रविवार, १ फेब्रुवारी, २०२६

अध्याय २ - लेख क्रमांक ३ - श्री गजानन महाराज शेगाव

 अध्याय २ - लेख क्रमांक ३ - श्री गजानन महाराज शेगाव 

                   श्री गणगणरामाय नमः

                      लेख क्रमांक ३

                       अध्याय दुसरा 

                 *प्रगटले स्वामी गणगणराज*

   

अध्याय २ - लेख क्रमांक ३ - श्री गजानन महाराज शे

                 प. पू.दासगणू महाराजांनी, स्वामींची लिहीलेली उत्कृष्ट आरती म्हणजे " जय जय सत् चित् स्वरुपा स्वामी गणराया" ही आहे.ह्याआरतीच्या ध्रुवपदात महाराजांनी स्वामींचे स्वरुप लक्षण सत्,चित् ,आनंद आहे असे सांगून पुन्हा अंतरात, स्वरुप लक्षण व तटस्थ लक्षण लिहीले आहे."धाता हरिहर गुरुवर तूची सुखसदना"  हे परब्रम्हाचे तटस्थ लक्षण आहे.कारण ,

१)धाता =विधाता=ब्रम्हा=जगाचे उत्पत्ती कर्ता

२)हरि =जगाचा पालन कर्ता

३)हर= जगाचा संहार कर्ता 

        म्हणजे हे स्वामी! तुम्ही जगाचे उत्पत्ती, स्थिती व प्रलय  कर्ता असून तुम्हीच आनंद स्वरुप स्वामी आहात.ह्या परमतत्वालाच सर्व भक्त सद्गुरु म्हणतात व स्वामींची उपासना करतात. हे परब्रम्ह स्वरुपच जगाचे अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. ज्ञानेश्वरीत माऊलींनी सुद्धा  वेदांनी प्रतिपादन केलेल्या, स्वसंवेद्य ओंकार स्वरुप परब्रम्हालाच  नमन केले आहे.


ॐ नमाजी आद्या। वेद प्रतिपाद्या।

जय जय स्वसंवेद्या। आत्मरुपा ।।


प.पू तुकाराम महाराजांनी सुद्धा,"अठराही पुराणे हरिसी गाती" असे वर्णन केले आहे.येथे श्रीहरि म्हणजे वेदांनी प्रतिपादन केलेले आद्य तत्व म्हणजे श्रीविठ्ठल होय.म्हणूनच संत एकनाथ महाराज म्हणतात


 कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा

चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा 


म्हणजे  आपण ज्याची उपासना करतो ते आपल्यासारखे पूर्व जन्मात  कलेले कृतकर्म भोगण्यासाठी आईच्या पोटी जन्मलेले स्वामी नाहीत.तर ते स्वयंभू प्रगट झालेले परमात्म तत्व आहे.म्हणजे जे अगोदर अव्यक्त होते ते भक्तांच्या उपासनेसाठी आलंबन म्हणून व्यक्त  झाले आहे.किंवा अमूर्त तत्वाने मुर्त रुप धारण केले आहे. स्वामींची उपासना करणारे भक्त दोन प्रकारचे असतात.(१)देवा कडून मागणारे याचक.जसे भगवद्गीतेत वर्णिल्या प्रमाणे आर्त किंवा अर्थार्थी आणि दुसरे(२) जे फक्त भगवंताची निष्काम भावनेने उपासना करणारे जिज्ञासू किंवा ज्ञानीभक्त.ह्यांना भगवंताकडून काहीच नको असते फक्त देवच हवा असतो.हेच खरे उपासनेचे अधिकारी भक्त आहेत. ह्या उपासकांना व्याघ्र दृष्टी उपासक म्हणतात.व देवाकडून जड भौतिक पदार्थांची  अपेक्षा असणाऱ्या भक्तांना श्वानदृष्टी उपासक म्हणतात.

             आपल्या वैदिक ग्रंथात व वारकरी संप्रदायातील सर्वच साधू संतांनी परब्रम्ह स्वरुप सद्गुरू चे प्रतिपादन खालील प्रमाणे केले आहे.

        

जगत्व्याप्त,जग,जगआधार .

       जनजीवन , जनजीवन सार 

घेऊन रुप सगुण साकार

          साकारले दीगंबराकार 

अजर अमर ऋषी अविनाशी

          नाशी अन्न मुखी ग्रासी 


 

 म्हणजे परब्रम्ह परमात्म्याने आपल्याच योगमायेचा अंगीकार करुन सगुण साकार रुप धारण केले आहे. म्हणजे अजर अमर, अविनाशी असे शबलीत परब्रम्हच दीगंबराकार रुपात शेगावला शालिवाहन शके अठराशे साली माघ वद्य सप्तमीला देवीदास पातुरकरांच्या वाड्यसमोरील  वटवृक्षाखाली प्रगट झाले.ह्यालाच आम्ही"प्रगटले स्वामी गणगणराज" म्हणतो. ते उष्ट्या पत्रावळीतील भाताची  शिते उचलून,त्याचे निरिक्षण करुन तोंडात टाकून खातांना बंकटलाल अग्रवाल ह्यांनी पाहिले.ह्या कृतीतून जणू स्वामींना सुचवायचे होते की,


अन्नं परब्रम्ह वेदोक्ती

         ब्रम्हं अन्नं दर्पोक्ती


अन्न हे परब्रम्ह आहे  असे समजून  प्रसाद ग्रहण करणाऱ्या सज्जनांचे रक्षण करण्यासाठी व  जो परब्रम्ह स्वरुप जगाला अन्न समजतो म्हणजे जो दीन, दुबळ्या गोरगरीबांना माजलेल्या सांडाप्रमाणे ताडतो किंवा लुटतो अशांचा दर्प नष्ट करुन धर्म संस्थापनेसाठी स्वामीं प्रगट झाले होते.भगवद्गीतेत भगवंतानी चवथ्या अध्यायात परमेश्वराच्या अवतार कार्याचे तीनच प्रयोजन सांगितले आहे.(१)साधू , सज्जनांचे रक्षण (२) दुष्टांचे निर्दालन (३) धर्माचे संस्थापन.


परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम् ।

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे।।८।।


        म्हणून स्वामी वरील तीन उद्दिष्टांसाठी प्रगट होऊन भाताच्या  शितांबरोबर खेळत होते.

बंकटलालांना  स्वामींच्या पत्रावळीतून शीते उचलून तोंडात टाकण्याच्या खेळाचे मोठे आश्चर्य वाटले.म्हणून ते स्वामींच्या जवळ आले तेंव्हा स्वामी त्यांना खेळाच्या बरोबर मुखाने"गण गण गणात बोते" हा जप करीत असतांना दिसले. तेंव्हा बंकटलालांना वाटले की,आज पातुरकरांच्या मुलाच्या ऋतु शांति च्या कार्यक्रमा निमीत्त भोजनाचे आयोजन आहे.म्हणून बंकटलाल ला वाटले ह्या पत्रावळीशी खेळणाऱ्या माणसाने देविदास पातुरकरांना अन्न मागितले असते  तर त्यांनी ते निश्चित दिले असते कारण कोणताही सज्जन माणूस याचकाला परत पाठवित नाही.म्हणून बंकटलालाने पातुरकरांना सांगून अन्नाची पत्रावळ स्वामींसाठी बोलावली. व दोघांनी स्वामींना अन्न सेवन करण्यास सांगितले. स्वामींनी पत्रावळीतील संपूर्ण अन्नाचा काला केला व जेवण करु लागले. स्वामींचं जेवण पूर्ण होत असतांना बंकटलाल ने स्वामींना पाणी आणू कां ? असे विचारल्यावर स्वामी म्हणाले हा साधा व्यवहार तुम्हास कळायला हवा की जेवतांना पाणी वाढले पाहिजे.म्हणून बंकटलाल पाणी आणावयास पातुरकरांच्या वाड्यात गेले असता स्वामी सरळ उनाड नाल्यावर गेले.


   निरसून नीर निर्मळ भगवान

             गट्गट् गिळती गटारपान

   गिळवून गिळविती गणगणराम

             सिता सितापती सीताराम।।ॐ।।

      

 

म्हणजे त्या उनाड नाल्यातून  स्वामींसाठी शुद्ध निर्मळ जल उत्पन्न झाले.व स्वामी निर्मळ जल पिऊ लागले.तेवढ्यात बंकट पाण्याचा गडवा घेऊन उनाड नाल्याजवळ आला व  स्वामींना म्हणाला की स्वामी! नाल्यात गढूळ पाणी आहे ते पिऊ नका.तेंव्हा स्वामी म्हणाले सर्व ठिकाणी शुद्ध, निर्मळ परब्रम्ह ओतप्रोत भरलेले आहे.येथे गढूळ किंवा घाणेरडे म्हणून काही नाही.शुद्ध मनाने आपणास आवडत असेलेल्या ईश्वराची किंवा संताची मुर्ती हृदयात बसवा.व शांत मनाने  ईश्वराचे चिंतन करा हीच उपासना आहे.आणि ह्या उपासनेने त्रिवीध ताप नष्ट होऊन ईश्वर साक्षात्कार होतो.बंकटास वाटले गडवा परत केल्यानंतर स्वामींशी बोलू.म्हणून  बंकट गडवा द्यावयास वाड्यात गेले  तेंव्हा स्वामी वायुवेगाने निघून गेले.बंकट परत नाल्याजवळ आले  तर त्यांना स्वामी दिसलेच नाहीत.बंकट हिरमुसल्या मुखाने स्वामींचा शोध घेऊ लागले.

             खरं तर बंकटांचे पुर्व सुकृत फळा आले होते.म्हणून स्वामींच्या कडे त्यांचे लक्ष जाऊन परभारे कां होईना,बंकटाने स्वामींना भोजन करविले.पण बंकटांनी आणलेल्या गडव्यातून स्वामी पाणी प्यायले नाहीत. विचार केला तर ती माऊली कीती पुण्यवान असेल जीच्या ऋतुशांतीच्या कार्यक्रमास स्वामींनी हजेरी लावली .व तिच्या दारावर स्वामी जेवले.कांही कां असेना , बंकटलालांना स्वामींचा ध्यास लागला.ते संपूर्ण गावात हिंडून स्वामींचा शोधू घेऊ  लागले.स्वामी गावात दिसले नाहीत म्हणून जंगलातून त्यांनी तहान भूक विसरुन स्वामींचा शोध सुरू ठेवला.स्वामींनी बंकटलालास भक्तीचे संक्षिप्त सुत्रच सांगून दिले होते.म्हणून , अध्यात्माची आवड असल्याने लोकांना गप्पांच्या ओघात स्वामीबद्ल विचारु लागले. बंकटाच्या घराशेजारी राहणाऱ्या वयोवृद्ध रामोजीराव देशमुखांनी बंकटांच्या मानसिक स्थितीचे निरीक्षण करुन विचारले की, बंकटा ! तुम्हाला कशाची चिंता सतावत आहे .मी बघतो की मागील दोन दिवसांपासून तुम्ही भयाण चेहऱ्याने गावभर हिंडत आहात.बाप्पा बंकटा ! मला सांगा,तुमच्यावर कोणतं संकट कोसळलं.तेंव्हा बंकटांनी स्वामींची आश्चर्यकारक कथा बाप्पूंना सांगितली.तेंव्हा बाप्पू म्हणाले ते कोणीतरी योगी असावेत.तुम्ही मोठे भाग्यवान आहात म्हणूनच तुम्हाला स्वामींचे दर्शन झाले.आता पुन्हा स्वामींचे दर्शन झाल्यास मला सुद्धा स्वामींचे दर्शन घडवा.

       मग  बंकट तेथून उठून दुसऱ्या ठिकाणी स्वामींना शोधावयास  निघून गेलेत.


रघुपती राघव राजाराम

          पतित पावन सिताराम


           श्री गणगणरामार्पणमस्तू


जगन्नाथ गांधी

मुंबई मालाड (प)

९७६९५१८८५८

अध्याय २ - लेख क्रमांक २ - श्री गजानन महाराज शेगाव

अध्याय २ - लेख क्रमांक २ - श्री गजानन महाराज शेगाव 

                    *श्री गणगणरामाय नमः*

                          लेख क्रमांक २

                        *अध्याय दुसरा*

                   *स्वामींचा प्रगटोत्सव*

अध्याय २ - लेख क्रमांक २ - श्री गजानन महाराज शेगाव



प्रगटले स्वामी गणगणराज 

           समर्थ योगी योगीराज 

उधळे भक्तीरस रसराज 

           लीला लिलये करे गणराज।।धृ।।

जगत् व्याप्त,जग,जग आधार 

          जनजीवन जनजीवनसार

घेऊन रुप सगुण साकार 

          साकारले दीगंबराकार 

अजर, अमर, ऋषी ,अविनाशी 

           नाशी अन्न मुखी ग्रासी 

"अन्नं परब्रह्म" वेदोक्ती

           "ब्रम्हं अन्नं" दर्पोक्ती 

दर्प दर्पीचे दडपाया 

            दुख दुखितांचे दर्शाया 

दर्शन दर्शवी गणगणराम   

             सिता ,सितापती सिताराम।।ॐ।।


       सद्गुरू सांगतात की, जे ज्ञेय परब्रह्म आहे ते 

(१)संपूर्ण जगाला व्यापून आहे (२)ते जगाचे अभिन्न निमित्तोपादान कारण आहे.

(३) संपूर्ण जग त्या ज्ञेय परब्रम्हावरच आधारित आहे.(४)संपूर्ण जगातील लोकांच्या  जीवनाचे संप्रेरक तेच ज्ञेय परब्रम्ह आहे 

(५)आणि प्रत्येकाच्या जीवनाचे सार सुद्धा तेच परब्रह्म आहे.

    ज्ञेय म्हणजे ,जाणून घेण्याची गोष्ट. समजा समोर एक वस्तू ठेवलेली आहे.ती वस्तू काय आहे ते मला जाणावयाचे आहे. तेव्हा  मी झालो ज्ञाता.समोरची वस्तु झाली ज्ञेय.आणि ती वस्तु जाणणे ,हे झाले ज्ञान. आणि ज्ञाता,ज्ञेय,ज्ञान ह्यास त्रिपुटी म्हणतात. पंच ज्ञानेंद्रियाद्वारे जाणलेल्या ज्ञानामुळे ,ज्ञाता केंव्हाही ज्ञेय होत नाही.समजा समोर ज्ञेय, गुलाबाचे फुल आहे.परंतू ज्ञाता केव्हाही गुलाबाचे फुल होणार नाही.

            परंतू  परब्रह्माचे विशेष हे आहे की ,ते ज्ञेय परब्रह्म जाणता क्षणीच जाणणारा स्वतः परब्रम्ह होतो.व तो जीवन्मुक्त महापुरुष नित्यानंदात लीन होतो.माउली ज्ञानेश्वरीत लिहितात की,"आणि जाणितलेया वरौते |काहीच करणे नाही जेथे |जाणणेचि तन्मयाते | आणि जयाचे ॥१३\८६५॥

अर्थ:-ते ज्ञेयस्वरुप जाणल्यामुळे, ज्ञाता संसाराचा निरास करून नित्यानंद स्वरूप होतो.म्हणजे ज्ञेय स्वरूप होतो.ह्यासच अमृतत्वाची प्राप्ती म्हणतात. 

        हे ज्ञेय परब्रम्ह  जगास आतून  व बाहेरून पुर्णपणे व्यापून आहे. भगवान भगवद्गीतेत सांगतात की, "सर्वत: पाणिपादं तत्सर्वतोऽक्षिशिरोमुखम् |सर्वत: श्रुतिमल्लोके सर्वमावॄत्य तिष्ठति ॥

१३-१३॥

 अर्थ :-ते  सर्वत्र हात, पाय, डोळे, नाक, कान, मुख,असलेले आहे. कारण ते विश्वाला व्यापून राहीले आहे. 

      ह्यावरून कोणास असे वाटेल की परब्रह्म उपाधी युक्त आहे.परंतू माउली लिहितात की,ते परब्रह्म निरुपाधिक आहे. ते ज्ञेय परब्रम्ह सर्व व्यापक आहे हे दाखविण्यासाठी श्रृती मधे सुद्धा असाच उल्लेख आहे."वाचूनि हस्त, नेत्र पाये | हे भाष तेथ के आहे | सर्व शुन्यत्वाचा न साहे | निष्कर्षु जे ॥१३-८८४॥

अर्थ:- एरव्ही ब्रम्ह हे सर्व शुन्यपणाचा शेवट आहे.हा सिद्धांत सुद्धा ज्या ठिकाणी सहन होत नाही, त्या परब्रम्हाच्या ठिकाणी हात, पाय, डोळे हे बोलणे कोठे आहे.

         हे परब्रह्म "आहे" असेही म्हणता येत नाही.व "नाही " असेही म्हणत येत नाही. माऊली ज्ञानेश्वरीत लिहीतात की,"जे नाही म्हणो जाइजे | तव विश्वाकारे देखिजे |विश्वचि ऐसे म्हणिजे | तरि हे माया ॥१३-८६८॥ 

       म्हणजे परब्रम्हास नाकाराबे ,तर जे जगाच्या आकाराने आपणांस दिसते, मग त्यासाठी उपादान व निमित्त कारण कोणते ?ह्या प्रश्नास उत्तर मिळत नाही.व जगच परब्रम्ह म्हणावे तर ही माया आहे किंवा परमात्म्याचे तेज किवा प्रकाश आहे.म्हणूनच भक्तिमार्गात "जे जे भेटे भूत | तया मानिजे भगवंत "| असा भाव ठेवतात. ह्यावरून हाच निष्कर्ष निघतो की जग व जगाचा आधार एक परमात्माच आहे.

*जनजीवन जनजीवनसार*:- केनोपनिषदात ऋषी लिहितात की, यन्मनसा न मनुते येनाहुर्मनो मतम् |

तदेव ब्रम्ह त्वं विद्धि नेदं यदिदमुपासते.॥५॥

अर्थ:- ज्याचे मनाने मनन करता येत नाही ,पण ज्याच्यामुळे मनाला मनन करण्याची शक्ती प्राप्त होते,तेच ब्रम्ह स्वरुप आहे असे तू निश्चितपणे जाण.ज्याची तू उपासना करतोस, ते ब्रम्ह स्वरुप नाही.तसेच ज्याच्यामुळे डोळ्यांना बघण्याची शक्ती ,वाचेला बोलण्याची शक्ती,पायाला चालण्याची  शक्ती, म्हणजे जी जी क्रिया कर्मेद्रियानी ,किंवा ज्ञानेंद्रियानी करतो त्या सर्व कार्यास ज्याच्यामुळे शक्ती प्राप्त होते ते परब्रम्ह आहे.म्हणून सर्व प्राण्यांच्या जीवनाचे कारण एक परब्रम्हच आहे व सर्वाच्या जीवनाचे सार सुद्धा परब्रम्हच आहे.

             अशा विलक्षण सर्वज्ञ,सर्व व्यापी, सर्व शक्तीमान परब्रम्हाची शक्ती घेऊन ब्रम्हलोकातून स्वामी माघ वद्य सप्तमीस  शेगावात पातुरकरांच्या वाड्यासमोर प्रगट झाले.व लीलये पत्रावळीतील उष्ट्यी भाताची  शीते वेचून खाऊ लागले. ह्या स्वामीच्या लीलेचा असा अर्थ होतो की ,आपणास जे काही मिळते तो भगवंताचा प्रसाद म्हणून आनंदाने ग्रहण करावा कारण तो प्रसाद म्हणजेच परब्रम्ह आहे.व हीच वेदाची सुद्धा शिकवण आहे.ह्या उलट जो ब्रम्ह स्वरुप प्राण्याना अन्न समजतो म्हणजे  दीन दुबळ्या ,गरीब लोकांना लुटतो ,छळतो किंवा त्याच्यावर अन्याय करतो हा त्या दुर्जनांचा दर्प आहे.व हा दर्प दडपण्या साठीच स्वामी  ब्रम्हलोकातून पृथ्वीवर अवतीर्ण झाले. स्वामी ब्रम्हलोकातून अवतीर्ण झाले ह्या वाक्याची मीमांसा अशी आहे की, प्रत्येक कार्याला काहीतरी कारण असतेच व  ते  कारण त्या कार्यामधे सुक्ष्म रुपात अनुस्यूत असते. स्वामीनी आपल्या सर्व भक्ताना नामस्मरण करुन उपास्याचे रूप डोळ्यांत साठविण्यास शिकविले.व भक्ताना  क्रम मुक्तीच्या मार्गाद्वारे मुक्त होण्यासाठी ब्रम्हलोकात पाठविले.म्हणून ह्या कार्याच्या कारणावरुन आपण तर्क बांधू शकतो की  स्वामी सुद्धा ब्रम्ह लोकातून आले आहेत.त्याचप्रमाणे तेलंगी ब्राह्मण जे स्वामीच्या समोर चुकलेली ऋचा म्हणत होते ,त्यांना स्वामी म्हणाले होते, 

   म्हणा असे मी जसे म्हणू 

          ब्रम्हा म्हणती तसे म्हणू

त्याचप्रमाणे,

    म्हणवून म्हणविली ऋचा अशी 

          ब्रम्ह ब्रम्हदेव वदे जशी 

वरील सर्व कारणावरून हाच निष्कर्ष निघतो की स्वामी ब्रम्हलोकातून अवतीर्ण झालेले  महापुरुष आहेत.    

      महाभारताचे युद्ध संपल्यावर अर्जुनाने भगवंताना पुन्हा एकदा भगवद्गीता कथन करण्यास सांगितली तेव्हा भगवान म्हणाले त्या वेळेस मी तुला योगयुक्त अवस्थेत उपदेश केला.आता तो उपदेश पुन्हा सांगणे मला शक्य नाही.पण मी तुला  ब्रम्हलोकातून आलेल्या ऋषीनी दिलेली उत्तरे सांगतो असे सांगून अर्जुनाची ईच्छा तृप्त केली.त्या उत्तरानाच *अनुगीता* म्हणतात. ह्यावरून ब्रम्हलोकातून आलेल्या ऋषींचे महत्त्व कळते.आपले सद्गुरू देहधारी दिसत होते तरी ते परब्रम्ह स्वरुप अजर,अमर,अविनाशी असे ऋषी होते.माऊली लिहीतात की,

नाम,रुप, संबंधु |जाति,क्रिया,भेदू | हा आकारासीच प्रवादू | वस्तुसि नाही॥१३-९०४॥

अर्थ:- नाम,रुपादी संबंध व जाति क्रियादी भेद  हे आकारावरच नांदतात. त्याची भाषा ब्रम्हवस्तुला लागु पडत नाही. भगवान सुद्धा  भगवद्गीतेच्या दुसर्‍या अध्यायात लिहीतात की, अविनाशि तुद्विध्दि येन सर्वमिदं ततम् | विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ॥१७॥

अर्थ:-नाशरहित असे तेच ज्ञेय आहे की,ज्याने  हे हे सर्व जग व्याप्त केले आहे.त्या अविनाशी तत्वाचा नाश कोणीही करु शकत नाही.

        अशा तत्वाच्या प्राप्तीचा एकमेव उपाय म्हणजे सद्गुरूंना शरण जाऊन त्यांची अहंकार रहित भक्ती करणे हा होय.ह्या भक्तीत सद्गुरुंचा शब्द प्रमाण असतो.अशी भक्ती जेव्हा पुर्णता गाठते,तेव्हा भक्ताचा जीवभाव टाकून दिल्या जातो.व स्वामी त्यास मंत्र दीक्षा देतात. भक्त रात्रंदिवस मंत्राचा जप करतो. जसे चिचोलीचे माधवराव कुळकर्णी.ह्या जपातूनच त्या उपासकाला  जीवनाचे रहस्य कळते व भक्त कृतकृत्य होतो.ही कृतकृत्यता आम्हांसही मिळावी हीच सद्गुरु चरणी प्रार्थना.


ओवाळितो गुरूराया 

             जीवभाव ओवाळूनिया

ध्यान स्वरुपा ध्यानी यावे 

             ध्यानी रघुपती पद गावे 

मुखी नित्य गणगण गावे 

             गणगण गीत मुखी यावे.

गणगण गीत वदाया या 

             गणगण गीत गावाया या 

भक्ती स्वरुप वदाया या 

             पद भक्ती शिकवाया या 

शिक्षण शिकवे गणगणराम 

             सिता सितापती सिताराम ॥ॐ॥


रघुपती राघव राजाराम 

                  पतित पावन सिताराम 

                  श्रीगणगणरामार्पणमस्तू



जगन्नाथ गांधी 

मुंबई मालाड (प)

९७३९५१८८५८

अध्याय २ - लेख क्रमांक १ - श्री गजानन महाराज - शेगाव

    अध्याय २ - श्री गजानन महाराज - शेगाव 

                         

गणगण काव्यमाला – जीवभावाची ओवाळणी | श्री गजानन महाराज

                     *श्री गणगणरामाय नमः*

                         लेख क्रमांक १

                      *अध्याय दुसरा*

        *जीवभावाची ओवाळणी करतो* “जीवभाव म्हणजे काय?”

श्री गजानन महाराज शेगाव – जीवभावाची ओवाळणी, गणगण काव्यमाला अध्याय २


""ओवाळितो गुरुराया

             जीव भाव ओवाळूनीया"

ध्यान स्वरूपा ध्यानी यावे 

            ध्यानी "रघुपती "पद गावे 

मुखी नित्य गणगण गावे 

             गणगण गीत मुखी यावे 

गणगण गीत वदाया या 

              गणगण गीत गावाया या 

भक्ती स्वरूप वदाया या 

               पद भक्ती शिकवाया या 

शिक्षण शिकवे गणगणराम 

               सिता सितापती सीताराम  ॥१॥

         "गणगण काव्यमाला "ह्या ग्रंथातील दुसऱ्या अध्यायातील पहिल्या युग्मातील  जीवभावाचे चिंतन.व भक्ती स्वरुप शिकवण्या साठी सद्गुरू चरणी प्रार्थना

 जीव कल्पयते पूर्वं,

         ततो भावान् पृथग्विधान्

बाह्यान् आध्यात्मिकाश्चैव

          यथा विद्या यथा स्मृति

     आपण बाह्य पदार्थ पाहिले, इंद्रियांनी अनुभवले की, आपल्या मनावर त्याचे संस्कार होतात.व त्या संस्कारांच्या मधून आंतरिक मनोकल्पीत पदार्थांची निर्मिती होते.त्या कल्पनांच्या मधून पुन्हा बाह्य पदार्थ सत्य वाटायला लागतात.येथे शंका येते की,

१) ह्या सर्वांचे मूळ कारण काय?

२) ह्या सर्व कल्पना कोण करतो?

३)ह्या कल्पनांचे मूळ निमित्त काय आहे?

              सर्वप्रथम आत्मदेव, प्रभू, जगत्कारण ईश्वर, विशीष्ट जीवाची कल्पना करतो.विशीष्ट जीव म्हणजे शुद्ध स्वरूप  पारमार्थिक जीवाची कल्पना करतो.म्हणजे ईश्वर स्वतःच जीव भावाला प्राप्त होतो.श्रृती वर्णन करते

    "तत्सृष्ट्वा तदेवानुप्राविशत"

ईश्वराने विश्व निर्मिती करुन त्या मधे प्रवेश केला.अद्वय , आनंद स्वरुप असणारा परमात्माच  स्वतः विश्वरुप झाला.व त्याने सर्वांमध्ये जीवरुपाने प्रवेश केला.परमात्माच जीव रुपाला प्राप्त होऊन नंतर त्याने अनेक अंतर्बाह्य नानाविध पदार्थांची निर्मिती केली.सुख, दुःख, ज्ञान,राग वगैरे आंतरिक पदार्थ असून यासाठी निमित्त कारण होणारे घटपटादी हे बाह्य पदार्थ आहेत.हे सर्वच पदार्थ कल्पित आहेत.

प्रश्न:- ह्या सर्व कल्पित पदार्थांचे मूळ कारण काय आहे?की,हे सर्व पदार्थ "ख " पुष्पा प्रमाणे अगदीच असत् आहेत. स्वामी सांगतात, निर्गुण, निर्विशेष,निरुपाधिक आत्मस्वरूपामधे सर्वप्रथम "हेतु-फलात्मक " जीवाची कल्पना निर्माण होते.

प्रश्न:- हेतु फलात्मक जीव म्हणजे काय?

   प्रत्येक जीव सर्व प्रथम मी कर्ता आहे अशी कर्तृत्व भावना निर्माण करतो.त्यामुळे तो चांगल्या -वाईट अनेक प्रकारच्या कर्माच्या मध्ये प्रवृत्त होतो.त्यामुळे त्या कर्माप्रमाणे फळ प्राप्त होते.तेंव्हा जीवाला वाटते मला सुख, दुःख झाले.ही भोक्तृत्व भावना त्यांच्या मधे निर्माण होते.अशाप्रकारे जीव "मी"  करतो ह्या कर्तृत्व भावनेने व "मी ' सुखी दुःखी ह्या भोक्तृत्व भावनेने युक्त होतो.म्हणून येथे कर्तृत्व भावना हे कारण व भोक्तृत्व भावना हे त्यांचे फळ आहे.

"अहंकार विमूढात्मा कर्ता अहं इती मन्यते "

अहंकाराने विमूढ झालेला जीव स्वतःलाच कर्ता म्हणवून घेतो.अशा ह्या कर्तृत्व व भोक्तृत्व भावनेने युक्त असलेल्या अज्ञानी जीवालाच हेतु फलात्मक जीव असे म्हणतात. कर्तृत्व भावना हा हेतु म्हणजे कारण व सुख दुःख हे त्याचे फळ आहे.जीव ह्या हेतू फळांनी म्हणजे कर्म -कर्मफळांनी बध्द, मर्यादित व संसारीं होतो.

     वस्तूतः प्रत्येक जीव हा स्वतः ईश्वर स्वरूप, शुध्द चैतन्य स्वरुप, परिपूर्ण,व आनंदरस  आहे.परंतू ह्या शुध्द आत्मचैतन्यामधे हेतू फलात्मक बध्द जीवाची कल्पना निर्माण होते

प्रश्न:- कशी?

उत्तर:-रज्ज्वां इव सर्प कल्पयते

    ज्याप्रमाणे शुध्द,स्थिर रज्जुवर चंचल, अस्थिर सर्पाची कल्पना निर्माण होते, त्याप्रमाणे शुध्द आत्मचैतन्यामधे हेतू फलात्मक जीवाची म्हणजे बध्द, संसारीं जीवाची कल्पना निर्माण होते.एकदा हा अज्ञानमूलक जीव भाव निर्माण झाला की त्यापासून पुढे सर्व अनर्थ परंपरा निर्माण होते.

          आपल्याला आता काहीतरी मिळवायचे आहे अशी भावना निर्माण झाली की मग ती पूर्ण करण्यासाठी क्रिया -कारक -फलभेदाने युक्त असणाऱ्या अनेकविध बाह्य व आंतर अनंत पदार्थांची कल्पना निर्माण होते.

प्रश्न:- ह्या सर्व अंतर्बाह्य कल्पित पदार्थांचे कारण काय?

                 जो जीव स्वतः आत्मचैतन्यामध्ये कल्पित आहे तोच कल्पित जीव ह्या सर्व पदार्थांचे कारण आहे.त्या जीवाचे जसे ज्ञान -विज्ञान असेल त्याप्रमाणे त्याला स्मरण होते.जसे,अन्न, पाणी वगैरे पदार्थांमुळे भूक तहान शांत होते व आपणास तृप्ती चा अनुभव येतो.मात्र हे पदार्थ नसतील तर तृप्तीचा अनुभव येत नाही .तहान भुकेमुळे व्याकुळ होतो.अशावेळी भोजनाची कल्पना जागृत होते.तृप्ती मिळविण्यासाठी आपण जेवले पाहिजे.म्हणजे जेवण हा हेतु व तृप्ती हे त्याचे फळ.म्हणजे आपणास भोजनादी हेतुचे व तृप्ती ह्या फळाचे स्मरण होऊन, हेतूस्मरण व फलस्मरण ह्याचे विज्ञान होते.

        याप्रकारे जीवाला अनंत हेतूंचे व अनंत फळांचे स्मरण होत असते.आपल्याला हवे तेवढे अन्न वस्त्र मिळाले म्हणजे आपण सुखी होऊ ह्या कल्पनेने जीव इच्छीत वस्तू मिळविण्यासाठी अनेक कार्यामध्ये प्रवृत्त होतो.व कर्म केले की त्याचे फळ मिळते व मनाला समाधान प्राप्त होते.त्या समाधानाच्या स्मरणाने पुन्हा त्या वस्तू मिळविण्यासाठी जीव कर्म प्रवृत्त होतो.पुन्हा त्याला कर्माचे फळ मिळते व तो समाधानी होतो.व पुन्हा त्या समाधानाच्या स्मरणाने हेतुभूत भोग्य पदार्थांची कल्पना करतो.

अशा प्रकारे अनंत कल्पनांच्या प्रवाहाने बनलेला हा संसार सागर आहे.जीव सतत ह्या बाह्य व आंतरीक पदार्थांची निमित्त नैमित्तिक, साध्य -साधन भावाने कल्पना करत राहतो.विषयांचे संस्कार, त्यामधून स्मृती, स्मृती मधून संकल्प,संकल्पामधून क्रिया, क्रिया घडविण्यासाठी साधनीभूत कारक, त्यामधून क्रियेचे फळ,फळाचा उपभोग , पुन्हा संस्कार असे अव्याहत चक्र सुरूच राहते.

    याप्रकारे संस्कार -स्मृती-संकल्प-क्रिया-कारक-फळ-उपभोग व पुन्हा संस्कार हे असे सर्व परस्परांना कारण व कार्य होतात. ह्याप्रमाणे जीव अनंत साध्य साधनांनी युक्त असणाऱ्या अनेकविध कल्पना करतो.म्हणजे जीव आपल्या अंतःकरणात अशा अनंत कल्पनांचे जंजाळ निर्माण करतो.व कल्पनांच्या तरंगामधे जीवन जगतो.

        थोडक्यात , जीव स्वतः कल्पित आहे.स्वत:ला देह समजून, ह्या देहासाठी तो जीव अनेक कल्पना निर्माण करून जीवनभर त्या कल्पनांच्यामध्ये बध्द व मर्यादित होऊन राहतो.म्हणूनच त्याला सुखदुखात्मक संसाराचा अनुभव येतो.

          जोपर्यंत स्वतः च्या पारमार्थिक आत्मचैतन्य स्वरूपाचे अज्ञान असते, तोपर्यंत तो जीव स्वतः मध्येच अनात्म्याचा आरोप करुन निरनिराळ्या विषयांच्या कल्पना निर्माण करतो. कर्तृत्व , भोक्तृत्व भाव निर्माण करून संसारीं होतो.म्हणून जो पर्यंत कल्पना आहेत तोपर्यंत जन्मानुजन्मे हा अज्ञानमूलक संसार अखंड अव्याहतपणे चालूच राहतो.म्हणून ह्या कल्पनेला परमेश्वर चरणी अर्पण करण्यासाठी परमेश्वराच्या नामस्मरणाचा व रुप डोळ्यांत साठविण्याचा अभ्यास केला तर केंव्हातरी करुणाकराला करुणा येऊन आपल्या जवळ ठेवून घेतील व स्वस्वरुपाचा बोध करतील व मंत्र देतील. जसे 

"ध्यान स्वरूपा ध्यानी यावे 

        ध्यानी" रघुपती पद" गावे"

      येथे "रघुपती पद" म्हणजे रघुपती राघव राजाराम, पतित पावन सिताराम 

    स्वामी हे संपूर्ण पद एवढ्या जलद पण स्पष्ट रीतीने गात होते,की  मला वाटले स्वामी" रघुपती  पदाच्या" ऐवजी" गणगण "म्हणत आहेत .म्हणजे स्वामी परमेश्वराचे नामस्मरण करतात पण आपल्याला गणगण ऐकायला येते.आणि हीच गणगण सद्गुरू कृपेने आपल्या मुखात आली  म्हणजे आपला जीव भाव सद्गुरु चरणी अर्पण केल्या जाईल.असा सुदिन,सर्व भक्तांच्या भाग्याचा  उजळो ही प्रार्थना करुन सद्गुरु चरणी बोबडे बोल अर्पण करतो.


रघूपती राघव राजाराम

          पतित पावन सिताराम 

            श्रीगणगणरामार्पणमस्तू


जगन्नाथ गांधी 

मुंबई मालाड (प)

९७६९५१८८५८

खालील लिंक क्रोम ब्राउझर वर ओपन करा.

https://youtu.be/gMMRfsLdBaM?si=ItjyoeqbrSLcIXIc

ब्लॉग पोस्ट आणि  यू ट्यूब व्हिडिओ आवडल्यास कृपया शेअर नक्की करा.

Sangita Bhalsing 

Ahilyanagar Maharashtra 

चहाचा कप - एक भावस्पर्शी कौटुंबिक कथा

 *चहाचा कप* मराठी कथा 


 सकाळी सकाळी सासू- सुनेचा संवाद अगदी सहजपणे माझ्या कानावर पडत होता.हॉल आणि किचन मधलं अंतर तरी कितीसं..!



सुनबाई म्हणत होती,"सकाळी घाई घाईत मी माझा चहाचा कप धुवायला विसरले,बाळ ही रडत होतं ..!नंतर मी धुऊन टाकला असता की,तुम्ही तो कप असा बाजूला काढून का ठेवला?तुम्हाला धुण्यासाठी मी नव्हता ठेवला.तुम्ही कप धुवावा किंवा माझं काम करावं ही अपेक्षाच नाही

 आणि कामवालीला इतर सर्व भांड्या बरोबर कप ही घासायला दयायचा की, तुम्ही घासावा म्हणून मी तिथे ठेवला नव्हता.. मी नंतर धूतला असता कप...त्यात काय एवढं !तुम्ही असा बाजूला ठेवायला नको होता मला फार वाईट वाटले" असं म्हणत सुनबाई काम करताना,मुसमुसत होती. शेवटी डोळे पुसत पुसत ती बेडरूममध्ये निघून गेली. मी तिथं असूनही मध्ये बोलण्याचा काही प्रश्नच नव्हता ,खरेतर हिंमतही नव्हती,वेळही  नव्हती बोलण्याची...!आणि मध्ये बोलणे योग्य ही वाटत नव्हते.

संध्याकाळी आम्हा उभयतांची मंदिरात जायची वेळ झाली होती. बाळाला आम्ही कधी कधी फिरायला नेत असू,पण बाळ झोपलं होतं म्हणून दोघेच निघालो.ताटात हार-फुलं आणि अगरबत्ती ठेवत होती .मी तिच्याकडे पाहत होतो आणि काहीतरी मनाशी ठरवलं होतंच...आणि जे ठरवलं होतं त्याला पूरक परिस्थितीही लगेच निर्माण झाली...!

 मंदिरात देव दर्शन झालं आणि बाहेर हिरवळीवर आम्ही दोघ नेहमीप्रमाणे गप्पा करत  निवांत बसलो. खडीसाखरेचा प्रसाद खात होतो ,तेवढ्यात तिच्या फोनची रिंग वाजली.

बोलण्या वरून लक्षात आले की, आमच्या लाडक्या कन्येचा फोन होता आणि बाईसाहेब फोनवर रडत होत्या. सासूचे आणि तिचं कुठल्यातरी कारणावरून भांडण झालं होतं

आणि ही तिला समजावून सांगत होती. तिच्या सासूला नाव ठेवत होती. एवढं वय झालं कळत नाही का? असं म्हणत होती .तिला मुलगी नाही का ?आणि तुझ्या नवऱ्याला काही कळत नाही का ?त्याला दिसत नाही का? आपली आई कशी वागते...! असं सांगत होती. मी मात्र गप्प होतो

तिने त्रासिक मुद्रेने फोन ठेवला आणि माझ्याकडे रडवेल्या नजरेने पाहिलं .खूप वैतागलेला चेहरा दिसत होता मलाही ते सर्व काही सांगणार होती, तेवढ्यात मी तिला म्हणालो ," आपल्या सूनबाईने पण सकाळी तुला हेच सांगितलं की... आपली मुलगी जशी दुसऱ्या घरी गेली तुला काळजी वाटते तशीच आपली  घरी देखील परक्याची मुळी आली आहे. तुला स्वतःच्या मुलीची काळजी वाटतेय..मग सुनेला आपली का म्हणू शकत नाहीस. ती आपल सर्व काम करते .गरज पडली तर माझे,तुझे कपडे धुते. भांडी स्वयंपाक काम करते आणि तू तिचा कप बाजूला काढून ठेवला ...हे शोभत का तुला? हे पटलं का तुला? तुझ्या मुलीला असं केलं तर तुला चालत नाही मग तू दुसऱ्याच्या मुलीला असं का करते आणि हे बघ आपला मुलगा जेव्हा तीच्या घरी त्याच्या सासरी जातो तेव्हा तिचे आईवडील त्याचा सर्व पाहूणचार करतात,मानसन्मान करतात. मग तुझी जबाबदारी नाही का तिला मुलीप्रमाणे वागवायची ?जीव लावायची ?

तुला आठवतंय मागे तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं ,चांगली दोन महिने बेडवर आराम करत होतीस. हॉस्पिटलमध्ये चार दिवस होतीस तेंव्हा कोणी सेवा केली तुझी ! सुनबाईनेच जागेवर जेवण दिलं, आंघोळ घातली... एखाद्या मुलीप्रमाणे तुझी सेवा करत होती.. दिवसभर काम करत होती ,रजा घेऊन..!  आणि घरातील सर्व काम देखील व्यवस्थित, नीटनेटके करते,आग्रहाने खायला घालते. तुझ्याकडून कोणत्या कामाच्या अपेक्षा केली नाही.

आणि शेवटी हे बघ आपला एकुलता एक मुलगा आणि एकुलती एक असून आपल्याला त्यांच्या शिवाय कोण आहे? नातेवाईक कोण कोणाचे ?ते थोडीच आपली सेवा करणार आहेत? शेवटी म्हातारपणी आपली सेवा तिच तर करणार आहे हे ध्यानात ठेव. आपली मुलगी येईल फक्त चौकशी पुरती..!आणि तिच्यामागे लहान लेकरू आहे, नोकरी करते ,घरही सांभाळते मग तिच्याबरोबर तू बरोबरी का करते ...! तिला त्रास देण्यापेक्षा समजून घे ,प्रेम दे .शेवटी आपल्यापेक्षा लहानच आहे ती, चुका झाल्यात तर पोटात घालाव्यात ...समजून सांगावं. स्वतःच्या मुलांना जसं समजून घेतो तसेकंग समजून घेतलं पाहिजे.मुलगा आपलाच रहावा अस वाटत असेल तर सुनेलाच जीव लावावा लागतो.जुने लोक म्हणत असत " सोन्यासाठी चिंधी सांभाळावी लागते " म्हणून आज तिला जसे आपण वागवू तसेच ती आपल्याला वागविल..!

आपण जे देऊ तेच परत मिळेल.हे लक्षात ठेव.

आपल्या मुलाचे सुख तेच आपले सुख आहे.कुटुंब सुखात,आनंदात ठेवायचे असेल तर आपणच अधिक प्रयत्न करायला हवेत.त्यांच्या आयुष्यात अधिक ढवळाढवेळ न करता...!

आणि मी तिच्या आई बापाला लग्नापूर्वी म्हणालो होतो की आम्ही तिचे आईबाप बनू, तिला तुमची आठवण येणार नाही असा मी बाप होईल,मुलगी म्हणून मान सन्मान मिळेल तिला आमच्याकडे...."

ती शांतपणे सर्व ऐकून घेत होती न बोलता डोळ्याच्या पापण्या पुसत होती...

आणि हे बघ आपलं नशीब चांगलं आहे बरं...! कारण ती सतत नवऱ्याला आपलं भांडण ,वाद सांगत बसत नाही .तुझ्याबद्दल तक्रारी करत नाही, तिच्या आईबापाला ही ती आपल्या घरातील अशा गोष्टी सांगत नाही.समजूतदार आहे ती..!नाहीतर बघ अशा वाद विवादाने पोराचं डोकं फिरलं तर ...! तो कसा माथेफिरू आहे हे तुला चांगलंच माहीत आहे .कुटुंबात कलह निर्माण होईल भांडण होतील ....जॉब करतात दोघं ...टेन्शन असतं त्यांना..! ते ऑफिस पाहतील   की घरातले भांडण पाहतील. विचार कर ,त्यांना शांतता देऊ शकतो आपण .आपले हात-पाय चालत आहे तोपर्यंत..! आपण त्यांना मदत केली तर नक्कीच आपलं म्हातारपण सुखात जाईल. आपण आजूबाजूला पाहतोय की, समाजात काही ठिकाणी वृद्धांची अवस्था  फार वाईट आहे.वृद्धाश्रमाची संख्याही  वाढत चालली आहे.पण आपण नक्कीच भाग्यवान आहोत बघ...!आपल्याला वाईट वेळ येणार नाही ही खात्री आहे.आपण मुलाला चांगले संस्कार दिले आहेत आणि सुनबाई देखील चांगल्या संस्कारी घरातील आहे. माझा तुझ्यावर जसा विश्वास आहे तसा मुलावर विश्वास आहे आणि सर्वात जास्त माझ्या सुनेवर विश्वास आहे.खूप चांगली मुलगी आहे.आपल्या घरात ही तुळस छान रुजलीय....!  तू नक्कीच हुशार आहेस समजून घेशील .

संध्याकाळी घरी गेलो तर हॉलमध्ये नातवाने रडून गोंधळ चालवला होता आणि सुनबाई त्याला समजवत होती. पण लबाड रडायचा थांबत नव्हता...! काय बिनसलं होतं कोण जाणे..! स्वयंपाकाची तयारी बाकी होती...

ही म्हणाली,आरती तू सांभाळ त्याला...मी पाहते स्वयंपाकाचं !आणि आपल्याला फक्कडसा चहा पण करते ...! असं म्हणताना तिने हळूच माझ्याकडे पाहिलं आमच्या डोळ्यांची भाषा आमची आम्हाला समजली आणि हलकीशी स्मितरेषा चेहऱ्यावर होती दोघांच्याही..! आणि आमच्या दोघांच्या कडे पाहून सूनबाई चेहऱ्यावरही हलकस हसू होतं .कळी खुलली होती आणि सकाळच्या चहाच्या कपातील वादळ ,संध्याकाळच्या चहाच्या कपात शमलं होतं.


प्रा.सौ.संगिता भरतकुमार भालसिंग

उपशिक्षिका

शाळेचे नाव:- श्री घोडेश्वरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर, घोडेगाव

ता.नेवासा

जि. अहमदनगर


कथा आवडल्यास कृपया नक्की शेअर करा.

शनिवार, ३१ जानेवारी, २०२६

गुळणा-गुळणी… जुने ते सोने

 गुळणा-गुळणी… जुने ते सोने - मराठी लेख 

किती सुंदर चित्र…

किती हृद्य प्रसंग…

नववधू आणि वर—

मराठी विवाहातील गुळणा-गुळणी परंपरा – नववधू आणि वर यांचा प्रेमळ खेळ


एकमेकांची अजिबात ओळख नाही.

फक्त एकदाच, दूरून घेतलेली क्षणिक नजर…

प्रेम, प्रेमपत्र, बिमं-किमं यांचा प्रश्नच नाही.

लग्न ठरल्यानंतर भेटी अशक्यच.

फोन कॉल? मेसेज?

तो काळच नव्हता.

मग एकमेकांना ओळखायचं तरी कसं?

संकोचाचा पडदा गाळायचा तरी कसा?

म्हणूनच आपल्या पूर्वजांनी शोधलेले हे

सुंदर, प्रेमळ आणि खोडकर उपाय…

गुळणा-गुळणी!

विवाहानंतरची पहिली आंघोळ—

अंगावर चूळ भरून पाणी उडवणे,

हसत-खेळत खोड्या काढणे…

कंकण सोडविणे,

पाण्यात अंगठी शोधण्याचा खेळ…

त्या निमित्ताने नकळत हातांचा स्पर्श,

डोळ्यांत लाज, ओठांवर हसू…

ना शब्दांची गरज,

ना मोठ्या अपेक्षा—

फक्त साधेपणा, निरागसपणा आणि मनापासूनची जवळीक.

खरंच…

ते दिवस आता गेले.

उरल्या आहेत फक्त आठवणी…

आजच्या पिढीला कदाचित या गोष्टी

हास्यास्पद, वेड्या वाटतील.

पण ज्यांनी हा अनुभव मनापासून जगला आहे,

त्यांच्या संसाराला फिफ्टी पूर्ण झालेली

असण्याची शक्यता नक्कीच जास्त आहे…

कारण त्या नात्याची पायाभरणी

भौतिक साधनांवर नाही,

तर संयम, समज, प्रेम आणि परंपरेवर

झालेली होती.

जुने ते सोनेच…!

— Sangita Bhalsing

Ahilyanagar Maharashtra 

Post आवडल्यास नक्की शेअर करा.

मराठी निबंध - प्रयत्न हाच परमेश्वर

 

प्रयत्न हाच परमेश्वर - निबंध (मराठी लेख) इयत्ता 12 वी 

 मंगळवार दि.३१ जाने.२०१७ एकमत वर्तमान पत्रातील "साक्षी " पुरवणी मधे माझा निबंध/लेख प्रकाशित.

🌷 प्रयत्न हाच परमेश्वर 🌷

शासकीय कार्यालयात धार्मिक पूजा-अर्चा करन्यास बंदीची बातमी आज दूरदर्शनवर ऐकली ...अणि लगेचच मला

प्रयत्न हाच परमेश्वर - निबंध (मराठी लेख) इयत्ता 12 वी   मंगळवार दि.३१ जाने.२०१७ एकमत वर्तमान पत्रातील "साक्षी " पुरवणी मधे माझा लेख प्रकाशित.


"प्रयत्नान्ति परमेश्वर " या अचूक अणि अजरामर सुवचनाची आठवण झाली....यशस्वी होण्यासाठी प्रयत्न अणि उत्तम कार्य करण्याची गरज आहे,धार्मिक कर्मकांड करण्याची नव्हे...!!या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगाची ही अत्यावश्यक गरज आहे.प्रगत देश आज चंद्र अणि मंगळावर निवास करण्यासाठी धडपडत आहेत अणि आपण मात्र धार्मिक बाबीला चिकटून आहोत.परदेशात विद्यार्थी रोबोट बनवन्यात मग्न आहेत अणि आपली मुले आरती करन्यात गुंग झाले आहेत.मग भारत कसा प्रगत बनणार? जागतिक स्पर्धेत कसा टिकाव धरणार? परमेश्वराची आळवणी करुन अभ्यास न करता यशकसे मिळणार? जाती धर्म उंबऱ्याच्या आतच असला पाहिजे.

श्रद्धा असावी पण डोळस....!!अंधश्रद्धा काय कामाची ? आपले दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलाम ,राष्ट्रपिता म.गांधी अणि इतर अनेक थोर महान व्यक्तिमत्व असलेल्यानी अथक प्रयत्नावर भर दिला आहे.रिलायंस कंपनीचे निर्माते धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर नोकरीला होते.गरीबीत जीवन कंठणारी व्यक्ती आपल्या योग्य प्रयातनांच्या जोरावर देशातील महान उदयोगपती ठरली.

"असाध्य ते साध्य सायास करीता" असे तुकाराम महाराज म्हणतात तर, संत रामदास म्हणतात,

" जो दुसऱ्यावरी विसंबला,त्याचा कार्यभाग बुडाला 

जो आपणची कष्टत गेला,तोचि भला...!!" सर्वच संतांचा असा उपदेश आहे.

"केल्याने होत आहे रे,आधी केलेचि पाहिजे"

दैवावर विसंबुन रहा ,असा उपदेश कोणीच केला नाही.

म्हणून सतत उत्तम कार्य करीत रहा, प्रयत्ना शिवाय कोणतीही गोष्ट प्राप्त होत नाही. योग्य मार्गाने जाणाऱ्या ला नक्की यश मिळते हा विश्वास बाळगा.प्रसिद्ध प्रशासक किरण बेदी म्हणतात की, "माझ्या आयुष्याचे एक ब्रीद आहे,ते म्हणजे जगात अशक्य असे काहीच नाही, कोणतेही ध्येय अप्राप्य नसते, फ़क्त अतोनात असे अथक परिश्रम करावे लागतात"

संत रामदास म्हणतात, "म्हणोंन आळस सोडावा,यत्न साक्षेपे जोडावा"

आळस एक नंबर चा शत्रू आहे. चिकाटी ,उत्साह यांनी सतत काष्टाचा मार्ग अवलंब करा.यश मिळविण्या साठी कोणताही शार्ट कट नाही देवाला नवस करुन अणि तीर्थ क्षेत्री जाऊन किंवा प्रदक्षिणा करुन यशमिळेल याची खात्री नाही.

यशाचा मूलमंत्र म्हणजे फ़क्त कठोर परिश्रम....!!

ससा अणि कासव यांच्या गोष्टीतील कासवाची चिकाटी ,अविचल राहण्याची प्रवृत्ती धारण केल्यास नक्की यश मिळेल. अभ्यास न करता नवरात्र उत्सव काळात अनवानी चालून,उपवास करुन परीक्षेत यश कसे मिळणार.

सार्वजनिक उत्सव सर्वच वाईट आहेत असे नव्हे,पण वेळेचा अपव्यय

अणि इतर लोकांना त्रास होतो ,पैशाचा गैरवापर ही ध्यानात घेतले पाहिजे.


धार्मिक कार्य घराच्या आत करुन  सात्विक समाधान मिळू शकते याचे सार्वजनिक प्रदर्शन कशाला? देव भक्ती आजकल प्रदर्शनीय झालेली दिसून येते,खरा भक्तिभावहरवून गेलेला दिसतो. केवळ इच्छा नि संकल्प करुण उद्दिष्ट पूर्ण होत नाही, त्याला प्रयातनांची जोड़ द्यावी लागते.

आजच्या पिढी समोर आपण कोणते आदर्श ठेवत आहोत ,यांचा विचार केला पाहिजे. आजच्या तरुणाईला आपण खूप दोष देतो पण त्यांच्या समोर आपण कोणत्या चांगल्या बाबी मांडत आहोत का?

हे विचार वाचून कदाचित असे वाटेल, की मी नास्तिक आहे की काय? पण तसे नव्हे ...!! घराच्याउंबरयाच्या आत धार्मिक बाबी असाव्या ,अणि श्रद्धा डोळस असावी इतकेच माझे मत आहे.


सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर/अहिल्यानगर, महाराष्ट्र 
Copyright


ब्लॉग पोस्ट/निबंध आवडल्यास नक्की शेअर करा.


अध्याय १ - श्री गजानन महाराज - शेगाव

अध्याय १ - श्री गजानन महाराज 

‌.   

श्री गजानन महाराज हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत आहेत, ज्यांचा शेगाव येथे मंदिर आहे आणि त्यांचे जीवन व भक्ती अनेकांमध्ये श्रद्धेचा विषय आहे. 

अध्याय १ श्री गजानन महाराज हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत आहेत, ज्यांचा शेगाव येथे मंदिर आहे आणि त्यांचे जीवन व भक्ती अनेकांमध्ये श्रद्धेचा विषय आहे.


    श्रीगणगणरामाय नम: 

       श्री समर्थ सद्गुरू प.पू.श्री गजानन महाराज यांच्या लीलावर आधारीत ग्रंथ " गणगण काव्यमाळा".ह्या ग्रंथातील गीताची गायिका सौ. अनुजा असून लेखन श्री जगन्नाथ गांधी, मालाड मुंबई ह्यानी केले आहे.

                    अथ प्रथमोऽध्याय:

                     मंगलाचरण

 मंगलाचरण तीन प्रकारचे असते.

(१) वस्तु निर्देशात्मक (२)आशिर्वादात्मक (३) नमस्कारात्मक 

           प्रस्तुत प्रथमोध्यायात पारंपरिक देवी देवता,वारकरी संप्रदायातील संत व विद्वान सत्पुरूषाना नमस्कार करुन सद्गुरुंची कथा निर्विघ्न संपन्न व्हावी म्हणून आशीर्वाद मागितले आहेत.

खाली दिलेली लिंक क्रोम ब्राउझर वर ओपन करून व्हिडिओ पहा.

 https://youtu.be/rq6P9tp_E3Y

व्हिडिओ आवडल्यास कृपया like comment share नक्की करा.


श्री गणगणराजाय नमः

              अथ प्रथमोध्याय:

                 मंगलाचरण

प्रगटले स्वामी गणगणराज 

           समर्थ योगी योगीराज

उधळे भक्तीरस रसराज

            लीला लिलये करे गणराज।।धृ ।।


 विनवे दास दासगणू या

             सद्गुरू कथा कथाया या

सद्गुरू ची मह महती अशी

            पंगु गीरी चढे सरसरशी

मुका वदे रसरस वाणी

             आई शारदा वदे वाणी

सरस्वती आई वदाया या

              लेखणी करी धराया या

संगे श्रीरंग घेऊन या

              संत कथा रंगवाया या

रंगूनी रंगवा गणगणराज 

               समर्थ योगी योगीराज।।१।।


ओवाळितो राधा आई

            भावे भक्तिदान देई

भक्ती सुर सुरसाया या

            ग्रंथी स्त्राव स्त्रवाया या

संगे मुकुंद घेऊन या

             मुकुंद मकरंदाया या

निर्मळ परिसर प्रसवाया

             शरदचंद्र पौर्णाया या

मुरळी अधर धराया या

             स्वर रजनी रंजाया या

रंजूनी रंजवा गणगणराज 

 ‌.           समर्थ योगी योगीराज।।२।।


सीता सती मां परम् सती

           वंदितो सीता सीतापती

सीता सीतापती सिताराम

           वनमाळी, माळी,वनपतीराम

वर्षा वर्षवी मेघ:श्याम

            फुले फुलवी सीताराम

भक्ती फुले फुलवाया या

             काव्य फुले गुंफाया या

भक्ती माळ वळाया या

             काव्य माळ अर्पाया या

अर्पूनी अर्पितो गणगणराम

              सिता सितापती सीताराम।।३।।


वंदितो गौरी गौरीशा

          ओंकारा ओंकारीशा

शरणागत शरणाया या

          वत्सल वत्स वत्सलाया या

भक्ती शिक शिकवाया या

           ध्यानी ध्यान धराया या

मूर्ती मूर्त कराया या

           गुरुपूजन पुजवाया या

गुरुवंदन वंदनाया या

            सर्वार्पण अर्पाया या 

अर्पूनी अर्पितो गणगणराम

             सीता सितापती सीताराम।।४।।


ओवाळितो विठूराया

            धरुनी भाव भक्ती पाया

पंढरी पंढरांची पाया

             भीमा तटी उभा राया

पांडुरंग पंढरीशा

              जगदाधार जगाधिशा

किर्ती तुझी अशी गाया

              निगमागमे उभी राया

स्फूरवा स्फूर्ती पंढरा या

              पंढरपूरी किर्ती गाया

कीर्तन किर्तवे गणगणराम

              सिता सितापती सीताराम ।।५।।


वंदितो विठू विठूराणा

          धरुनी भाव भक्ती चरणां

चरणी चंद्रभागा गंगा

           उधळे भक्तीरस गंगा

अर्पितो अर्घ्य पांडुरंगा 

          रंगवा दासा पांडू रंगा

दासा दास्य भक्ती द्यावी

          भक्ती गाणी वाणी गावी

वृत्ती हर्षून नाचावी

         नाचून कथा कथन व्हावी

कथवे कथा  श्रीगणगणराम

         सिता सितापती सीताराम ।।६।।


वंदितो जगदंबा आई

           पदरी पंढरास घेई

कर्णी कर्णफुले शोभे

           नथनी नाकामधे लोभे

शालू हिरवा हिरवाळी

           शोभै लाल टीळा भाळी

कांती अंगी अंगीराजे

            नयनी रामकृष्ण राजे

कृपाळू कृपावंत व्हावी

           भक्ती गाणी वाणी गावी

गावून गाववा गणगणराम

           सिता सितापती सीताराम।।७।।


वंदितो ज्ञानी ज्ञानेश्वरा

          ज्ञानयोगी योगेश्वरा 

शुष्क ज्ञान ज्ञानी वदती

          कल्प कल्पना करताती

वाद वादवे वेदांती

          वाच्य वाच्यवे उच्चरती

वाच्य वाच्यता करण्यासी

          ब्रम्ही ब्रम्ह मिळविण्यासी

ग्रंथ ग्रंथीला असा जसा

          कृष्ण सांगतो कथा जसा

सांग सांगती गणगणराम

          सिता सितापती सीताराम।।८।।


विनवितो ज्ञानेश्वरी आई

          पंढरी पंढराया नेई

पंढरी पंढ पंढाया या

          निवृत्ती वृत्ती दावाया या

पंढ सोपा सोपानाया

          भजनी भजन म्हणाया या

नाम जप जपवाया या

          गुरुपूजन पुजवाया या

गुरुवंदन वंदनाया या

          सद्गुरू सांग सांगाया या

सांगून सांगे गणगणराम

          सिता सितापती सीताराम ।।९।।


वंदितो भगवती भागवता

           शुकदेवांची रसरसता

रस रसलेली हरी कथा

           हरते जीव जीवनाची व्यथा

वंदितो नाथा एकनाथा 

           जग,जगव्यापी,जगन्नाथा

भागवत रस रसवाया या

           रसना रसी रसाया या

रसना रास कराया या

           रसना नाच नाचाया या

नाचूनी नाचवे गणगणराम

           सिता सितापती सीताराम ।।१०।।


वंदितो तुका तुकारामा

           अभंग अभंग तुझा रामा

नयनी विठ्ठल -विठू आई

           वृत्ती नाचू नाचू गाई

विणा विणकरी करी चिपळ्या

           शब्द ब्रम्ह उधळे उधळ्या

शब्द ब्रम्ह पुरवाया या

            रचना वाक्य कराया या

किर्तनी रंग उधळाया या

           नम्र भाव शिकवाया या

नमूनी नमितो गणगणराम

            सिता सितापती सीताराम ।।११।।


वंदितो कुलस्वामिनी माता

           पोखरणी धरजल माता

जग, जगव्यापी, जगन्माता

           " गांधी " सुगंधी करे माता

गंध सुगंध उधळाया या

            भाव प्रफुल्ल वदाया या

आनंद रस वर्षाया या

             चातक मन हर्षाया या

भव जंजाळ सुटाया या

              भाव गंगाळ भराया या

धरजल गंगा गणगणराम

             सिता सितापती सीताराम।।१२।।


वंदितो महा महामाई

           ठाकूरांची ठाकूराई

बाळा बाळा म्हणाया या

           बाळा कुरवाळाया या

सांजी झांज धराया या

           गुरू आरती आर्ताया या

गुरू स्त्रोत्री स्त्रोत्राया या

            गुरुवंदन वंदनाया या

भजनी भजन म्हणाया या

            सद्गुरू कथा कथाया या

कथवून कथवा गणगणराम

             सिता सितापती सीताराम।।१३।।


वंदितो देवा देवनाथा

           अंजनगावी नाथे नाथा

कृपासिंधु मनोहरनाथा

            वंदितो मने मनोहरनाथा

भक्ती काव्य दिव्य देवा

             द्यावी काव्य भक्ती देवा

मनोहर काव्य रचाया या

              रचूनी काव्य गावाया या

काव्य सरिता वहाया या

              सरिता काव्य अर्पाया या

अर्पूनी अर्पितो गणगणराम

              सिता सितापती सीताराम।।१४।।



वंदितो संत महंतांना 

         प्रज्ञावंत भाषकांना

देव भक्त धन धनिकांना

           पुण्यश्लोक महापुरुषांना

धर्म ध्वजा हाती धरण्या

            भक्ती भाव मनी भरण्या

भक्ती भाव भराया या

             भक्ती स्नान कराया या

गणगण गीत वदाया या

              बाळा सांभाळाया या

संभाळ सांभाळे गणगणराम

              सिता सितापती सीताराम।।१५।।


काव्य व्युत्पत्ती ची ना जाण

          काव्य कल्पनेचे ना भान

नाही कथा कथन केली

           नाही कथा मनन केली

जडमती, मूढमती, अज्ञानी

           काम्य कर्मरत् अभिमानी

दोषी दोष कर्म खाणी

           सरसावलो गाया गाणी

एकच आशा मनी असे

            सद्गुरू गणगण स्वामी असे

गणगण स्वामी गणगणराम

             सिता सितापती सीताराम।।१६।।


रघुपती राघव राजाराम

           पतित पावन सिताराम

       श्रीगणगणरामार्पणमस्तु


जगन्नाथ गांधी
मुंबई मालाड (प)
९७६९५१८८५८

9769518858

  All rights are reserved with writer of poem Mr Jagannath Maniklal Gandhi
Of Mumbai malad (west) having mobile number 97679518858


“हे लेखन लेखकाच्या परवानगीने प्रकाशित केले आहे.”
Sangita Bhalsing 
Ahilyanagar Maharashtra 


New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...