श्री रामनवमी निमित्त स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त
यात मी खालील रचना केल्या होत्या .(27चारोळ्या)
**************************
रावणाने केले सीताहरण
बंदिस्त अशोक वाटिका
दर्भ ठेविलें संरक्षणा
राम माझा पाठीराखा ..
**************************
रामजपाचा महिमा अपार
वाल्मीकि होई ऋषिसारखा ..
रामायण लेखनाचे भाग्य
राम माझा पाठी राखा ..
**************************
आन बान शान
रामासारखी राखा ..
आशीष घेऊन म्हणा
राम माझा पाठीराखा ...
***************************
चराचरात वसे श्रीराम
रामनाम असो सदा मुखा
शेवटचा श्वास बोलेल
राम माझा पाठीराखा ...
***********************
सीता ओलांडी रेखा
फसुन रावणाच्या नाटका
लक्ष्मण करी पाठलाग म्हणे
राम माझा पाठी राखा
************************
राम चाले वाटे
लक्ष्मण उचली कंटका
असा बंधू नाही कोठे
राम माझा पाठी राखा
**************************
सीता भुलली मृगाला
दिसे सुवर्णा सारखा
लक्षमण धावताना म्हणे
राम माझा पाठीराखा ...
***************************
रामायण लिहिले आधी
घडले नंतर बरका ...
वाल्मीकि सदा म्हणे
राम माझा पाठीराखा ...
************************
अटळ अग्निपरीक्षा
उरी धडधड लोका ...
अग्नित शिरली सीता म्हणे
राम माझा पाठीराखा ..
***************************
जातीभेदाच्या दंगली
पोलिस मारीती दंडूका ..
पळता प्राणभयाने म्हणे
राम माझा पाठीराखा ..
***************************
सीतेच्या तोलाचा नाही
राम दिलाचा हलका ..
गर्भार सीता म्हणे
राम माझा पाठीराखा ...
***************************
लेक आली लग्नाला
नाही पैसा अड़का
कशाला करू चिंता ?
राम माझा पाठीराखा ...
***************************
शेतकरी बाप माझा
पड़े दुष्काळ सारखा ..
दुर्दम्य इच्छाशक्तीन म्हणे
राम माझा पाठीराखा ..
***************************
राम सीता वनवासी
भरत रक्षी राम पादुका ...
राज भोग न घेता म्हणे
राम माझा पाठी राखा
**************************
वचन घेऊन कैकयीन
दशरथाला दिला धोका ...
शेवटच्या श्वासाला म्हणे
राम माझा पाठीराखा ...
***************************
वाल्या कोळयाला दिला
बायको पोरांनी धोका ..
मरा मरा म्हंणताना म्हणे
राम माझा पाठीराखा ..
***************************
शेतकरी आई बाप
गेले करुन पोरका ...
पण करील स्वप्न साकार
राम माझा पाठीराखा ...
***************************
बाप म्हणे लेकींना
लाडक्या खारका ..
ऋणात शिक्षण देईन
राम माझा पाठीराखा
**************************
सीता वनवासी दगडाची उशी
संवाद करी वृक्ष अन् लतिका ..
लवकुश बाळ वाढवी कशी ? म्हणे
राम माझा पाठीराखा ...
***************************
रामकुंडावर बिछाई
हाती सुवर्ण मुद्रिका
पाय चेपी सीतामाई, म्हणे
राम माझा पाठीराखा
***************************
वनात वाट पाहे शबरी
साथ असे वृक्ष लतिका ...
ऊष्टी बोरे रामास देई म्हणे
राम माझा पाठी राखा ..
**************************
अखंड राम नाम जपताना
वाल्या भोवती वारुळ मृत्तिका ...
रामायण लिहिताना म्हणे
राम माझा पाठीराखा ....
**************************
काळवंडला अंजनीसुत
शेपटीनं जाळली लंका ...
रावणा निरुत्तर करी म्हणे
राम माझा पाठीराखा ...
***************************
झेप घेई महाबली
घेऊन राम मुद्रिका ..
म्हणे समुद्र करीन पार
राम माझा पाठीराखा ...
***************************
संसारतापे पोळले मी
घेतेय सुख दुखा चा झोका ...
भवसागर जाईल तरून
राम माझा पाठीराखा...
***************************
रावणाचा सहोदर तो
होई श्रीरामाचा सखा ..
लंकाभेदी बिभीषण म्हणे
राम माझा पाठीराखा ..
**************************
दळिता कांडिता
बहिणाई सांगे लोका ...
लपे करमची रेखा
राम माझा पाठीराखा ...
**************************
सौ.संगिता भालसिंग
28/3/15
श्री राम नवमीच्या शुभेच्छा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.