अध्याय २ - लेख क्रमांक ३ - श्री गजानन महाराज शेगाव
श्री गणगणरामाय नमः
लेख क्रमांक ३
अध्याय दुसरा
*प्रगटले स्वामी गणगणराज*
प. पू.दासगणू महाराजांनी, स्वामींची लिहीलेली उत्कृष्ट आरती म्हणजे " जय जय सत् चित् स्वरुपा स्वामी गणराया" ही आहे.ह्याआरतीच्या ध्रुवपदात महाराजांनी स्वामींचे स्वरुप लक्षण सत्,चित् ,आनंद आहे असे सांगून पुन्हा अंतरात, स्वरुप लक्षण व तटस्थ लक्षण लिहीले आहे."धाता हरिहर गुरुवर तूची सुखसदना" हे परब्रम्हाचे तटस्थ लक्षण आहे.कारण ,
१)धाता =विधाता=ब्रम्हा=जगाचे उत्पत्ती कर्ता
२)हरि =जगाचा पालन कर्ता
३)हर= जगाचा संहार कर्ता
म्हणजे हे स्वामी! तुम्ही जगाचे उत्पत्ती, स्थिती व प्रलय कर्ता असून तुम्हीच आनंद स्वरुप स्वामी आहात.ह्या परमतत्वालाच सर्व भक्त सद्गुरु म्हणतात व स्वामींची उपासना करतात. हे परब्रम्ह स्वरुपच जगाचे अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. ज्ञानेश्वरीत माऊलींनी सुद्धा वेदांनी प्रतिपादन केलेल्या, स्वसंवेद्य ओंकार स्वरुप परब्रम्हालाच नमन केले आहे.
ॐ नमाजी आद्या। वेद प्रतिपाद्या।
जय जय स्वसंवेद्या। आत्मरुपा ।।
प.पू तुकाराम महाराजांनी सुद्धा,"अठराही पुराणे हरिसी गाती" असे वर्णन केले आहे.येथे श्रीहरि म्हणजे वेदांनी प्रतिपादन केलेले आद्य तत्व म्हणजे श्रीविठ्ठल होय.म्हणूनच संत एकनाथ महाराज म्हणतात
कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा
चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा
म्हणजे आपण ज्याची उपासना करतो ते आपल्यासारखे पूर्व जन्मात कलेले कृतकर्म भोगण्यासाठी आईच्या पोटी जन्मलेले स्वामी नाहीत.तर ते स्वयंभू प्रगट झालेले परमात्म तत्व आहे.म्हणजे जे अगोदर अव्यक्त होते ते भक्तांच्या उपासनेसाठी आलंबन म्हणून व्यक्त झाले आहे.किंवा अमूर्त तत्वाने मुर्त रुप धारण केले आहे. स्वामींची उपासना करणारे भक्त दोन प्रकारचे असतात.(१)देवा कडून मागणारे याचक.जसे भगवद्गीतेत वर्णिल्या प्रमाणे आर्त किंवा अर्थार्थी आणि दुसरे(२) जे फक्त भगवंताची निष्काम भावनेने उपासना करणारे जिज्ञासू किंवा ज्ञानीभक्त.ह्यांना भगवंताकडून काहीच नको असते फक्त देवच हवा असतो.हेच खरे उपासनेचे अधिकारी भक्त आहेत. ह्या उपासकांना व्याघ्र दृष्टी उपासक म्हणतात.व देवाकडून जड भौतिक पदार्थांची अपेक्षा असणाऱ्या भक्तांना श्वानदृष्टी उपासक म्हणतात.
आपल्या वैदिक ग्रंथात व वारकरी संप्रदायातील सर्वच साधू संतांनी परब्रम्ह स्वरुप सद्गुरू चे प्रतिपादन खालील प्रमाणे केले आहे.
जगत्व्याप्त,जग,जगआधार .
जनजीवन , जनजीवन सार
घेऊन रुप सगुण साकार
साकारले दीगंबराकार
अजर अमर ऋषी अविनाशी
नाशी अन्न मुखी ग्रासी
म्हणजे परब्रम्ह परमात्म्याने आपल्याच योगमायेचा अंगीकार करुन सगुण साकार रुप धारण केले आहे. म्हणजे अजर अमर, अविनाशी असे शबलीत परब्रम्हच दीगंबराकार रुपात शेगावला शालिवाहन शके अठराशे साली माघ वद्य सप्तमीला देवीदास पातुरकरांच्या वाड्यसमोरील वटवृक्षाखाली प्रगट झाले.ह्यालाच आम्ही"प्रगटले स्वामी गणगणराज" म्हणतो. ते उष्ट्या पत्रावळीतील भाताची शिते उचलून,त्याचे निरिक्षण करुन तोंडात टाकून खातांना बंकटलाल अग्रवाल ह्यांनी पाहिले.ह्या कृतीतून जणू स्वामींना सुचवायचे होते की,
अन्नं परब्रम्ह वेदोक्ती
ब्रम्हं अन्नं दर्पोक्ती
अन्न हे परब्रम्ह आहे असे समजून प्रसाद ग्रहण करणाऱ्या सज्जनांचे रक्षण करण्यासाठी व जो परब्रम्ह स्वरुप जगाला अन्न समजतो म्हणजे जो दीन, दुबळ्या गोरगरीबांना माजलेल्या सांडाप्रमाणे ताडतो किंवा लुटतो अशांचा दर्प नष्ट करुन धर्म संस्थापनेसाठी स्वामीं प्रगट झाले होते.भगवद्गीतेत भगवंतानी चवथ्या अध्यायात परमेश्वराच्या अवतार कार्याचे तीनच प्रयोजन सांगितले आहे.(१)साधू , सज्जनांचे रक्षण (२) दुष्टांचे निर्दालन (३) धर्माचे संस्थापन.
परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे।।८।।
म्हणून स्वामी वरील तीन उद्दिष्टांसाठी प्रगट होऊन भाताच्या शितांबरोबर खेळत होते.
बंकटलालांना स्वामींच्या पत्रावळीतून शीते उचलून तोंडात टाकण्याच्या खेळाचे मोठे आश्चर्य वाटले.म्हणून ते स्वामींच्या जवळ आले तेंव्हा स्वामी त्यांना खेळाच्या बरोबर मुखाने"गण गण गणात बोते" हा जप करीत असतांना दिसले. तेंव्हा बंकटलालांना वाटले की,आज पातुरकरांच्या मुलाच्या ऋतु शांति च्या कार्यक्रमा निमीत्त भोजनाचे आयोजन आहे.म्हणून बंकटलाल ला वाटले ह्या पत्रावळीशी खेळणाऱ्या माणसाने देविदास पातुरकरांना अन्न मागितले असते तर त्यांनी ते निश्चित दिले असते कारण कोणताही सज्जन माणूस याचकाला परत पाठवित नाही.म्हणून बंकटलालाने पातुरकरांना सांगून अन्नाची पत्रावळ स्वामींसाठी बोलावली. व दोघांनी स्वामींना अन्न सेवन करण्यास सांगितले. स्वामींनी पत्रावळीतील संपूर्ण अन्नाचा काला केला व जेवण करु लागले. स्वामींचं जेवण पूर्ण होत असतांना बंकटलाल ने स्वामींना पाणी आणू कां ? असे विचारल्यावर स्वामी म्हणाले हा साधा व्यवहार तुम्हास कळायला हवा की जेवतांना पाणी वाढले पाहिजे.म्हणून बंकटलाल पाणी आणावयास पातुरकरांच्या वाड्यात गेले असता स्वामी सरळ उनाड नाल्यावर गेले.
निरसून नीर निर्मळ भगवान
गट्गट् गिळती गटारपान
गिळवून गिळविती गणगणराम
सिता सितापती सीताराम।।ॐ।।
म्हणजे त्या उनाड नाल्यातून स्वामींसाठी शुद्ध निर्मळ जल उत्पन्न झाले.व स्वामी निर्मळ जल पिऊ लागले.तेवढ्यात बंकट पाण्याचा गडवा घेऊन उनाड नाल्याजवळ आला व स्वामींना म्हणाला की स्वामी! नाल्यात गढूळ पाणी आहे ते पिऊ नका.तेंव्हा स्वामी म्हणाले सर्व ठिकाणी शुद्ध, निर्मळ परब्रम्ह ओतप्रोत भरलेले आहे.येथे गढूळ किंवा घाणेरडे म्हणून काही नाही.शुद्ध मनाने आपणास आवडत असेलेल्या ईश्वराची किंवा संताची मुर्ती हृदयात बसवा.व शांत मनाने ईश्वराचे चिंतन करा हीच उपासना आहे.आणि ह्या उपासनेने त्रिवीध ताप नष्ट होऊन ईश्वर साक्षात्कार होतो.बंकटास वाटले गडवा परत केल्यानंतर स्वामींशी बोलू.म्हणून बंकट गडवा द्यावयास वाड्यात गेले तेंव्हा स्वामी वायुवेगाने निघून गेले.बंकट परत नाल्याजवळ आले तर त्यांना स्वामी दिसलेच नाहीत.बंकट हिरमुसल्या मुखाने स्वामींचा शोध घेऊ लागले.
खरं तर बंकटांचे पुर्व सुकृत फळा आले होते.म्हणून स्वामींच्या कडे त्यांचे लक्ष जाऊन परभारे कां होईना,बंकटाने स्वामींना भोजन करविले.पण बंकटांनी आणलेल्या गडव्यातून स्वामी पाणी प्यायले नाहीत. विचार केला तर ती माऊली कीती पुण्यवान असेल जीच्या ऋतुशांतीच्या कार्यक्रमास स्वामींनी हजेरी लावली .व तिच्या दारावर स्वामी जेवले.कांही कां असेना , बंकटलालांना स्वामींचा ध्यास लागला.ते संपूर्ण गावात हिंडून स्वामींचा शोधू घेऊ लागले.स्वामी गावात दिसले नाहीत म्हणून जंगलातून त्यांनी तहान भूक विसरुन स्वामींचा शोध सुरू ठेवला.स्वामींनी बंकटलालास भक्तीचे संक्षिप्त सुत्रच सांगून दिले होते.म्हणून , अध्यात्माची आवड असल्याने लोकांना गप्पांच्या ओघात स्वामीबद्ल विचारु लागले. बंकटाच्या घराशेजारी राहणाऱ्या वयोवृद्ध रामोजीराव देशमुखांनी बंकटांच्या मानसिक स्थितीचे निरीक्षण करुन विचारले की, बंकटा ! तुम्हाला कशाची चिंता सतावत आहे .मी बघतो की मागील दोन दिवसांपासून तुम्ही भयाण चेहऱ्याने गावभर हिंडत आहात.बाप्पा बंकटा ! मला सांगा,तुमच्यावर कोणतं संकट कोसळलं.तेंव्हा बंकटांनी स्वामींची आश्चर्यकारक कथा बाप्पूंना सांगितली.तेंव्हा बाप्पू म्हणाले ते कोणीतरी योगी असावेत.तुम्ही मोठे भाग्यवान आहात म्हणूनच तुम्हाला स्वामींचे दर्शन झाले.आता पुन्हा स्वामींचे दर्शन झाल्यास मला सुद्धा स्वामींचे दर्शन घडवा.
मग बंकट तेथून उठून दुसऱ्या ठिकाणी स्वामींना शोधावयास निघून गेलेत.
रघुपती राघव राजाराम
पतित पावन सिताराम
श्री गणगणरामार्पणमस्तू
जगन्नाथ गांधी
मुंबई मालाड (प)
९७६९५१८८५८






