर्ड परीक्षा - निबंधलेखन - विषय यादी इयत्ता १२ वी मराठी साठी परीक्षेत विचारले जाण्याची शक्यता असलेले निबंधाचे जास्तीतजास्...
-
अर्थशास्त्र - इयत्ता १२ वी - महत्वाचे दीर्घोत्तरी प्रश्न शाखा - कला आणि वाणिज्य अर्थशास्त्र (49) प्रश्न क्रमांक 6 तीनपैकी दोन सोडवा.( ...
-
सावरु दे... मुक्तपणे हवे तसे वावरू दे मला... डोईवर भार असे सावरू दे मला... भरारते पंख असे पाखरू दे मला... उबदार जिद्द अशी पांघर...






