बुधवार, २३ मार्च, २०१६

आई

🌹 ओवी गीतातील आई 🌹
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
ओवी गीत अणि जाते यांचे अतूट नाते दिसून येते .आजच्या यंत्र अणि
तंत्र युगात जाते अणि ओव्या हद्दपार
झाल्या आहेत ,पण अजूनही कुठे कुठे विशेषतः ग्रामीण भागात ओवी
गीते विवाह समारंभ, हळदी समारंभ
या निमित्ताने ऐकायला मिळतात ...
तेंव्हा त्यातील अविट गोडी जाणवते .
     ओवी गीते म्हणजेच स्त्री जन्माची
कहाणीच जणू ...! अशा ओवीतुन
तिचे अंतरंग उलगडत जाते ...!!
आपल्या जीवनातील विविध अनुभव
ती ओवीतुन मांडते ,सुख अणि दुःख
दोन्ही गाण्यात व्यक्त करते ...
अशाच काही ओव्या ....आई अणि
बालकाचे प्रेम ...!!
मूल नसलेली स्त्री किती दुःखी असते,
समाजात अणि कुटुंबात तिला मान
सन्मान नसतो , म्हणून ती म्हणते,
   ""वांझनी मेली बाई
   कुण्या गल्लीने तिला नेली
   लेकुरवाळी मेली
    उभ्या गल्लीला गर्दी झाली ...!!"
म्हणून बिचारी दुःखी स्त्री देवाला
नवस,अणि उपास तापास करू लागते,
" देवाच्या देवळात
नंदीला घाली माळ
मागते तान्हे बाळ "
शेवटी तिची तपश्चर्या फळाला येते,
परमेश्वर तिच्यावर प्रसन्न होतो
अणि तिच्या पदरात एक सुंदर,
गोंडस बाळ देऊन तिला धन्य करतो .
मग तिचा आनंद गगनात मावेनासा
होतो ,ती म्हणते,
" तान्हे ग जन्मले
भाग्य ग उदेले
आनंदी बुडाले
जग सारे "
तिला आपल्या बाळाचे किती कौतुक,
अणि आवड ...
"मला हौस मोठी
तान्हे बाळ ते असावं
दोन मुठीत धरावं
नेसू माझं ...!!"
किती सुंदर दृश्य मनात रंगविते पहा
एक सुंदर गुटगुटित बाळ आईचे
नेसू म्हणजे साडीचा पदर धरून
उभे आहे अणि आईला म्हणते की
मला तू उचलून घे ...!!
"लांब लांब केस
वेणी येते गोफाची
मला हौस लेकाची
सई बाई "
पुरुषप्रधान संस्कृती या ओवीतून
दिसते ,मुलगा वंशाचा दिवा ही रीत
,समाज रीत ती जाणून आहे .
एकुलत्या एक मुलावर ती आतोनात
प्रेम करते, जीव ओवाळून टाकते .
"एकुलता एक
म्हणू नको सई बाई
बाळ राजस ग माझा
मला शंभराच्या ठायी ...!!"
बाळाचे कौतुक किती करू अणि
किती नको असे तिला होते ...
" पाळण्याच्या वरी
विचित्र पाखरू
नक्षत्र लेकरु
तान्हे बाळ ...!!"
"चंद्राची वाढे कला
तसे बाळाचे बाळसे
लावण्या उणे नसे
अनुमात्र ...!!
असे सुंदर बाळ दिसामासानी वाढू
लागते, रांगू लागते, खेळू लागते ..!
त्याच्या खोड्या वाढू लागतात ..
"रांगुनी खेळूनि
बाळ उंबर्यात बसे
सोन्याचा ढिग दिसे
बाळ माझे ...!!"
किती सुंदर कल्पना ..आईला बाळ
सोन्या सारखे दिसते ...!!
"गोऱ्या गालावर
लाल शोभतो मुलामा
गोड हसशी गुलामा
तान्हे बाळ ...!!"
खुदुखुदू हसणारे बाळ पाहून ती
माऊली आपले सारे कष्ट विसरते,
त्याच्या हास्यात आनंद शोधते ...!
खोडकर बाळाच्या खोड्या किती
पहा ..!! शेजारी जाऊंन खोड्या
करणे हा त्याचा छंद ...!! मग
शेजारनी बरोबर वाद होणे ठरलेले ...
"शेजीने दिली शिवी
वेचुन घेतली
जाई जुईची
कळी मानली ...""
"शेजीने दिली शिवी
लागली माझ्या जीवी
आयुष्याची तुला ओवी
तान्हे बाळा ...!!"
अशी अमृत तुल्य आई आपल्याला
अशा ओवी गितातून सापडते ...!!
आपले सुख दुःख ,वेदना,अनुभव
ओवी मधे मांडून जीवन सुसह्य
करते ....!!
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
spsfun.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲